' वेश्येवर मर्दानगी गाजवणारे विकृत लोक आणि नामर्द पोलीस! – InMarathi

वेश्येवर मर्दानगी गाजवणारे विकृत लोक आणि नामर्द पोलीस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक: समीर गायकवाड 

===

काल दुपारी बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बिहिया शहरात विमलेश कुमार साह या तरुणाचा मृतदेह रेड लाईट एरियाला लागून असलेल्या रेल्वेरुळांनजीक आढळला. तो आरा येथील एका कॉलेजमध्ये अकरावी इयत्तेत अॅडमिशन घेतल्यानंतर बिहिया येथे आला होता. यादरम्यान त्याच्यासोबत काही संशयास्पद घटना घडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

रेल्वे ट्रॅकच्या कडेला दुपारी त्याचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी तेथे धाव घेतली. परंतु, हद्दीच्या वादामुळे पोलिसांच्या कारवाईला विलंब झाला.

यामुळे जमाव संतप्त झाला आणि पाहता-पाहताच हिंसा पसरली. संतप्त जमावाने केवळ संशयापोटी घटनास्थळाला लागून असलेल्या रेड लाईट एरियातील वस्तीवर अमानुष हल्ला चढवला.

तिथल्या ३ घरांना आग लावली. लगतच्या रस्त्यावरील वाहने जाळली. एका इमारतीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. इतके करूनही समाधान न झालेल्या लोकांनी त्यांना विरोध करणाऱ्या एका मध्यमवयीन वेश्येला नग्न करून अख्ख्या शहरात संध्याकाळी उशिरापर्यंत फिरवले. तब्बल पाचशे लोक तिच्या मागोमाग चित्कारत होते.

 

bihiya-mob-inmarathi
Inkhabar.com

ती महिला जीव वाचवण्यासाठी लोकांना विनवणी करत होती, हात जोडत होती, रडत-ओरडत होती, परंतु जमावाचे रौद्ररूप पाहून एकानेही तिला वाचवण्याची हिंमत दाखवली नाही.

जमावातील काही लोकांचे म्हणणे होते की याच बाईने विमलेशचा खून केला असावा !

हिंसक जमावाचे रौद्र रूप पाहून कर्तव्यतत्पर नितीशकुमार सरकारमधील पोलिस आपला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळाहून पळून गेले. ज्या महिलेस नग्न करून फिरवण्यात आले ती एक ‘रंडी’ असल्याने तिच्यासाठी कोण आक्रोश करणार ?

तिला विवस्त्र फिरवत असताना अनेकांनी तिच्याशी जे अश्लाघ्य चाळे केले ते रस्त्यावरील सर्व लहान थोर निमूटपणे पाहत होते.

कुणा एका बाईचं झाकलेलं फुकटात लाईव्ह बघायला मिळतंय तर कशाला सोडा या हेतूने अनेकांनी हा ‘सीन’ मोबाईलवर शूट केला. एक वेश्याच ती, तिला काय अब्रू असणार ! हा आपल्या विकृत आणि नीच समाजाचा नेहमीचा दृष्टीकोन पोलिसांना कदाचित वाचवून जाईल पण त्या बायकांचे काय ? यांना कोण वाली ? यांची घरे कोण उभी करून देणार ?

पांढरपेशी कुलीन घरंदाज स्त्रियांच्या लुगडयांना दिवसाढवळया हात लावणाऱ्या श्वापदांना वेश्या म्हणजे रस्ते का माल सस्ते में वाटल्यास नवल ते काय! नंतर खूप प्रयत्न करून पोलिसांनी त्या महिलेला सोडवले आणि आपल्या कस्टडीत घेऊन तिला वस्त्रे दिली. तोवर तिला काय यातना झाल्या असतील ?

की एक वेश्या आहे म्हणून तिनं नागवं फिरलं तरी तिला त्याच्या वेदना होत नसतील का ?

 

india.com

घटनेच्या ४ तासांनंतरही पोलिसांतील एकही वरिष्ठ अधिकारी तेथे पोहोचला नव्हता. संध्याकाळी ७ वाजता मोठ्या संख्येने पोलिस बल आणि वज्रवाहन तसेच फायर बिग्रेड घटनास्थळी पोहोचले. आंदोलकांना त्यांनी पिटाळून लावले. यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.संध्याकाळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ६ राउंड हवेत गोळीबार केला.

जाळपोळ आणि तोडफोडीदरम्यान जमावाने बिहिया स्टेशनवरून जात असलेल्या जनसाधारण एक्सप्रेससहित अन्य रेल्वेंवर दगडफेक केली. यात काही प्रवासी गंभीर जखमी झाले.

संध्याकाळी उशिरा आग विझविण्यासाठी पोहोचलेल्या फायर ब्रिगेडच्या गाड्यांनाही समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केली. पूर्ण घटनाक्रमा दरम्यान पोलिस असहाय बनलेले होते आणि हिंसेवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले. गोंधळानंतर एसपी अवकाश कुमार यांनी पोलिसांवर कारवाई करण्यात धन्यता मानली.

बिहिया पोलिस स्टेशनचे कुवर गुप्ता यांच्यासह ८ जणांना निलंबित करण्यात आले. पण त्या महिलेची बेअब्रू झाल्याचा एफआयआर आज सकाळपर्यंत तरी नोंदवला गेला नव्हता.

या घटनेचे वृत्तवाहिन्यांवरील वार्तांकन देखील एककल्ली होते आणि आहे, महिलेला विवस्त्र फिरवल्याचा उल्लेख अत्यंत तुरळक माध्यमांनी केलाय.

काही लोकांनी विमलेशकुमारच्या मृत्यूस ही महिला जबाबदार असल्याने तिच्यावर केलेला हल्ला समर्थनीय ठरवला आहे. विमलेशच्या गुप्तांगावर मोठ्या जखमा आढळल्यात, वेश्या असं करत नाहीत. मात्र कुणी तरी त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठी त्याला मारून तिथं आणून टाकलेलं असू शकतं.

या घटनेने विमलेशची बहिण मृत पडल्याची आवई कुणी तरी उठवली आणि मामला अधिकच गंभीर झाला.

यातल्या कोणत्याच गोष्टीस सबळ आधार नाही. पोलिसांनीही याला दुजोरा दिलेला नाही. समजा या आरोपात तथ्य असले तरी या कृत्याची परवानगी यांना कोणी दिली ? ह्या घटनेवर ‘या’ बायकादेखील कदाचित मौनच अधिक पसंत करतील.

 

domestic-violence-inmarathi
ste.india.com

या बायकांना तिथं ‘धंदा’ करायचा असेल तर कदाचित गप्पच बसावं लागेल असा आपल्या लोकशाहीतील भक्षकांचा कायदा सांगतो. कदाचित कुणी तक्रार देखील करणार नाही. प्रसारमाध्यमात फार तर एक दिवस बातमी येईल. पण आमच्यासारखे काही माणुसकीचे अतिरेकी किडे असतात ते हे उद्योग करतात.

आरा येथील ‘दिशायें सोसायटी’ आणि भोजपूरमधील ‘आकांक्षा सेवा सदन’च्या एनजीओचे कार्यकर्ते आता त्या अभागी महिलेच्या वतीने तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर आहेत.

यात वाईट एका गोष्टीचे वाटले की या कामी मदत करण्यास भोजपूरमधील एक ही स्त्री पुढे आली नाही !

त्यांना देखील या बायकांची कणव आली नाही ! एका वेश्येवर काय मर्दानगी दाखवणारे यांचेच भाऊबंद असतील हा विचार देखील त्यांच्या मनी आला नसेल का ?

वेश्या इतकी वाईट असते का ? तिला शील नसतं म्हणजे नेमकं काय ? व्यभिचारी कुलीन स्त्रिया आणि वेश्या यात कोण उजवे, कोण डावे ? यासारख्या माझ्या प्रश्नांना सार्थ उत्तरे आजवर कुणी दिली नाहीत. कुणीही उठून पैसे देऊन तिला बंद खोलीआड भोगू शकतो म्हणून तिला रस्त्यावर देखील विवस्त्र करण्यास कुणाचा विरोध नसणं हा विचार आपल्या समाजातील विकृत ओंगळवाण्या विचारधारेचं जहरी प्रतिक आहे…

खरं तर सोबतच्या फोटोत दिसणारे सर्व पुरुषच नागडे आहेत, नुसते नागडे नाहीत तर अधम आहेत. यांच्या अंगावर जे कपडे दिसताहेत ते यांचे बाह्य रूप आहे आत एक पशु आहे, जो लिंगपिसाटही आहे आणि क्रूर, निष्ठुर आहे ज्याला प्रत्येक स्त्री एक मादी वाटते…. मी थुंकतो अशा समाजावर आणि अशा व्यवस्थेवर !

 

prostitution-marathipizza00
thinkinghatssix.blogspot.in

या संपूर्ण घटनेचे वृत्तवाहिन्यांवरील वार्तांकन देखील एककल्ली होते आणि आहे, एका तरुणाचा मृतदेह पाहून जमावाने हल्ले केले अशीच त्रोटक बातमी बहुतांश वाहिन्यावर आणि वर्तमानपत्रात आहे. एका ३४ वर्षीय महिलेला विवस्त्र फिरवल्याचा उल्लेख अत्यंत तुरळक माध्यमांनी केलाय.

आपल्या देशात ‘बाई’ इतकी स्वस्त झालीय हे मला नव्याने कळले. कदाचित या ‘बाई’चं भलं केल्याने कुणाचे उखळ पांढरे होत नसावे वा यात राजकारण करता येत नसावे यामुळे लोकही या फंद्यात पडत नसावेत…

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः …. कसली पूजा आणि कुठली नारी ?…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?