' सलाम: एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची गाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे

सलाम: एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची गाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : सुधीर हसबनिस

===

गो ग्रीन नावाखाली आपण ५-१० झाडं किंवा फार तर २० झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीने, एकट्याने एक कोटीं पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती?

एक चांगला शिकला सवरलेला माणूस, निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचे महत्व कळलेला माणूस. पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस.

काळ्या मातीशी त्याचं नातं जुळलं कारण, त्याला लहानपणीच त्याच्या आईकडून कळलं एवढ्या प्रचंड वृक्षांना माती कशा प्रकारे जन्म देते.

लहान असताना त्यानं पाहिलं की, आपली आई वेगवेगळ्या प्रकारच्या बिया एका डब्यात साठवून ठेवते. कुठे जाताना येताना झाडाखाली पडलेल्या बिया गोळा करते आणि पावसाळा आला की घराच्या आसपास जिथे मोकळी जागा असेल तिथे पेरते.

काही दिवसानंतर तिथे छान रोपं उगवायची , मग आई त्या झाडांना काड्यांचं कुंपण करायची. ती झाडं मोठी होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आणि आता तीच मोठी होऊन आपल्याला गोड गोड फळं द्यायला लागलीत.

हे सगळं आपल्या डोळ्यांनी त्याने पाहिलं होतं. तीच आईची सवय त्यानेही आत्मसात केली.

गेली अनेक वर्ष ‘ही व्यक्ती’ वेळ मिळेल तेंव्हा सायकलवर एक फेरी मारून येते. जिथे मोकळी जमीन, नापीक जमीन दिसेल तिथे सायकल बाजूला ठेऊन मोठे मोठे खड्डे करते. त्यात खिशात भरून आणलेल्या बिया पेरण्याचं काम करते.

दिसली मोकळी जमीन की पेरा बिया.

 

Ramaiah-inmarathi
telanganatoday.com

 

सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं पण कुठेही बोभाटा न करता.

गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे. पण ह्याचे काम चालूच. ध्यासच घेतला होता जणू..!

या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. 

तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात.

चेट्टू म्हणजे झाड. (तेलगू भाषेत) म्हणून हा ‘झाडं वाला रामय्या’ झाला. आता सगळे त्याला ह्याच नावानं ओळखतात.

हा रामैय्या नुसत्या बिया पेरत नाही तर, त्या बियांची रोपंही तयार करतो.

त्याने त्याच्या विभागाच्या नगर सेवकाला झाडांचे महत्व पटवून दिले. त्या नगरसेवकाच्या मदतीने रामय्याने खंमम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. चार किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली.

रामय्या नुसती झाडे लावून थांबत नाही तर, त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतो. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतो. मोठी झालेली झाडं काही दिवसांत मोठे वृक्षही होतील.

कोण कोणत्या प्रकारचे आहेत हे वृक्ष?

रामय्यांनी लावलेल्या झाडांत असंख्य प्रकारचे वृक्ष आहेत. बेल , पिंपळ, कदंब, कडूनिंब, चंदन, रक्त चंदन असे मोठे मोठे वृक्ष रामय्याने लावलेत. त्याचे गाव सगळीकडे हिरवे गार झाले आहे, तेही त्याच्या एकट्याच्या ध्यासातून.

 

Teak-Farming-inmarathi
india.com

 

या कामात रामय्यांच्या पत्नीने खूप मदत केली आहे. ‘टिक’ वृक्षाचं जे बी असतते, ते कठीण कवचाच्या आतमध्ये असते आणि ते फोडून ते बी बाहेर काढावे लागते. एकट्या रामय्याने ते फोडण्याचा प्रयत्न केला पण ते बी मिळवायला वेळ बराच खर्च व्हायला लागला.

पण ह्या कवच फोडण्याच्या कामात रामय्यांच्या पत्नीने खूप मदत केली आणि ते काम हलके झाले.

कशी? तीही एक गंमत आहे.

रामय्यांची बायको बसून चुलीपुढे स्वयंपाक करायची. त्याला एक कल्पना सुचली. त्याने एका पोत्यात ह्या कवच असलेल्या बिया भरल्या आणि ते आसन तिला बसायला दिले. रोज रोज त्यावर बसून कवच फुटले आणि बिया मिळाल्या!

सगळ्यांना प्रश्न पडतो की, रामय्याला या कामातून काय मिळतंय? रामय्या म्हणतो मला यातून शांती आणि समाधान मिळते म्हणून मी हे करतो.

‘वृक्षो रक्षती रक्षितः’ म्हणजे वृक्ष त्याचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण करतात असे स्लोगन त्याने तयार केले आहे.

एवढे करून रामय्या शांत बसत नाही तर, त्याने जिल्ह्यातल्या लायब्ररीतून अनेक वृक्ष लागवडीची माहिती देणारी पुस्तके मिळवली.

शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करायची ह्याचीही माहिती मिळवली. आता त्यापद्धतीने रोपे तयार करून त्याचे वाटप तो करतो आहे .

एवढं करूनही तो थांबत नाही तर त्याने तेलगू भाषेतली काही स्लोगन तयार केली आहेत.

ती तो गावातल्या भिंतींवर जनजागृतीसाठी छान रंगांनी रंगवतोय. याशिवाय तो जुन्या गाड्यांच्या क्लचप्लेट्स आणून पत्र्याचे तुकडे हिरव्या रंगाने रंगवतो.

झाडे लावा झाडे जगवा , निसर्गाशी नाते जोडा त्यावर असे स्लोगन लिहून जन जागृती करतो आहे.

 

daripalli-ramiah-inmarathi
youtube.com

 

एकदा त्यांच्याच सायकलवरून पडून त्यांचा अपघात झाला. त्यांच्या पायाला जबर मार लागला.

पायाचं हाड मोडलं आणि काही महिने त्यांचे बाहेर जाणे बंद झाले. पण त्यांचे काम थांबले नाही. पाय दुखावला पण हात तर काम करू शकतात ना! म्हणून रामय्याने घरात रोपं लावायचं काम चालू ठेवलं. त्याचं काम अजिबात थांबलं नाही.

एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने रामय्यांच्या कामासाठी मदत म्हणून ५००० रुपये देणगी स्वरूपात दिले. तर तेही रामय्याने वृक्ष लागवडीच्या कामात खर्च केले.

नसा-नसात निसर्ग प्रेम भरलेल्या ह्या रामय्याला लोकांनी सल्ले दिले की, तू लावलेली झाडे तू विकून पैसे मिळव तुला भरपूर पैसे मिळतील. तर रामय्या म्हणाले,

या काळ्या आईच्या पोटातून जन्मणाऱ्या झाडांना मी विकण्यासाठी नाही लावलं. या झाडांमुळे आपल्या सगळ्यांनाच फायदा होणार आहे. शुद्ध हवा, भरपूर पाऊस आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, म्हणून मी ही झाडं लावलीत.

 

Daripalli-Ramaiya-inmarathi
modernindianhero.com

 

रामय्यांचे म्हणणे आहे की, निसर्ग आपण न मागता आपल्याला उपयोगी पडणाऱ्या सगळ्या झाडांची निर्मिती करतो. आपल्याला चांगली फळे फुले देतो. तर मग आपले कर्तव्य आहे की आपण निसर्गाचे रक्षण केलेच पाहिजे.

पुढे ते असेही म्हणतात की,

तुम्ही तुमच्या मुलांना फक्त फळे खायला देऊ नका. त्यांना त्या झाडाचे रोप आणून द्या आणि लावायला सांगा. त्याची निगा राखायला शिकवा. म्हणजे मुले मोठी झाल्यानंतर त्यांना त्याच झाडाची गोड फळे चाखता येतील. त्यातला आनंद काही वेगळाच असेल.

आज जी लहान मुलं आहेत तीच उद्याचे नागरिक होणार आहेत. मग लहानपणीच त्यांना निसर्गाचे ज्ञान द्या म्हणजे मोठेपणी त्यांना आनंद मिळेल. निसर्गाबद्दल प्रेम वाटेल.

ते म्हणाले होते, मी सरकारलाच सांगणार आहे की तुम्ही सरकारी जमिनीत रक्तचंदनाची झाडे लावून ती मोठी झाल्यावर सरकारतर्फेच लिलावाच्या पद्धतीने विका. म्हणजे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. ही रामय्यांची सूचना सरकारने मान्य देखील केली.

रामय्याची आपल्या कामावर निष्ठा आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फळ आता सगळीकडून त्यांना मिळायला लागले आहे. लोक आता त्यांच्या कामाची वाहवा करायला लागले आहेत. त्यांना आपोआपच नावलौकिक मिळायला लागला आहे.

काही राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांसोबत त्यांना २०१७ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार ही मिळाला आहे.

 

daripalli-padmashree-inmarathi
pib.com

 

प्रसिद्धीची आस नसलेल्या, धनाची लालसा नसलेल्या, पण निसर्गाची समृद्धी सतत वाढत राहो या उत्कट इच्छेने काम करणाऱ्या या अवलीयाला शतशः प्रणाम..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “सलाम: एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची गाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे

 • February 20, 2019 at 3:23 pm
  Permalink

  Having read tһis I believed it was very informative. Iappreciate you spending some time and energy to put this shoгt articlе together.
  I once again find myself personallү spenbɗing a loot օf time both reading and posting cоmments.
  But soo what, it was still woгth it!

  Reply
 • April 7, 2019 at 1:29 pm
  Permalink

  I respect to his dedication towards nature. What a benchmark of success! Govt. Should include 1 lesson on this person. Feel free to contact me. 9922811933

  Reply
 • May 12, 2020 at 11:16 am
  Permalink

  खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?