' तांब्यापितळेच्या भांड्यांना चकाकी आणणाऱ्या “पितांबरी” ची कहाणी – InMarathi

तांब्यापितळेच्या भांड्यांना चकाकी आणणाऱ्या “पितांबरी” ची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

पितळ या मिश्र धातूला मराठी म्हणींमध्ये सोन्याची उपमा दिली गेली आहे. अगदी एकविसाव्या शतकापर्यंत घरोघरी पितळी भांड्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असायचे. त्याकाळी, पितळी डबे, बंब, बादल्या, घंगाळे आणि अशा अनेक कल्हईच्या साहित्याने घरातील स्वयंपाकघर भरलेले असायचे.

देव्हाऱ्यातील देवांचे टाक आणि ताम्हण आणि निरांजन देखील पितळी धातुचेच असत.

तेव्हा कल्हईच्या साहित्याला साफ करण्यासाठी चिंच आणि राखेचा उपयोग केला जायचा, जे अतिशय कष्टप्रद आणि वेळखाऊ काम असायचे.

अशा रोजच्या आयुष्यातील एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर श्री. रविंद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील कै. वामनराव प्रभुदेसाई यांनी ‘पितांबरी‘च्या स्वरुपात शोधले.

आज भारतभरात आणि इतर सतरा देशांमध्ये विस्तारलेल्या पितांबरीच्या विविध उत्पादनांमागे या ध्येयवेड्या वडील आणि मुलाची विलक्षण कहाणी आहे.

 

pitambhari-inmarathi
youtube.com

श्री. रविंद्र प्रभुदेसाई सातवीमध्ये असताना एकदा वाणसामान आणण्यास गेले. तेव्हा काही दिवसांची उधारी बाकी असल्यामुळे दुकानदाराने त्यांच्या पिशवीमधील सामान ओतून त्यांचा अपमान केला.

त्या अपमानामुळे रविंद्र यांना पैशाचे आणि पर्यायाने व्यवसाय करण्याचे महत्व कळले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नोकरी करून ठराविक पगार घेण्यापेक्षा स्वतः नवनवीन उत्पादने तयार करून लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवणे हे त्यांचे स्वप्न होते. वडिलांचा वाहतुकीचा व्यवसाय असल्यामुळे ते वामनरावांसोबत अनेक यंत्रोत्पादनांच्या कारखान्यांमध्ये जात असत.

तेव्हा त्यांनी उत्पादन प्रणालीचा बारकाईने अभ्यास करण्यास सुरुवात केली.

रविंद्रजींनी रसायनशास्त्रामध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी घरीच संशोधन करून वेगवेगळी उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. ते पंचवीस वर्षांचे असताना त्यांनी बनवलेल्या ‘लिक्विड सोप’ च्या उत्पादनास मोठमोठ्या हॉटेलकडून प्रचंड मागणी येवू लागली.

अशातच त्यांनी हॉटेल ताज येथे पितळी भांड्यांना साफ करण्यासाठी वेगळे गुणधर्म असलेल्या पावडरचा शोध लावला, ती पावडर म्हणजे आजची पितांबरी होय.!

त्यांचा लघु उद्योग विस्तार-प्रक्रियेमधून जात असताना त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचे देखील प्रशिक्षण घेतले.

त्यामुळे त्यांचा भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती, त्यांच्या गरजा, गुणवत्ता आणि किमतीचे गुणोत्तर प्रमाण आणि व्यवसाय संबंधित संख्याशात्राचा अभ्यास झाला. हा अभ्यास त्यांना पुढील वाटचालीमध्ये खूप उपयोगी पडला असं ते म्हणतात.

 

RAVINDRA-PRABHUDESAI-inmarathi
youtube

त्यांच्या अनुभवानुसार ते नेहमी सांगतात की,

आपले उत्पादन जगावेगळे असले पाहिजेच; परंतु आपल्याला त्याची नेमकी गुणवत्ता माहित असायला हवी.

कमी गुणवत्तेला भाव कमीच मिळणार, त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन निर्मितीवर त्यांनी भर दिला.

दक्षिण भारतामध्ये पितळी वस्तूंचा वापर जास्त असल्याने तेथे पितांबरी उत्पादनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. रविंद्रजींनी पितांबरी हे व्यवसायाचे नाव ठेवून अनेक उत्पादनांना बाजारपेठेमध्ये आणण्यास सुरुवात केली.

त्यांनी होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर आणि फूडकेअर अशा ४ मुख्य दिशा ठरवून, त्यासंबंधित ५० पेक्षा जास्त उत्पादने तयार केली आहेत.

यांपैकी बऱ्याच उत्पादनांचे पेटंट देखील पितांबरी उद्योगसमुहाच्या नावावर आहेत. त्यांचे गणपतीपाडा, वडोदरा, हिमाचल प्रदेश, सुपे आणि तळवडे येथे कारखाने असून त्यांमुळे १०५० जणांचा समावेश पितांबरी कुटुंबामध्ये झालेला आहे.

आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय उत्पादनांचा वेगळा ठसा उमटवणारे अनेक व्यावसायिक आहेत. अशांमध्ये अनेक स्वप्नाळू आणि ध्येयवेडे मराठी उद्योजक देखील आहेत.

विविध प्रकारचे संशोधन आणि सेवा भारतभरात आणि भारताबाहेर देखील निर्यात करण्याची ताकद आपल्या समाजामध्ये असून यातील एक उदाहरण म्हणून पितांबरी उद्योगसमुहाचे नाव घेतले जाते.

 

pitambari-products-inmarathi01
amazon.in

 

पितांबरी उद्योग समूहाचे वैशिष्ट असे की त्यांच्या उत्पादनांचे संशोधन हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला उत्तर शोधण्याच्या वेडाने प्रेरित झालेले दिसून येते. आयुर्वेदशास्त्राचा फार मोठा प्रभाव त्यांच्या उत्पादनांवर दिसतो.

जसे की गोमुत्राच्या वासविरहित गोळ्या या लहान मुलांची प्रतिकारक्षमता वाढवण्याच्या उद्दिष्ट्याने तयार केल्या आहेत. क्युअरओन तेल हे सांधेदुखीवर उपयोगी आहे.

पितांबरीची आयुर्वेद शाखा ही आर्थिकदृष्ट्या कमी सक्षम असूनही रविन्द्रजींना त्यातील संशोधनावर जास्त भर द्यावयाचा आहे. रसायनविरहित गुळाचे उत्पादन हे देखील त्यांच्या हटके विचारांचे उदाहरण आहे.

त्यांच्या उत्पादनांमधील विविधतेमुळे भारतभरातील जवळपास ५० लाख घरांपर्यंत पितांबरी पोहोचलेली आहे. लघुउद्योगाने सुरुवात केलेल्या त्यांच्या व्यवसायाची उलाढाल आज २०० कोटी असून ती ५०० कोटींपर्यंत नेण्याचे स्वप्न पितांबरी कुटुंबाने पाहिले आहे.

रविन्द्रजी म्हणतात की व्यावसायिकांनी सरकारवर अवलंबून न राहता, एकमेकांमध्ये मागणी-पुरवठा तत्वानुसार संबंध जोपासले पाहिजे.

मराठी व्यावसायिकांनी लघुव्यवसायामध्ये अडकून न राहता, मोठी स्वप्ने पहावी. ते लघुउद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून, मराठी व्यवसायवृद्धीसाठी प्रचंड काम करतात.

पितांबरी उद्योगसमूहाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे त्यांनी समाजाप्रती दायित्वाची भावना वाढीस लावली. आत्ताच्या C.S.R.च्या (कॉर्पोरेट सोशल रीस्पोन्स्सिबिलीटी) संकल्पनेची सुरुवात त्यांनी भरपूर संस्थांना दत्तक घेऊन केली.

ते जर कुणाला आर्थिक मदत करू शकत असतील तर तसे पत्र पाठवतातच, परंतु जर आर्थिक मदत देऊ शकत नसतील तरीही माफीचे पत्र पाठवतात.

 

RAVINDRA-PRABHUDESAI-inmarathi01
outlookbusiness.com

आजच्या कोडग्या समाजामध्ये हे उदाहरण ठळकपणे उठून दिसते. ते म्हणतात की,

उद्योग करताना सामाजिक भान ठेवावे, यासाठी पहिले कारण म्हणजे चांगल्या गोष्टींमागे आर्थिक पाठबळ देता यावे, आणि दुसरे कारण असे की त्यामुळे व्यावसायिक विरोधक कमी होतात आणि, संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो.

आज प्रभुदेसाई यांची तिसरी पिढी व्यवसायामध्ये आहे. त्यांनी कधीही या व्यवसायास त्यांची मालमत्ता समजली नाही. त्यांच्या नजरेमध्ये पितांबरी सर्व कर्मचाऱ्यांच्या मालकीची आहे.

ते आपलेपण यावे म्हणून रविन्द्रजींनी खूप प्रयत्न केले. ते कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, वेगवेगळ्या सहली, नेतृत्व विकसनासंबंधित आणि व्यक्तिमत्व विकसनासाठी प्रशिक्षण वर्ग इत्यादींचे आयोजन करतात.

आज कै. वामनराव प्रभुदेसाई आणि श्री. रविंद्र देसाई यांनी पाहिलेल्या जगावेगळ्या स्वप्नाचे रुपांतर नावाजलेल्या उद्योग समूहामध्ये झालेले आहे. त्यांची त्यामागील जिद्द आणि कष्ट पाहून म्हणावे वाटते,

‘कोई नामुमकीनसी बात को मुमकिन कर के दिखा, खुद पहचान लेगा जमाना भीड में भी, तू बस अलग चलकर दिखा…!’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?