'फाळणीनंतर पाकिस्तानात जाऊनही "सिंध"चा भारतीय राष्ट्रगीतात उल्लेख कायम ठेवण्यामागे आहे "हे" ऐतिहासिक कारण

फाळणीनंतर पाकिस्तानात जाऊनही “सिंध”चा भारतीय राष्ट्रगीतात उल्लेख कायम ठेवण्यामागे आहे “हे” ऐतिहासिक कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले भारताच्या “जन गण मन” हे राष्ट्रगीत म्हणताना “पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग” असे वाक्य येते. आपण हे वाक्य अगदी सहज म्हणून जातो. आपल्या डोक्यातही येत नाही की, आता सिंध प्रांत हा भारतात नसून फाळणीनंतर हा प्रदेश पाकिस्तानात गेला आहे. पण काही लोकांच्या डोक्यात मात्र असा विचार आला की,

आता सिंध प्रांत तर भारतात नाही मग आपल्या राष्ट्रगीतातून “सिंध” हा शब्द वगळला का जात नाही?

१९५१ साली भारत सरकारने भारताचे अधिकृत राष्ट्रगीत प्रसिद्ध केले. आधी आपल्या राष्ट्रगीतात “सिंधू हा शब्द नसून “पंजाब सिंध गुजरात मराठा” असे शब्द होते.

मात्र १९५१ साली जे राष्ट्रगीत प्रसिद्ध करण्यात आले, त्यात सिंध ह्या शब्दाऐवजी सिंधू हा शब्द होता. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, भारत सरकारने हा जो राष्ट्रगीतात बदल केला त्याबाबत जनजागृती केली नाही.

२००५ साली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत राष्ट्रगीतात सिंध ह्या शब्दाचा वापर कायम ठेवला आहे.

तसेच २०११ साली बॉम्बे हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाचा पुनरुच्चार केला होता. म्हणजेच थोडक्यात आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्या राष्ट्रगीतात सिंध व सिंधू हे दोन्ही शब्द कायद्याने अधिकृत आहेत.

 

indian-flag-inmarathi
indiatimes.com

परंतु सामाजिक दृष्ट्या हे लोकांना स्वीकारार्ह आहे की, नाही हा वादाचा मुद्दा आहे. खरे सांगायचे तर हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत असू शकते. ह्याबाबतीत निवृत्त प्राध्यापक श्रीकांत मलुष्टे ह्यांनी एक जनहित याचिका कोर्टात दाखल केली होती.

shrikant malushte inmarathi

 

ह्या याचिकेत असे म्हटले होते की, आता सिंध प्रांत हा पाकिस्तानमध्ये असल्याने भारताच्या राष्ट्रगीतात सिंध हा शब्द येऊ नये. त्याऐवजी भारतात जी सिंधू नदी वाहते त्या नदीचा उल्लेख म्हणून राष्ट्रगीतात सिंध ऐवजी सिंधू असा शब्द यावा.

न्यायमूर्ती रंजना देसाई आणि न्यायमूर्ती आर. जी केतकर यांच्या खंडपीठाने ह्या जनहित याचिकेचे कामकाज पाहिले.

ह्यावेळी मलुष्टे ह्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास असे आणून दिले की, हा शब्द भारत सरकारने जानेवारी १९५० मध्ये बदलला होता. तरीही अजूनही आपण सिंध हाच शब्द वापरतो आणि आपल्या देशात आपण राष्ट्रगीत म्हणण्यात चूक करतो.

मलुष्टे ह्यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकील निरंजन मोगरे ह्यांनी कोर्टात युक्तिवाद करताना असे म्हटले की, राष्ट्रगीतात सिंध हा शब्द वापरणे हा आपला “सिंध” प्रांत अजूनही आपला आहे, असे मानण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे. परंतु सत्य हेच आहे की, आता सिंध प्रांत भारतात नाही.

 

bombay-high-court inmarathi

ह्यावर न्यायमूर्ती देसाई म्हणाल्या की,

“हा हेतुपुरस्सर प्रयत्न का असेल? त्यात काय हेतू असेल? आपण सिंध हा शब्द हेतुपुरस्सरपणे ठेवला आहे ह्यात काय लॉजिक आहे?” असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला असता वकील मोगरे म्हणाले कि “हा राष्ट्राचा अपमान आहे.”

अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की हिंदू हा शब्द पर्शियन/अरेबिक भाषेतून आला आहे. ह्या शब्दाची व्युत्पत्ती सिंधू ह्या शब्दापासून झाली आहे. सिंधू नदीच्या खोऱ्याजवळचा प्रदेश म्हणून सिंध प्रदेश. अरेबिक भाषेत सिंधचे हिंद झाले व ह्या भागात राहणारे ते हिंदू! हिंद हा शब्द सिंध पासूनच तयार झाला आहे.

एवढेच नाही तर इंडिया हा शब्द सुद्धा सिंधपासूनच आला आहे. हिंदू हा शब्द सुद्धा सिंध पासूनच आला आहे.

 

indus-vally-civilisation-inmarathi
opinion .com

ह्याउपर अनेक लोक असेही म्हणतात की, हिंदी महासागराचे नाव सुद्धा सिंधवरूनच दिले गेले असावे. ह्या सिंधप्रदेशावरुनच भारत सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेल्या पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीवर हक्क सांगू शकतो.

सिंध ह्या शब्दाशी आपली नाळ जुळलेली आहे. ह्या शब्दाशी व प्रदेशाशी आपले हजारो वर्षांपासूनचे नाते आहे.

असे असले तरीही आता सिंध प्रांत भारतात नाही, त्यामुळे तो शब्द वापरू नये त्याऐवजी ईशान्य भारताचे प्रतिनिधित्व दर्शवण्यासाठी राष्ट्रगीतात पूर्व हा शब्द वापरावा असे काही लोकांचे म्हणणे आहे.

परंतु सिंध हा शब्द राष्ट्रगीतातून वगळला तर आपल्या सिंधी बांधवांची मने दुखावतील. फाळणीच्या वेळी सिंधी बांधवांना आपले मूळ सोडून इकडे यावे लागले. सिंधी बांधव हे देशभक्त आहेत. शिवाय त्यांनी त्यांची भाषा, संस्कृती व परंपरा सांभाळून जतन करून ठेवली आहे.

हे बांधव जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी कट्टर देशभक्त असतात.

 

cheti chand sindhi festival inmarathi

ते त्यांच्या देशाविषयी आदर व प्रेम बाळगतात. फाळणीनंतर हे आपले घरदार सोडून आल्याने त्यांच्याकडे तेव्हा काहीही नव्हते. परंतु अत्यंत कठीण परिस्थितीतून हे बांधव आजवर येऊन देशाच्या प्रगतीस हातभार लावत आहेत.

सिंध प्रांत हा ब्रिटीशांच्या अंमलाखाली फार उशिरा म्हणजेच १८४३ साली आला.

१९४२ साली चले जाव ह्या आंदोलनामुळे असंख्य क्रांतीकारकांना अटक झाली. व सिंध प्रांतात मार्शल लॉ लागू झाला. सिंध प्रांतातील प्रसिध्द वर्तमानपत्र “हिंदू” हे स्वातंत्र्यलढ्यात जनजागृतीचे कार्य करत होते. ह्या वर्तमानपत्राचे उद्घाटन १९२१ साली महात्मा गांधी ह्यांच्या हस्ते झाले होते.

 

१९४२ साली “हिंदू” चे संपादक असलेल्या हिरानंद करमचंद मखीजांनी ह्यांना ब्रिटीश सरकारने अटक केली व प्रेस सील केली.

संपादकांच्या अटकेनंतर थोड्याच काळात नवे संपादक रुजू झाले व त्यांनी दुसऱ्या ठिकाणाहून वर्तमानपत्राचे काम परत सुरु केले. परत वर्तमानपत्रातून ब्रिटीश सरकार विरुद्ध जनजागृतीचे काम सुरु झाले. त्या संपादकांना सुद्धा अटक झाली.

त्यानंतर परत दुसऱ्या संपादकांनी वर्तमानपत्राची धुरा सांभाळून ब्रिटीश सरकारविरुद्ध मजकूर छापण्याचे काम सुरूच ठेवले. अशी एकामागून एक आठ संपादकांना अटक झाली तरी वर्तमानपत्रातून जनजागृती सुरूच राहिली.

सिंध प्रांतातील युवा क्रांतिकारक हेमू कलानी ह्यांना १९४२ साली अटक झाली. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सिंध प्रांतातील लोकांनी त्यांची शिक्षा माफ होण्यासाठी व्हाईसरॉयकडे दयेचा अर्ज केला. व्हाईसरॉयने एका अटीवर शिक्षा रद्द होईल असे सांगितले.

hemu kalani inmarathi

ती अट म्हणजे हेमू कलानी ह्यांनी ब्रिटीशांचा माफीचा साक्षीदार होऊन इतर क्रांतीकारकांविरुद्ध साक्ष दिली तरच त्यांची शिक्षा रद्द होईल. हेमू कलानी ह्यांनी हे फेटाळून लावले व ते वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी देशासाठी फाशीच्या शिक्षेला सामोरे गेले.

म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी इतर सर्व भारतीयांसारखेच सिंधी बांधवांनी सुद्धा प्राणपणाने प्रयत्न केले आहेत.

म्हणजेच पूर्वीपासूनच ते भारत देशालाच आपले मानतात. नंतर फाळणी होऊन सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्यावर सुद्धा हजारो सिंधी बांधव आपले गाव, घरदार सोडून भारतात आले कारण त्यांना भारतातच राहायचे होते.

सिंधी बांधव हे शांतताप्रिय आहेत. त्यांनी कुठल्याही अवाजवी मागण्या करून सरकारला धारेवर धरले नाही. उलट व्यवसाय करून देशाच्या प्रगतीत हातभारच लावला.

 

sindhi-samaj-marriage-inmarathi
UdaipurTimes.com

अनेक शिक्षण संस्था व धर्मादाय संस्था उभ्या केल्या. अनेक मोठे व्यवसाय उभे करून रोजगारनिर्मितीत योगदान दिले. सिंधी बांधवांना त्यांचे घरदार सोडावे लागले. परंतु शांतपणे त्यांनी स्वतंत्र भारताच्या प्रगतीत आपले योगदान दिले.

आजच्या सिंधी बांधवांना “पाकिस्तानातील” सिंध प्रांताविषयी फार आकर्षण नसले तरी भारतावर त्यांचे निश्चितच प्रेम आहे. त्यांना आनंद आहे की, फाळणीनंतर त्यांच्या पूर्वजांनी पाकिस्तानात न राहता भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यांना सिंधी असण्याचा व त्यांच्या संस्कृतीचा अभिमान आहे.

म्हणूनच सिंध हा शब्द राष्ट्रागीतातून काढून टाकल्यास हा सिंधी बांधवांच्या राष्ट्रप्रेमाचा अपमान होईल.

Traditional-Indian-Dresses inmarathi

त्यांच्या भावना दुखावल्या जातील. सिंध हा शब्द आता “सिंध प्रांताला” उद्देशून नसून भारतात राहणाऱ्या सिंधी बांधवांचे प्रतिनिधित्व करतो. कारण हा देश जितका पंजाबी, बंगाली, गुजराती, मराठी, द्रविडांचा आहे तितकाच सिंधी बांधवांचा देखील आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?