'समलिंगीयांना समजून घेण्यास आपण कमी पडतोय

समलिंगीयांना समजून घेण्यास आपण कमी पडतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज समलैंगिक संबंधांना “गुन्हा” म्हणून गृहीत धरलं जाणार नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या निमित्ताने, ह्याच विषयावर, विचारवंत व ज्येष्ठ अभ्यासक श्री श्रीकांत उमरीकर ह्यांचा एक जुना लेख इनमराठीच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

===

गेली 20 वर्षे वाचन चळवळीचं काम करतो आहे पण एका अजब प्रसंगाला तोंड देण्याची वेळ माझ्यावर पहिल्यांदाच आली. समपथिक ट्रस्टचे काम पाहणारे बिंदुमाधव खिरे यांचा फोन आला. त्यांच्या संस्थेने समलिंगिंसाठी प्रकाशीत केलेली पुस्तके विक्रीसाठी ठेवायची होती.

यात अडचण वाटावी असं काहीच नव्हतं. मी चटकन होकार दिला आणि त्यांनी धन्यवाद मानले.

यात धन्यवाद कसले असे मी विचारताच ते म्हणाले की ही पुस्तके कुणी विक्रीला ठेवायला तयार होत नाही. मी जरासा चकित झालो. पण पुढे मला त्याचे प्रत्यंतर येत गेले.

केवळ ही पुस्तके कुणी विक्रीला ठेवत नाही इतकेच सत्य नसून ही पुस्तके विकत घेण्यासही कुणी तयार नाही हेही कटू सत्य मला लवकरच समजले. हळू हळू समलिंगी व्यक्तींच्या जीवनातील अडचणींचा एक पटच उलगडत राहिला.

मुंबईला भरणारा समलिंगी चित्रपटांचा महोत्सव ‘कशिश’ आणि काही वर्षांपूर्वी प्रदर्शीत झालेला मनोज वाजपेयी राजकुमार राव अभिनीत हंसल मेहताचा चित्रपट ‘अलिगढ’ यांच्यावर मी वर्तमानपत्रात लेखन केले. संपर्कासाठी माझा मोबाईल क्रमांक दिला. आणि आवर्जून खाली टीप दिली.

ज्यांना कुणाला संवाद साधायचा आहे त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. इतकं सांगितल्यावर मग समलिंगी व्यक्ती संपर्क करायला लागल्या.

 

kashish-inmarathi
mumbaiqueerfest.com

शहरातील काही पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मिळून ‘लोक नीती मंच’ या नावाने एक सामाजिक प्रश्‍नांसाठी एक मंच सहा वर्षांपासून चालवित आहोत.

या अंतर्गत शहरातील कचरावेचकांच्या समस्या असो, राखीव जागा-आरक्षणासंबंधी काही किचकट विषय, कोळसा घोटाळ्यासारखे २०१२ मधील राजकीय दृष्ट्या गैरसोयीचे विषय, शहरी सार्वजनिक वाहतूकी गंभीर समस्या हे विषय आम्ही हाताळत आलो आहोत.

समलिंगींच्या समस्यांचा किचकटपणा आमच्या लक्षात आला आणि इ.स. २०१२ पासून आम्ही हा विषय हाताळायला सुरवात केली.

पहिली अडचण खुद्द समलिंगी व्यक्तींचीच असते की त्यांना आपली ओळख जाहिर होवू द्यायची नसते. समाज स्विकारत नाही हे कारण पुढे करत ते मागे मागे सरकतात.

आपल्या समाजरचनेत कुटूंबाला अजूनही महत्त्वाचे स्थान आहे. आणि कुटूंब म्हणजे पती पत्नी आणि मुले इतकेच अपेक्षीत आहे. फारच एकत्र कुटूंबाचा उमाळा आला तर आजी आजोबा. पण दोन पुरूष किंवा दोन स्त्रीया आयुष्याचे जोडीदार म्हणून सोबत रहात असतील तर त्याला आपण कुटूंबाचा दर्जा द्यायलाच तयार होत नाहीत.

हा सगळा पेच सोडवायचा कसा? समलिंगी संबंधांना कायद्याची मान्यता नाही यासाठी न्यायालयीन लढाई चालू आहे. हा विषय बर्‍याच जणांनी सविस्तर मांडला आहेच. पण त्या सोबतच वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन पैलूंचा विचार झाला पाहिजे.

एक व्यक्ती म्हणून समलिंगींची होणारी घुसमट-अडचण गेली सहा वर्षे संस्थेच्या माध्यमातून माहित आहे. यातही परत लेस्बियन अगदी एकच प्रकरण आमच्याकडे आले आहे. ती मुलगी चांगली सरकारी अधिकारी आहे. तिचा स्वत:चाच काही एक गोंधळ नेहमी उडालेला असतो. परिणामी इच्छा असूनही आम्ही तिला फारशी मदत करू शकत नाहीत.

तृतियपंथी यांचाही संपर्क आमच्या संस्थेशी फारशा आला नाही. त्यांच्या वेगळ्या संस्था आहेत. त्यांचे काही विषयही भिन्न आहेत. पण ‘गे’ची संख्या मात्र मोठी आहे. आणि एकुणच एल.जी.बी.टी. समाजाचे नेतृत्व तसेही ‘गे’च करत आलेले आहेत.

सामाजिक पातळीवर एलजीबीटी बाबत असलेले गैरसमज ही एक मोठीच अडचण आहे.

 

lgbt-inmarathi
WashingtonPost.com

आमच्या संस्थेशी निगडीत असणार्‍या ‘गे’ व ‘बाय’ यांच्याशी चर्चा करून समोर आलेले काही मुद्दे इथे ठेवतो.

गे आणि बाय (उभयलिंगींबद्दल आकर्षण असणारे) हे इतर लोकांसारखेच प्रजननाबाबत पुरेसे सक्षम असतात. सरधोपट सगळ्यांना ‘तृतियपंथी’ समजण्याची चुक समाजकडून होत असते. (लेस्बियन या माता होण्यास सक्षम असतात. त्यांना पुरूषांसोबत संभोग करण्यात रस नसतो इतकेच.)

या अनुषंगाने पहिला गैरसमज निर्माण होतो की गे लोकांच्या लिंगाचा आकार लहान असतो किंवा त्यांना लिंग जवळपास नसतेच असे समजतात.

त्यांना सक्षमपणे संभोग करता येत नाही. प्रत्यक्षात सर्वसामान्य कुठल्याही पुरूषासारखीच संभोगाची क्षमता यांचीही असते. यांच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या इतरांसारखीच असते. कृत्रिमरित्या यांचे वीर्य काढून एखाद्या स्त्रीच्या बीजांडाशी त्याचा संयोग घडवला तर अपत्य जन्मू शकते.

दुसरा गैरसमज असा बनून गेला आहे की यांच्या भावविश्‍वात केवळ आणि केवळ शरिरसुखच आहे. इतर बाबींचा विचारच हे करत नाहीत. हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे.

इतर कुठल्याही पुरूषाप्रमाणेच एकुण आयुष्यात शारिरीक संबंधाचे प्रमाण यांचेही मर्यादितच असते. सर्वसामान्य पुरूष जसा आपल्या पत्नी (किंवा प्रेयसी) शिवाय फारसा कुणाकडून शारिरीक सुखाची अपेक्षा ठेवत नाही किंवा एका मर्यादेपलिकडे तोही आपल्या स्त्रीशी शारिरीक संबंध ठेवत नाही तसेच हे पुरूषही आपल्या जोडीदाराशी मर्यादित शारिरीक (ज्याच्या त्याच्या आवडीनुसार) संबंधच ठेवतात.

याशिवाय समाजतील त्यांचे जे स्थान आहे, त्यांच्या आवडी निवडी आहेत, त्यांना विविध विषयांत गती आहे हे सगळे इतरांसारखेच आहे. ते बाकी पुरूषांसारखेच समाजात मिसळून गेलेले आहेत.

अगदी आत्ताही तुमच्या आजूबाजूला असे काही ‘गे’ असतील जे तूम्हाला ओळखूही येणार नाहीत.

फक्त अडचण इतकीच आहे की कायदेशीर अडथळे, समाजाचे अडथळे, सामान्य माणसांचे गैरसमज यांमुळे उघडपणे यांना सोबत राहणे अवघड जाते. परिणामी यांच्या भावविश्‍वावर मोठा परिणाम होतो.

 

India Gay Pride
time.com

दुसरा मोठा वर्ग आमच्या संपर्कात येतो तो म्हणजे ‘बाय’ लोकांचा. स्त्री आणि पुरूष या दोघांशीही संभोग करण्यात यांना सारखाच रस असतो. हे लोक लग्न करतात, यांना मुले होतात, एक कुटूंबिय म्हणून ते समाजात स्थिरावतातही. पण यांना स्त्री सोबत पुरूषाच्या शरिराचीही ओढ असल्याने ते एखादा पुरूष जोडीदार शोधतात आणि त्याच्याशी संबंध ठेवतात. पण अर्थातच हे संबंध उघड असू शकत नाहीत.

शिवाय हा जोडीदार जर ‘गे’ असेल तर त्याचीही मोठी भावनिक ओढाताण होत राहते. कारण त्याला या जोडीदारावर आयुष्यभरासाठी हक्क सांगायचा असतो.

पण हा जोडीदार तर त्याच्या कुटूंबाशी बांधलेला असतो. शिवाय त्याला तिकडे जी प्रतिष्ठा प्राप्त असते ती इकडे मिळू शकत नाही. त्यामुळे तो आपल्या शारिरीक वासनेसाठी जरी याच्याशी संबंध ठेवून असला तरी याला पूर्ण न्याय तो देवू शकत नाही.

आपला भारतीय समाज तर मोठा विचित्र आहे. त्याला समलिंगींबाबत शतकांपासून माहिती आहे.

तसे भरपूर पुरावे आपल्या जून्या शिल्पांमधून, जून्या ग्रंथांमधून उपलब्ध आहेत. पण एकूणच धार्मिक पातळीवर याला मान्यता न मिळाल्याने हा विषयच निषिद्ध समजला गेला आहे. मुसलमानांमध्येही समलिंगी आहेत. एका तरुण मुसलमान मित्राला ह्याबाबत विचारले तर त्याचे उत्तर मोठे दाहक होते, “अरे यार *** को कहा मजहब होता है!”.

एलजीबीटी समाजाकडून ज्या पद्धतीनं ‘क्वीर प्राईड परेड’ आयोजीत केली जाते त्याने तर गैरसमज वाढविण्यासच हातभार लावला आहे. चित्रविचित्र कपडे घालून, काही वेळा अश्‍लिल बिभत्स हावभाव करत रस्त्यावरून जाणारा हा घोळक़ा बघितला की डोक्यात फारसे काही नसलेला सामान्य माणूसही हे लोक ‘तसलेच’ असतात असा काहीतरी गैरमसज करून बसतो.

बिंदू माधव खिरे यांनी या विरोधात मोठा रोष पत्करून साध्या चांगल्या सभ्य कपड्यात गे परेड आयोजीत करून एक मोठा आदर्श समोर ठेवला आहे.

पुण्याच्या सात तरूण गे मित्रांनी एलजीबीटी सोसायटीचा झेंडा म्हणून वापरला जातो त्या सप्तरंगी झेंड्यातील प्रत्येक रंगाचे झब्बे परिधान करून मोर्चात सहभाग नोंदवून एक चांगला आदर्श समोर ठेवला होता.

 

gay-pride-pic-inmarathi
3.bp.blogspot.com

आम्ही औरंगाबाद येथे मागील वर्षी अशी ‘क्वीर प्राईड परेड’ आयोजीत करता येईल का याची चाचपणी करत होतो. समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटलो. त्यांनी मोठ्या उदारतेने याला पाठिंबा तर दिलाच शिवाय नैतिक धैर्य वाढविण्यासाठी स्वत: सहभागी होण्याचेही मान्य केले. प्रतिष्ठीत संस्थेने आपली जागाही देण्याचे ठरवले.

पण आश्चर्य म्हणजे एलजीबीटी समाजातील तरूणच पुढे येण्यास तयार झाले नाहीत. मग अशा परिस्थितीत हा उपक्रम पुढे नेणे शक्यच नव्हते. परिणामी ते सगळंच आम्हाला बासनात गुंडाळून ठेवावे लागले.

आम्ही यासाठी एक दुसरा मार्ग निवडला. औरंगाबादला आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट महोत्सव गेली पाच वर्षे भरतो आहे. या महोत्सवात एलजीबीटी विषयावरील चित्रपट दाखविले जावेत असा आग्रह धरला. त्या अनुषंगाने मागील वर्षांपासून अशा काही चित्रपटांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे.

मुंबई आणि पुण्यात केवळ याच विषयाला वाहिलेल्या चित्रपटांचे महोत्सव आता नियमित होत आहेत. पत्रकारही आता या विषयाला बर्‍यापैकी स्थान आपल्या वृत्तपत्रांतून देत आहेत.

समाज माध्यमांवर तर समलिंगींची एक मोठीच फळी सक्रिय आहे. विविध ठिकाणी आलेले लेख शोधून ‘शेअर’ केले जातात. छोट्या छोट्या माहितीपटांतून माहिती येते ती ‘शेअर’ केली जाते. काही चंागले लघुपटही या विषयावर तयार होत आहेत. त्याच्या माध्यमातूनही प्रबोधनाचे काम होते आहे.

समाज समलिंगींना समजण्यास कमी पडतो आहे हे तर खरेच आहे. पण उलटही घडते आहे. स्वत: समलिंगी समाजात मिसळण्यास कमी पडत आहेत.

आज जे कुणी समलिंगी आपआपल्या व्यवसायात नौकरीत स्थिर आहेत, ज्यांनी ज्यांनी आपली ओळख जवळपासच्या लोकांसाठी उघड केली आहे अशा व्यक्तींनी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे. अशोक रावकवी किंवा बिंदूमाधव खिरे यांच्या सारख्या अजून काही लोकांनी धडाधडीने पुढे येण्याची गरज आहे. छोट्या गावांमधूनही एलजीबीटी लोकसंख्या बर्‍यापैकी आहे.

 

india-transgender-inmarathi
theadvocate.com

नामदेव कांबळे या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकाची कादंबरी ‘मोराचे पाय’ ग्रामीण भागातील समलिंगी संबंधावरचीच आहे.

पण छोट्या गावात मध्ययुगीन मानसिकता जास्त प्रमाणात असलेला समाज आढळतो. त्या मानाने शहरी भागात आधुनिकता जास्त आहे. म्हणून ही चळवळ शहरीभागात जास्त लवकर रूजू शकते. उद्योग व्यवसायाचे नौकरीचे जास्त स्वातंत्र्य, जास्त पर्याय शहरात उपलब्ध असतात. म्हणून एलजीबीटी व्यक्तींना तूलनेने शहरात जगणे सुकर जावू शकते.

एलजीबीटी समाजाने सगळ्यात पहिल्यांदा ही त्यांची समस्या असल्या कारणाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

समाजात इतके विविध प्रश्‍न पडून आहेत. तेंव्हा इतर समाज घटक आपणहून तूमच्या समस्या सोडविण्यास पुढे येतील याची शक्यता फार थोडी आहे. तेंव्हा तूम्ही पहिल्यांदा पुढाकार घ्या. माध्यमे आजकाल बर्‍यापैकी उदारमतवादी झाली आहेत. सोशल मिडीया तर हक्काचा आहेच.

समाजानेही आता या प्रश्‍नाकडे केवळ सहानुभूतीने न बघता जगण्याचा हक्क म्हणून मान्य केला पाहिजे. कायद्याने या संबंधांना मान्यता दिली आहे पण आधी समाजाने उदार मनाने मान्यता दिली पाहिजे. तशीही केवळ कायद्याने मान्यता मिळून काहीच होणार नाही. अंतिमत: समाजाची मान्यता महत्त्वाची आहे.

आज कितीही उदारमतवादी दृष्टिकोन ठेवला तरी मांसाहरी असलेला हिंदू गाय खात नाही. मुस्लिम डुक्कर खात नाही.

अनुसूचित जातींमधील पूर्वाश्रमीचे महार डुक्कर खात नाहीत. कायद्याने कुणावर काही बंधन नाही पण आपणहून ही बंधने लोक पाळतात. आजही कपड्यांबाबत कितीही स्वातंत्र्य असले तरी काही एक विशिष्ट पद्धतीचेच कपडे आपण परिधान करतो.

गावोगावचे मंदिरे त्यांचे उत्सव त्यांचे सप्ते जेवणावळी (मुसलमानांच्या बाबतीत उरूस, सामुहिक जेवणावळी) हे सगळं काही कुणी कायदा केला म्हणून चालू आहे असं नाही. तर लोक आपण होवून काही बंधने पाळतात.

काही बंधने मान्य करत नाहीत, काही सण उत्सव साजरे करतात, काही परंपरा रूढी कालबाह्य झाल्या की टाकून देतात. याच पद्धतीनं समलिंगींना सुद्धा इतरांसारखीच प्रतिष्ठा दिली पाहिजे हे समाजाने मनोमन ठरवले पाहिजे. कायद्याने मान्यता जेंव्हा मिळायची तेंव्हा मिळो.

===

लेखक: श्रीकांत उमरीकर.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?