' या सामाजिक 'संताच्या' एका शब्दाखातर श्रीमंतांनी त्यांच्या जमिनी 'दान' केल्या!

या सामाजिक ‘संताच्या’ एका शब्दाखातर श्रीमंतांनी त्यांच्या जमिनी ‘दान’ केल्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आचार्य विनोबा भावे म्हणजेच विनायक नरहरी भावे हे सामाजिक संत म्हणून ओळखले जातात. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक तर होतेच शिवाय ते भूदान चळवळीचे प्रणेते होते. विनोबा भावेंचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी गागोदे, जिल्हा रायगड येथे झाला.

धर्मपरायणतेचे संस्कार त्यांनी त्यांचे आजोबा शंभूराव भावे व त्यांच्या आई रखुमाबाई ह्यांच्याकडून घेतले.

त्यांचे वडील नरहरी भावे नोकरीनिमित्त बडोदे येथे गेल्याने विनोबा भावेंचे माध्यमिक व उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. ते अत्यंत विद्वान होते.

 

vinoba-bhave InMarathi

 

त्यांनी उपनिषदे, पातंजलयोगसूत्रे तसेच ब्रह्मसूत्र शांकरभाष्य ह्या सर्वांना खोलवर अभ्यास केला होता. १९१६ साली इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईला येण्यास निघाले होते पण ते मुंबईस न जाता वाराणसीला गेले.

त्यांना बंगालच्या सशस्त्र क्रांतीकारकांबद्द्ल आकर्षण होते. त्यांनी वाराणसी येथे झालेल्या हिंदू विश्वविद्यालयातील एका कार्यक्रमात महात्मा गांधींचे भाषण ऐकले व ते भाषण ऐकून ते प्रभावित झाले. त्यांनी महात्मा गांधीशी पत्रव्यवहार केला. ७ जून १९१६ रोजी त्यांनी महात्मा गांधीची भेट घेतली तेथेच त्या कोचरबच्या आश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली.

ब्रह्मविद्या शिकून तिची साधना करण्याचे त्यांनी ठरवले होते म्हणूनच त्यांनी एक वर्षाची राजा घेतली व ते वेदांताचे अध्ययन करण्यासाठी वाईच्या प्राज्ञपाठशाळेत आले.

१९२१ साली गांधीजींचे अनुयायी जमनालाल बजाज ह्यांनी साबरमतीच्या आश्रमाची एक शाखा वर्ध्याला सुरु केली. त्या शाखेचे संचालक म्हणून विनोवा भावे ८ एप्रिल १९२१ रोजी वर्ध्याला आले. त्यानंतर त्यांनी भूदान चळवळ सोडल्यास तेथेच तपश्चर्या करून जीवन व्यतीत केले.

हा आश्रम वर्ध्याजवळील सेवाग्राम, पवनार, बजाजवाडी, मगनवाडी व महिलाश्रम येथे फिरत होता.

 

Vinobha-Bhave-inmarathi01
hindi.firstpost.com

 

१९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने त्यांना अटक केली व त्यांना धुळ्याच्या कारागृहात शिक्षा भोगण्यास पाठविले. तुरुंगात असतानाही त्यांनी त्यांचे कार्य थांबवले नाही.

त्यांनी तुरुंगाच गीताप्रवचने केली. शेकडो सत्याग्रही कैदी व इतर कैदी त्यांचे हे प्रवचन आवर्जून ऐकत असत.

१९४० साली गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा देण्याचे ठरवले. अहिंसात्मक असहकार आंदोलनासाठी तेव्हा पहिले सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनोबा भावेंची निवड केली. जवाहरलाल नेहरूंचा नंबर विनोबा भावेनंतर लागला. सत्याग्रहासाठी अध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेला तसेच अखंड तपस्वी असलेला माणूस योग्य आहे.

म्हणूनच त्यांनी पहिली निवड विनोबा भावेंची केली. सत्याग्रहात शत्रूच्या हृदयाचे परिवर्तन होते ते हृदयपरिवर्तन हा आध्यामिक साधनेला वाहून घेतलेला मनुष्यच उत्तम प्रकारे करू शकतो. विनोबा भावे हे असेच एक तपस्वी होते म्हणून गांधीजींनी त्यांची पहिली निवड केली.

 

vinoba bhave 1 InMarathi

 

स्वातंत्र्य लढ्यात विनोबा भावेंचे मोलाचे योगदान आहे परंतु गांधीजींच्या प्रसिद्धीपुढे ते झाकोळले गेले.

भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर गांधीजी स्वर्गवासी झाले व देशाची सूत्रे पंडित नेहरूंच्या हातात गेली. परंतु त्यांच्याकडे गांधीजींच्या विचारांनी चालण्यासाठी वेळ नव्हता आणि तेवढी शक्ती सुद्धा नव्हती.

त्या काळी जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव व राम मनोहर लोहिया ह्यांनाच लोक गांधीवादी म्हणून ओळखत असत. परंतु ह्या सर्वांचाही ओढा समाजवादाकडेच होता. ह्या सर्व गोंधळात कुठलीही प्रसिद्धी नसताना ,कुठल्याही वादात न अडकता विनोबा भावे गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर एकटेच नेटाने मार्गक्रमण करीत होते. त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नव्हता.

 

Vinobha-Bhave-inmarathi02
newsgram.com

 

कुठल्याही प्रकारच्या वादापासून ते लांब राहणे पसंत करीत असत. गांधीजींप्रमाणेच संपूर्ण देशाची चेतना बनण्याची शक्ती त्यांच्याकडे होती परंतु आपल्याकडे असलेली ताकद स्वतःपुरती मर्यादित ठेवून त्याचा फक्त स्वत:साठी उपयोग करणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते.

आपल्याकडे असलेले दुसऱ्याला सहज देऊन टाकणे ही त्यांची वृत्ती होती. त्यांना एक मार्गदर्शक बनणे जास्त सहज वाटत असे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा तेलंगणा व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात डाव्यांच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र लढा सुरु होता. तिथल्या भूमिहीन शेतकऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध हा लढा सुरु केला होता. दुर्दैवाने ह्यातील काही लोक लोकशाही मानत नव्हते. विनोबा भावेंनी १९५१ च्या एप्रिल महिन्यात तेलंगणाचा दौरा केला.

त्यांनी तुरुंगात जाऊन वामपंथीयांची भेट घेतली. १८ एप्रिल १९५१ रोजी ते नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावात गेले. तेथे त्यांनी हरिजनांची भेट घेतली. ह्या लोकांची एकच मुख्य मागणी होती की त्यांना त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी जमिन दिली जावी.

 

vinoba bhave 2 InMarathi

 

ह्या ४० कुटुंबांना मिळून फक्त पोटापुरती ८० एकर जमीन हवी होती.

ह्या मागणीसाठी सरकारपर्यंत जाण्याची विनोबा भावेंची इच्छा नव्हती म्हणूनच त्यांनी गावातल्याच श्रीमंत लोकांकडे हरिजनांसाठी थोडी जमीन देण्याची विनंती केली. तेव्हा रामचंद्र रेड्डी ह्यांनी विनोबा भावेंचे आवाहन ऐकून लगेच आपली १०० एकर जमीन देण्याची इच्छा वर्तवली. ह्याच घटनेनंतर विनोबा भावेंच्या मनात भूदान चळवळीचा विचार आला.

ही चळवळ करताना त्यांनी पदयात्रा करून मोठ मोठ्या श्रीमंत शेतकऱ्यांना जमीन मागणे सुरु केले. ते म्हणत असत की ,

“हवा आणि पाणी ह्याचप्रमाणे जमिनीवर सुद्धा सर्वांना हक्क आहे. मला तुमचा एक मुलगा मानून तुमच्या जमिनीचा सहावा भाग द्या. ह्या जमिनीवर भूमिहीन लोक राहून शेती करून आपला चरितार्थ चालवू शकतील.”

विनोबा भावेंच्या ह्या आवाहनाला जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला.

 

Vinobha-Bhave-inmarathi03
bbc.com

 

लोकांनी सहज आपल्या जमिनीचा काही भाग विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत दान केला. पदयात्रा करत विनोबा भावे पवनारला पोचले तेव्हा हजारो एकर जमीन लोकांनी दान केली होती. ह्याने विनोबा भावे आनंदित झाले व त्यांनी उत्तर भारताची यात्रा केली.

सरकारने सुद्धा विनोबा भावेंच्या ह्या आंदोलनाला पाठींबा दिला. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी भूदान केले. मिळालेली जमीन सर्वांना सारख्या प्रमाणात विभागून देता यावी म्हणून सरकारने भूदान ऍक्ट पास केला.

भूदान चळवळ यशस्वी झाल्यानंतर विनोबा भावेंच्या मनात ग्रामदान चळवळीची कल्पना आली. ह्या चळवळीत ७५ टक्के शेतकरी आपल्या जमिनी एकत्र करून नंतर त्याचे समान हिस्से करून वाटून घेत असत. काळाच्या ओघात ह्या दोन्ही चळवळी थंडावल्या परंतु ह्या चळवळीदरम्यान मोठी लँड बँक तयार झाली.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात जवळजवळ २२.९० लाख एकर जमीन दान करण्यात आली.

भूदान चळवळीवर टीका करणारे असे सांगतात की ह्या चळवळीत विनम्रपणे जी जमीन मागितली होती तिचे स्वागत सरकारने उत्साहाने केले कारण त्यांना मोठ्या शेतकऱ्यांवर कायद्याने सिलिंग करायचे नव्हते. अनेकांनी जमीन दान करून सुद्धा त्यावर स्वतःच शेती करणे सुरु ठेवले. काहींनी नापीक जमीन दान केली जी काहीच कामाची नव्हती.

जमिनीचे वाटप सुद्धा योग्य प्रकारे समान झाले नाही. वर सांगितलेल्या २२.९० लाख एकरातील ६.२७ लाख एकर जमीनीचे अजूनही गरजवंतांना वाटप झालेले नाही.

विनोबा भावेंची कर्मभूमी असलेल्या एकट्या महाराष्ट्रातच ७७ हजार एकर जमीन तशीच वाटपाविना नुसतीच पडून आहे. पण ह्या सगळ्याचा दोष विनोबा भावेंना देणे म्हणजे मुर्खपणा आहे. त्यांचा उद्देश वेगळा होता जो दुर्दैवाने सफल होऊ सकला नाही.

 

 

काही लोक असेही म्हणतात की, विनोबा भावेंनी आणीबाणीचा विरोध केला नाही, उलट आणीबाणीला “अनुशासन पर्व” संबोधून आणीबाणीचे स्वागतच केले.

परंतु हा वादाचा विषय आहे. सत्य असे आहे कि २५ डिसेंबर १९७४ साली विनोबा भावेंनी एका वर्षासाठी मौनव्रत धारण केले होते व २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू झाली.

भूदान चळवळीमुळे विनोबा भावेंना प्रसिद्धी मिळाल्यामुळे सरकार व विद्यार्थी आंदोलक ह्या दोघांनाही विनोबा आपल्या बाजूने हवे होते. नेहरू सोडले तर जनतेचा इतका प्रचंड प्रतिसाद फक्त विनोबा भावेंना मिळत होता.

ह्या सर्व परिस्थितीत वसंत साठे विनोबांना भेटायला त्यांच्या पवनारच्या ब्रह्मविद्या मंदिरात गेले. विनोबा भावेंचे मौनव्रत असल्याकारणाने दोघांमध्ये संवाद होऊ शकला नाही.

 

Vinobha-Bhave-inmarathi04
mkgandhi.org

 

विनोबांनी वसंत साठेंना आपल्याजवळचे “अनुशासन पर्व” (महाभारतातील एक अध्याय)हे पुस्तक दिले. ह्यातून विनोबांना नेमका काय संदेश द्यायचा होता हे कुणालाच कळले नाही. साठेंनी मात्र आकाशवाणी, वर्तमानपत्र व दूरदर्शनवरून असे पसरवले की विनोबा भावेंनी आणीबाणीला “अनुशासन पर्व” असे संबोधित केले आहे.

म्हणजेच त्यांच्या मते हा काळ स्वतःला शिस्त लावून घेण्याचा आहे. युवा कॉंग्रेसने विनोबांच्या नावाने देशभरातील भिंती “आणीबाणी हे अनुशासन पर्व आहे” हे लिहून रंगवल्या.

ह्याने झाले असे की आणीबाणीचे समर्थक व विरोधक दोघांनीही असा ग्रह करून घेतला की आणीबाणीला विनोबांनी मान्यताच दिली आहे. समर्थकांनी हा स्वत:चा विजय मानला तर विरोधकांनी ह्या कारणावरून विनोबांवर टीका केली.

२५ डिसेंबर १९७५ रोजी विनोबा भावेंनी आपले मौनव्रत संपवले आणि अनुशासन पर्वाचा अर्थ सांगितला की अनुशासन म्हणजे आचार्यांचे अनुशासन होय.

आचार्य जे मार्गदर्शन करतील, जे अनुशासन शिकवतील त्याचा जर शासनाने विरोध केला तर लोक शासनाविरुद्ध सत्याग्रह सुरु करतील. विनोबांनी आपल्या म्हणणे स्पष्ट करूनही लोकांना हे फक्त डॅमेज कंट्रोल करणे वाटले.

त्यांनी इंदिरा गांधी व जयप्रकाश नारायण ह्यांच्यात सलोखा व्हावा असे प्रयत्न केले तेव्हा लोक त्यांना इंदिरा गांधींच्या गटातले समजू लागले. जयप्रकाश नारायण सुद्धा विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सहभागी होते पण ह्या घटने नंतर ते सुद्धा विनोबांपासून अंतर ठेवून राहू लागले.

विनोबांनी त्यांच्यावर होणाऱ्या ह्या आरोपांचे खंडन केले नाही व कुठलेही स्पष्टीकरण सुद्धा दिले नाही म्हणूनच विनोबा आणीबाणीचे समर्थक होते की विरोधक ह्याबद्दल लोकांमध्ये अजूनही वाद आहेत. हा एकमेव काळ होता जेव्हा विनोबा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

अर्थात ह्यात लोकांनीच त्यांना गोवले होते. हे सोडल्यास त्यांचे तपस्वी जीवन हे सर्वांसाठीच आदर्श ठेवण्यासारखे आहे.

 

Vinobha-Bhave-inmarathi
hindi.firstpost.com

 

मृत्युच्या सात दिवस आधीपासून विनोबांनी पवनारच्या आश्रमात प्रायोपवेशन सुरु केले होते. ५ नोव्हेंबर रोजी त्यांना ताप आला व हृदयविकाराचा सुद्धा त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यात आले. त्यांना रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले परंतु विनोबांनी आश्रम सोडून जाण्यास नकार दिला.

म्हणून डॉक्टरांनी आश्रमातच त्यांच्यावर उपचार सुरु केले. अ‍ॅलोपथीचे उपचार त्यांनी स्वीकारले पण ८ नोव्हेंबर पासून त्यांनी अन्न पाणी व औषधे तिन्ही घेणे बंद केले.

 

indira-gandhi-vinova-bhave_InMarathi

 

स्वत: इंदिरा गांधी त्यांना भेटायला आल्या व त्यांना औषधे व अन्नपाणी घेण्याची विनंती केली. अनेकांनी काकुळतीला येऊन त्यांना विनंती करूनही विनोबांनी प्राणत्यागाचा निश्चय केल्याने त्यांनी काहीही घेण्यास नकार दिला.

“आता देह आत्म्याला साथ देत नाही, रखडत जगण्यात काहीही अर्थ नाही. हे जराजर्जर शरीर टाकणेच योग्य!”

असे त्यांनी त्यांच्या प्रायोपवेशनाच्या संकल्पाचे कारण श्री. त्र्यं. गो. देशमुखांना सांगितले. १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली व एका तपस्व्याने ह्या जगातून रजा घेतली.

आयुष्यभर लोकांसाठी झटण्याचे व्रत घेतलेल्या विनोबा भावेंनी हरिजनांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून मोलाचे कार्य केले. त्यांचे दु:ख कळण्यासाठी स्वत: मैला डोक्यावर वाहून नेला. येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन होईल म्हणून आश्रम काढले, पुस्तके लिहिली.

आजही त्यांचे विचार व त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “या सामाजिक ‘संताच्या’ एका शब्दाखातर श्रीमंतांनी त्यांच्या जमिनी ‘दान’ केल्या!

  • April 1, 2019 at 8:17 am
    Permalink

    खूप दुर्मिळ माहिती.. धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?