' तुला पाहते रे : श्रीमंतीला आसुसलेल्या मध्यमवर्गीय स्वप्नांची कच्ची खिचडी – InMarathi

तुला पाहते रे : श्रीमंतीला आसुसलेल्या मध्यमवर्गीय स्वप्नांची कच्ची खिचडी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कधी अत्यंत दर्जेदार मालिका तर कधी अगदीच टुकार मालिका देण्याऱ्या झी मराठीने काही दिवसांपूर्वी साडे आठच्या प्राईम टाइमच्या स्लॉटला एक नवीन मालिका सुरू केलीये. ‘तुला पाहते रे..!’ सुरुवातीला दाखवलेल्या प्रोमो क्लिप्स ज्यात सतत एक कमी वयाची मुलगी आपल्या जोडीदाराशी दिलखुलास गप्पा मारताना दाखवली होती.

प्रोमो आणि होर्डिंग्जवर एक वाक्य ठळक स्वरूपात लोकांपर्यंत पोचण्यास लिहिलेले होते.

‘वय विसरायला लावतं तेच खरं प्रेम..!’

ह्या हायलायटेड वाक्यानेच मालिकेचा टोन कळला. म्हणजे वयाने खूप जास्ती असलेल्या प्रौढ पुरुषाची एका कोवळ्या वयाच्या मुलींवरच्या प्रेमाची कहाणी. सध्या खूपच गाजत असलेला विषय..!

म्हणजे अत्यंत कमी वयाच्या जोडीदाराबरोबर विवाह करणे ही जणू ह्या शतकाची एक खास खूण ठरली आहे.

 

balvivaha-inmarathi
lokayan.com

अलीकडच्या काळापर्यंत संस्कृतीच्या विरोधात असलेल्या ह्या विषयाला हल्ली कोणी खूप महत्व देत नाही. ह्या युगात जगभरात असंख्य जोडप्यांनी असे विवाह केलेले आहेत. आणि अशी जोडपी इतर जोडप्यांपेक्षा जास्ती आनंदाने राहताना दिसत आहे. स्त्री

पुरुषापेक्षा मोठी असणे हा देखील फार काही उहापोह करण्याचा मुद्दा उरला नाहीये.

राहता राहिला प्रश्न ‘तुला पाहते रे’ ह्या मालिकेतील जोडप्याचा तर फार पूर्वी पासून जरठ-कुमारी विवाह भारतात सर्रास होत असत.

नवऱ्या मुलाचे श्रीमंत असणे हा एक मोठा प्लस पॉईंट असायचा. आपली लहानशी लेक श्रीमंतांच्या घरी दिली तर ती खूप सुखात नांदेल अशी समजूत तिच्या आई वडिलांची असायची. मुलीच्या मर्जीच्या विरोधात असे विवाह लावले ही जायचे.

ह्या मालिकेने थोडा ट्विस्ट देऊन साधारण हाच विषय पुढे मांडल्या सारखा वाटतोय. म्हणजे ह्यात मुलीची लग्नाला संमती सुद्धा असू शकेल. इतकेच..!

 

tula pahate re-inmarathi01
zee5.com

इशा निमकर ही मालिकेची नायिका अगदीच साध्या कुटुंबातील आहे. इतकी साधी, म्हणजे अगदी १० बाय १२ ची, मुंबईच्या जुनाट चाळीतील घरातील आहे. चाळ हे मुंबईचं एकेकाळचं वैभव होतं. कोकणातून मुंबईत स्थायिक झालेले, सूतगिरणी कामगार आणि इतर साध्या उपजीविकेवर आपले पोट भरत असणारे लोक अशा चाळीत राहत असत.

सणवार दणक्यात आणि गुण्या गोविंदाने करत असत. पण आताच्या टोलेजंग इमारतीमध्ये ही ‘चाळ संस्कृती’ जवळ जवळ संपुष्टात आली आहे.

चाळीत राहणारी माणसे आताच्या गणितानुसार मध्यमवर्गीय किंवा निम-मध्यमवर्गीय प्रकारात मोडली जातात. हाल आपेष्टा सहन करून बाजूलाच उभ्या असलेल्या उंचच उंच इमारतीत कधी तरी घर घेऊ अशी स्वप्न बाळगणारे हे साधे सरळ चाळ वासी..!!

बाजूच्या कोट्यानी किंमत असलेल्या घराला घेणे हे त्यांना अशक्यच असल्याने फार तर विरार, बदलापूर किंवा अंबरनाथ इथे १ रूम किचनचा फ्लॅट घेऊ पाहतात. थोडी परिस्थिती सुधारित असल्यास आणखी १ खोली जोडतात.

तर अशा चाळीत राहणारे निमकर. गरीब स्वभावाचे आणि गरीब परिस्थितीतले..!! आईच्या जीवाला पैशांची सतत घरघर. तुटलेली चप्पल ४ ठिकाणी शिवून घेऊन, नवीन चप्पल न घेता वाचलेले पैसे तांदळाच्या डब्यात, गादी खाली, देवघरा मागे लपवून ठेवणारी आई.

वडिलांवर कर्जाच्या ओझ्यापाई आपलेच दुकान विकून त्यातच कमी पगारावर नोकरी करण्याची वेळ आलेली. एक ‘चहाचा कप’च काय तो पक्वान्न बाकी रोजची मीठ भाकरी अशीच निमकरांची अवस्था.

 

tula pahate re-inmarathi
watch.tatasky.com

पण इशाला १०,००० हजारांची नोकरी सुद्धा पुरेशी आहे, आई वडिलांना ह्या परिस्थितीतून बाहेर काढायला. तिला पटकन शिक्षण संपवून नोकरी शोधायची आहे. आहे त्या परिस्थितीपेक्षा थोडी वरची पातळी गाठायची आहे.

श्रीमंत अशा बिझनेसमनने म्हणजेच खूप साऱ्या कंपन्यांच्या मालकाने, विक्रांत सरंजामेने दिलेला कोरा चेक सुद्धा ना वापरता परत देणारे निमकर.

कारण काय तर ५-६ आकडी रक्कम एकत्र कधी पाहिलेली सुद्धा नाही, तर ती फुकटात घेऊन करायचं काय? भले त्या आईची यादी तयार असो. त्यात तिने रोजच्या कामाला येतील आशा वस्तू घेण्यावर भर दिलेला असो.

पण स्वप्न बघून सत्यात उतरवणे हे ह्या मध्यमवर्गीय विचारधारेला पटकन पचत नसते.

पण श्रीमंती कोणाला नको असते? ह्या चाळीतल्या ‘पाय पसरले तर दाराबाहेर जातील’ अशा घरात किती दिवस राहणार? पाणी भरायला लांब नळावर किती दिवस जाणार? रोज अपमानित करणारी नोकरी किती दिवस झेलणार? कधी ना कधी ह्या सगळ्याच वैताग येतोच.

छान नोकरी किंवा बिझनेस करून खोऱ्याने पैसे कमवावा. नाहीच हे जमले तर किमान लॉटरी तरी लागावी आणि घरात छन छन करत लक्ष्मी नांदावी. ‘पैसे है तो सब है’ असे कोणीतरी म्हणून गेलेलाच आहे.

खूप पैसे आले तर मोठं घर घेता येईल. घर भव्य असेल तर दिमतीला नोकर चाकर असतील.

 

tula pahate re-inmarathi02
marathistars.com

चहा आणि मीठ भाकरी सोडून रोज चमचमीत खाद्य पदार्थ असतील. दारात २-४ गाड्या झुलत असतील. महागाच्या सिल्क आणि मलमलच्या कपड्यात स्वतःचे रूप निखरून जाईल. परदेश सफाऱ्या घडतील. विमानातच काय तर स्वतःचे चॉपर देखील घेतले जाईल अशी सुप्त स्वप्ने प्रत्येक जण पाहत असतो.

‘तुला पाहते रे’मध्ये सरंजामे तर असे स्वप्न जगताना दाखवले आहेत. जे आपल्याला नाही मिळाले ते निदान आपल्या लाडक्या लेकीला मिळावे ह्याच्यासाठी निमकर दाम्पत्य देखील इशासाठी चांगले स्थळ शोधताना दाखवतीलच.

त्यातून सरंजामेंचे स्थळ तर ते का सोडतील? जरठकुमारी विवाह मनाला पटत जरी नसेल तरी मुलगी मात्र नक्कीच ऐश्वर्यात लोळेल ह्या विचारानेच तिचे आईबाप भरून पावतील. स्वतःहून मुद्दाम मुलीला वयाने खूप मोठा असलेल्या नवऱ्याशी विवाह लावून देणे मनाला टोचणी देणारे असू शकेल पण हाच जर प्रेमविवाह असेल तर कोण काय करेल?

मुलीच्या निमित्ताने त्यांना देखील मोठ्या माणसात उठबस होईल. सोबत थोडी श्रीमंती चाखता येईल. त्याबरोबर मान मतराब ही मिळेल. चाळीतल्या डब्याच्या बाहेरील ऊंची जीवन जगण्याची इच्छा कधी न कधी पूर्ण होईल. एरवी मध्यमवर्गीयाला समोर उभेच कोण करतो?

इथे मुद्दा फक्त वयाचा नाहीये पण गरिबी श्रीमंतीची खोल दरी असलेले असे विवाह देखील कितपत यशस्वी ठरू शकतात ते खरे..!

कारण आयुष्यभर अल्युमिनियमच्या भांड्यात संसार केलेल्यांना, चांदीच्या ताटात जेवणे आणि सोन्याच्या पेल्यात पाणी पिणे हे देखील जमले पाहिजे. नाहीतर सरंजामे वर ५ स्टार वाल्या पार्टीच्या समोर पाणीपुरीची पार्टी करून शेवटी वाचलेल्या २ रुपयाचा ‘चुविंगम’ डिझर्ट रोज खायची वेळ यायची..!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?