' “गुगल” नावाच्या चमत्काराच्या जन्माची अफलातून कथा – InMarathi

“गुगल” नावाच्या चमत्काराच्या जन्माची अफलातून कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – सर्वेश शरद जोशी

===

‘तिळा तिळा दार उघड’ किंवा ‘खुल जा सिम सिम’ सारखाच एक पासवर्ड झालाय ‘गुगल’! वर्ल्ड वाईड वेबच्या महासागरात एका क्लिकवर आपल्याला हवी असलेली माहिती क्षणभरात आपल्यासमोर हजर करणारा हा जादूगार, पण या जादूगाराची गोष्ट किती जणांना माहितीय?

म्हणून हा खास लेख, ‘गोष्ट गुगलच्या जन्माची’!

या कथेत दोन मध्यवर्ती पात्रं आहेत, लॉरेंस उर्फ लॅरी पेज आणि सर्जे ब्रेन, गुगलचे संस्थापक !

तर गोष्टीला सुरुवात होते अगदी वीसेक वर्षांपूर्वी, सन १९९६ मध्ये, ज्यावेळी आपल्या कथेतील दोन्ही मध्यवर्ती पात्रे कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करत होते.

लॅरी पेज त्याच्या रिसर्च पेपरसाठी विषय शोधत होता, तेव्हा ‘वर्ल्ड वाईड वेबच्या गणितीय गुणधर्मांचे अन्वेषण आणि वेबच्या लिंक स्ट्रक्चरचा एक प्रचंड आलेखस्वरुपात अभ्यास’ हा विषय घ्यावा असं त्याला वाटलं.

त्याच्या या विचाराला त्यांचे पर्यवेक्षक सर टेरी विनोग्रॅड यांनी प्रोत्साहन दिलं आणि ह्याच विषयावर रिसर्च करण्याच्या त्यांच्या या सल्ल्याला पेज ‘आजवर त्याला मिळालेला सर्वोत्तम सल्ला’ म्हणतो, कारण याच रिसर्च पेपरची फलश्रुती ‘गुगल’ नावाच्या जादूगारात झाली.

 

google-birthday-inmarathi
cnbc.com

पेजने सरांचा सल्ला योग्य मानून नानाविध पेजेसच्या लिंक्स, त्यांची संख्या आणि त्यांचे गुणधर्म या आधारावर, दिलेल्या/होमपेजशी जोडण्याच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित केले. या त्याच्या रिसर्च पेपरला त्याने ‘बॅकरब’ असं नाव दिलं आणि या बॅकरब च्याच प्रक्रियेमध्ये लॅरी पेजला आपलं दुसरं मुख्य, सर्जे ब्रिन जॉईन झाला.

खरंतर सर्जे ब्रिन हा पेजचा आधीपासूनचा, १९९५ पासूनचा, फार जवळचा असलेला एक हुशार मित्र होता आणि त्याला नॅशनल सायन्स फाउंडेशन ग्रॅज्युएट फेलोशिप मिळालेली होती. ते दोघेही स्टँडफोर्ड डिजिटल लायब्ररी प्रोजेक्ट(SDLP) वर सोबत काम करत होते.

एक, एकत्रित आणि सार्वत्रिक लायब्ररी स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी सॉफ्टवेअर निर्माण करणे हे SDLP चे मुख्य उद्दिष्टे होते.

ह्या प्रोजेक्टला नॅशनल सायन्स फाउंडेशनकडून निधी मिळाला होता. या प्रोजेक्टमध्ये पेज आणि ब्रिन सोबतच इतर काही हुशार विद्यार्थी काम करत होते. आणि या प्रोजेक्टचा गुगलच्या संकल्पनेमागे सिंहाचा वाटा आहे.

मार्च १९९६ मध्ये, लॅरी पेजने स्टँडफोर्डच्या होमपेज ला स्टार्टिंग पॉईंट धरून त्याच्या वेब क्रॉलरने वेबच्या अन्वेषणाला सुरुवात केली. दिलेल्या पेजेससाठी संग्रहित केलेल्या बॅकलिंक्सवरील डेटाला महत्त्वपूर्ण स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी पेज आणि ब्रिन यांनी पेजरँक अल्गोरिदम निर्माण केला.

 

google-birthday-inmarathi01
mashable.com

त्यानंतर दिलेली URL आणि महत्त्वानुसार क्रमित केलेली बॅकलिंक्सची यादी यांच्या आधारावर ‘बॅकरब’ या सर्च इंजिनचे आऊटपुट चेक करताना पेजरँक अल्गोरिदमवर आधारित सर्च इंजिन हे त्याकाळातील कुठल्याही इतर सर्च इंजिनपेक्षा उत्तम काम करू शकते, असे एक निरीक्षण निघाले.

यानंतर पेज आणि ब्रिन यांचे लक्ष या निरीक्षणावर केंद्रित झाले आणि इतर मुख्य पाने संग्रहाला जोडून आणखी काही चाचण्या घेतल्या गेल्या. या सगळ्या चाचण्यांतून पूर्वी केलेले निरीक्षण सत्य असल्याचाच निष्कर्ष आला आणि पेज-ब्रिन नव्या सर्च इंजिनच्या निर्मितीकडे वळले.

या सर्च इंजिनचे नाव ‘गुगोल’ या फार मोठ्या संख्येच्या अपभ्रंशावरून ‘गुगल’ असे ठेवले गेले.

 

google-birthday-inmarathi02
hindustantimes.com

‘पेजरँक’ या आपल्या रिसर्चपेपरमध्ये या नावाबद्दल सांगताना पेज आणि ब्रिन म्हणतात-

“आम्ही, आमच्या सिस्टमसाठी ‘Google’ हे नाव निवडले आहे; कारण Google हा गूगोल( googol/10100 / १ पुढे १००० शून्य) चा एक सामान्य अपभ्रंश आहे, आणि फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या सर्च इंजिनाची निर्मिती करण्याच्या आमच्या ध्येयाशीच निगडित आहे.”

गुगलची पहिली आवृत्ती ऑगस्ट १९६६ मध्ये स्टॅंडफोर्डच्याच होमपेजवरून रिलीझ करण्यात आली. यावेळी गुगलला स्वतंत्र डोमेन नव्हते, त्यामुळे ती आवृत्ती google.stanford.edu या डोमेनवरूनच रिलीझ करण्यात आली होती. त्यानंतर दोघे मित्र नव्या डोमेनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला लागले.

दिनांक १५ सप्टेंबर,१९९७ रोजी google.com हे स्वतंत्र डोमेन रजिस्टर झाले.

४ सप्टेंबर १९९८ रोजी लॉरेंस उर्फ लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन या दोन मित्रांनी मिळून ‘गुगल’ नावाची कंपनी स्थापन केली; यावेळी त्या कंपनीचे मुख्यालय होते त्या दोन मित्रांची म्युच्युअल फ्रेंड आणि आजची युट्युबची सीईओ सुझान वोजकिकी हिच्या घराच्या शेजारी असणारे तिचे गॅरेज !

अशाप्रकारे ‘गुगल’ नावाचा हा जादूगार जन्माला आला होता. त्यानंतर काळसुसंगत असे अनेक बदल गुगलमध्ये करण्यात आले, अनेक नवीन कल्पना अंमलात आणल्या गेल्या, अनेक नवीन योजना राबवल्या गेल्या.

आणि आज ह्या शून्यातून निर्माण झालेल्या ‘गुगल’ने इतर स्पर्धकांना मागे टाकून या जगात ‘गुगलप्लेक्स’ ची जागा घेतली आहे.

 

google-birthday-inmarathi03

 

१९९८ च्या अखेरीस गुगलवर ६ कोटी पेजलिंक्स जमा झाल्या होत्या. अजूनही गुगलचे होम पेज हे ‘Beta’/ ‘Betaware’ स्टेजला (सॉफ्टवेअर रिलीज करण्याच्या प्रक्रियेतील ५ पायऱ्यांपैकी तिसऱ्या पायरीवर) होते.

पण तरीही त्या काळातील इतर सर्च इंजिनांपेक्षा उत्तम आऊटपुट देऊ लागले होते; तसेच इतर पोर्टल साईट्सपेक्षा तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि वापरायला सोपे होते.

या गोष्टींसाठी तेव्हाच गुगलचे कौतुक होऊ लागले होते. आज ह्या गुणधर्मामुळेच गुगल आपल्या जीवनात एका अढळ पदावर पोहोचले आहे.

गुगलचा वाढदिवस नुकताच झाला. खरंतर गुगलबाप्पाच्या वाढदिवसाचीही एक गंमतच आहे. या सगळ्या प्रक्रियेत कुठेही एक विशिष्ट तारीख गुगलची जन्मदिनांक म्हणून नोंदवली गेली नव्हती. म्हणूनच २०१३ पर्यंत गुगल कंपनीकडून वेगवेगळ्या तारखांना ‘वाढदिवस’ साजरे केले.

पण २७ सप्टेंबर, २००२ ला गुगलच्या वाढदिवसासाठीचे डुडल पहिल्यांदाच (चौथ्या वाढदिवसानिमित्त) लाँच केले गेले होते. हे लक्षात घेऊन गुगल एलएलसी ने ही तारिख गुगलचा वाढदिवस म्हणून जाहीर केली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?