' माओवाद विरोध आणि (म्हणून!) प्रस्थापितांना आलेलं दुखणं! : कॅप्टन स्मिता गायकवाड – InMarathi

माओवाद विरोध आणि (म्हणून!) प्रस्थापितांना आलेलं दुखणं! : कॅप्टन स्मिता गायकवाड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : कॅप्टन स्मिता गायकवाड.

लेखिका निवृत्त मिलिटरी कॅप्टन आहेत आणि माओवादाच्या अभ्यासक आहेत.

===

घटना १:

काल ABP माझावर माओवाद ह्या विषयावर चर्चा चालू असताना प्रसन्न जोशींना अचानक प्रश्न पडतात :

‘स्मिता गायकवाड कोण? आणि तिचा “उदय” अचानक कसा होतो?’

‘स्मिता गायकवाडला अचानक सोशल मीडियावर followers मिळतात कसे? ‘ वगैरे वगैरे

 

smita-gaikwad-inmarathi
Hitavada.com

(हे प्रश्न प्रसन्ना जोशींनी चर्चेत ह्याच शब्दांत उपस्थित केले आहेत.)

घटना २:

राजदीप सरदेसाई तुषार दामगुडेना विचारतात :

“FIR करणारे तुम्ही कोण?” “FIR का केली?”

 

 

घटना ३:

स्वतःला न्यायाधीश आणि पुरोगामी म्हणून मिरवणारे कोळसे – पाटील, तुषार दामगुडेंना “जय महाराष्ट्रावर”

 

tushar-damgude-inmarathi
dnaindia.com

“गप रे कुत्र्या”

म्हणतात.

घटना ४:

जानेवारीमध्ये अक्षय बिक्कड ह्यांनी जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद विरोधात FIR केल्यावर ABP च्याच चर्चेत समर खडस त्यांना

“मेवानी आणि उमर खालिद च्या भाषणांना हरकत घेणारे तुम्ही कोण?”

अशा आवेशात ‘ इंटरप्रिटेशन ‘ मागतात.

 

samar-khadas-akshay-bikkad-inmarathi
youtube.com

“गप बसा…कोणी वाचतो का तुमचा blog?” अशा मुजोर भाषेत उत्तर देतात…!

वरील चारही घटना “आम्ही म्हणू तेच ‘पुरोगामी’, तेच ‘विचारी’, तेवढंच ‘सत्य’, तोच ‘विवेक’ आणि तीच ‘लोकशाही’ – ह्या ब्राह्मण्यवादी (ब्राह्मणवादी नव्हे) मानसिकतेच्या प्रतीक आहेत.

“पुरोगामित्वाचा” मठ ही आमची मक्तेदारी आहे आणि आम्हीच त्याचे ‘मठाधिपती’ आहोत. त्यामुळे ‘ पुरोगामित्वाचं’ certificate देण्याचा हक्क केवळ आमचा आहे – ह्या मानसिकतेत ही ‘ स्वयंघोषित पुरोगामी ‘ मंडळी नांदत असतात.

आणि त्या मठाधिपत्याला तडा जातो आहे किंवा हादरे बसतात असं ह्यांना वाटायला लागतं तेव्हा ते अक्षय, तुषार, स्मिता अशा त्यांच्या गोटाबहेरील लोकांना “तुम्ही कोण?” “तुमची लायकी काय?” अशा आविर्भावात उन्मत्तपणा दाखवतात.

तीस्ता सेतलवाड, विवेक अग्निहोत्री, अरुंधती रॉय, कोळसे – पाटील यांच्यासारख्या खोटारड्या आणि भम्पक लोकांना असे उन्मत्त प्रश्न कधीच विचारले जात नाहीत…!

कारण बुद्धिवादी असल्याचं सोंग घेणारी ही मंडळी ह्या चमूपैकीच असतात. कारण ती “सामान्य” माणसं नसतात. त्यामुळे समतेचा आव आणणारे हा विषमतेचा बुद्धिवाद अव्याहतपणे रुजवत आणि जपत असतात.

ह्या सगळ्यातून शेषराव मोरे ह्यांच्यासारखा ज्येष्ठ बुद्धिवादी अभ्यासक आणि विचारवंतही वाचत नाही. आम्ही तर त्यामानाने खूपच लहान आहोत.

ह्या मठाधिपत्याला जेव्हा ते ‘ पुरोगामी दहशतवाद ‘ म्हणून ललकारतात तेव्हा ही झुंड त्यांच्यावरही असंबद्ध आरोप करून ‘ तुम्ही कोण ?’ असे प्रश्न उपस्थित करत असते.

 

more-sheshrao-inmarathi
facebook

आजपर्यंत एसी मध्ये बसून प्रत्यक्ष जमिनीवर काय चाललंय हे जाणून न घेता खोटंसुद्धा रेटून बोलणारी ही मंडळी, त्यांचं पितळ उघडं पडू लागल्याने, अस्वस्थ झाली आहेत.

गेल्या आठवड्यात प्रसन्न जोशीनी कोळसे पाटील ह्यांची केवळ बाजू उचलून धरण्यासाठी ‘पोलिस अधिकारी रवींद्र कदम ह्यांनी एल्गार मध्ये माओवाद्यांच्या संबंध नसल्याचं म्हटलं’ असा खोटा दावा केला.

रवींद्र कदम “संबंध आहे” असं म्हणालेत, हे सांगितल्यावर सुद्धा प्रसन्न जोशींनी अत्यंत निष्ठेने कोळसे पाटील ह्यांची बाजू उचलून धरली आणि ‘मी स्वतः त्या न्यूजचं anchoring केलं आहे’ अशी थापही मारली.

“मी नंतर फेसबुकवर तो व्हिडिओ टाकून तुम्हाला टॅग करेन”

असं जोशी म्हटल्यावर, मी त्यांना “व्हिडिओ नाही मिळाला तर माफी मगणार का?” हा प्रश्न विचारला.

हाच प्रश्न सोशल मीडिया वर अनेक लोकांनी प्रसन्न जोशीला विचारला आणि ‘व्हिडिओ दाखव नसाल माफी मागा” अशी वारंवार मागणी केली. त्यातूनच मग “स्मिता गायकवाडला सोशल मीडियावर अचानक follower कसे निर्माण होतात” हा प्रश्न प्रसन्न जोशींना पडला.

 

prasanna-joshi-inmarathi
abpmaza.com

पण प्रसन्न जोशींना एक गोष्ट माहिती नाही.

प्रत्यक्ष ते followers, स्मिता गायकवाड, तुषार दामगुडे , किंवा अक्षय बिक्कडचे followers नसतात.

माध्यमांच्या आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या दांभिकतेला, अरेरावीला कंटाळलेले हे लोक असतात.

ज्यांना जमिनीवर खरी परिस्थिती काय आहे ते माहीत असते. त्यामुळे ह्या तथाकथित बुद्धिवंतांचा खोटेपणा ते जाणून असतात. आणि कोणीतरी सत्यासाठी निर्भिडपणे उभ राहात आहे हे पाहून ते आनंद व्यक्त करत असतात.

आणि म्हणूनच आजपर्यंत बुद्धिजीवी, पुरोगामी म्हणून स्वतःच स्वतःला मिरवणाऱ्या लोकांची पंचाईत होते.

आजपर्यंत स्वतःला पुरोगामी, बुद्धिजीवी म्हणून प्रस्थापित “केलेल्या” (केलेल्या! “झालेल्या” नव्हे!) लोकांचं हेच खरं दुखणं आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?