केरळातील अख्खं गाव “नशेडी” झालं असताना, बुद्धिबळाच्या पटाने सगळं चित्र पालटलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मुंबई हे शहर रात्रभर जागेच असते, महान मुंबईमध्ये दिवसा आणि रात्री सगळ्या सेवा चालूच राहाव्यात म्हणून प्रयत्न चालूच आहेत.

जसे दिवसा सगळे कारखाने चालू असतात त्याच प्रमाणे ते रात्रीही चालू असतात आणि २४ तास मालाचे उत्पादन घेतले जाते. ह्यामुळे दिवस रात्र कामगारांची ये-जा चालूच असते. मुंबईची विमान सेवाही रात्रभर चालूच असते, मुंबईची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन रात्रभर लोकांची ने-आण करत असते.

कारण का? तर मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये अनेक कारखाने आहेत, अनेक प्रकारची ऑफिसेस आहेत, कॉलसेन्टर्स आहेत, बस सेवा, माल वाहतूक ह्या सगळ्या गोष्टी दिवस रात्र चालूच असतात.

म्हणून सगळीच ऑफिसेस, सेवा, वाहतूक, ह्या दिवसा प्रमाणे संपूर्ण रात्रभर चालूच ठेवाव्यात असा विचार सुरू झाला.

एका दृष्टीने ते योग्यच आहे, कारण त्यातून मोठी रोजगार निर्मिती होणार हाच विचार पुढे आला होता. उत्पादनात वाढ, व्यापारात वाढ, आर्थिक उलाढाल दुपटीने वाढणार हा मोठा विचार केला गेला आणि आवश्यक त्या सेवा दिवस रात्र चालू राहाव्यात म्हणून प्रयत्न झाले.

 

mumbaia-inmarathi
topinfowala.in

आता मुंबई सारख्या मोठ्या आणि सगळ्या दृष्टीने अनुकूलता असलेल्या शहराला हे सहज शक्य आहे. पण दुर्गम भागात, डोंगराळ भागात हे करता येणे शक्यच नाही. म्हणून तिथे प्रगती नाही. अशी अनेक गावे आजही भारतात आहेत की जिथे आर्थिक विकास खुंटला गेला आहे.

डोंगराळ, दुर्गम भागात दळणवळणाच्या सुविधा नाहीत म्हणून काही ठराविक गोष्टींचे उत्पादन होते, विकास होत नाही. निसर्गावर लोकांचे जीवन अवलंबून असते, तर कुठे ठराविक शेती उत्पादन होते. ठराविक काम झाल्यावर जास्तीचे काम शक्य नाही. मग “ठेविले अनंते तैसेचि राहावे” अशी परिस्थिती असते.

असेच एक डोंगराळ भागात वसलेले छोटे गाव. गावाचे नाव “मारोत्तीचल”. केरळ राज्यातल्या त्रिशूर जिल्ह्यातलं  हे गाव.

केरळ म्हटले की, अतिशय निसर्गरम्य, सुंदरतेनी नटलेली, मोठ्ठा समुद्रकिनारा लाभलेली विविध पर्यटन स्थळे असलेले राज्य. जगभरातल्या लोकांना मोहवून टाकणारी ही पर्यटन स्थळे म्हणजे  केरळच्या लोकांचा रोजगार. निसर्गाने समृद्ध असलेले केरळ ह्या पर्यटनामुळे आर्थिक दृष्ट्या पण समृद्ध झाले आहे.

केरळ मधील विविध उद्योग सुद्धा केरळच्या समृद्धीचे स्रोत आहेत. नारळ उत्पादने, मसाल्याचे पदार्थ, रबर उत्पादन, ज्यूट उत्पादन, केळी, मत्सोद्योग, ही सगळी केरळची समृद्धी.

आता केरळमध्येच असलेल्या ह्या मारोत्तीचल गावात रबराचे उत्पादन होते. पण डोंगराळ भाग असल्याने दळणवळण सुविधा नसल्यामुळे बाकी उत्पादने शक्य होत नाहीत, त्यामुळे एक उत्पादन घेऊन संपूर्ण  गाव आपली रोजगार निर्मिती करते.

 

Chess-inmarathi02
thehindu.com

मर्यादित जमीन, मर्यादित उत्पन्न, मर्यादित रोजगार. ह्यामुळे बाकी उलाढाल करणे शक्य होत नाही. मग काम झाल्यावर काय करायचे? तर हातभट्टी दारूची निर्मिती करायची हे काही लोकांचे काम, तर ती दारू पिण्याचे दुसऱ्या काही लोकांचे काम आणि नशेत जुगार खेळणे.

अशी सुरू होती त्या संपूर्ण गावाची दिनचर्या. ह्यात लहान, मोठे, तरुण, म्हातारे सगळेच सामिल. मग कोण कोणाला बोलणार? असं सगळं गाव नशेत आणि जुगारात धुंद व्हायचं.

रोज काम झालं की दारू, दारू चढली की जुगार. सगळं गाव बुडून गेलं होतं ह्या दारूच्या नशेत.

सांगणार कोण? सगळ्या गावातल्या महिला पुरत्या त्रासून गेल्या होत्या. अशी ही परिस्थिती होती १९७० ते १९८० ह्या दशकातली. दहा वर्षे गाव बुडून गेला होता ह्या देशी नशेत.

अनेक संसार दहा वर्षात उध्वस्त झाले, अनेक घरे जुगारात बेचिराख झाली. अनेकांची शेती वाडी विकली गेली. काही लोक बेघर झाले. अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून गाव जात होता. फारच दयनीय परिस्थिती ओढवली होती. बरबादीकडे वाटचाल.

एक सूज्ञ व्यक्ती ह्या गावात एक छोटे चहाचे दुकान चालवत होता, त्याचे नाव “सी. ऊंनी कृष्णन”.

 

Chess-inmarathi04
thenewsminute.com

आपलं गाव दारूमुळे संकटात चालला आहे आणि आपल्या गावाला ह्यातून बाहेर काढले पाहिजे ही जाणीव त्याला झाली. त्याने गावातल्या काही लोकांना एकत्र आणलं आणि विचार पक्का केला की गावातल्या दारूचे व्यसन जडलेल्या ह्या लोकांना दारू पासून परावृत्त करायचंच.

ऊंनी कृष्णनला वयाच्या १६ व्या वर्षांपासून बॉबी फिशर ह्या जगज्जेत्या बुद्धिबळ पटूचे आणि त्याच्या उत्कृष्ट खेळाचे आकर्षण होते.

पण खेळ कसा खेळतात हे माहीत नव्हते. ऊंनी ने हा खेळ काही दिवसात आत्मसात केला, बॉबी फिशर कडून सल्ला घेतला आणि गाव सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. स्वतः हा खेळ शिकून घेतला आणि काही लोकांना बुद्धीबळ शिकवायला सुरुवात केली.

हा नवीन खेळ बघून काही आणखी लोक बुद्धिबळ पाहायला यायला लागले. पाहता पाहता हळू हळु त्यांना ह्या खेळात गोडी वाटू लागली आणि हळू हळू तेही खेळ शिकले. ऊंनीच्या घरात गर्दी जमायला लागली ऊंनीच्या पत्नीने ही ऊंनी कृष्णनला मदत करायला सुरुवात केली आणि आणखी काही लोकांना बुद्धिबळ शिकवला.

हळू हळू ६०० च्या वर लोक ऊंनीकृष्णन कडून बुद्धीबळ शिकले आणि दारू पिणे विसरून बुद्धिबळ खेळायला लागले.

जुगारात पैसे घालवण्यापेक्षा बुद्धिबळ लोकांना चांगला वाटायला लागला. लोक ऊंनी कृष्णनला गुरू मानू लागले. ऊंनी ने त्यांना जुगार आणि दारूपासून परावृत्त केले आणि गाव मोठ्या व्यसनातून मुक्त झाला.

 

Chess-inmarathi03
thehindu.com

सतत काहीतरी काम करत राहणे फार उपयोगाचे असते. कारण रिकामे बसणे म्हणजे कोणत्या तरी व्यसनाला किंवा वाईट गोष्टीला आमंत्रण देणे हे निश्चितच. व्यसनामुळे संपूर्ण गावच्या गाव बरबाद होऊ शकतो हे केरळच्या मारोत्तीचल गावचे जिवंत उदाहरण आहे. आजही ऊंनीकृष्णन त्या गावात राहतात. आज ते ५९ वर्षांचे आहेत.

ऊंनीने बुद्धीबळ हाच खेळ का निवडला असावा? तर बुद्धिबळ हा बैठा खेळ आहे आणि तो कितीही वेळ खेळला जाऊ शकतो. रात्री किंवा दिवसा हा खेळ मर्जी प्रमाणे खेळता येतो म्हणून जुगारिपासून माणूस लांब राहू शकतो आणि दारूची त्याला आठवण होत नाही म्हणून हाच खेळ निवडला असं ऊंनीकृष्णन आज मोठ्या उत्साहात सांगतात.

ऊंनीकृष्णनच्या डोक्यात ही कल्पना आली नसती तर संपूर्ण गाव रसातळाला गेला असता. आज ऊंनीच्या चहाचा धंदाही जोरात चालतो आणि गावातले लोकही आपला मोकळा वेळ ऊंनीच्या चहाच्या हॉटेलमध्ये बुद्धिबळ (Chess) खेळण्यात धन्यता मानतात. हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांना पोलिसांनी उचलून नेले. ते कसे?

तर त्या गावातल्या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी एक्साइज ड्युटी डीपार्टमेंटला सगळ्या अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती दिली आणि अवैध दारू विक्री बंद झाली.

एक चहावाला एवढे मोठे परिवर्तन करू शकतो हे आज त्याच गावातले लोक आनंदाने सांगतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?