' भारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा

भारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जरी भारतामध्ये कित्येक वर्षांपासून अनेक राष्ट्रीय आणि सहकारी बँका पाय रोवून उभ्या असल्या, तरीही अनेक नियम, कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या अटी, शिकलेले अगदी मोठे दरारा असणारे साहेब यासर्वांमुळे गावातील सामान्य माणूस बँकांमध्ये जाण्यास घाबरतो.

अगदी पुण्यापासून ५० किलोमीटरच्या परिसरातील गावांमधील महिला बँकेमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार करण्यास घाबरतात.

अशा अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर भारताचा ग्रामीण भाग आर्थिक व्यवहारांसाठी मुख्य प्रवाहाशी जोडला गेला नाहीये. जिथे अनेक बँका ग्रामीण क्षेत्रात पोहोचण्यास अपयशी झाल्या, तिथे भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या टपाल खात्याने, गेल्या १६४ वर्षात लाखो गावांना एकमेकांशी जोडले.

पूर्वी आजसारखी संपर्कमाध्यमे नसल्याने टपालखात्यावर सर्वांची भिस्त असायची. शहरांमध्ये आणि गावांमध्ये देखील पोस्टमेन काकांना सर्वजण ओळखायचे. गावी कुणाघरी काही चांगली बातमी असो अथवा वाईट बातमी, निकडीच्या वेळी पोस्टमास्तर काका अगदी रात्री झोपेतून उठूनही तार पाठवायचे.

अशा या टपाल खात्याने वर्षानुवर्षांच्या मेहनतीने माणसे आणि पर्यायाने भारतीय समाज एकमेकांशी जोडला.

 

india-post-inmarathi
inc42.com

या भारतभर विणल्या गेलेल्या टपालखात्याच्या जाळ्याचा उपयोग आता दुरदुरच्या गावांमध्ये आर्थिक साक्षरतेसाठी व्हावा. आणि सर्व समाज मुख्य आर्थिक प्रवाहाशी जोडला जावा यासाठी भारत सरकारने दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बँक’ या नवीन योजनेची सुरुवात केली आहे.

या बँकेवर भारत सरकारचा मालकी हक्क आहे आणि सर्व व्यवहार हे संपूर्णतः रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली असतील.

बँक आपल्या दारीआजपर्यंत पेन्शन घ्यायला, पैसे भरायला किंवा काढायला आपण सर्वजण तासंतास बँकेमध्ये उभे राहिलो, आता या योजनेमुळे ग्रामीण टपाल सेवक, किंवा पोस्टमेन काकांच्या स्वरुपात बँक आपल्या घरी येणार आहे.

या बँकेचा मुख्य उद्देश्य शाखांद्वारे गावोगावी पोहोचण्याचा नसून मोबाईल फोन द्वारे घरोघरी पोहोचण्याचा आहे.

टपाल खात्याच्या जाळ्याचा वापर केल्यामुळे ग्रामीण पातळीवर सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पोहोचणारी ही पहिली बँक असेल. या बँकेमार्फत कर्ज आणि क्रेडीट कार्ड सुविधा सोडल्यास बाकी सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. या बँकेची अनेक वैशिष्टे आहेत-

जसे की याअंतर्गत बाकी बँकासारखे चालू आणि बचत खाते उपलब्ध करून दिले आहेच, त्याशिवाय पोस्टातील १७ कोटी बचत खाती या बँकेशी जोडली जातील.

या खात्यांचा उपयोग करून पैसे हस्तांतरण, विजेचे, घरातील फोन आणि टी.व्ही.चे बिल भरणे, विमा योजनेचे हफ्ते भरणे आदि अनेक व्यवहार करता येतील.

या सुविधेअंतर्गत खात्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची अट नसल्याने सर्व आर्थिक स्तरातील लोकांना योजनेमध्ये समाविष्ट करून घेता येईल. अनेक शासकीय सुविधांशी हे खाते जोडून त्यांद्वारे येणे असलेले पैसे या खात्यामार्फत आपल्याला मिळू शकतात.

 

india-post-inmarathi01
yourstory.com

खाते कसे उघडावे ?

या बँकेत खाते उघडणे अगदीच सोपे आहे. पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अथवा बँकेचे मोबाईल अॅॅप वापरून आपण खाते उघडू शकतो. खाते उघडण्यास आपल्याला फक्त आपल्या आधार कार्डची गरज आहे.

ज्यांचे पोस्टातील बचत खाते आहे, ते फक्त दोन्ही खाती जोडून सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

खाते उघडल्यावर प्रत्येकाला Q.R. कार्ड म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कार्ड मिळेल, ज्याचा वापर करताना आपल्याला खाते क्रमांक लक्षात ठेवायची गरज पडणार नाही.

कुणी फसवले जाऊ नये यासाठी खाते उघडताना आपली बायोमेट्रिक माहिती खात्याशी जोडली जाईल आणि प्रत्येक व्यवहार करताना त्यानुसार शहानिशा केली जाईल.

बँकेचे ग्राहक फोनचा वापर करून अथवा पोस्टमेन काका आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या मदतीने सर्व व्यवहार करू शकतात.

पोस्टाचे कर्मचारी गरजेची सर्व यंत्रणा घेऊनच आपल्या घरी येतील, आणि सर्व सामान्य ग्राहकांना मदत करतील. या बँकेचा ग्राहक आपल्या खात्यामध्ये रुपये १ लाखापर्यंत पैसे जमा करू शकतो.

 

india-post-inmarathi02
entrackr.com

त्यानंतर हे पैसे पोस्टाच्याच बचत खात्यामध्ये जमा केले जातील. या रक्कमेवर बाकी बँकांइतकेच, म्हणजे ४% व्याज दिले जाईल. बँकेकडून ग्राहकांस मोफत डेबिट कार्ड दिले जाईल. हे कार्ड वापरू लागल्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून वार्षिक १०० रुपये हि नाममात्र रक्कम भरावी लागेल.

या बँकेने अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या विविध ई-कॉमर्सच्या कंपन्यांशी करार केले आहेत, जेणेकरून या वेबसाईटवर इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे कार्ड वापरून वस्तू मागवता येतील आणि त्या मागवलेल्या वस्तू पोस्टामार्फत घरी येवू शकतील.

याशिवाय या बँकेचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की, विदेशी मुद्रांमध्ये व्यवहार (Foreign exchange) करताना इथे बाकी बँकांपेक्षा स्वस्त दरामध्ये सेवा मिळेल.

डाकिया डाक लाया ..!

भारतीय शासनाने उचलेले हे पाउल अतिशय कौतुकास्पद आहे. नव्या युगामध्ये संपर्क माध्यमे वाढल्याने टपाल खाते आपल्या विस्मारणातच गेले होते. अनेक वर्षांपासून अडनिड्या वेळी धावून येणारे आपले पोस्टऑफिस आता एका वेगळ्या स्वरुपात आणि एका नवीन ध्येयाने समाजाला एकत्र गुंफायचा प्रयत्न करणार आहे.

आपल्या सरकारने गावांना- खेड्यांना जोडणाऱ्या या लाइफलाईनचे रूपांतरण आर्थिक सुविधांच्या स्रोतामध्ये करण्याचा संकल्प केला आहे.

आपण सर्वजण या मोहिमेमध्ये सहभागी होऊया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सुविधांची माहिती पोहोचवून नवीन भारत घडवण्यास हातभार लावूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?