स्वयंसेवकांच्या रक्ताने लाल झालेल्या भूमीत संघाच्या सेवाभारती बचावकार्य: शिवभावे देवभूमीसेवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका: विनिता तेलंग

देवभूमी केरळ साठी पावसाचा अतिरेक व पूरपरिस्थिती काही नवीन नाही. पण दोन वर्षांपुर्वी पावसाने कहर केला.

केरळमधील ४० हून अधिक संख्येने असलेल्या नद्या त्यांवरील लहानमोठी धरणे व त्यांतून करावयाच्या विसर्गाचे फसलेले धोरण यामुळे केरळला शंभर वर्षांत आला नव्हता इतका प्रचंड महापूर आला.

पर्यावरण तज्ञांचे इशारे धुडकावून केलेली बांधकामे, खोदकामे यामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलनांची भर पडली व जवळजवळ अख्खे राज्यच पुराखाली जाऊन हाहाःकार माजला.

शेकडो जीव गमावले हजारो घरे पाण्याखाली गेली व लाखो लोक बेघर झाले.शेते, मसाल्यांच्या बागा, रस्ते, पूल इमारती सारे प्रचंड प्रमाणात वाहून गेले.

 

Kerala-flood-inmarathi
theresistancenews.com

 

अशावेळी राज्यसरकारचे प्रयत्न फार तोकडे पडणे स्वाभाविक होते. केंद्रसरकार व सेनाबल यांची मदत तातडीने सुरु झालीच.

राज्यात सरकार कुणाचे, त्याचे केंद्राशी असलेले संबंध कसे, या परिस्थितीला जबाबदार कोण, असे कोणतेही प्रश्न उपस्थित न होता तातडीने केरळमधे मदतकार्य सुरु झाले.

कोठल्याही आपत्तीच्या प्रसंगी देश एक होतो व स्वयंस्फूर्तीने कामाला लागतो, हे भारताचे वैशिष्ट्य आहे. देशभरातूनअनेक स्वयंसेवी संस्था, संघटना या कामासाठी धावल्या .

अशी आपत्ती जेव्हा येते तेव्हा वित्तमत्ता नैसर्गिक साधनसंपत्ती याचं मोठं नुकसान होतं. केरळचे हजारो कोटी रुपयांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी हजार वाटांनी निधी देखील येऊ लागला आहे.

अनेक मोठी देवस्थाने उद्योगसमूह सरकारी आस्थापनांनी देखील मोठे निधी पाठवले आहेत . या निमित्तानं आपले सणसमारंभदेखील बाजूला ठेवून सामान्य माणसांनी देखील आपापला खारीचा वाटा उचलला हेही फार महत्वाचे.

 

Kerala-flood-1 InMarathi

 

कारण अशा आपत्तीवेळी सारा देश आपल्या दुःखाला समजून घेतोआहे व मदतीसाठी धावतो आहे ही भावनादेखील पीडितांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उपयोगी असते.

आपण सारे एक आहोत बांधव आहोत ही एरवी पुस्तकातील प्रतिज्ञेत बद्ध असलेली ओळ अनुभवायला मिळते. नागरिकांच्यातली संवेदनशीलता जागी रहाते व बंधुत्वाची भावना अधिक बळकट होते.

आपत्तीच्या प्रसंगात सर्वप्रथम लागतात ती धावून जाणारी माणसे. लाखो टन वा करोडो रुपयांची मदत पुरवणे एकवेळ सोपे, पण संकटाच्या वेळी आपला जीव धोक्यात घालून, स्वतःहून अडचणी अोळखून, स्वयंप्रेरणेने, एक दिलाने, काहीही हातचे न राखता झोकून देऊन काम करणारी माणसे.

 

kerala-help-inmarathi

 

८ ऑगस्टपासून केरळच्या जलमय भूमीवर पुराचे थैेमान सुरु झाले व तातडीने तिथले संघ कार्यकर्ते कामाला लागले. संघ परिवाराचा एक घटक असलेली व सेवाकार्य हेच ज्यांचे नित्य काम आहे अशा सेवाभारती या संस्थेने या कामी पुढाकार घेणे स्वाभाविकच होते.

अशा प्रसंगी आपत्तीची तीव्रता अोळखून त्यानुसार मदतकार्याचे नियोजन करणे त्यात सुसूत्रता असणे व मदतकार्याची नीट रचना लागणे हे करणारी जबरदस्त रचना संघ व सेवाभारतीच्या एकत्रित नियोजनातून उभी राहिली.

केरळमधे ४५ वर्षांपासून वनवासी भागात वैद्यकीय सेवा देत असलेली स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन ही संघपरिवारातील संस्था वैद्यकीय मदतीत अग्रेसर झाली .

आकडेवारीवर नजर टाकली तर या रचनेच्या माध्यमातून किती कामे केली गेली ते सहज लक्षात येते. सरकारने चालवलेल्या एकूण ३९६५ मदत शिबिरांपैकी १५० शिबिरे केवळ सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी सांभाळली.

अन्य शिबिरांतही सेवाभारतीचे प्रत्येकी २० स्वयंसेवक काम करत होते.

 

kerla-inmarathi

 

पुरात अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे ठिकठिकाणी उभ्या केलेल्या पुनर्वसनाच्या कँपमधे त्यांची व्यवस्था करणे प्रत्यक्ष शिबिरांमधे दिवसरात्र भरती होत असलेल्या नागरिकांना निवारा, भोजन, कपडे व जीवनावश्यक वस्तू पुरवणे, त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन वैेद्यकीय मदत पुरवणे अशी विविध कामे स्वयंस्फूर्तीने, समन्वयाने व शांतपणे पार पाडणारे सहृदयी कार्यकर्ते हे या मदतकार्याचे खरे शिलेदार.

असे थोडेथोडके नव्हे तर ८५,००० कार्यकर्ते कार्यरत होते. महिलाही मोठ्या प्रमाणावर म्हणजे २० हजार इतक्या मोठ्या संख्येने मदतकार्यात योगदान देत होत्या. २५००० स्वयंसेवक पुराने झालेली पडझड व पसरलेली प्रचंड घाण कचरा हटवून स्वच्छता करण्याच्या कामात गुंतले होते.

अलाप्पुझा, पथनमथित्ता, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, पलक्कड आणि वायनाड या जिल्ह्यांना प्रचंड प्रमाणात हानी पोहोचली. त्रिवेंद्रम, कासरगोड आणि पलक्कड या तुलनेने कमी प्रभावित जिल्यांमधेच तातडीने मदत संकलन सुरु झाले. तातडीनेे ३ संकलन केंद्रे कार्यरत झाली.

उरलेल्या जिल्यांतही शक्य तेथे ताबडतोब मदत गोळा करणे सुरु झाले.

 

sangh-kerala-inmarathi

 

नेमकी कशाची गरज आहे याची पत्रके सर्व माध्यमांतून पोचवली गेली व त्यानुसार किराणा सामान, कपडे, स्वच्छता साहित्य, औषधे, घरगुती वस्तू इ. गोळा करण्यासाठी १४ जिल्ह्यांमधील १४ गोदामांसह एकूण २१० केंद्रातून मदत संकलन सुरु झाले. त्रिशूर येथे राज्यातील मदतकार्याचे सुसूत्रीकरण करणारे राज्यस्तरीय केंद्र उभाारले गेले तर १४ जिल्ह्यांमधे नियंत्रण, माहिती व मदत केंद्रे चोवीस तास चालू होती.

पूरप्रभावित क्षेत्रातून अडकलेल्या लोकांची सुटका करणार्‍या १५० नौका, ७० रुग्णवाहिकांसह ३०० खाजगी वहाने अहोरात्र सेवा देत होती.

सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने ७०,००० लोकांचे प्राण वाचले आहेत.  मदतकार्यात आजपर्यंत सुमारे १.२० कोटीची रक्कम खर्च झाली.

संघाच्या मूळ व्यक्तिनिर्माणाच्या कार्याला गरजेनुसार प्रत्यक्ष कामाची जोड देणारी विविध कामे समाजाच्या विविध क्षेत्रात उभी आहेत. सेवाभारती ही संस्थादेखील याच कामाच्या विशाल वटवृक्षाची एक भक्कम फांदी.

१९७८ साली दिल्लीत “नरसेवा हीच नारायण सेवा ” हे ब्रीदवाक्य घेऊन, समाजाला सर्वप्रकारे समृद्ध व समरस करणे व त्यासाठी सेवेच्या मार्गाने विविध उपक्रम करणे या हेतूने सेवाभारतीच्या कामाला प्रारंभ झाला.

संघाचे तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांची कल्पना व प्रेरणा यामागे होती. आज देशभरात सेवाभारतीच्या माध्यमातून हजारो प्रकल्प राबवले जातात.

आपत्तीकाळात तातडीने मदतकार्य सुरु करता यावे यासाठी वर्षभर सुरु असलेल्या निधीसंकलानांतून काही निधी राखीव असतो. सेवाभारतीच्या कामाला त्यांच्या निरलस सेवेमुळे समाजातील लहान मोठ्या दात्यांचा मोठा हातभार असतो. आताही केरळमधे १.२५ कोटी रुपयांची मदत सेवाभारतीच्या माध्यमातून पोचवली गेली.

 

seva-inmarathi

 

या बचावकार्यासाठी पुराच्या भयंकर पाण्याशी दोन हात करत एक एक अडकलेल्या व्यक्तीपर्यंत पोचून सुरक्षित ठिकाणी आणणे हे सोपे काम नव्हते. काम करणारे कार्यकर्ते होते. ते काही आपातकालीन व्यवस्थापनाचे धडे घेतलेले प्रशिक्षित स्वयंसेवक नव्हते. त्यांचा समुद्राशी असलेला संबंध व आपल्या बांधवांसाठी मनात असलेली आस्था या बळावर इतक्या मोठ्या प्रमाणावर बचावकार्य झाले.

अलापुझ्झा व एर्नाकुलम या जिल्ह्यांत मत्स्य प्रवर्तक संघ या संस्थेच्या स्वयंसेवकांनी सेवा भारतीच्या या बचावकार्यात मोठा हातभार लावला.

अलापुझ्झामधील अवघ्या साठ जणांच्या चमूने २० लहान बोटी २ मोठ्या बोटी व एक स्पीडबोट यांच्या सहाय्याने अथक काम केले. कुंडगलूर, पंडनाड, वेणमणी, बुधनूर, कुमारक्कम या भागातून या चमूने पुरात अडकलेल्या शेकडो जणांना सुखरुप बाहेर काढले.

परमपुझा व कुट्टनाड या ठिकाणच्या ६०० जणांना यामाहा इंजिन बसवलेल्या २०बोटींच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले.

मूवट्टुपुझा व कोटामंगलम येथे मुनबम् व वडनपल्ली येथील स्वयंसेवकांनी १० बोटींसह बचावकार्यात सहभाग दिला. सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी मत्स्य प्रवर्तक संघाच्या माध्यमातून पय्योली, कोयिलांडी, वेल्लयिल व मराद या ठिकाणांहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.

कोट्टायम जिल्ह्यात सेवा भारतीने २७ मदत केंद्रे चालवली ज्यातून एका दिवसातच साडेसातलाख रुपयांची अन्नपाकिटे वाटली गेली. कोट्टायम जिल्यातील मदतकेंद्रातून ७५००० पाकिटे वाटली गेली. या ठिकाणी ५२ वहानांच्या सहाय्याने कार्यकर्ते जिल्हाभर मदतकार्य करत होते.

एर्नाकुलम मधे १८ तर इडुक्कीमधे ११ मदतशिबिरे चालू केली. कार्यकर्ते केवळ बचाव व अन्नधान्याची मदत पुरवत होते असे नाही तर पुरामुळे अर्धवट पडलेली धोकादायक झाडे तोडून बाजूला करणे व पाणी अोसरल्यानंतर जमा झालेली साठून राहिलेली प्रचंड घाण साफ करण्याचे कामही सेवाभारतीने केले.

राज्याच्या विविध भागातून आलेले १०० कार्यकर्ते घराघरात सफाईच्या कामात मदत करत होते. संघाच्या शेकडो स्वयंसेवकांची हत्या ज्या कम्युनिस्ट पार्टीने केली त्या कम्युनिस्ट पार्टीचे अलापुझा जिल्ह्यातील चेनेगुरा शहरातील पुरामुळे उध्वस्त झालेले कार्यालयदेखील संघ व सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी साफ केले.

 

sevabharati-inmarathi

 

संकटसमयी माणसाची जातधर्म तर पहायचा नाहीच शत्रू असला तरी अडचणीत असताना त्यालाही मदतच करायची हे संघाचे संस्कार इथे प्रत्यक्षात आणले गेले.

कोल्लनकोट येथील ४८ मदत केंद्रांत ७६७ कुटुंबातील ३१३३ लोकांची व्यवस्था केली गेली आहे. तिथे ५८० स्वयंसेवक काम करत आहेत.

वायनाड जिल्ह्यात १२८ केंद्रे चालत आहेत. तेथून २३ टन भात ४६०० क्विंटल भाज्या व ४,५०,००० किमतीचे कपडे यांचे वाटप झाले. कन्नूर व थालेसर्री येथे दोन गोदामे उघडून तेथून मदत एकत्र करणे व गरजेनुसार वाटप करणे याचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. वायनाड जिल्ह्यातही १० टन तांदूळ रवाना केला गेला आहे. हे आकडे साधारण २२ तारखेपर्यंतचेच आहेत. दररोज यात भर पडतेच आहे .

गेले पंधरा दिवस अखंड सुरु असलेले सेेवाकार्य व त्यातून उभी राहिलेली अायुष्ये यांची मोजदाद आकडेवारीत होणे अशक्यच आहे.

तरीदेखील सेवाभारतीसारख्या एका स्वयंसेवी संघटनेने कोणतीही प्रबळ अर्थसत्ता पाठीशी नसताना लोकसहभागातून उभारलेल्या निधीच्या बळावर केलेली सव्वाकरोड रुपयांची मदत निश्चितच मोठी आहे.

परंतु आपत्तीत केवळ निधी वा मदतसाहित्य येऊन भागत नाही. विस्कटलेले संसार व खचलेली मनं उभं करायला लागतात माणसांचे मायेचे हात. पूर ओसरु लागतो तशी नवनवी संकटं समोर येतात. सर्वप्रथम पुराने अस्ताव्यस्त पसरलेली घाण स्वच्छ करावी लागते.

 

cleaning-inmarathi

 

या स्वच्छता मोहिमेत एक लाख स्वयंसेवक राज्यभर काम करत आहेत. स्वतःचे घरदार नोकरीव्यवसाय सोडून केरळमधील निसर्गाने दिलेल्या आव्हानांना भिडणारे हे स्वयंसेवक व त्यांच्या रुपाने होणारे निरपेक्ष सेवाभावाचे, माणुसकीचे दर्शन ही केरळवासियांना मिळालेली सर्वात महत्वाची मदत.

ही मदत व कार्यकर्ते भारताच्या विविध भागांतून विविध संस्था संघटनांच्या माध्यामातून व संपूर्णपणे स्वयंस्फूर्तीने अाले व सरकारी यंत्रणा व सैन्यदलाची रचना यांच्याशी जुळवून घेत त्यांना मदतरुप होत त्यांनी काम केले.

ही सौहार्दाची भावना केरळी जनता व सरकारच्या मनापर्यंत पोचेल का? ज्या चुकीच्या पर्यावरणीय धोरणांमुळे केरळची भूमी अक्षरशः उद्धवस्त झाली त्यावर आता तरी गंभीर विचार व कठोर उपाययोजना होतील का?

या पुढील काळातही मोठी आव्हाने केरळमधे असणार आहेत. साथीच्या रोगांपासून ते रस्ते, पूल, इमारती, वीजपुरवठा अशा सर्व पायाभूत सोयी कित्येक ठिकाणी नव्याने उभ्या कराव्या लागतील. वाहून गेलेली शेती, मसाल्याच्या बागा, अचानक ठप्प झालेले मासेमारी व पर्यटनाचे व्यवसाय या सर्वांना उभं करुन राज्यात पूर्ववत सुरळीतपणे व्यवहार चालू होणे यासाठी दीर्घकाळ नियोजनबद्ध काम करावे लागेल.

पुनर्वसनाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळासाठी निधी, तज्ञ व कार्यकर्ते यांची गरज भासेल.

आजपर्यंत सेवाभारती व रा.स्व .संघाने अशा अनेक आपत्तीत तेथील जनता व प्रशासनाला मदत केली आहे व कुठेही संपूर्ण पुनर्वसन होईतो त्यांचा हात सोडलेला नाही. केरळही असेच उभे राहीतो सेवाभारतीचे काम सुरुच रहाणार आहे.

 

clean-kerala-innmarathi

 

मदत करु इच्छिणार्‍यांनी सेवाभारती रा.स्व. संघ जनकल्याण समिती यांच्याशी संपर्क केल्यास नेमकी कशाची गरज आहे ते लक्षात घेऊन मदत करता येईल.

केरळची हरित भूमी संघस्वयंसेवकांच्या रक्तानं लाल झाली होती. तरीही मनात कोणतीही कटुता न ठेवता समोरची व्यक्ती ही फक्त एक माणूस आहे व त्या माणसाला आपल्याला वाचवायचेच आहे अशा निकोप भावनेने संघ व सेवाभारतीचे स्वयंसेवक राबले.

केरळच्या भूमीवरचा रक्तरंजित कलंक या महापुरापाठोपाठ आलेल्या बंधुतेच्या सेवेच्या महापुराने धुतला जाईल व देवभूमी केरळ पुन्हा पूर्वीचे निसर्गवैभव प्राप्त करेल अशी आशा करुया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “स्वयंसेवकांच्या रक्ताने लाल झालेल्या भूमीत संघाच्या सेवाभारती बचावकार्य: शिवभावे देवभूमीसेवा!

 • August 29, 2018 at 9:16 pm
  Permalink

  good article

  Reply
 • August 30, 2018 at 9:18 am
  Permalink

  मात्र ही संघाची जमेची बाजू इतर वृत्तपत्र व प्रसारमाध्यम पुढे येऊ डेट नाही आपन छान माहिती संकलन केली. अभिनंदनीय…..

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?