' इराणी कबड्डी संघ ‘चॅम्पियन’ बनला तो या भारतीय महिलेमुळे! – InMarathi

इराणी कबड्डी संघ ‘चॅम्पियन’ बनला तो या भारतीय महिलेमुळे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दोनदा विजयी ठरलेल्या भारतीय महिला कबड्डी संघाला यंदा आशियाई स्पर्धांमध्ये २४-२७ ने इराणने हरविल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

काही लोकांचं असं म्हणणं आहे की,

कबड्डीमध्ये भारतीय संघाला मिळत असलेल्या सततच्या विजयाने त्यांना स्वतःबद्दल अति-आत्मविश्वास वाटत होता. याचाच परिणाम म्हणून भारत सुवर्णपदक मिळवू शकला नाही.

 

india-kabaddi-team-inmarathi
india.com

 

मात्र इराणच्या विजयात त्या संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांचा मोलाचा वाटा आहे.

आशियाई स्पर्धांमध्ये इराणच्या महिला संघाने अंतिम फेरीत भारताला हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. या विजयात पूर्व भारतीय प्रशिक्षक शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांचे मोठे योगदान आहे.

शैलजा या आपल्या आईला कबड्डी खेळताना पाहत लहानाच्या मोठ्या झाल्या.

 

shailaja jain inmarathi
the indian express

 

नॅशनल लेव्हलवर खेळत असताना त्यांना जळगावमधील एका व्यक्तीकडून लग्नासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. पण त्यांनी कबड्डी खेळायचं ठरवलं आणि त्यांना नकार दिला. पुढे काही काळाने १९८० मध्ये त्यांनी लग्न केले.

मात्र आपली खेळाची आवड, खरंतर पॅशन जोपासण्यासाठी त्यांनी लग्नानंतरही कबड्डीचे प्रशिक्षण देणे सुरूच ठेवले.

सध्या त्या इराणी महिला संघाच्या प्रशिक्षक आहेत. जवळपास दीड वर्षापूर्वी त्या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक होत्या.

काही काळापूर्वी एका मुलाखतीत वृत्तपत्राशी बोलत असताना त्यांनी सांगितले की, त्यांना भारतीय कबड्डी फेडरेशनने काहीही संयुक्तिक कारण न देता प्रशिक्षक पदावरून काढून टाकले होते. 

भारतीय महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी इराणच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली.

 

iran team inmarathi
news 18 hindi news

 

यापूर्वी २००८ साली सुद्धा त्यांना इराणकडून प्रशिक्षकपदाची ऑफर आली होती. कमी पैसे मिळणार असल्याने त्यांनी ती स्वीकारली नव्हती. पण, या वेळी जेव्हा इराणच्या संघासाठी प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला तेव्हा त्यांनी तो आव्हान म्हणून स्वीकारला.

शैलजा यांनी भारत आणि इराणच्या सामन्याबद्दल बोलताना सांगितले की,

एक भारतीय म्हणून भारताने सुवर्णपदकाची संधी गमावली याबद्दल मला निःशंकपणे दुःख झाले, पण प्रशिक्षक या नात्याने इराणने ते सुवर्णपदक मिळवल्याचा आनंद निश्चितच झाला आहे.

इराणच्या महिला कबड्डी संघाला इथपर्यंत पोचविण्यासाठी शैलजाने इराणी खेळाडूंवर खूप मेहनत घेतली आहे. महिलांच्या पोशाखाबद्दल इराणचे कडक नियम आहेत. मात्र असे असताना देखील संघाने शैलजाने सांगितलेले नियम आचरणात आणले.

त्यांनी आपल्या संघाच्या दैनंदिन वेळापत्रकात योग, प्राणायाम यांचा देखील समावेश केला. त्यांनी सांगितले की, नियमितपणे प्राणायाम केल्याने खेळाडूंची श्वासावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढली.

सुरुवातीला त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. इराणमध्ये गेल्यावर इतर काही गोष्टींसाठी त्यांना त्रास सहन करावा लागला. पण, इराणच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना काही त्रास झाला नाही. हळूहळू त्या इराणच्या वातावरणात ऍडजस्ट झाल्या.

 

shailaja kabbadi inmarathi
sports wallah

 

त्यांनी पुढे सांगितले की, इराणला जाताना त्यांना थोडी भीती निश्चितच वाटली होती. पण २०१६ मध्ये एका महिन्याच्या ट्रायलनंतर इराणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तत्परतेने व्हिसा मिळवून दिला आणि त्यांनी तेहरानला जाण्यासाठी विमान पकडले.

त्या म्हणाल्या, ” इराणमध्ये काही गोष्टींवर बंदी आहे पण त्याचा मला काही त्रास झाला नाही. पण मी शाकाहारी असल्याने प्रश्न होता आणि शिवाय भाषेची समस्या होती, ती वेगळीच. प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यावर मी थोडी फारसी भाषा शिकले. त्यामुळे माझे पुढचे काम सोपे झाले. ”

कोचिंगबद्दल बोलताना त्या म्हणतात की ,

 मला इराणच्या मुलींना प्रशिक्षण देताना खूप मजा येते कारण या मुलींचा फिटनेस जबरदस्त आहे. त्यांच्यापैकी सगळ्याच पूर्वी कुठला न कुठला खेळ खेळलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा फिटनेस सुद्धा चांगला आहे.

 

2018-kabaddi-champions-inmarathi
indiatoday.com

 

आपल्या संघाच्या सवयींबद्दल सांगताना शैलजा म्हणतात,

मॅच किंवा प्रशिक्षणाची सुरुवात करताना प्रथम संपूर्ण टीम मॅटला डोकं लावते. त्यांनी स्वतःला ही सवय लावून घेतली आहे. मी सुद्धा ग्राउंड मध्ये जाण्यापूर्वी जमिनीवर डोकं टेकवते. यात कोणत्याही प्रकारचा धार्मिक हेतू नाही.”

त्या हे आपल्या खेळाला मान देण्यासाठी करतात. ज्या खेळाने आपल्याला आयुष्यात सर्व काही दिलं आणि अजूनही देत आहे त्या खेळाप्रती असलेली निष्ठा, त्या खेळाबद्दल आपल्याला असलेला आदर व्यक्त करण्याची ही पद्धत आहे असं मी मानते.

हे मीच या मुलींच्या मनावर बिंबवलं आहे आणि आता त्या देखील हेच करतात. मी माझ्या संघाला सांगितलं होतं की, जिंकणं हा माझा एक हेतू आहे पण गोल्ड जिंकणं हे माझं टार्गेट आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की,

त्यांना पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घ्यायला आवडेल पण अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय. इराणमध्ये कोचिंगदरम्यान त्यांना कोणत्याही हस्तक्षेपाला सामोरे जावे लागत नाही.

 

iran victory inmarathi
DBPOST

 

संपूर्ण ताबा हा त्यांच्याकडे असतो. त्यामुळे त्या जे हवे ते करू शकतात ज्याचा खेळाडूंना फायदा होतो.

खेळाडूंना निवडण्यासाठी बनविण्यात आला होता व्हॉट्सअप ग्रुप.

१२ महिलांच्या अंतिम गटातील मुली निवडण्यासाठी शैलजा यांनी ४२ खेळाडूंचा एक व्हाट्सअप ग्रुप बनविला होता. या ग्रूपवर त्यांना रोज काही प्रेरणादायी संदेश पाठवले जात.

त्या ग्रुपमधून रोज एक किंवा दोन जणांना बाहेर काढले जात असे. त्यामुळे खेळाडूंना ते अंतिम संघात नसल्याचे समजत असे.

शैलजा म्हणतात,

‘मला आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं आणि इराणला आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून देऊन मी ते करून दाखवलंय.

 

iran kabbadi inmarathi
deccan chronical

 

कदाचित पुन्हा भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची संधीही मला मिळणार नाही.

पण भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझं प्रेम आहे आणि ते कायम राहील. पण माझ्या देशाइतकंच माझं माझ्या खेळावर प्रेम आहे आणि त्यानेच हे गोल्ड मेडल जिंकवून दिलंय.’

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?