'हे ६ प्रसंग दाखवतात की भारतीय क्रिकेट टीम कोणत्याही परिस्थितीत विरुद्ध टीमचे दात घशात घालू शकते

हे ६ प्रसंग दाखवतात की भारतीय क्रिकेट टीम कोणत्याही परिस्थितीत विरुद्ध टीमचे दात घशात घालू शकते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ! इंग्रज गेले परंतु आपल्याला ह्या खेळाचा नाद लावून गेले. ह्या खेळासाठी अनेक देश वेडे आहेत. फुटबॉल खालोखाल जगात क्रिकेटचे दिवाने आहेत. पण भारतात मात्र फेवरेटसच्या लिस्ट मध्ये क्रिकेटचा नंबर फुटबॉलच्या आधी लागतो.

भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध इंग्लंड असल्या उत्कंठावर्धक मॅचेस तर सहसा कुठलाच क्रिकेटप्रेमी सोडत नाही.

क्रिकेटला जेंटलमेन्स गेम म्हणतात तरी प्रतिस्पर्ध्याचे मनोधैर्य खचावे म्हणून विरुद्ध संघातील खेळाडू अनेकदा टोमणेबाजी करणे किंवा स्लेजिंग करणे अश्या गोष्टी करतात.

ऑस्ट्रेलियन खेळाडू तर स्लेजिंगसाठी प्रसिद्धच आहेत. आपल्याला घरात बसून तिकडचे खेळाडूंमधले बोलणे स्पष्ट ऐकायला येत नसले तरी त्यांचे हावभाव व बॉडी लँग्वेज वरून नक्कीच कळते की, आपला फलंदाज व समोरच्या टीमचा गोलंदाज किंवा यष्टीरक्षक काही हवापाण्याच्या गप्पा मारत नाहीयेत.

आणि मग आपण सुद्धा समोरच्या टीमच्या खेळाडूला घरातूनच दोन चार शिव्या हाणतो व मनोमन प्रार्थना करतो कि आपल्या खेळाडूंनी ह्या आगाऊ प्लेयरला जशास तसे उत्तर द्यावे.

 

Unbroken Records in Cricket.Inmarathi11
indianexpress.com

काही खेळाडू हे अशा वेळी चिडून तोडीस तोड स्लेजिंग करतात तर काही संयमी खेळाडू शांत राहून आपल्या खेळातूनच समोरच्याला प्रत्युत्तर देतात.

आज आपण अशीच काही क्रिकेटच्या इतिहासातील उदाहरणे बघणार आहोत ज्या वेळी आपल्या भारतीय खेळाडूंनी विरुद्ध टीमच्या खेळाडूंना तोडीस तोड उत्तर देऊन त्यांचे दात त्यांच्याच घशात घातले.

सचिन तेंडुलकर विरुद्ध हेन्री ओलोंगा :

१९९८ साली शारजामध्ये झालेल्या कोका कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे ह्या सामन्यात झिम्बाब्वेचा ओपनिंग बॉलर हेन्री ओलोंगाला तोंड देताना भारतीय फलंदाजांचे धाबे दणाणले होते.

त्याने सचिन तेंडुलकरला एक शॉर्ट बॉल टाकला. आखूड टप्प्याचा बॉल बघून सचिन थोडा चमकला आणि त्याने ग्रॅण्ट फ्लॉवरच्या हाती एक सोपा झेल दिला.

 

 

सचिनला आउट करणे हे जगातल्या प्रत्येक बॉलरचे स्वप्न असते. ते स्वप्न खरे झालेले बघून ओलोंगाने अत्यानंदाने मैदानावरच सेलिब्रेशन सुरु केले. ह्यावर सचिनने काहीही प्रतिक्रिया न देता तो शांतपणे पॅव्हिलियनमध्ये परतला.

दुर्दैवाने आपण ती मॅच १३ रन्सने हरलो.

ह्याच सिरीजच्या फायनलमध्ये आपला सामना परत झिम्बाब्वेविरुद्ध होता.

आपल्याला जिंकण्यासाठी १९७ धावा करायच्या होत्या. ह्या सामन्यात सचिनने झिम्बाब्वेच्या बॉलर्सची दाणादाण उडवली. सचिन हेन्री ओलोंगाच्या बॉलिंगवर तुटून पडला. त्याने ओलोंगाच्या ६ ओव्हर्समध्ये ६० धावा केल्या.

ह्या सामन्यात त्याने एकूण १२४ धावा करून तो नॉट आउट राहिला. ह्या १२४ धावांमध्ये त्याने ६ कडक षटकार ठोकले आणि भारताला सामना जिंकवून देऊन आधीच्या पराभवाचे उट्टे काढले.

युवराजचे सहा बॅक टू बॅक षटकार :

युवराज सिंगचे इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यातले सहा षटकार कोण विसरू शकेल? ह्या सामन्यात युवराजने इंग्लिश बॉलर स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर एकामागे एक असे सहा षटकार लगावले होते.

२००७ साली झालेल्या टीट्वेंटी विश्वचषकात झालेल्या ह्या सामन्यात युवराजने फास्टेट फिफ्टीचा रेकॉर्ड केला होता. युवराजने फक्त १२ बॉल्समध्ये त्याचे अर्धशतक केले होते.

 

 

इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफने युवराज सिंगला स्लेज केल्याने युवराजने त्याचा हा असा बदला घेतला. युवराजने त्याचा सगळा राग स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर काढला. ह्या ऐतिहासिक सामन्यानंतर युवराज म्हणाला की,

“सामन्यादरम्यान दोन संघांच्या खेळाडूंमध्ये अश्या शाब्दिक चकमकी घडतातच. मैदानाबाहेर आम्ही खूप चांगले मित्र आहोत. परंतु मैदानात खेळताना मात्र स्पर्धा असते. आणि म्हणूनच मला ह्या चकमकीचे उत्तर माझ्या खेळातूनच द्यायचे होते.”

शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अप्पर कट :

भारत पाकिस्तान हा सामना म्हणजे दोन्ही देशांच्या इज्जतीची गोष्ट असते. दोन्ही संघ जीवाच्या आकांताने एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करतात.

ह्याच “पारंपारिक प्रतिस्पर्धी” असण्यावरून मागच्या विश्वचषकाच्या वेळी आलेली “मौका मौका” ही जाहिरात तुम्हा सर्वांना आठवत असेलच! तर २००३ च्या विश्वचषकातील ही भारत पाकिस्तान मॅच होती.

 

 

आपल्याला विजयासाठी २७४ धावांची गरज होती. सचिन-सेहवाग ही जोडी पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होती. ह्यांचे लक्ष विचलित करण्याचे सर्व प्रयत्न पाकिस्तानी खेळाडू करत होते. परंतु ह्या स्लेजिंगला आपले फलंदाज त्यांच्या बॅटने चांगलेच उत्तर देत होते.

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सचिनने अप्पर कट मारून डीप थर्डमॅनच्या दिशेने एक जोरदार षटकार लगावला.

पाकिस्तानी खेळाडूंच्या रागात भर घालत शोएबच्या त्याच ओव्हरमध्ये असाच फटका सेहवागने सुद्धा मारला आणि तो ही षटकार गेला.

ह्यामुळे शोएब अख्तर चिडला. आणि सर्व प्रयत्न करत त्याने अखेर सचिनला ९८ धावांवर रोखण्यात यश मिळवले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता, कारण सचिनच्या ह्या खेळीमुळे भारताने आधीच विजय जवळ खेचून आणला होता.

लॉर्ड्समध्ये सौरभ गांगुलीचे अँड्र्यू फ्लिंटॉफला प्रत्युत्तर :

२००२ साली इंग्लंडमध्ये झालेल्या नॅटवेस्ट सिरीजच्या आधी इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना एकदिवसीय सामन्याची सिरीज ३-३ अशी बरोबरीत सुटली होती.

तेव्हा शेवटच्या सामन्यात इंग्लंड जिंकले असताना अँड्र्यू फ्लिंटॉफने विजयाचा आनंद मैदानावरच टी शर्ट काढून साजरा केला होता.

ह्यावर क्रिकेट जगतात अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. परंतु भारतीय खेळाडूंना मात्र फ्लिंटॉफचे हे कृत्य फार रुचले नसावे.

त्यानंतर लगेच झालेल्या नॅटवेस्ट सिरीजमध्ये शेवटच्या सामन्यात भारताची फलंदाजी कोसळत असताना मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग ह्यांनी भारताची बाजू सांभाळली. आणि दोघांनी मिळून धावा करून भारताला ह्या सामन्यात विजय मिळवून दिला.

 

 

भारत जिंकल्यानंतर आपल्या कर्णधार सौरव गांगुलीने टी शर्ट काढून विजय साजरा केला.

गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये उभे राहून टी शर्ट काढून तो त्याच्या डोक्याभोवती गोल गोल फिरवून अँड्र्यू फ्लिंटॉफला त्याच्या भारतातल्या ह्या कृत्याबद्दल प्रत्युत्तर दिले.

विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या ११६ धावा :

२०११ -१२ सालच्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती. तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे जगप्रसिद्ध स्लेजिंग आणि प्रेक्षकांच्या असभ्य वर्तणूकीमुळे भारताचे खेळाडू त्रस्त झाले होते.

हे सगळे असह्य झाल्याने शेवटी विराट कोहलीने “मधले बोट” दाखवून प्रत्युत्तर दिले. त्याने त्याचे प्रत्युत्तर देणे तिथेच थांबवले नाही.

त्याने अॅडलेड येथे ११६ धावा करून सर्वांचे तोंड बंद केले. भारताने ही सिरीज ०-४ अशी गमावली. परंतु नंतर २०१४-१५ मध्ये परत विराटने ४ शतके करून आधीच्या पराभवाचे उट्टे काढले.

आमीर सोहेलला व्यंकटेश प्रसादचे चोख उत्तर :

१९९६ च्या विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आमीर सोहेलने व्यंकटेश प्रसादच्या बॉलवर चौकार मारल्यानंतर बॅट बाउन्ड्रीकडे दाखवून जे हावभाव केले ते क्रिकेटप्रेमींना आठवत असतीलच.

व्यंकटेश प्रसादने पुढच्याच बॉलवर आमीर सोहेलची विकेट काढून त्याला परतीचा रस्ता दाखवला.

 

 

त्या क्षणापर्यंत पाकिस्तान ८४ वर शून्य आउट असे खेळत होते. परंतु सोहेल आउट झाल्यानंतर पाकिस्तान ह्या धक्क्यातून सावरू शकले नाही आणि त्यांनी ३९ धावांनी सामना गमावला.

आपले भारतीय खेळाडू “भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी” ही समर्थ रामदासांची शिकवण पुरेपूर लक्षात ठेवून वागतात आणि अपमानाचा वचपा बरोबर काढतात!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?