' नेहरूंचा मुस्लिमांना खडा सवाल : “तुम्हाला हिंदुस्थान ‘अजूनही’ तुमच्या मालकीचा वाटतो का?” – InMarathi

नेहरूंचा मुस्लिमांना खडा सवाल : “तुम्हाला हिंदुस्थान ‘अजूनही’ तुमच्या मालकीचा वाटतो का?”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४८ साली अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला भेट दिली होती. २४ जानेवारी १९४८ रोजी त्यांनी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या पदवीदान समारंभाच्या वेळी एक भाषण दिले होते.

त्या भाषणात त्यांनी मुस्लिमांना उद्देशून एक प्रश्न विचारला होता. त्या भाषणाचे हे भाषांतर देत आहोत.

शिक्षण हे माणसाचे विचार व दृष्टिकोन मुक्त करण्यासाठी आहे.

“मी अलिगढ व ह्या विद्यापीठात बऱ्याच काळाने परत आलो आहे. माझ्यात व ह्या विद्यापीठात काळाने तर अंतर निर्माण केले आहेच, तसेच येथील दृष्टीकोनामुळे सुद्धा माझ्यात व ह्या जागेत अंतर निर्माण झाले आहे.

 

aligadh-uni-inmarathi
openthemagazine.com

तुम्ही, किंवा आपण सगळेच आज कुठे आहोत ह्याचा मला अंदाज येत नाहीये. आपण सगळ्यांनीच दु:ख व त्रास सहन केला आहे. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांच्या मनात आज संशय व भ्रम निर्माण झाला आहे.

वर्तमानात अस्थिरतेचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे व भविष्य आणखी अनाकलनीय, गूढ व अभेद्य स्वरूपाचे असेल.

असे असले तरीही आपल्याला ह्या वर्तमानाला सामोरे जाऊन आपले भविष्य आपल्याच हातांनी घडवायचे आहे. आपल्यातील प्रत्येकाने स्वत:चे स्थान, स्वतःचा दृष्टिकोन काय आहे तसेच आपण कुठल्या गोष्टीला पाठिंबा देतो आहे ह्याचा विचार केला पाहिजे.

भविष्यावर पक्का विश्वास ठेवला नाही तर आपल्या वर्तमानातच आपण कुठल्याही उद्दिष्टयाशिवाय फिरत राहू आणि आपल्या आयुष्यालाही काही निश्चित ध्येय मिळाल्याशिवाय जगण्यात अर्थ उरणार नाही.

तुमच्या उपकुलगुरूंनी मला येथे येण्याचे दिलेले निमंत्रण मी अतिशय आनंदाने स्वीकारले कारण मला तुम्हा सर्वांना भेटायचे होते.

मला जाणून घ्यायचे होते की तुमच्या मनात काय चालले आहे, तसेच माझ्या मनातल्या गोष्टी सुद्धा तुमच्याशी शेअर करायच्या होत्या.

आपले विचार संपूर्णपणे एकमेकांना पटले नाही तरी आपण एकमेकांना समजून घेतले पाहिजे. आपले विचार भिन्न असू शकतात हे आपण स्वीकारले पाहिजे.

आपल्याला एकमेकांचे काय पटते व काय पटत नाही हे आपण जाणून घेतले पाहिजे.

 

NEHRU_inmarathi
awaam.net

भारतातल्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तीसाठी मागचे सहा महिने फार दु:खाचे व त्रासाचे होते. ह्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे लोकांच्या भावनांचा झालेला अपमान होय.

हे सर्व वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींसाठी जास्त त्रासाचे होते.

परंतु माझ्या मनात वारंवार हा विचार येतो की हा अनुभव सर्व तरुण व आयुष्याची सुरुवात करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी कसा होता? त्यांना ह्या सगळ्याबद्दल काय वाटते?

देशातील तरुणांनी हे संकट व विनाश बघितला आहे, अनुभवला आहे. तरुण लोक संवेदनाक्षम असतात पण ते स्थितिस्थापक असल्याने ह्या सगळ्यातून लवकर बाहेर पडतील.

परंतु ह्या सगळ्याचा परिणाम मात्र आयुष्यभर त्यांच्या मनावर कोरलेला असेल. आपण जर ताकदीने, शहाणपणाने विचार करून योग्य रीतीने वागलो, तर कदाचित ह्या सगळ्याचे आपल्या मनावर झालेले वाईट परिणाम पुसून टाकण्यात यशस्वी सुद्धा होऊ शकतो.

माझ्याकडून मी हेच सांगू इच्छितो की हे सगळे झाले असले तरीही माझा भारताच्या चांगल्या भविष्यावर संपूर्ण विश्वास आहे. जर मला हा विश्वास नसता तर माझ्यासाठी चांगल्या प्रकारे काम करणे शक्यच झाले नसते.

आता घडलेल्या घटनांमुळे जरी माझ्या जुन्या स्वप्नांपैकी काहींचा चुराडा झालेला असला तरीही माझे मुख्य ध्येय बदललेले नाही आणि ते बदलण्याचे काही कारण सुद्धा मला दिसत नाही.

माझे ध्येय म्हणजे असा स्वतंत्र भारत घडवणे आहे, जिथे सर्वांना समान संधी मिळेल, लोकांचे आदर्श उच्च असतील, भिन्न संस्कृतींचे प्रवाह एकत्र येऊन आपल्या लोकांसाठी एका मोठा प्रगतीचा व विकासाचा प्रवाह तयार होईल. असा आदर्श भारत घडवण्याचे ध्येय माझ्या पुढ्यात आहे.

 

india-flag-inmarathi
india.com

मला भारताचा अभिमान वाटतो. हा अभिमान केवळ माझ्या देशातील सुवर्ण भूतकाळाचा व संस्कृतीचा नाही तर देशातील लोकांच्या खुल्या विचारांचा व विशाल हृदयाचा सुद्धा आहे.

कारण वेळोवेळी ह्या देशाच्या संस्कृतीने आपली कवाडे उघडी ठेवून लांबून आलेल्या लोकांना तसेच त्यांच्या परंपरांना आपल्यात स्थान दिले आहे.

अजूनही आपली संस्कृती सर्वसमावेशकता निभावते आहे. भारताची ताकद ह्या दोन गोष्टींत आहे.

एक म्हणजे त्याची स्वतःची प्राचीन सुवर्ण परंपरा व संस्कृती व दुसरी म्हणजे दुसऱ्या संस्कृतींच्या चांगल्या गोष्टींना आपल्या संस्कृतीमध्ये स्थान देणे ही होय.

आपल्या देशाची संस्कृती बाहेरील आक्रमणामुळे कोलमडून पडेल अशी कधीच नव्हती. उलट ती सामर्थ्यवान होती तसेच स्वतःला परकीय आक्रमणापासून वेगळी ठेवण्याइतकी हुशार सुद्धा होती.

म्हणूनच भारताच्या इतिहासात सतत संश्लेषण होत आहे. तसेच अनेक राजकीय बदल घडले असले तरी विविधतेत एकता असलेल्या ह्या संस्कृतीवर फारसा परिणाम झालेला नाही.

मी असे म्हटले की मला माझ्या सांस्कृतिक वारशाचा तसेच पूर्वजांनी देशाला जी बौद्धिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळवून दिली त्याचा अभिमान वाटतो.

तुम्हाला आपल्या ह्या भूतकाळाबद्दल काय वाटते? तुम्ही स्वत:ला ह्या संस्कृतीचे वारसदार मानता का? तसेच जे माझे आहे तेच तुमचे आहे म्हणून तुम्हाला ह्याचा अभिमान वाटतो का?

की तुम्हाला ही संस्कृती एलियन वाटते व तुम्ही ती न समजून घेताच परंपरा पार पाडता? किंवा तुम्हाला ह्या अफाट खजिन्याचे आपण वारसदार आहोत म्हणून स्फुरण वाटते का?

मी तुम्हाला हे प्रश्न विचारतो आहे कारण गेल्या काही वर्षात काही शक्ती लोकांची मने दुसरीकडे, वाईट गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच आपल्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करीत आहेत.

मी एक हिंदू आहे व तुम्ही मुस्लिम आहात. आपले धर्म व धार्मिक श्रद्धास्थाने भिन्न आहेत. ज्या संस्कृतीचा वारसा मला लाभला आहे त्याच संस्कृतीचे तुम्हीही वारसदार आहात.

आपल्या भूतकाळाच्या आपल्याला एकत्र बांधून ठेवलेले आहे.

मग वर्तमानामुळे किंवा भविष्यामुळे आपल्या मनांमध्ये फूट का पडावी? राजकीय बदलांचे काही परिणाम होतात. पण मुख्य बदल घडला आहे तो देशाच्या भावनांमध्ये व दृष्टिकोनामध्ये!

गेल्या काही महिन्यात किंवा वर्षांत घडलेल्या घटनांमध्ये मला राजकीय बदलांचा त्रास झाला नाही. पण लोकांच्या मनात व भावनांमध्ये जो भयावह बदल घडला आहे त्याने आपल्यात एक भिंत उभी करून ठेवली आहे.

भारताचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न हा गेल्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक प्रक्रियेच्या नेमका उलट होता. असे घडले कारण आपण इतिहासाच्या प्रवाहाच्या विरुद्ध गेलो आणि ह्याच संकटाने आपल्याला पराभूत केले.

आपण भूगोलाशी किंवा इतिहास घडेल अशा प्रभावशाली ट्रेंडशी खेळ करू शकत नाही. आणि आपण जर हिंसा व द्वेषाच्या आहारी गेलो तर ते आणखीनच वाईट आहे.

अतिशय अनैसर्गिकदृष्ट्या पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. तरीही तो अनेक लोकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करतो. ह्या घटनेने आपले नुकसानच झाले आहे पण आपण ते स्वीकारले आहे.

आपला वर्तमानातील दृष्टिकोन काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे.

पाकिस्तानला कोंडीत पकडून, नष्ट करून परत भारतात आणावे अशी अनेक जणांची इच्छा आहे. भारत व पाकिस्तानने एकत्र यावे हे अनिवार्य आहे, नाहीतर दोघेही एकमेकांचे विरोधक होतील.

ह्यात कुठलाही सुवर्णमध्य काढता येण्यासारखा नाही कारण आपण एकमेकांना अलिप्त शेजारी म्हणून वर्षानुवर्षे ओळखतो आहे.

सद्यस्थितीत भारताने आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे क्रमप्राप्त आहे. ह्याचा अर्थ पाकिस्तानला कोंडीत पकडणे असा होत नाही. जबरदस्ती करणे हा उपाय होऊच शकत नाही. पाकिस्तानचे नुकसान केल्याने भारतालाही भविष्यात नुकसानकारक ठरू शकते.

जर आपल्याला पाकिस्तानचे नुकसानच करायचे असते तर आपण फाळणीला मान्यता का दिली?

ते सर्व फाळणीच्या आधीच करणे जास्त सोपे नव्हते का?

 

indo-pak-inmarathi
thewire.in

इतिहास बदलणे कोणालाच शक्य झाले नाही. पाकिस्तानने सुरक्षित व विकसित होणे हे भारताच्या फायद्याचेच आहे कारण अश्या चांगल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे नंतर आपल्याच फायद्याचे ठरणार आहे.

जरी आता मला भारत व पाकिस्तान जोडण्याची संधी कुणी दिली तर मी ती अमान्य करेन कारण पाकिस्तानचे प्रश्न ओढवून घेणे मला जमणार नाही. माझ्याकडे माझ्या देशातले असलेले प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी आहे.

पाकिस्तानशी मैत्रीचा प्रस्ताव हा इतर देशांच्या मैत्रीप्रमाणेच शांततेत व एक नॉर्मल प्रोसेस म्हणून यायला हवा.

माझे पाकिस्तानशी बोलणे झाले आहे. तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहिला असेल की आमचा ह्याबाबतीत काय दृष्टिकोन आहे? तुमच्या मनात सध्या काय करावे, काय करू नये, आपला पाठिंबा कोणाला असावा ह्याचा संभ्रम निर्माण झाला असेल.

आपल्यापैकी सर्वांनाच आपल्या मूलभूत निष्ठेबाबत स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे.

आपण अशा राष्ट्राची कल्पना करतो का जिथे सर्व धर्मांची व सर्व प्रकारच्या विचारांची माणसे असतील व ते राष्ट्र धर्मनिरपेक्ष असेल? की आपण अशा धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना करतो जिथे इतर धर्माच्या लोकांना काहीही स्थान नसेल?

हा खरे तर एक विचित्र प्रश्न आहे कारण धर्माधिष्ठित राष्ट्रे ही संकल्पना ह्या जगाने काही शतकांपूर्वीच सोडून दिली आहे. धर्माधिष्ठित राष्ट्र ह्या संकल्पनेला आधुनिक माणसाच्या विचारांत सुद्धा स्थान नाही. तरीही आज भारतात हा प्रश्न उभा राहिला आहे.

आपल्यापैकी काही लोकांना अजूनही धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना योग्य वाटते. असे असले तरीही आताच्या आधुनिक जगात असे होणे शक्य नाही.

भारताबद्दल बोलायचे झाल्यास मी निश्चितपणे सांगू शकतो की आपण जगाप्रमाणेच धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणूनच पुढे जाणार आहोत.

आता कितीही संशयाचे वातावरण निर्माण झालेले असले तरीही भविष्यात भारत हा सर्व धर्माच्या लोकांना समान आदर देणारा व राष्ट्रीय हित जोपासणारा एक देश असेल. “वन वर्ल्ड” होण्याकडे जगाचा प्रवास होईल.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना हे सगळे सध्या असाध्य वाटेल तरीही आपण हेच ध्येय पुढे ठेवून चालले पाहिजे.

आपण खुल्या मनाने व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. संकुचित विचारसरणीच्या लोकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कम्युनिझमची विषारी फळे आपण चाखली आहेत. त्यामुळे त्याला चाप बसला पाहिजे.

माझी जबाबदारी ही आहे हा कम्युनिस्ट दृष्टिकोन कुठेही दिसता कामा नये, शैक्षणिक संस्थांमध्ये तर नाहीच नाही.

शिक्षण हे माणसाचे विचार व दृष्टिकोन मुक्त करण्यासाठी आहे, ते विचारांच्या तुरुंगात बंदिस्त करण्यासाठी नाही. हे विद्यापीठ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून तसेच बनारसचे विद्यापीठ हिंदू युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते हे दोन्ही मला मान्य नाही.

 

banaras-aligadh-uni-inmarathi
indiatoday.com

ह्याचा अर्थ असा नाही की विद्यापीठात कुठल्या विशिष्ट धर्माचे व संस्कृतीचे शिक्षण दिले जाऊ नये.

माझी अशी इच्छा आहे की ह्या सर्व प्रश्नांचा तुम्ही विचार करावा आणि तुम्ही ह्यावर निष्कर्ष काढावेत. तुम्ही स्वतःला ह्या देशात बाहेरचे समजू नका.

तुम्ही इतरांप्रमाणेच संपूर्ण भारतीय आहात आणि भारतात जे आहे त्यावर तुमचाही हक्क आहे.

परंतु हक्क मिळवताना कर्तव्ये बजावायलाही विसरू नका. कर्तव्ये पार पाडल्यानंतरच हक्क मिळतो हे लक्षात ठेवा.

मी तुम्हाला स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून ह्या देशात इतरांबरोबर महत्वाचा वाटा उचलण्याचे आवाहन करतो. तुम्ही यश आणि अपयश ह्या दोन्हीचे वाटेकरी व्हावे असे मी आवाहन करतो.

आताचे दु:ख आणि त्रास हळूहळू दूर होईल. आपल्यापुढे वाढून ठेवलेले भविष्य महत्वाचे आहे. तरुणांसाठी तर भविष्य सर्वात महत्वाचे आहे जे तुम्हाला खुणावते आहे. ह्या भविष्याकडे तुम्ही कसे बघाल?”

(मूळ इंग्रजी भाषण येथे वाचता येईल.)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?