'ओला/उबर बुक करण्याआधी, हा एक अत्यंत वाईट अनुभव लक्षात असू द्या...

ओला/उबर बुक करण्याआधी, हा एक अत्यंत वाईट अनुभव लक्षात असू द्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अनय जोगळेकर

===

२००९ साली सिलिकॉन वॅलीमध्ये जन्मलेली उबर अल्पावधीतच सुमारे ४० देशांतील ६५० शहरांत सेवा पुरवू लागली. टॅक्सी चालकांची मनमानी, मीटरहून जास्त दर आकारणी आणि प्रवाशांच्या; खास करून महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्नांमुळे ग्रस्त असलेल्या या क्षेत्राला उबरच्या रूपाने जादूचा दिवाच सापडला.

एकाही गाडीची मालकी नसलेली उबर, अल्पावधीतच जगातील सर्वात मोठी टॅक्सी सेवा बनली. प्रचंड तोटा सहन करत असूनही जागतिक गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे उबर जगातील १० मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली.

 

uber-india-inmarathi


भारतातही उबरने अल्पावधीत बस्तान बसवून ओलासमोर आव्हान उभे केले. पण पारंपारिक टॅक्सी सेवेतल्या ज्या वाईट गोष्टींना उबर पर्याय द्यायला निघाली.

त्यातील अनेक वाईट गोष्टी आता उबरचाही भाग झाल्या आहेत. मी स्वतः गेली काही वर्षं काळी-पिवळी टॅक्सी वापरणे सोडूनच दिले आहे. रात्री-अपरात्री प्रवास करतानाही ओला आणि उबरवर डोळे झाकून विश्वास ठेऊन प्रवास करतो.

 

ola uber InMarathi

 

पण एखादा अनुभव डोळे खाडकन उघडून जातो.

मध्यंतरी असेच झाले. दोन आठवड्यांच्या युरोप ट्रिपनंतर रात्री आडीच वाजता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो होतो. बाहेर पडताना साडे तीन वाजेपर्यंत घरी (ठाण्याला) पोहचेन या आशेने उबर बुक केली खरी, पण एका वेगळ्याच नाट्याला सुरूवात झाली.

पहिले बुकिंग ड्रायव्हरने कॅन्सल केले, तेव्हा उबरने महंमद रिझवान नावाचा दुसरा ड्रायव्हर सुचवला. आम्ही पिक-अप पॉइंटला आलो आहोत हे सांगायला त्याला फोन केला असता,

“गाडीत सीएनजी भरायचाय, काय करायचे?”

असा प्रतिप्रश्न त्याने केला. टॅक्सी चालकांना “नाही” म्हणायचे असते तेव्हा ते सीएनजी संपलाय असे सांगतात, असा माझा अनुभव असल्यामुळे मी त्याला राइड कॅन्सल करायला सांगितले. त्यावर तो म्हणाला की, ५-१० मिनिटे थांबायची तयारी असेल तर आपण अंधेरीला गॅस भरुया.

अंधेरीला विमानतळासमोरच दोन पेट्रोल पंप असल्यामुळे मी चालेल म्हणालो. गाडी घेऊन आलेला ड्रायव्हर प्रोफाइलमधील माणसापेक्षा वेगळा आणि पोरसवदा होता. त्याने अरबांसारखा पायघोळ अंगरखा (धोब) घातला होता. कुर्ता-पायजमा आणि जाळीदार टोपी घातलेले ओला-उबर ड्रायव्हर बघायची सवय झाली आहे. पण पायघोळ अंगरखा घातलेला ड्रायव्हर पहिल्यांदाच पाहिला.

 

nazi-inmarathi

 

गाडीची अवस्था फार चांगली नव्हती. सामान ठेवण्यासाठी डिकी उघडायला गेलो तर डिकी उघडत नाही, सामान पाठच्या सीटवर ठेवा असे त्याने सांगितले.

चार बॅगा पाठी ठेऊन त्यांच्याबाजूला माझी पत्नी बसली. मी पुढे बसलो.

विमानतळापासूनच ड्रायव्हरच्या शार्प टर्न घेणे, अचानक वेग वाढवणे, खड्यांमधून गाडी काढणे अशा स्टंटबाजीला सुरूवात झाली.

दोन मिनिटे दुर्लक्ष झाले तर त्याने गाडी घाटकोपर ऐवजी पश्चिम द्रुतगती मार्गाकडे वळवल्याचे लक्षात आले.

 

Ola-Uber-1 InMarathi

 

असे का केले असे विचारले असता त्याने अंधेरीला गॅस भरायचा असल्याचे सांगितले. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील एखादा पंप असावा असे वाटून मी दुर्लक्ष केले तर त्याने हायवे सोडून गाडी सर्विस रोडवर घेतली.

रात्री तीन वाजता, निर्मनुष्य सर्विस रोडवर दोन-चार जणांना गाडी थांबवून प्रवाशांना लुटणे सहज शक्य होते.

त्यामुळे सावध होऊन मी त्याला त्याबाबत विचारले असता,

हायवेपेक्षा सर्विस रोडवर कमी ट्राफिक असते त्यामुळे आपण सटकन निघून जाऊ

असे त्याने सांगितले.

नंतर त्याने रेल्वे-लाइन ओलांडून गाडी अंधेरी पश्चिमेला वळवली.

मग मात्र मी उबर अ‍ॅपवरचे सुरक्षा सेटिंग उघडून ड्रायव्हरबद्दल तक्रार करता येईल का ते तपासू लागलो. मला राइड स्टेटस शेअर करणे किंवा १०० वर फोन करणे असे दोनच पर्याय दिसले.

 

uber-inmarathi

 

हे दोन्ही पर्याय चालण्यासारखे नव्हते. त्यामुळे सावधगिरी म्हणून मी आमच्या बिल्डिंगच्या वॉचमनला फोन करुन आम्ही अर्ध्या तासात पोहचत आहोत, गेट उघडून ठेव असे फोन करुन सांगितले.

अंधेरी पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावरील पेट्रोल पंप बंद होता. तो गाडी आणखी पुढे घ्यायचा विचार करत होता. तेव्हा मात्र मी त्याला खडसावून विमानतळासमोरील पेट्रोल पंपावर गॅस भरायला सांगितला.

हा पेट्रोल पंपवाला माझ्या ओळखीचा आहे असे तो म्हणाला. तो काय तुला गॅस स्वस्तात देणार आहे का असे विचारले असता त्याने गाडी निमुटपणे विमानतळाकडे घेतली.

 

petrol-station-InMarathi

 

विमानतळासमोरच्या पेट्रोल पंपावर जाऊन गॅस भरायला थांबला असता, त्याने आम्हाला गाडीतून उतरायला सांगितले. या संधीचा फायदा घेऊन मी त्याचे आणि गाडीचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले.

गॅस भरायला जाण्यापूर्वी आणि नंतर असा दोनदा तो रस्ता चुकला किंवा त्याने तो मुद्दामून चुकवला.

अखेरीस जवळ जवळ १० किमी जास्त अंतर कापून, पाऊण तास उशीराने आणि प्रचंड मनस्ताप सहन करुन आम्ही सव्वा चारच्या सुमारास ठाण्याला पोहचलो.

उबरने सांगितलेल्या ३५० ऐवजी ५०३ रुपये बिल झाले. त्यामुळे घरी पोहचल्यावर उबरकडे तक्रार करायचे ठरवले.

 

uber-inmarathi

 

तक्रार करुन झालेला प्रकार सांगण्याची सोय नसल्यामुळे नाईलाजाने तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी एक निवडावा लागतो. त्यामुळे ड्रायव्हरने अनियोजित थांबा घेतला या सदराखाली तक्रार केली.

दोन तासांत उबरचे उत्तर आले. त्यात त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आपण कसे कटिबद्ध आहेत हे सांगतानाच, तुमची राइड कॅन्सल झाल्यास उबर तुम्हाला पर्यायी ड्रायव्हर देते त्यामुळे कधीकधी असे (गॅस भरायला लागणे) होऊ शकते अशी सारवासारवी करणरे उत्तर दिले. तेव्हा मात्र माझा राग अनावर झाला.

त्यांना रिप्लाय करताना मी त्यांना फोटो पाठवले आणि लिहिले की, खरे तर मी पोलिसात तक्रारच करणार होतो, पण ड्रायव्हरचे वर्तन गुन्हेगारी स्वरुपाचे नव्हते म्हणून मी तक्रार करत नाहीये.

हा प्रकार तुमचे मुख्यालय असलेल्या अमेरिकेत झाला असता तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला सहन करावे लागले असते. त्यामुळे किमान माझ्याकडून घेतलेले जास्तीचे भाडे रद्द करा आणि प्रकरणाची नीट चौकशी करा.

त्यानंतर उबरकडून दोन वेळा फोन आला. पण जेट लॅगमुळे मी तो उचलू शकलो नाही. उबरकडून इ-मेल आली होती. आम्ही तुमचे अतिरिक्त भाडे रद्द करत आहोत. भविष्यात तुम्हाला या ड्रायव्हर सोबत प्रवास करावा लागणार नाही असा प्रयत्न राहील.

 

Ola-Uber-3 InMarathi

 

झाल्या प्रकाराबद्दल मला जेवढा त्या मुलाचा राग आला, त्यापेक्षा जास्त राग उबरचा आला.

या विषयाबाबत फेसबुकवर लिहिले असता त्यावर जवळपास शंभर प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी त्यांनाही अशाच अनुभवातून जावे लागल्याने उबर वापरणे बंद केल्याचे सांगितले. तर काहींनी अशा परिस्थितीत एकटी महिला किंवा ज्येष्ठ नागरिक काही करू शकणार नाहीत अशी हतबलता व्यक्त केली.

 

comments-inmarathi

 

मला असे वाटते की, जर असे प्रकार वारंवार होत असतील तर उबर आणि ओलासारख्या कंपन्यांकडून सरकारने काही विषयांचा खुलासा करुन घेणे आवश्यक ठरते. –

जर नोंदणीकृत गाडी एकापेक्षा अधिक ड्रायव्हर चालवत असतील तर त्या सगळ्यांची उबरकडे चारित्र्य प्रमाणपत्रासहित नोंद असते का?

त्यांची गाडी चालवण्याचे कौशल्य, ज्या शहरात गाडी चालवतात त्याबाबतची माहिती, ग्राहकांशी बोलण्यासाठी स्थानिक भाषा येणे, ग्राहकांशी सौजन्याने वागणे या गोष्टींची तपासणी होते का केवळ ग्राहकांनी दिलेल्या रेटिंगवर सगळे अवलंबून असते.

कागदोपत्री माझी गाडी चालवणाऱ्या महंमद रिझवानचे रेटिंगही ५ पैकी ४.४४ इतके होते.

जर काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना युनिफॉर्म आणि फोटो-ओळखपत्र गाडीत लावणे सक्तीचे असेल तर तशीच सक्ती, किमान काही ड्रेस कोड हवा का नको?

 

Ola-Uber-2 InMarathi

 

अरबांसारखा पायघोळ अंगरखा घालून जर मी उद्या कामावर गेलो तर मला कामावरून काढून टाकतील. चालकांची पार्श्वभूमी नीट न तपासल्यामुळे त्यांच्याकडून घडलेले अपघात ते अगदी बलात्कारापर्यंतचे गुन्हे, कंपनीच्या संस्थापकांकडून होत असलेली पैशाची उधळपट्टी, महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, कर चुकवेगिरी यामुळे अनेक देशांमध्ये उबरवर बंदी; किंवा कडक निर्बंध लादले गेले आहेत.

उबरच्या वाढत्या तोट्यामुळे आणि मलिन झालेल्या प्रतिमेमुळे कंपनीचा संस्थापक ट्रॅविस कालानिकला जून २०१७ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता.

 

Ola-Uber-4 InMarathi

 

दिल्लीत उबर चालकाकडून एका महिलेवर बलात्काराची घटना घडूनही या कंपन्यांनी थातूर-मातूर सुधारणांच्यावर काही केलेले दिसत नाही. याबाबत सर्व स्तरांवर पाठपुरावा करुन ओला-उबरसारख्या कंपन्यांना अधिक उत्तरदायी आणि पारदर्शक बनवण्याची आवश्यकता आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?