' अख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला : एक थरारक युद्ध! – InMarathi

अख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला : एक थरारक युद्ध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही वर्षांपूर्वी अयान हिरसी अली ही महिला अचानक जगाच्या प्रकाशझोतात आली.

२००४ सालच्या नोव्हेंबर महिन्यातील एका पावसाळी दुपारी अयान ह्यांच्या एका मित्राची म्हणजेच थिओ व्हॅन गॉग ह्या चित्रपट निर्मात्याची अतिशय अमानुषपणे निर्घृण हत्या करण्यात आली.

थिओ व्हॅन गॉग हे प्रसिद्ध चित्रकार व्हीन्सेंट व्हॅन गॉग ह्यांचे वंशज होते.

 

theo van gogh inmarathi

 

थिओ हे नेहमीप्रमाणे आपल्या सायकलवरून ऍमस्टरडॅमला निघाले असताना मोहम्मद बोएरेई नावाच्या एका डच मुस्लिमाने प्रथम त्याच्याजवळच्या हॅन्ड गन मधून थिओ ह्यांच्या छातीत गोळी झाडली व जेव्हा थिओ ह्यांनी त्याला विचारले कि,

“बोलून तुझा प्रश्न सुटणार नाही का?”

तेव्हा ह्या खुन्याने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर आणखी चार गोळ्या झाडल्या व नंतर जवळच्या सुरीने त्यांच्या गळ्यावर इतक्या जोराने वार केला कि त्यांचे शीर जवळजवळ धडावेगळे झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यानंतर ह्या माथेफिरूने त्याच्याजवळच्या आणखी एका सुरीने एक पाच पानांचे पत्र थिओ ह्यांच्या शरीरात भोसकून ठेवले.

हे ही वाचा – 

===

 

हे पत्र अयान हिरसी अली ह्यांच्यासाठी होते.

 

ayaan-hirsi-ali-ap_inmarathi

 

त्यात असा मजकूर होता कि

थिओ व्हॅन गॉग अयान ह्यांच्याबरोबर मिळून इस्लामविरोधी एक चित्रपट बनवत असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली व हत्या होण्याची पुढची पाळी अयान ह्यांची आहे कारण त्यांनी त्यांचा धर्म भ्रष्ट केला आहे.

अयान हिरसी अली ह्या डच अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या इस्लामविरोधी भूमिकेमुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे.

त्या मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांना जागतिक स्तरावर वाचा फोडून मुलींचे जबरदस्तीने करून देण्यात येणारे लग्न,ऑनर किलिंग तसेच बालविवाह व फिमेल जेनायटल म्युटीलेशन ह्याविरोधात आवाज उठवून जनजागृती करत आहेत.

त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी एक AHA Foundation ही संस्था स्थापन केली आहे.

त्यांनी थिओ व्हॅन गॉग ह्यांच्यासह “सबमिशन” हा मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार दाखवणारा एक चित्रपट तयार केला.

ह्यामुळे वादंग उठले व अयान ह्यांना ठार मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या.त्यात थिओ व्हॅन गॉग ह्यांची हत्या झाली.

त्यांच्या “हेरेटिक” ह्या पुस्तकात त्यांनी इस्लाम धर्मात कट्टरपंथीयांना हरवून सुधारणा करण्याविषयी लिहिले आहे. त्या सुधारणावादी मुस्लिमांना पाठींबा देतात.

 

vangogh-submission-inmarathi

 

अयान म्हणतात कि ,

“अजूनही जेव्हा जेव्हा मी डोळे बंद करते तेव्हा तेव्हा माझ्यापुढे थिओचा अमानुषपणे केला गेलेला खून दिसतो आणि त्या खुन्यापुढे विनवणी करणारा माझा सज्जन आणि निष्पाप मित्र दिसतो.

माझा हा डच मित्र डच लोक असतात तसाच अगदी सभ्य व सुसंस्कृत होता.”

जेव्हा केसच्या सुनावणीसाठी मोहम्मद बोएरेई ह्याला कोर्टात आणले तेव्हा तो थिओ ह्यांच्या आईला म्हणाला ,

“मला तुमच्या दु:खाशी काहीही देणे घेणे नाही. मला तुमच्याविषयी अजिबात सहानुभूती वाटत नाही आणि कृत्याच्या पश्चातापही नाही कारण तुम्ही नास्तिक आहात.”

अयान हिरसी अली ह्या अतिशय शांत, सौम्य व मृदुभाषी आहेत. परंतु ह्या संयमी व मृदुभाषी महिलेविरुद्ध इंटरनेटवर कट्टरपंथीय लोकांनी अनेक वाईट गोष्टी लिहिल्या आहेत!

कि ते कसे अयान ह्यांचा छळ करून त्यांची हत्या करू इच्छितात. अयान ह्यांच्याविरुद्ध असे लिहिण्याचे कारण हेच आहे त्या जगभरातील मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत.

त्या म्हणतात ,

“आज मी हे काम करतेय कारण मी ठरवलं होतं कि जे हाल माझ्या आईचे झाले, ज्या परिस्थितीत माझ्या आईने तिचे आयुष्य काढले तशी वेळ माझ्यावर येऊ नये.

आज मी जी काही आहे तो माझ्या विचारांचा परिपाक आहे.”

 

ayan-hirsi-ali-inmarathi

 

अयान ह्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९६९ साली सोमालिया ह्या देशातील मोगादिशु येथे झाला.

त्यांचे वडील हिरसी मगन इस्से Somali Salvation Democratic Front ह्या पक्षाचे व सोमालियन क्रांतीतील प्रमुख सदस्यांपैकी एक होते.

अयान ह्यांच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांच्या वडिलांना सिआद बार ह्यांच्या सरकारला विरोध केल्यामुळे अटक झाली व ते तुरुंगात गेले.

अयान ह्यांच्या वडिलांचे शिक्षण परदेशात झाले असल्याने त्यांचा फिमेल जेनाईटल म्युटीलेशनला विरोध होता.

परंतु ते तुरुंगात असल्याने अयान ह्यांच्या आजीने एका पुरुषाकडून अयान ह्यांचे त्या पाच वर्षांच्या असताना फिमेल जेनाईटल म्युटीलेशन करवून घेतले.

ह्या गोष्टीला अयान ह्यांची आई विरोध करू शकली नाही.

त्यांची आई इतर सोमालियन महिलांप्रमाणेच व्यक्तिमत्व दडपून टाकलेली एक असहाय स्त्री होती. त्यांच्या आईचे संपूर्ण आयुष्य असेच दडपशाही सहन करण्यात व पुरुष व देवाला समर्पित होण्यात गेले.

अयान ह्यांच्या मते त्यांची आई व इतर सोमालियन स्त्रिया ह्या एक अत्यंत समर्पित , प्रशिक्षित वर्क ऍनिमल आहेत.

 

 

त्यांच्या आईनेही त्या तरुण असताना अनेक वाईट प्रथांना धीटपणे विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी त्यांचे वाळवंटातील घर सोडण्याचेही धारिष्ट्य दाखवले होते.

अयान ह्यांच्या आईचे कुटुंब हे वाळवंटातील आदिवासी कुटुंब होते. ते अतिशय पुरातन काळात जगत होते.

त्यांच्याकडे लिखाणाची कला नव्हती व अतिशय थोड्या चीजवस्तू होत्या व ते फक्त अल्लाह व त्यांचे देवदूत आणि राक्षस ह्या काल्पनिक जगात आयुष्य जगत होते.

ह्या सर्व गोष्टींचा विरोध करून अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांच्या आईने घर सोडून वाळवंट पार करून त्या एदेन ह्या शहरात आल्या.

परंतु जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीही न भेटलेल्या माणसाशी लग्न करण्यासाठी परत बोलावले तेव्हा अयान ह्यांच्या आईने अयान ह्यांच्या आजोबांपुढे नाईलाजाने हार मानली.

पुढे त्यांनी घटस्फोट सुद्धा मिळवला. पण हे सगळे धाडस त्यांनी अयान ह्यांच्या जन्मापूर्वी दाखवले होते.

ह्यानंतर त्यांचे अयान ह्यांच्या वडिलांशी लग्न झाले. व त्यानंतर त्यांनी समाजाच्या नियामांपुढे व ते नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सामाजिक दबावापुढे शरणागती पत्करली.

देव न्यायी आहे आणि तो सर्वज्ञ आहे. तुम्ही त्याला पूर्णपणे शरण गेलात तरच तो तुमच्यावर कृपा करेल”, ह्या विचाराने अयान ह्यांच्या आईचे संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलून टाकले.त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत केले.

 

हे ही वाचा – 

===

 

अयान सांगतात कि त्यांची आई संपूर्णपणे एका आश्रितासारखे जीवन जगत होती ती कायम त्रस्त असायची. चिडलेली असायची व कधी कधी हिसंक सुद्धा होत असे.

तसेच ती कायम निराश असायची. ह्या सगळ्याचा राग अयान वर निघत असे. अयान ह्यांची लहानशी चूक झाली तरी त्यांची आई त्यांचे हात पाठीमागे बांधून त्यांना वायरने मारत असे.

जेव्हा अयान ह्यांची पहिल्यांदा मासिक पाळी सुरु झाली तेव्हा त्यांची आई त्यांच्यावर चिडली. त्यांचा अत्यंत घाणेरड्या शब्दात अपमान केला व म्हणाली की तू कायम वांझ राहो. तुला कॅन्सर होवो.

 

ayaan hirsi ali inmarathi

 

अश्या शब्दात त्यांच्या आईने त्यांचा अपमान केला. ह्यानंतर दु:खी होऊन अयान ह्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

परंतु आता त्यांचे असे मत आहे की, अयान ह्यांच्यावर त्यांच्या आईचा राग निघत असे पण ह्याचे कारण अयान नसून त्यांच्या भोवतालचे जग होते.

त्यांचा राग अयानवर नसून त्यांचा राग हा अन्यायी जगावर होता ज्या जगाने त्यांचे आयुष्य, त्यांचे स्वातंत्र्य त्यांच्यापासून हिरावून घेतले होते.

अयान ह्यांचे वडील जेव्हा अयान ह्यांच्या आईला सोडून गेले तेव्हा त्यांच्या आईची स्थिती अत्यंत वाईट झाली. त्यांना निराशा आली!

त्यांना घराबाहेर जाऊन स्वतःसाठी नवे आयुष्य सुरु करण्याचेही सुचले नाही.

 

त्यांचे वय फक्त ३५ किंवा ४० होते तरी त्यांनी आयुष्यात काही चांगले होईल ही आशाच सोडून दिली होती व त्यासाठी प्रयत्न करणेही सोडून दिले होते.

 

muslim-women-inmarathi

 

अयान सांगतात कि त्यांना कायम त्यांची आई रात्रीच्या अंधारात रडत बसलेली दिसत असे.

जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची आई त्यांच्यावर चिडली व त्यांना मारहाण केली.

ह्या घटनेनंतर अयान लांबूनच आईचे रडणे व दु:ख बघत असत कारण त्यांना आईसाठी काय करावे हे कळत नसे.

अयान थोड्या मोठ्या झाल्यानंतर त्यांच्यावरही इतर सोमालीयन महिलांप्रमाणे स्वत्व सोडून देण्याचा व सामाजिक प्रथांपुढे समर्पण करण्याचा दबाव येऊ लागला.

त्या अवघ्या पाच वर्षाच्या असताना त्यांच्या आजीने त्यांना “शुद्ध” केले. म्हणजेच त्यांच्या आजी व आजीच्या दोन मैत्रिणींनी अयान ह्यांना पकडून ठेवून जबरदस्तीने त्यांच्या जननेन्द्रियाची सुंता केली.

व नंतर ती जखम शिवून टाकली. अयान सांगतात कि त्यांना आजही ती भयंकर घटना लख्ख आठवते.

एखाद्या खाटिकाने कोंबडीचे किंवा बकऱ्याचे मांस कापावे इतक्या सहजतेने सुंता करणाऱ्याने त्यांच्या शरीराचा एक भाग खटकन कापला.

तो मांसावर ब्लेड फिरवल्याचा निर्दय आवाज आजही त्यांना आठवतो. ह्या घटनेनंतर त्या दोन आठवडे चालू शकत नव्हत्या.

 

genital-mutilation-1-inmarathi

 

ह्या घटनेनंतर व आसपास घडणाऱ्या अनेक घटना बघून अयान ह्यांना कळले कि ,

“ह्या समाजात जिथे मुलींना “पवित्र” करण्यासाठी त्यांची सुंता केली जाते व ह्या प्रथेला विरोध करणाऱ्याला चिरडून टाकले जाते तिथे मी माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे कधीच जगू शकणार नाही.

माझ्यावर कायम कोणीतरी पहारा ठेवेल. किंवा मालकी हक्क गाजवेल.माझ्याकडे निर्णय घेण्याचा हक्क कधीच नसेल.” असे आयुष्य अयान ह्यांना नको होते.

त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगायचे होते. असे स्वतंत्र आयुष्यही जगता येते हे अयान ह्यांना वाचनातून कळले.त्यांनी एनिड ब्लेटन व बार्बरा कार्टलँड ह्यांची पुस्तके वाचली.

 

ayaan hirsi ali 2 inmarathi

 

ह्या पुस्तकांत मुली व मुले बरोबरीने एकत्र खेळू शकत होते. बायकांना आपला नवरा निवडण्याचा हक्क होता.

जो हक्क अयान ह्यांच्या समाजात मुलींना कधीच नव्हता. मुलींचे वडीलच मुलीसाठी नवरा शोधत व मुलींना नकाराचा अधिकार नव्हता. अयान अश्या परिस्थितीत आयुष्य कंठत होत्या जिथे त्यांना बार्बरा ह्यांची पुस्तके क्रांतिकारी विचारांची वाटली.

पुढे अयान ह्यांनी स्वत:चे आयुष्य कसे घडवले? असे त्यांच्या आयुष्यात काय घडले कि त्यांनी धर्माचा त्याग केला? वाचा पुढील भागात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?