'साजूक तूपाच्या धोतरात गुंतलेल्या चित्रपटसृष्टीत गावरान झुणका भाकरीचा धुडगूस!

साजूक तूपाच्या धोतरात गुंतलेल्या चित्रपटसृष्टीत गावरान झुणका भाकरीचा धुडगूस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : चांगदेव गिते

===

आतापर्यंत गिटार, पियानो सारखी अनेक (ज्यांची आम्हाला अजून नावे सुद्धा माहीत नाहीत) मुलायम वाद्य वाजवीत आमच्या हालगी, संबळ, ढोलकी, मृदुंगाकडे डोळेझाक केलीत तुम्ही.

तुम्ही तुमच्या पुळचाट पिझ्झा-बर्गर मध्ये आमच्या चूलीवरच्या गावरान बाजरी, मका, झुणका-भाकरच्या स्टॉलला जागा दिलीच नाही किंवा एकवेळ जागा मिळालीच नाही असे म्हणू.

अतिक्रमण करावे एवढे आम्ही एकत्रित मजबूत नव्हतो ही, आज ही नाहीत अन अतिक्रमण करणे आमच्या रक्तात ही नाही.

याचाच फायदा घेत ‘साजूक तूप’वाल्यांनी आपल्या ‘नाजूक’ शब्दाच्या साथीने मीडियातील आपल्याच भाऊ-बंधूंना हाताशी धरून अनेक क्षेत्रात मोठ-मोठ्या तटबंदी भिंती उभ्या करून ठेवल्या.

त्याला टक्कर द्यायची हिंमत आमच्यातल्या कोणी केली नाही किंवा केली तरी तुम्ही ती परतून लावली. त्यात आजवर आमची कोणाची टक्कर इतकी दमदार नसेल.

अन याचमुळे जरी आमचा माल उत्तम असला तरी गॉडफादर नसल्यामुळे किंवा व्यासपीठाअभावी त्याचे हालच झाले असतील अन झालेही.

 

marathi-films-inmarathi

 

त्याचवेळी तुम्ही मात्र कित्येक पिढ्यापासून एकमेकांना, काका पुतण्याला, पुतण्या काकांना, एकमेकांच्या भाच्याला, भाचीला, चाचीला लाँच करत राहिलात. आमच्या माथी मारत राहिलात !!

मीडियानेही तुमच्या बुटा-सॉक्सपासून बातम्या प्रसारित करत, त्या गोष्टीत काही अर्थ असला नसला तरीही काहीही अर्था-अर्थी संबध जोडून आमच्या मेंदूचं पाकीट मारत तुमच्या अन त्यांच्याही “TRP” ला ऊतरंडीला येऊनच दिले नाही.

‘स’ ला ‘श’ म्हणत ‘न’ ला ‘ण’ म्हणण्यावरून तुम्ही कायम इतरांना हिणवत राहिलात, सोसायटीतल्या कुचाळ म्हातारीसारखे.

तुम्ही नेहमीच आमचे व्याकरण पाहत राहिलात. अंतःकरण कोणी पाहिलेच नाही. इतरांच्या शब्दात असणाऱ्या भावनांना बोलण्या-चालण्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जागा दिलीच नाही.

आता तुम्हीच पहा ना !! गणपती बाप्पा तर सगळ्यांच्याच घरी येतो पण तुम्ही दाखवता तो कपूर, हिराणी,अंबानी, रॉय, बच्चनच्या घरचा.

वरून देवाला सगळे सारखेच असतात हे पुन्हा तुम्हीच आम्हाला शिकवता. तुमच्या कॅमेऱ्याचा झगमगाट वाडी, वस्ती, तांड्यावर कधी पडलाच नाही.

त्यामुळे कित्येक वर्षे आमचे सुख-दुःख अडगळीतच खितपत पडत राहिले, सडत राहिले; कोणाचीच नजर न गेलेल्या दऱ्या-खोऱ्यातील एखाद्या सुगंधी, औषधी रानफुलाप्रमाणे.

 

khwada-movie-inmarathi

 

तळमळ असणारे आमच्यासारखे काही मध्यमवर्गीय मात्र या छुप्या युतीचा फारसा विचार न करता फक्त आपलीच गाडी माडी साडी सांभाळत आपल्याच लोकांचे पाय ओढत प्रेक्षक गॅलरीत बसून आवडले, नाही आवडले तरी पियानोवर माना डोलवत राहिले.

पर्याय नसल्याने आळणी-सपक मालालाही रसद पुरवत राहिले.

त्याचवेळी नागराज अण्णा सारख्या एखाद्या एकलव्याने स्वतःच स्वतःला लाँच करून तथाकथित सरंजामी लोकांच्या भिंतीला असे खिंडार पाडले की झोपेत सुद्धा त्यांच्या डोक्यात आता संबळ वाजत असेल.

त्याने ‘हाबाडा’च एवढ्या जोरात दिला की तुम्ही उभा केलेल्या अडथळ्यांच्या भिंती, बुरुज भूकंपात पडावेत तसे कोलमडून पडले. गावठी ‘दणका’ काय असतो त्याने दाखवून दिले.

आता अण्णाने ज्याला द्रोणाचार्य मानले आहे, ते द्रोणाचार्य अंगठा मागतील की नाही माहीत नाही, पण काही झारीतले शुक्राचार्य मात्र अडथळे आणत राहतील, हे नक्की.

 

nagraj_manjule_inmarathi

 

फेरारी मॅन, मेट्रो मॅन, शुद्ध बोलणारे, वाय-फाय अन हाय-फाय असणारेही चांगले कलाकार आहेत याबाबत दुमत नाही, तीही तितकीच चांगली गोष्ट आहे. तुमच्यातल्या कोणी संघर्ष केला नाही असे ही आमचे म्हणणे नाही.

तुमच्या यशाबद्दल आम्हाला असुया असण्याचे काहीच कारण नाही. तुमची सुद्धा मेहनत आहे आणि तेवढ्या संकुचित वृत्तीचे आम्ही नाही.

घरावर तुळशी पत्र ठेऊन काम करणारे आम्ही लोक आहोत. पण तुमचे जे फक्त तुम्ही, तुम्ही अन तुम्हीच चालले आहे ना, ते  मात्र मनाला न पटणारे नाही.

घरातल्या खिडकीतून समुद्र बघताना कधीतरी घरावर नीट छप्पर अन पायात स्लीपर नसणारे काही जण लाँच करायचे औंदार्य दाखवायला पाहिजे होते.

पण ते तुम्ही कदापी करणार नाही. आता मात्र न्यूनगंडाची आमची आम्हालाच नाळ कापुन आमच्यातील टॅलेंट जगाला ओरडुन सांगावे लागणार आहे.

कारण कधी-कधी माल दर्जेदार असूनही गिऱ्हाईकापर्यंत पोहचत नाही, त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही. आम्हीही नवीन गोष्टीचे धाडस करत नाहीत.

जे झाले ते झाले. आता मात्र कागदाच्या परीक्षेत नापास झालेले पण दुनियादारीच्या परीक्षेत टॉपर असलेले, कधी काळी रस्ता भरकटलेले,
आपल्याच शेणा-मातीतले, परिघा बाहेर असलेले, जगाने गावठी समजलेले, भाऊसाहेब कऱ्हाडे, नागराज अण्णा, भाऊसाहेब शिंदे सारखे लोक बबन, ख्वाडा, सैराट, फँड्री सारखे मनाला भिडतील असे दर्जेदार चित्रपट काढत असतील.

फक्त मनोरंजनच न करता सामाजिक संदेश देत असतील.

 

baban-inmarathi

 

हे लोक तुमच्याआमच्या रोजच्या जगण्याचे डफडे आणि तुणतुणे पडद्यावर मांडत असतील. रिअल आणि रील हिरो बनत असतील तर ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.

कारण माणसाने ज्या गोष्टी जगलेल्या असतात, भोगलेल्या असतात त्या इतरांसाठी भले अभिनय असतील पण ज्याने भोगलय तो त्याद्वारे आपले काळीज हलके करण्याचा प्रयत्न करत असतो.

अशाच या काही ठराविक लोकांच्या (जातीच्या नव्हे) मक्तेदारीला मोडून काढणे ही देखील चित्रपटातल्या हिरो सारखीच वास्तवातल्या हिरोची गोष्ट आहे.

ही लढाई आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची अन प्रस्थापित-विस्थापित हे फक्त कोण्या एका क्षेत्रातले, जातीतले, धर्मातले नाहीत.

अजूनही भाकरीसाठी मरणारे विस्थापित अन कुत्र्यांना महागडे बिस्कीट खाऊ घालणारे प्रस्थापित आहेत सज्जनांनो!!

त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आता असे अनेक नागराज अण्णा, भाऊसाहेब दादा, शिंदे गुरूजी प्रस्थापितांच्या गल्लीत जाऊन धुडगूस घालतील यात शंका नाही.

 

marathi-films-inmarathi

 

आजपर्यंत आपण फक्त चिकण्या-चोपड्या चॉकलेट बॉय हीरोच्या अन आईस्क्रीम गर्ल हिरोईनच्या नादात अस्सल गावरान करवंदाला अन लोण्याच्या गोळ्याला कोंडून ठेवले. आताशी काहींनी पिंजरा उघडला आहे. आता फक्त तुम्ही-आम्हीही त्यांना खंबीर साथ दिली पाहिजे!

जाता जाता सहज म्हणून फक्त एक-दोन गोष्टी उदाहरणादाखल सांगतो, बबन चित्रपटातील घर, म्हशी-कोंबड्या, शेती स्वतः खऱ्या हिरोची आहे.

पहिल्या लेखाखाली : सदर लेखाचा प्रतिवाद इनमराठीवर प्रसिद्ध करण्यात आला आहे : प्रतिवाद वाचण्यासाठी इथे क्लिक करा,

तथाकथित “साजूक तुपातले प्रस्थापित” आणि मराठी चित्रपटसृष्टी : एक प्रतिवाद

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “साजूक तूपाच्या धोतरात गुंतलेल्या चित्रपटसृष्टीत गावरान झुणका भाकरीचा धुडगूस!

 • September 21, 2018 at 11:15 am
  Permalink

  Evdha dwesh bara nahi.. Deshala development chya margawar nyaycha aahe. Apasat Bhedbhav nako..

  Reply
 • March 21, 2019 at 5:21 pm
  Permalink

  तुम्हाला न आणि ण या मधील फरक कळतो का ओ?
  एखाद्या शब्दचा उच्चार बदला की त्या वाक्याचा अर्थ बदलतो ऐवढं तरी कळते का?
  धन्यवाद.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?