' माओवादी चळवळ आदिवासी समाजाचा फक्त वापर करून घेतेय! – माओवादी कमांडरचा खुलासा! – InMarathi

माओवादी चळवळ आदिवासी समाजाचा फक्त वापर करून घेतेय! – माओवादी कमांडरचा खुलासा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

माओवाद (नक्षलवाद) आणि माओवादी अगदी सुरवाती पासूनच राज्यकर्ते आणि सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे.

पश्चिम बंगालच्या ‘नक्षलबारी’ या एका छोट्याशा गावापासून १९६७ ला माओवादी चळवळ सुरू झालेली. ही चळवळ आज भारतातल्या ७ राज्यांमध्ये आपल्या हिंसक करवायांमधून लोकशाही विरुद्ध एक प्रकारचे छुपे युद्धचं लढते आहे.

माओवादी चळवळ प्रामुख्याने ग्रामीण किंवा आदिवासी भागांमध्ये घनदाट अरण्यात राहून आपला लढा लढते. तरी त्याचा वाईट परिणाम मात्र छोट्याशा आदिवासी पाड्यांपासून ते थेट राजधानी दिल्लीपर्यंत पडतो आहे.

बऱ्याच जणांना माओवादी चळवळीबद्दल फारशी माहिती नसते. माओवादी म्हणजे हिंसक कारवाया करणारे आदिवासी तरुण इतकीच काय ती माओवादाबद्दलची आपली ओळख.

पण प्रत्यक्षात माओवादी चळवळ आदिवासी तरुण किंवा आदिवासी नेतृत्वामार्फत चालवली  जाते का? माओवादी कशाप्रकारे आदिवासी तरुणांना चळवळीत ओढतात? माओवाद आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढत असल्याचे भासवले जात असले तरी, त्यात किती तथ्य आहे याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

काही दिवसांपूर्वी ‘पहाड सिंग’ नावाचा एक जहाल माओवादी कमांडर छत्तीसगड मधील राजनांदगाव येथे पोलिसांना शरण आला. हा पहाड सिंग म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड (एमएमसी) झोनचा प्रमुख.

 

pahad-singh-inmarathi
opIndia.com

ही तिन्ही राज्ये मिळून ५० लाखांपेक्षा जास्त बक्षीस आणि ८० पेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या जहाल माओवादी कमांडरने छत्तीसगड पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

माओवादी चळवळीत आदिवासी तरुणांना कशाप्रकारे सामील केले जाते याबद्दल आपण पहाड सिंगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर माओवादी चळवळ आदिवासी समाज आणि विशेषतः आदिवासी तरुणांचा कशाप्रकारे वापर करून घेते याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत.

अलीकडेच एका मोठ्या वृत्तपत्र समूहाला दिलेल्या मुलाखतीत पहाड सिंगने त्याच्या चळवळीत सहभागी होण्याच्या, काम करण्याच्या, तसेच माओवादी चळवळीच्या कार्यपद्धती बद्दल अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत.

छत्तीसगडच्या ‘फाफामार’ या गावात एका आदिवासी कुटुंबात जन्मलेला पहाड सिंग गरिबीमुळे जास्त शिक्षण घेऊ शकला नाही. मात्र काम करण्याची इच्छा असल्याने त्याने अनेक सरकारी पदांसाठी अर्ज भरण्यास सुरवात केली.

शिक्षक आणि शिक्षाकर्मी इत्यादी पदांसाठी पात्र झाल्यानंतरही पहाड सिंगला नोकरी भेटू शकली नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यवस्थेतील ‘भ्रष्टाचार’.

आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची तळमळ अंगात असली तरी, तशी संधी न मिळाल्याने निराश झालेला पहाड सिंग जंगलात तेंदू पत्ता गोळा करण्याच्या व्यवसायात उतरला. तिकडेच त्याची ओळख माओवादी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हिंडणाऱ्या माओवाद्यांशी झाली.

पहाड सिंग सांगतो की,

सुरवातीच्या काळात माओवादी आदिवासी तरुणांपुढे सशस्त्र उठावाची भाषा वापरात नाहीत. आदिवासींनी त्यांच्या संस्कृतीसाठी, त्यांच्या ‘जल, जमीन व जंगल’ आणि आदिवासी समाजातल्या गरिबी आणि भूक याविरुध्द लढण्यासाठी एकत्र यावे अशीच त्यांची भाषा असते.

 

naxalite-rule-inmarathi
understanding-society.com

याशिवाय आदिवासी तरुणांना चळवळीत आणण्यासाठी त्यांना शहरात असलेल्या मोठमोठाल्या शाळा आणि आदिवासी गावांमध्ये असलेल्या शाळांची तुलना करून दाखव जाते. जेणेकरून त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे संतापाची भावना निर्माण व्हावयास हवी.

या सगळ्या खोट्या आणि भावनिक आवाहनांना बळी पडून बहुतांश आदिवासी तरुण माओवादी चळवळीत स्वतःस सामील करून घेतात. इतर आदिवासी गावांमधील तरुणांना माओवादी चळवळीत सामील करून घेण्यासाठी चळवळीतल्याच आदिवासी तरुणांचा सहयोग घेतला जातो.

आदिवासी तरुणांचा’ब्रेन वॉश’ करण्यासाठी सर्वप्रथम ‘आदिवासी अस्मितेचा’ वापर करून त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करतात.

‘ब्राह्मण संस्कृती’ कशाप्रकारे आदिवासी समाजाला दाबून ठेऊन त्यांना विभक्त करण्याचे षड्यंत्र रचते आहे. जाती व्यवस्था कशी आणि कुठून आली इ. भावना भडकावून देणाऱ्या विषयांवर बोलुन आदिवासी तरुणांची दिशाभूल केली जाते. परिणामी आदिवासी या चळवळीत सहभागी होतात.

आदिवासी तरुणांचा बुद्धिभेद करण्यासाठी माओवादी कुठल्या मुद्द्यांचा वापर करतात याबद्दल बोलतांना पहाड सिंग सांगतो की,

आदिवासी समाजाचा त्यांच्या संस्कृतीवर प्रचंड विश्वास असतो. जंगलातल्या माओवादी चळवळीच्या ‘मूलनिवासी, आदिवासी, भारतनिवासी’ ह्या घोषणा असतात. माओवादी चळवळीत काम करणारे सगळे आदिवासी आहेत.

 

bastar-tribes-inmarathi
sunstartv.com

हे आदिवासीच या जमिनीचे मूळ मालक आहेत आणि तेच खरे भारतीय आहेत इ. घोषणांद्वारे आपणच (आदिवासी) भारताचे मूलनिवासी आहोत अशी भावना निर्माण होते. त्यामुळे आदिवासी त्यांच्या संस्कृती आणि इतिहासाच्या आणखी जवळ जातात आणि त्यांना हक्क (?) मिळवून देणाऱ्या माओवादी चळवळीत खुशीने सामील होतात.

मात्र माओवादी चळवळीच्या ‘सेंट्रल कमिटी’ मध्ये याच आदिवासी तरुणांना कुठल्याही प्रकारचे स्थान दिले जात नाही. याउलट ‘पोलिसांचे खबरी’ म्हणून स्थानिक आदिवासी नेते आणि कार्यकर्त्यांकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते.

संशयाने बघणाऱ्या नेत्यांमध्ये सेंट्रल कमिटी मधल्या सर्वच ‘नॉन आदिवासी’ नेत्यांचा समावेश असतो. शिवाय सर्वोच्च पदांवर बसलेल्या मंडळींचा स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांप्रती व्यवहार अत्यंत वाईट असतो.

मिलिंद तेलतुंबडे (सदस्य-सेंट्रल कमिटी) हा नेहमीच स्थानिक माओवादी कार्यकर्त्यांकडे संशयाच्या नजरेने पाहत. स्वतः मला त्याचा अनुभव आला असल्याचे पहाड सिंग बोलून दाखवतो.

सर्वोच्च नेत्यांच्या एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेतल्यास अथवा वाद घातल्यास ‘तुम्ही असे बोललेच कसे’? अशी उद्धट प्रतिक्रिया त्यांच्या कडून येत असल्याचे देखील पहाड सिंग सांगतो.
पहाड सिंग पुढे सांगतो की,

खाणकामासाठी जमिनी मोजायला येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे आदिवासी समाजाला प्रचंड त्रास होतो. हा आदिवासी संस्कृतीवर आणि अस्तित्वावर आघात असल्याचीच त्यांची भावना असते’ ज्याचा फायदा माओवादी घेतात.

आदिवासी समाजाच्या मनात आपले स्थान निर्माण करून ते सशस्त्र उठावासाठीची पायाभरणी करतात. अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने आदिवासी लोकांचा देखील माओवाद्यांच्या या कृतीला पाठिंबा मिळतो. म्हणूनच पोलिसांना माओवादी कारवायांची माहिती मिळवणे अवघड जाते.

सुरवातीला जरी आदिवासी तरुणांना शस्त्र उचलण्यासाठी सांगितले जात नसले तरी, हळू हळू त्यांचा बुद्धिभेद केला जातो.

सरकार त्यांच्या शस्त्रांसहित जंगलाकडे येत आहे. वन खाते आणि त्यांचे कर्मचारी तुम्हाला इकडे राहू देणार नाहीत. तुम्हाला मारले जाईल, तुम्हाला जंगलाचा वापर करू दिला जाणार नाही इ. गोष्टींची भीती दाखवली जाते.

 

jharkhand-tribals-movement-inmarathi
the-indian-express.com

‘जल, जंगल आणि जमीन’ हे मिळवण्यासाठी शस्त्र उचलणे गरजेचे असून, त्याशिवाय या गोष्टी मिळणार नाहीत अशा प्रकारचे विष आदिवासी तरुणांच्या मनात पेरले जाते. या सर्व संघर्षानंतरही ठोस निकाल मिळत नसल्यामुळे बऱ्याच आदिवासी तरुणांचा भ्रमनिरास होतो.

मात्र सेन्ट्रल कमिटीला त्याबद्दल साधी माहिती देखील नसते. कारण सेंट्रल कमिटीत एकाही आदिवासी नेत्याचा समावेश नसतो.

माओवादी ‘आम्ही आदिवासी समाजासाठी लढत असल्याचे’ कितीही सांगत असले तरी त्यांच्या कथनी आणि करनी मध्ये बराच फरक असल्याचे पहाड सिंग आवर्जून सांगतो.

त्यामुळे माओवादी चळवळ आदिवासी समाजाचा फक्त वापर करून घेते आहे अशी भावना कित्येक तरुणांच्या मनात निर्माण होते. या सगळ्यांमुळेच माओवाद्यांकडे आदिवासी तरुणांचा ओघ कमी होतोय. ज्याचा फटका चळवळीला बसतोय असे पहाड सिंग सांगतो.

माओवादी चळवळ आदिवासींच्या हक्कांसाठी लढते आहे ही शुद्ध थाप असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येते. वास्तविकता बघितल्यास नक्षलवादी भागातील आदिवासी समाजापेक्षा इतर भागात वास्तव्यास असणारा आदिवासी मुख्य प्रवाहात येऊन दिवसेंदिवस प्रगत होतांना दिसून येतो.

मात्र याच्या अगदी उलट माओवादी चळवळीत आयुष्य खर्च करणाऱ्या आदिवासी तरुण आणि त्याच्या कुटुंबाच्या वाट्याला फक्त भय आणि मृत्यूच येतो. माओवाद्यांनी आदिवासी समाजाला किती हक्क प्राप्त करून दिले हे सांगणे कठीण आहे.

पण आदिवासी समाजाला माओवादाची जी कीड लागली आहे ती आदिवासींचे दिवसेंदिवस पतन करतेय एवढे मात्र नक्की आहे.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?