' आपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत? समजून घ्या जागतिक अर्थकारण सोप्या भाषेत!

आपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत? समजून घ्या जागतिक अर्थकारण सोप्या भाषेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

समाज माध्यमांवर घसरत्या रुपयावर होणाऱ्या विनोदांची जागा आता संतप्त प्रतिक्रियेने घेतली आहे. रोज एका नवा निचांक गाठून रुपया बातम्यांत स्थिर होत आहे. आपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे टेकले आहेत आणि इतक्यात तो सावरेल ही शक्यता पण दिसत नाही.

आपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत? या प्रश्नाचे उत्तर जगाच्या वर्तमान परिस्थितीची जाणीव करून देईल.

सगळ्यात पहिल्यांदा ही महत्वाची गोष्ट ध्यानात असू द्यात की एखाद्या देशाचे चलन मुल्य खूप जास्त असते म्हणजे तो देश विकसित देश किंवा बलाढ्य देश ठरतो असे नाही. असे झाले असते तर बांगलादेश आज जपान पेक्षा बलाढ्य देश ठरला असता.

जानेवारी २०१८ पासून सप्टेंबर पर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण १२% च्या पुढे असून आज रुपयाची किंमत ७२.६७ प्रति डॉलर अशी आहे.

भारत आणि इतर देशात वेगवेगळ्या ३६ चलनात व्यवहार होत असतो परंतु जागतिक व्यापारात मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर हेच चलन वापरले जाते. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था स्थिर मानली जाते परिणामी त्या देशाचे चलन शिलकीत असणे कमी जोखमीचे असते.

 

rupee-dollar-inmarathi
goodreturns.in

इतर चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया भक्कम होत असला तरी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्याचे अवमूल्यनच होत आहे.

त्यामागची कारणे काय आहेत हे पण आता जाणून घेऊ.

१) क्रूड तेलांच्या किमतीत झालेली वाढ :

आपला देश मोठ्या प्रमाणावर क्रूड तेलाची आयात करत असतो तेव्हा २०१४ च्या तुलनेत तेलाच्या किंमती आता वाढू लागल्या आहेत इतकेच नव्हे तर आपली देशांतर्गत तेलाची मागणीही वाढली आहे. म्हणजे किती वाढली तर गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट!

आणि यातील मोठा व्यवहार हा अमेरिकन डॉलर मध्ये होतो तेव्हा त्याचा आपल्या परकीय गंगाजळीवर ताण पडणार हे तर निश्चितच आहे.

 

crude-oil-inmarathi
Newsring.com

हे इतक्यावरच थांबत नाही. अमेरिका नोव्हेंबर पासून इराण वर पुन्हा एकदा व्यापारी निर्बंध लावणार आहे.

जगातला ६ व्या क्रमांकाचा तेलाचा निर्यातक असणारा इराण जर तेलाची निर्यात करू शकला नाही तर मागणी पुरवठ्याच्या तत्वानुसार किंमत वाढेल तो दबाव पण आहेच.

२) चीन – अमेरिकेतील व्यापारयुद्ध :

 

china-america-tradewar-inmarathi
MarketWatch.com

बाह्य जगतातील म्हणावी अशी बाब आपल्या देशासाठी पण डोकेदुखी ठरत आहे. याचा परिणाम आयात महाग होण्यात झाला आहे. आधीच आयात अधिक त्यात ती महाग होणे यामुळे आपण अधिक डॉलर्स खर्च करतो आहोत.

३) वाढती व्यापारतूट :

भारताचा व्यापारतोल नेहमीच ऋण बाजूचा असल्याने परकीय चलन आपल्या देशात येण्याच्या तुलनेत आपले चलन इतर देशात जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे व्यापारतूट वाढली आहे.

किती, तर १५७ बिलियन डॉलर. हा आकडा काय दर्शवतो तर भारतात डॉलर्स येण्याचं प्रमाण कमी झाल्याने त्याची मागणी वाढली आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची आवक वाढल्याने त्याची किंमत कमी झाली आहे.

“द हिंदू बिजनेस” च्या एका रिपोर्टनुसार, गेल्या फेब्रुवारी महिन्यातील व्यापारतुट तब्बल २६% इतकी होती.

यांत अजून एक असा दावा केला जातो की आपल्याला याचा फायदा निर्यात करतांना पण होतो आहे पण हे काही प्रमाणातच खरं आहे कारण एकतर आपली निर्यातीपेक्षा आयात अधिक आहे आणि दुसरं म्हणजे आपण निर्यात काय करतो?

 

trade-deficit-inmarathi
thehindubusinessline.com

उदाहरणार्थ आपण हिरे आयात करतो त्यांना पैलू पाडण्याचं काम भारतात होत आणि ते नंतर जगात निर्यात केले जातात. म्हणजे आपण आयातच महाग करतो तेव्हा निर्यात महाग करून होणारा फायदा तितका मोठा नाही.

आता या प्रकारच्या निर्यातीचं प्रमाण एकूण निर्यातीच्या ४०% इतकं आहे. यावरून निर्यातीच क्षेत्र किती मर्यादित आहे हे पण लक्षात येईल.

४) घटते परकीय चलन :

वाढते इंधनदर, व्यापारयुद्धाची वाढती तीव्रता या कारणांमुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतून (ज्यात भारताचाही समावेश होतो) आपली गुंतवणूक बाहेर काढण्यास प्राधान्य देत आहेत.

 

foreign-exchange-india-inmarathi
india.com

भारताबाबत बोलायचे झाल्यास या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात (जानेवारी ते जून) ४७,८३६ कोटी  रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिजर्व बँकेने आपले व्याजदर वाढवल्याने गुंतवणूकदार तिकडे आकर्षित होत आहेत.

ज्या वेळी आपण देशाच्या चलनमुल्याचा विचार करत असतो त्यावेळी लक्षात घ्यायला हवं की चलनमूल्याच्या किमती मध्ये सतत चढ उतार होत राहतात. त्यामुळे रुपयाची किंमत डॉलर च्या काय पण जगातील इतर दुसऱ्या कुठल्याही चलनमुल्याच्या समांतर रेषेत स्थिर होवू शकत नाही.

खरे पाहता आपल्या देशाचे चलनमुल्य जे रुपयात मोजतात तो रुपया अमेरिकन डॉलर च्या तुलनेने खूप स्वस्त किंमत मुल्य असणारा आहे. सध्याच्या रेट प्रमाणे साधारण ८० रुपयाला एक अमेरिकन डॉलर विकत मिळतो किंवा घ्यावा लागतो.

अजून एक कारण म्हणजे येत्या वर्षात भारतात निवडणूका आहेत अशावेळी जर सत्ताधारी पक्ष बदलला तर सध्याचे आर्थिक धोरण राबवले जाईल का?

या शंका असल्याने गुंतवणूकदार जोखीम न स्वीकारता आपली गुंतवणूक करण्याकडे कल  ठेवतात.

 

fdi-inmarathi
Factly.com

वर नमूद केलेली कारणे लक्षात घेतली तर आपण तात्पुरते उपाय करून यावर नियंत्रण मिळवू पाहतो आहोत पण ते पुरेसे नाही याची कल्पना सहज येईल.

तेलाचे अवलंबित्व कमी करणे, अंतर्गत बाजारपेठेचे सशक्तीकरण, देशांतर्गत गुंतवणूक वाढवणे हे उपाय दीर्घकालीन आहेत आणि त्यासाठी धोरणसातत्याची आवश्यकता आहे.

किंबहुना आज उद्भवलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील असणे म्हणजेच उदयोन्मुख अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे होय.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?