' तथाकथित "साजूक तुपातले प्रस्थापित" आणि मराठी चित्रपटसृष्टी : एक प्रतिवाद

तथाकथित “साजूक तुपातले प्रस्थापित” आणि मराठी चित्रपटसृष्टी : एक प्रतिवाद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चांगदेव गीते यांच्या लेखास प्रतिसाद.

चांगदेव गीतेंचा मूळ लेख वाचण्यासाठी क्लिक करा : साजूक तूपाच्या धोतरात गुंतलेल्या चित्रपटसृष्टीत गावरान झुणका भाकरीचा धुडगूस!

===

लेखक : केदार जोशी

===

दिनांक १८ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांचा ‘श्री पुंडलिक’ हा ‘one angle’ चित्रपट प्रदर्शित झाला. ‘One Angle’ म्हणजेच, एका ठिकाणी कॅमेरा स्थिरावून संपूर्ण कथा/चित्रपट अथवा नाटक चित्रित करणे.

 

यानंतर साधारण वर्षभरातच दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरीश्चंद्र’ प्रदर्शित केला आणि मराठी चित्रपटसृष्टीचा खऱ्या अर्थाने उदय झाला.

चित्रपटातील वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करून, तेही संपूर्णतः मराठी कलाकार वापरून राजा हरिश्चंद्र हा खऱ्या अर्थाने ‘हलती चित्रे’ दाखविणारा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला अविष्कार ठरला.

 

raja-harishchandr-inmarathi

 

हा तोच काळ आहे ज्या काळी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि कराची भागात प्रामुख्याने पारसी नाटक मंडळी आणि मराठी नाटक मंडळी यांची नाटके लोक डोक्यावर घेत होते.

मराठी नाटक मंडळींमध्ये त्यातही संगीत नाटकांमध्ये प्रामुख्याने विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, कृष्णाजी खाडिलकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, भाऊराव कोल्हटकर, बालगंधर्व इत्यादींचा वरचष्मा होता.

ज्याप्रमाणे गुजराती नाटक मंडळींमध्ये प्रामुख्याने पारसी समाजाचे प्राबल्य होते, त्याचप्रमाणे मराठी नाटक मंडळीमध्ये बहुतांशी शहरी भागात राहणाऱ्या ब्राह्मण व मराठा समाजाचे वर्चस्व होते.

मात्र, ही झाली नाट्य क्षेत्राची गोष्ट! चित्रपट क्षेत्रात तर तोरणे, फाळके (ब्राह्मण), व्ही शांताराम, बाबुराव पेंटर, विष्णुपंत दामले (ब्राह्मण) , फतेह लाल इत्यादींचा वरचष्मा होता.

असे असताना, ज्या कोणी चित्रपट क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली, इंडस्ट्री टिकवली, त्यांना ‘साजूक तुपातले’ असे संबोधणे हा त्यांचा अपमान नाही का?

त्यांनी ‘ग्रामीण क्षेत्राला हिणवायचे’ असे ठरवून इंडस्ट्री चालवली, असा कदाचित लेखक महाशयांचा आरोप दिसतो. आता प्रारंभिक इंडस्ट्री ही कोल्हापूरस्थित होती मुंबई किंवा पुणे स्थित नव्हे, हे लेखक महाशय कदाचित विसरले असावे.

कोल्हापूरची ‘नेटिव’ बोली कशी होती अथवा आहे, हे माहित असूनही, पुणे, मुंबई स्थित प्रमाण मराठीचा आग्रह धरणाऱ्या पुणेरी समाजावर लेखक महाशयांची टीका कशासाठी, हे सांगणे अवघड आहे.

आता, ह्या ठिकाणी ‘साजूक तुपातले’ म्हणजे?

तर लेखकांचा रोष हा प्रामुख्याने शहरी भागातील ब्राह्मण समाजावर आहे का? असा प्रश्न पडतो.

प्रस्तुत लेखासोबत स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, नाना पाटेकर, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, प्रिया बापट इत्यादी कलाकारांच्या चित्रपटांचे पोस्टर्स दर्शवणे हेच अधोरेखित करते.

आता लेखक महाशय ज्याप्रमाणे म्हणतात, त्याचप्रमाणे त्यांचा संदर्भ हा कुठला जातीविरोधी नसून ‘प्रस्थापित’ विरुद्ध ‘विस्थापित’ असा आहे.

या ठिकाणी प्रमाण मराठी नुसार ‘विस्थापित’ शब्दाचा अर्थ एखाद्याला त्याच्या स्थानावरून जबरदस्तीने घालवणे किंवा अगदी बेघर करणे असा होतो. मात्र, चित्रपटसृष्टीमध्ये हे ‘विस्थापित’ म्हणजे कोण, हे कोण आणि कसे ठरवणार?

इथे ज्याच्याकडे कला आहे, त्याला लोक डोक्यावर घेतात, ज्याच्याकडे नाही, ते इंडस्ट्री मधून नामशेष होतात. आता, कुणी जात बघून विस्थापित होते का? किंवा जातीमुळे कोणी प्रस्थापित झाले आहेत का?

आणि मुळात ज्या प्रदेशात कधी चित्रपटसृष्टी निपजली नाही, त्यांनी स्वतः ला विस्थापित म्हणवून घेऊन विक्टीम कार्ड खेळणे कितपत योग्य आहे? ज्यांनी याच चित्रपटसृष्टीस योगदान दिले, त्यांना ‘साजूक तुपातले’ संबोधून जातीयवादी कटाक्ष वापरणे कितपत योग्य?

 

marathi-actors-inmarathi

 

लेखक म्हणतात त्याप्रमाणे त्यांना ठराविक लोकांची मक्तेदारी मोडून काढली असे म्हणायचे आहे. मक्तेदारी मोडून काढणे म्हणजे नक्की काय? कोण हे ठराविक लोक?

जेव्हा नागराज मंजुळे या दिग्दर्शकाची तुलना स्वप्नील जोशी या अभिनेत्याशी अप्रत्यक्षपणे होते अथवा केली जाते, ती योग्य ठरेल का?

मुळातच, दिग्दर्शक आणि कलाकार यांची तुलना करणे योग्य आहे का? नागराज मंजुळे ‘विस्थापित’ म्हणायचे का? मुळातच, ‘विस्थापित’ या प्रमाण मराठी शब्दाचा अर्थ समजण्यात लेखक गफलत करत आहेत असे दिसते.

मग जर अशा चुकीवर बोट ठेवले तर लेखकाच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ”स’ ला ‘श’ आणि ‘न’ ला ‘ण’ म्हणण्यावरून तुम्ही कायम आम्हाला हिणवता’ असे म्हणून कदाचित कांगावा केला जाईल ! असो !

भाषा शुद्धी किंवा प्रमाण भाषेचा वापर यावर बोलायचे झाल्यास ‘सैराट’ मधला परश्या सैराटमध्ये शोभून दिसतो. त्यालाच जेव्हा FU मध्ये संधी मिळते तेव्हा ती गावरान बोली कथेच्या गरजेप्रमाणे बदलणे अभिप्रेत असते.

ते जर नाही झाले आणि कथेच्या गरजेनुसार आपण आपली बोली ‘साजूक तुपातली’ उर्फ शहरी ब्राह्मणी किंवा प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी नाही करू शकलात तर, स’ ला ‘श’ आणि ‘न’ ला ‘ण’ विसंगत ठरणार नाही का, याचा विचार करायची गरज आहे.

मात्र, याचा अर्थ प्रमाण भाषेशी साधर्म्य असणारी बोली बोलणारे गावरान बोली आत्मसात करतीलच, असे सांगता येत नाही. चित्रपटाचे कास्टिंग हे कथेच्या गरजेप्रमाणे दिग्दर्शक करतच असतात. जे नुसते योग्यच नसून स्वाभाविक देखील आहे.

जर ती हिंदी इंडस्ट्रीप्रमाणे कुठल्या कुटुंबांची मक्तेदारी असती तर, दादा कोंडकेंसारखे कलाकार कधी मराठी चित्रपटसृष्टीस स्वयंपूर्ण बनवण्यात हातभार लावूच शकले नसते.

‘सामना’ हा तेव्हाच बनू शकतो, जेव्हा जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाखाली निळू फुले, डॉ. श्रीराम लागू , स्मिता पाटील, मोहन आगाशे, उषा नाईक इत्यादी मातब्बर कलाकार एकत्र काम करतात.

यात जर आता ‘साजूक तुपातले’ आणि ‘साजूक तुपात नसलेले’, अशी विभागणी जर लेखक महाशय करणार असतील, तर धन्य आहे!

 

samna-movie-inmarathi

 

प्रस्थापित किंवा अनेक वर्षांपासून काम करत असणाऱ्या कलाकारांविरुद्ध ‘संघर्ष’ मांडू इच्छित असलेल्या लेखक महाशयांनी संबोधल्याप्रमाणे नाना पाटेकर, विक्रम गोखले , श्रीराम लागू, शरद पोंक्षे यांसारखे सो कॉल्ड ‘साजूक तुपातले’ प्रस्थापित लोक किंवा अगदी आजकालचे स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, श्रेयस तळपदे इत्यादी (नवे साजूक तुपातले?) काय चांदीचा चमचा तोंडात घेऊन इंडस्ट्रीत आले आहेत काय? नक्कीच नाही!

उदाहरणच सांगायचे झाल्यास, नाना पाटेकर यांचे वडील मुरुडमध्ये पेंटर होते. चित्रपट क्षेत्रात त्यांनी जो काही नावलौकिक मिळवला आहे, तो त्यांनी त्यांच्या वाड-वडीलांच्या जीवावर नक्कीच मिळवलेला नाही. त्यांनी जे कष्ट केले, त्याची फळे ते चाखत आहेत.

अर्थात, जे कोण स्कील विना, कुणाच्यातरी जीवावर उदार होऊन एखाद दोन चित्रपट करतात, त्यांच्याकडे जर कला नसेल, तर जनता त्यांनादेखील योग्य ती जागा दाखवतेच.

त्यांचे नशीब चांगले म्हणून त्यांना संधी मिळते. कारण, त्या चित्रपटास लागलेले पैसे हे त्यांच्या कुटुंबीयांनीच लावलेले असतात.

हे ही वाचा – “आपला मानूस” चित्रपटात हरवलेलं “आपलं” पण

जर आपल्याच कुटुंबात एखादा उत्तम कलाकार असेल, आणि तो कथानकाची गरज पूर्ण करण्यास सक्षम असेल, तर का त्याचा विचार करू नये? का बाहेरच्याला संधी देऊन जास्त पैसे पणाला लावावेत? हा साधा व्यवहार आहे.

उद्या अंबानी त्याची कंपनी ही स्वतःच्या अपत्यांकडे सोपवणार की दुसऱ्याला देणार? अर्थात, जर अपत्ये सक्षम असतील तर इतरांचा विचार करण्याचा संबंधच नाही.

इतके साधे गणित आहे इंडस्ट्रीचे. उद्या नागराज मंजुळे असो किंवा अजून कोणी, बिझनेसचा वारसा स्वकुटुंबीयच चालवणार, जे अतिशय स्वाभाविक आहे.

इंडस्ट्रीच्या नावाने शंख करणारे उद्या राजकारणाच्या क्षेत्रात म्हणणार का की, गैर’पवार’ (राजकारणातील साजूक तुपातले हेच असावेत कदाचित) व्यक्तीस राष्ट्रवादी पक्षाची सूत्रे हाती द्या, किंवा गैर’ठाकरे’ व्यक्तीस शिवसेनेची सूत्रे सोपवा?

अगदी सरळ शब्दात सांगायचे झाल्यास आजमितीस तो त्यांचा व्यवसाय किंवा बिजनेस आहे. (राजकारण म्हणजे समाजकारण हे समीकरण आजमितीस किती उरले आहे, याबाबत मी काही सांगण्याची गरज नाही). त्यामुळे तसे होणे कदापि शक्य नाही.

व्ही शांताराम, दादा कोंडके, जब्बार पटेल यांचा वारसा आजमितीस चालवणाऱ्या नागराज मंजुळे यांसारख्या दिग्दर्शकांच्या संख्येत भर पडल्यास आनंदच आहे.

मात्र त्यामुळे शहरी जीवनमान दाखवणे नामशेष अथवा कमी व्हावे, अशी सुप्त इच्छा कोणी मनी बाळगत असेल तर ते योग्य ठरणार नाही.

गिटार, पियानो, व्हायोलीन यांसारखी ‘मुलायम’ वाद्ये होती आणि साजूक तूप नाही, मात्र अमेरिकन चीजच्या सानिध्यात बनवल्या गेलेल्या संगीतामुळे सैराट लोकप्रिय होण्यास मदत झाली, हे विसरता कामा नये. (कदाचित लेखक महाशयांना हार्मोनियम, सितार यांचे पाश्चिमात्य अवतार वादन अतिशय सोपे व मुलायम वाटत असावे)

लेखकाच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, प्रस्तुत चित्रपटात ढोलकी, संबळ, टाळ किंवा मृदुंग यांचा वापर करण्याकडे डोळेझाक करण्यात आली, हे विशेष.

टाळ, मृदुंग, ढोलकी हे गीतांमध्ये आजही वापरले जातात. पंडितजींनी संगीतबद्ध केलेल्या जैत रे जैत पासून अगदी ‘जितेंद्र जोशी’ यांच्या तुकारामपर्यंत असे अनेक चित्रपट आहेत जे पाहिल्यास त्याचा प्रत्यय नक्कीच येईल.

‘अतुल कुलकर्णी’ यांच्या नटरंग सारख्या कलाकृती ढोलकी व इतर लोकावाद्यांचा पुरेपूर वापर करून तेच ‘साजूक तुपातले’ अजरामर करतात, हेही तितकेच खरे!

जर आयएमडीबी वर ८.६ अंक मिरवणाऱ्या ‘सैराट’ ने ९.२ अंकांना सार्थ ठरवणाऱ्या ‘नटसम्राट’च्या ‘सरंजामशाही’ ला खिंडार पाडले असे म्हणायचे असेल, तर अशा विचारसरणीची कीव करावी तेवढी थोडीच!

तात्पर्य हेच की जात आणि चित्रपटसृष्टी यांचा थेट काडीमात्रही संबंध नाही !

 

sairat-natsamrat-inmarathi

 

इथे कोणीही प्रस्थापित नाही आणि जर स्ट्रगल करण्यास एखादी व्यक्ती सक्षम असेल, तर त्या व्यक्तीचे ‘विस्थापन’ होणे शक्य नाही. अगदी हिंदी चित्रपटसृष्टीतही खान, कपूर, रोशन, खन्ना कितीही असले, तरी कोणीतरी नवाजुद्दिन, नाना, इरफान, राजकुमार राव पुढे येऊन अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकतातच!

मराठी चित्रपटसृष्टी मुख्यत्वे कोल्हापूर आणि मुंबई शहरात राहिली, वाढली असली, तरी तीचे लोककलेकडे किंवा ग्रामीण जीवनाकडे दुर्लक्ष झाले, असे कदापि नाही. काळाच्या ओघात जो तो आपापल्या परीने चित्रपटनिर्मिती करत राहिला, आणि यापुढेही करत राहील.

४०% पेक्षा अधिक मराठी माणूस आज शहरात राहत असल्याने आणि चित्रपटनिर्मिती शहरात होत असल्याने, शहरी भागातील जीवनमान चित्रपटांमधून जास्त प्रमाणात दाखवले जाणे स्वाभाविक आहे.

पण याचा अर्थ ग्रामीण भागात चित्रपट निर्मितीस बंदी आहे, असे मुळीच नाही. ज्याची ऐपत आहे, त्याने चित्रपटनिर्मितीत नक्कीच उतरावे. राजकारणात पैसा वाया घालवण्यापेक्षा जर तो पैसा कलेकडे वळला तर लोकांना नक्कीच आनंद होईल.

अपेक्षा करूया की, ग्रामीण भागाकडे चित्रपटनिर्मितीचा ओघ वळेल आणि ग्रामीण जीवनमान पडद्यावर अधिकाधिक उठावदारपणे दर्शवले जाईल.

मराठी चित्रपटसृष्टीची झालेली भरभराट पाहायला नुसता ‘साजूक तुपातल्यां’नाच नाही, तर तमाम मराठी जनतेला आनंद होईल एवढे मात्र नक्की!

शुभेच्छा !
जय महाराष्ट्र !

हे ही वाचा – चित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात? जाणून घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तथाकथित “साजूक तुपातले प्रस्थापित” आणि मराठी चित्रपटसृष्टी : एक प्रतिवाद

  • May 8, 2019 at 8:42 pm
    Permalink

    Very

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?