' माणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण गोष्ट

माणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आमचे ऑफिस, सगळ्यांचे असते तसेच.

एक मोठा हॉल, त्यात अनेक खुराडे, दिवसभर वाजणारे कीबोर्डस, मान वर उचलायची फुरसत नसलेली माणसे. मधूनच स्मोकिंग झोनमध्ये जाऊन आपली फुफ्फुसे जाळणारी काही लोक, चहा वर चहा घेत काम करणारी काही, कॉफीच्या कपाला आपले लिपस्टिक लागू नये असे वाटणाऱ्या काही.

सतत कावलेला बॉस आणि या सर्वात मी.

टीम लीडर अशी पदवी असली तरी ढोर मेहनत करायला लावणारा जॉब.

 

corporate job pressure Inmarathi

सतत व्हाट्सअप्प खेळणाऱ्या लोकांना हाकत हाकत प्रोजेक्ट पूर्ण करतांना पिट्या पडू शकतो हे न उमगणारी बायको पण आहेच. पण हे सगळे असले तरी मला माझे काम आवडते. आणि म्हणूनच मी सगळे अडथळे पार करत रोज ही शर्यत धावत असतो.

असाच एक दिवस आणि इंटरव्ह्यूवला आलेली काही पोरं. इंटरव्ह्यू घेतांना माझीच दमछाक जास्त होते आजकाल. आपल्याला हवे असलेले टॅलेंट मिळाले नाही की जीव जळतो नुसता. पण काय करणार ह्युमन रीसोर्स हेच आमचे भांडवल, इंटरव्ह्यूव घ्यावेच लागणार.

अश्याच एका इंटरव्ह्यूवमध्ये मला दीपक राजपाठक भेटला.

 

interview-inmarathi
mpgi.edu.in

माझ्याच वयाचा असेल. अभ्यासू आणि तल्लख. वय जरा जास्त असले तरी घेऊ या असे मी सजेस्ट केले आणि मानले ही गेले. ऑनसाईट जाणार नाही ही त्याची अट ही मान्य करण्यात आली. कंपनीला सध्या त्याच्या स्किलसेट्सची गरज होती आणि मला सपोर्ट हवा होता.

दीपक जॉईन झाला आणि आमच्या कामाला वेग आला. काम संपले की पिंक स्लिप देऊ असा विचार आम्ही आधीच केला होता. पण दीपक अफाट होता. कामाचा नुसता खुर्दा पाडत असे तो. दीपकने बघता बघता संपूर्ण ऑफिस आपलेसे केले.

सगळीकडे होतात तश्याच काही पार्टी आमच्या ऑफिसात ही होतात. अशीच एक पार्टी होती, दीपकची पहिलीच. वारुणी आणि मटण चिकन सगळे होते. दीपक मात्र हातात एक कोल्डड्रिंक घेऊन उभा होता.

– का रे घेत नाहीस का

– घेतो की

– मग बेट्या कोल्डड्रिंक काय घेतले आहेस

– घरी कन्या वाट बघत असेल

– अरे वा, लकी मॅन

– आय मेड मायसेल्फ लकी

– ग्रेट, एन्जॉय

आमची पार्टी रात्री उशिरा पर्यंत चालली.

 

holiday-office-party-inmarathi
WorkChic.com

दीपक मात्र साडे सातला निघून गेला होता.

अनेकांना तो प्रचंड अरसिक वाटला. मला मात्र हा माणूस काहीतरी वेगळा आहे असेच वाटून गेले. तो वेगळा “कसा” आहे याचा प्रत्यय आम्हाला लवकरच आला.

घाईघाईत जिना चढत असतांना वीणाचा तोल गेला आणि तिला बराच मार लागला. डोक्यातून रक्त बदाबदा वाहत होते. लोक अँब्युलन्सला फोन करायला लागले आणि दीपक पण धावला.

त्याने अँब्युलन्स येण्याची वाट न बघता पोर्च मध्ये आपली नविकोरी गाडी उभी केली. वीणाला उचलले आणि वाऱ्याच्या वेगाने गाडी दामटून हॉस्पिटल गाठले.

वीणा बचावली. पण यात दीपकच्या गाडीच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग पडले. वीणा आता धोक्याबाहेर आहे हे कन्फर्म करूनच दीपक तिथून निघाला. सरळ त्याने गाडी कार सलूनला नेली. गाडीचे कव्हर्स बदलून टाकले.

 

Head injury InMarathi

 

दुसऱ्या दिवशी मी त्याला पकडला तर मला म्हणतो, “माझी लेक पडली असती तर मी हाच विचार केला असता का ?”

खरंच तर बोलत होता तो…!

त्या दिवशी गाडीत घालून वीणाला न्यायची सगळ्यांचीच इच्छा होती. पण दीपकने ते केले. आम्ही मात्र सीट कव्हर्सला किती पैसे लागतील याचा विचार केला.

वीणा बरी होऊन कामाला जॉईन झाली. सीट कव्हरचे पैसे घेवून ती दीपकला भेटायला गेली. तिने पैसे समोर केले आणि दीपकच्या डोळ्यात पाणी आले. “हीच कदर केलीत तुम्ही वीणा माझी?” असे बोलून तो वॉशरूममध्ये शिरला. वीणाला शरमंदल्या सारखे झाले. दीपक परत आल्यावर तिने त्याची माफी मागीतली तर गडी खुश होऊन म्हणतो, “गॉड ब्लेस यू…!”.

दीपकचे अनेक गुण आम्हाला माहित होत होते आणि आम्ही सर्व स्मितीत होत होतो. एखाद्या माणसाच्या पैलूला किती कंगोरे असावे याचे दीपक म्हणजे जिवंत, चालते-फिरते उदाहरण होता.

“कम्युनिटी ऍक्टिव्हिटी” नावचे एक झेंगट असते आमच्या मागे. पण हे “झेंगट” नसून “आनंददायी काम” असू शकते ते कळले दीपकमुळेच. या उपक्रमाची जवाबदारी बॉसने दीपकला दिली आणि त्याच्या उत्साहाने उडाण घेतले. आम्हा सर्वांची मीटिंग घेऊन त्याने कसे वागावे, तिथे काय बोलावे याचा क्रॅश कोर्स घेतला आणि आम्ही शनिवारी “त्या” आश्रमात पोहोचलो.

अनाथ मुलांसाठी असलेला तो आश्रम होता.

 

Homeless kids inMarathi

मुलांमध्ये आम्ही मुले होऊन खेळलो. चकाचक फॉर्मल्सवर “अच्छे दाग” पाडून घेतले. दुपारी खिचडी किती अवीट असू शकते याचा अंदाज घेतला. संध्याकाळी भेंड्या खेळलो, रस्सीखेचेत हारलो. दिवस आनंद देऊन गेला.

निघतांना त्या कॉर्पोरेट जगतातला एकही माणूस असा नव्हता ज्याचे डोळे ओले झाले नाहीत.

घरी येऊन मी बायकोला हे सगळे सांगितले. तिचा विश्वास बसेना. दिपकला सहपरिवार जेवायला बोलव – उद्याच! – असा घोषा तिने लावला. रात्रीचे दहा वाजून गेले होते. तरीही मी फोन लावला आणि दीपकने आमचे आमंत्रण अत्यंत आनंदाने स्वीकारले.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या एक मिनिट अगोदर माझ्या घराची डोअरबेल वाजली. दीपक आणि त्याची कन्या आली होती. एक सुंदर परी, जगातल्या सर्वात नाजूक नाते असलेल्या पण तितक्याच खंबीर असलेल्या, आपल्या हिरोचा हात धरून उभी होती.

दोघे आत आले, आमच्या बायकोने देखील त्यांचे स्वागत केले. “माझी मुलगी, देवयानी” असा परिचय करून देताच देवयानी आमच्या पाया पडली. मी आणि माझी बायको आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघू लागलो. माझा मुलगा नुकताच घरी आला होता. देवयानी त्याच्या करामती बघायला आत गेली.

Touching feet Inmarathi

– कम्माल आहे दीपक

– त्यात कम्माल काय

– असे संस्कार या काळी

– संस्कार सगळ्याच काळात असेच होते, आपण फक्त बदललो.

जेवणे झाली, तुफान गप्पा झाल्या. देवयानी आमच्या बायकोला ताटे घेण्यापासून ते ताटे धुण्यापर्यंत मदत करत होती. माझ्या मनात बाप लेकी बद्दल आदर वाढतच होता. “चल रे पान घेऊन येऊ सर्वांसाठी” असे म्हणत मी त्याला घराबाहेर काढले. “मी आणि देवयानी पान खात नाही” हे त्याचे उत्तर मला अपेक्षितच होते…!

– एक विचारू का

– विचार की, त्यात काय

– वैनी नाही आल्यात

– असतील तर येतील ना…!

– व्हॉट डु यू मीन

– अरे लग्न केले तर बायको येईल न

– मग देवयानी

– गोंधळेकर मास्तर निजधामाला जातांना माझ्यावर सोपवून गेले

 

Adopting girl child Inmarathi
The Quint

 

– घरच्यांनी विरोध नाही केला

– असतील तर विरोध करतील, कोणीतरी असेच मला देखील गोंधळेकर गुरुजींकडे सोपवून निघून गेले होते.

– लग्न करावेसे नाही वाटले

– वाटले होते, प्रेम होते आमचे, तिच्या घरच्यांना अनाथ नको होता आणि तिला मला सोडायचे नव्हते

– मग?

– नशिबात नव्हते, तिने देखील लग्न केले नाही

– लेकीला आई लागतेच रे पण…

– आई म्हणून कोणी यायला तयार होईना…!

आम्ही निघालो. घरी परतलो.

आमचा निरोप घेऊन दोघेही घरी गेले.

लोक म्हणतात “तुम्ही देव पाहिला आहे का? मग नं बघता देवावर विश्वास कसे काय ठेवता?”

मला देवाला भेटलासारखे वाटले त्या दिवशी. गणरायाच्या चरणी डोके ठेवतांना त्या दिवशी मला त्याच्या चेहऱ्यात दीपकच दिसत होता!

 

father-inmarathi
searchenginesense.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?