' नवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….! – InMarathi

नवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या देशात सगळीकडे उत्साहाचे व धामधुमीचे वातावरण आहे. देशातील हिंदू लोक आदिशक्तीची उपासना करण्यात मग्न आहेत. सगळीकडे देवीच्या शांत, सौम्य, रौद्र अशा सर्व रूपांची पूजा केली जात आहे.

 

navratri-inmarathi
indianaarti.blogspot.com

 

नवरात्री म्हणजे अनिष्टावर शुभ शक्तीचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. सध्या बाजार रंगीबेरंगी कपडे, विविध वस्तू व पूजासाहित्याने नटला आहे.

अनेक लोक श्रद्धायुक्त अंतःकरणाने नऊ दिवस उपवास करून मन शांत होण्याचा अनुभव घेतात.

घराघरांत घट बसतात. देवी अंबाबाई जगदंबेची विविध रूपात पूजा बांधली जाते. अलंकार, फुले ह्यांनी नटलेले तेजपुंज देवीमातेचे दर्शन घेतल्याने मनातील सर्व अंधकार नष्ट झाल्याची भावना होते.

जसे महाराष्ट्रात घट बसवून देवीचे नवरात्र साजरे होते तशीच पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा साजरी केली जाते. बंगाली बांधवांसाठी दुर्गापूजा हा महत्वाचा उत्सव आहे. ते संबंध वर्षभर दुर्गापूजेची आतुरतेने वाट बघत असतात.

अशीच देशाच्या विविध भागात विविध प्रकारे नवरात्री दरम्यान देवीची उपासना केली जाते.

नवरात्री उत्सव साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. परंतु ह्या सर्व कथांचे सार एकच आहे ते म्हणजे दुष्ट शक्तींवर सत्याचा व पवित्र शक्तीचा विजय होय.

उत्तर भारतात नवरात्र आणि दसरा साजरा करण्याचे कारण म्हणजे श्रीरामाने रावणाचा वध करून असुर शक्तीचा संहार केला व जगाला रावणाच्या अत्याचारांपासून मुक्त केले. रावणाने अपहरण करून बंदिस्त करून ठेवलेल्या सीतामातेला मुक्त केले.

श्रीराम व रावणामध्ये भीषण युद्ध झाले. अखेर रावणाच्या बेंबीत बाण मारून श्रीरामाने रावणाचा वध केला. ही सगळी कथा नवरात्रीच्या सुमारास उत्तर भारतात “रामलीला” सादर करून सांगितली जाते.

 

ramleela-inmarathi
stabroeknews.com

 

ठिकठिकाणी रामलीलेचे आयोजन केले जाते. नवरात्रीची सांगता दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला रावणाचे तसेच रावणाचा मुलगा मेघनाद व भाऊ कुंभकर्ण ह्यांच्या पुतळ्यांचे दहन करून केली जाते.

नवरात्री साजरी करण्यामागे दुसरी कथा दुर्गामातेसंदर्भात सांगितली जाते. नवरात्रीमध्ये भारताच्या पूर्व व ईशान्य भागात दुर्गादेवीची पूजा करून साजरी केली जाते.

ह्या बाबतीतली कथा अशी की महिषासुर हा दैत्य तिन्ही लोकांत अत्याचार करीत होता. त्याला अडवणे कुणालाही शक्य होत नव्हते. अखेर जगदंबेने दुर्गादेवीचा अवतार घेऊन महिषासुराचा अंत केला. ह्या कथेचे देवी माहात्म्यात वर्णन केले आहे.

दक्षिण भारतात नवरात्रात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि त्यांच्या वेगवेगळ्या असुरांवर विजयानिमित्त उत्सव साजरा केला जातो.

उत्तर भारतात रामलीलेमध्ये दहा दिवसांचा मेळा आयोजित केला जातो. ह्यात कलाकार संपूर्ण रामायण सादर करतात. हा मेळा देशात अनेक शहरांत आयोजित करण्यात येतो व लोक आपल्या मित्रमंडळी व कुटुंबासह ह्या मेळ्याला भेट देतात.

ह्या मेळ्यात विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल्स असतात, डान्स असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या राइड्स असतात. हा मेळा म्हणजे भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. ह्या नऊ दिवसांत घरातील मोठी माणसे पोथ्यांचे वाचन करतात.

बंगालमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवामध्ये ठिकठिकाणी पंडाल लावले जातात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीचे स्मरण केले जाते.

 

durgapuja-bengal-inmarathi
reacho.in

 

तसेच देवी व महिषासूर ह्यांच्यात झालेल्या युद्धाचे सुद्धा स्मरण केले जाते. ह्या दिवशी श्राध्दपक्षाची (पितृपक्षाची) समाप्ती होते. श्राध्दपक्षात पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण केले जाते.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पंडाल व घराघरांत देवीचे आगमन होते. त्यानंतरच्या दिवशी देवीची साग्रसंगीत महापूजा होते. विजयादशमीच्या दिवशी देवीच्या मूर्तींचे विसर्जन होते. ह्या उत्सवादरम्यान देवीचे नऊ अवतार दाखवून त्यांची पूजा केली जाते.

ह्या उत्सवादरम्यान श्रीराम व दुर्गादेवी ह्यांच्यासह लक्ष्मीदेवी, सरस्वतीदेवी, श्रीगणेश, शिवशंकर, कार्तिकेय आणि श्रीकृष्णाची पूजा करण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. विद्येची देवता म्हणून सरस्वतीदेवीचे पूजन केले जाते. तसेच सरस्वतीपूजनाच्या दिवशी आयुधांची पूजा करण्याचीही पद्धत आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोगवा मागण्याची पद्धत आहे. घराघरात घट बसतात. देवीमहात्म्याचे पठण घराघरात केले जाते. देवीचा गोंधळ घातला जातो. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. दसऱ्याला सीमोल्लंघन करून सोने लुटले जाते.

आप्तस्वकीयांना भेटून, मित्रमंडळींच्या घरी जाऊन मोठ्या माणसांना आपट्याची किंवा शमीची पाने सोने म्हणून देण्याची पद्धत महाराष्ट्रात बघायला मिळते.

 

dasara-inmarathi
blog.pradeep.net.in

 

दसऱ्याला घराघरात तोरण बांधून शुभ कार्याची सुरुवात होते कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. ह्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात किंवा नव्या वस्तूंची खरेदी आवर्जून केली जाते.

रावणाच्या प्रतिमेचे दहन करून नवरात्री उत्सवाची सांगता होते. गुजरातमध्ये रास गरबा व दांडिया खेळतात. घटाभोवती रास गरबा खेळला जातो. अश्या प्रकारे देशभरात नवरात्र उत्सव अतिशय मनोभावे व उत्साहाने साजरा केला जातो. हीच भारतीय संस्कृतीची विविधतेतील एकता आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?