' लॉर्डस वर "अकरा मुंड्या" चीत! : द्वारकानाथ संझगिरी

लॉर्डस वर “अकरा मुंड्या” चीत! : द्वारकानाथ संझगिरी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड येथे कसोटी सामन्यांसाठी दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आपला संघ मानहानीकारक पराभवाचा सामना करत आहे. खरंतर परदेशात जाऊन असे पराभव हाती पडण्याची भारतीय संघाची ही पहिले वेळ नव्हे. दर वेळी असे होत असेल तर कसोटीत आपला संघ कुठे कमी पडतो हे पाहावे लागेल.

खेळपट्ट्या अनुकूल नसल्याचे कारणही या पराभवाला दिले गेले आहे. पण जेव्हा गावस्कर, अझरूद्दीन हे खेळाडू सामने जिंकायचे तेव्हाही याच खेळपट्ट्या होत्या. म्हणजे कमी प्रदर्शनात आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी भारतीय संघाच्या या ओरडर्षानाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. ते इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

 

dwarkanath sanjhgiri ajinkya rahane fesbuk post inmarathi

===

हिंदुस्थानी संघाच्या पराभवाला काय विशेषण द्यायचं हा प्रश्नच आहे. ‘दारुण’ पासून ‘मानहानिकारक’ पर्यंतची सर्व विशेषणं एकत्रितपणे या पराभवाचं वर्णन करता येत नाही म्हणून माना टाकून आहेत.

परवा आमच्या ‘एबीपी माझा’वर पराभवाची बातमी लिहिताना सवयीप्रमाणे ‘चारीमुंड्या चीत’ वगैर लिहिलं गेलं. मी म्हटलं,

‘‘ते अकरा मुंड्या चीत म्हणा. हिंदुस्थानी संघातील एकही मुंडी ताठ मानेने उभी राहिली नाही.’’

पराभवाच्या अनेक कारणांत ‘टॉस’ हे एकच कारण जखमेवर फुंकर घालणारं आहे. पण जखम एव्हढी मोठी आणि खोल आहे की, ही फुंकर क्षणैकसुद्धा आराम देऊ शकत नाही.

 

india vs england-inmarathi
cricbuzz.com

टॉसच्या वेळी वातावरण ढगाळ दिसतंय. पुढच्या चार दिवसांचे हवामान खात्यांचे अंदाज, ढगाळ वातावरण आणि पावसाचे असूनसुद्धा वेगवान गोलंदाज उमेश यादव बाहेर जाऊन कुलदीप येतोच कसा? आणि मग मॅच संपल्यावर निवड चुकली म्हणण्यात काय अर्थ?

उमेश यादव ऍण्डरसन नाहीच नाही. स्टुअर्ट ब्रॉडही नाही. पण या वातावरणात कुलदीपपेक्षा उपयुक्त ठरला असता.

टी-20, वनडेत कुलदीपसमोर इंग्लिश फलंदाज गारठत होते. लॉर्डस् वर तो इंग्लिश फलंदाजांसमोर गारठला.

शिवरामकृष्ण आठवतो? १९८४ साली इंग्लंडविरुद्ध पहिल्या तीन खेळींत त्याने प्रत्येकी ६ अशा १८ विकेट्स काढल्या होत्या. पुढे कारकीर्दीत म्हणजे ९ कसोटींत या १८ विकेट्स वजा जाता फक्त त्याने ८ विकेट्स काढल्या. आता कॉमेंट्री करतो. कुलदीपला लवकर कॉमेंटेटर करायचा विचार आहे का?

 

india vs england-inmarathi01
deccanchronicle.com

पण तरीही कुलदीपऐवजी उमेश यादव असता किंवा श्रीकृष्ण सोडून जगातला कुठलाही यादव असता तरी या लोटांगणात फरक पडला नसता. किंबहुना हिंदुस्थानी संघातले उर्वरित राखीव खेळाडू अधिक रवी शास्त्री (पोट सुटलं म्हणून काय झालं? रणतुंगा आयुष्यभर सुटलेल्या पोटाने खेळला.) अधिक बांगर मिळूनही मॅच वाचली नसती.

जिंकायला फक्त २० विकेट्स लागतात ही अंधश्रद्धा आहे. धावाही लागतातच ना?

मला मान्य आहे की वातावरण, स्विंग, इंग्लिश गोलंदाजांचा दर्जा खूप वरचा होता. पण इंग्लंडमध्ये गेल्यावर ढगाळ वातावरण, पाऊस याचा बाऊ करून चालत नाही. पडणाऱ्या बर्फात खेळायचं तर तसे कपडे लागतात, गंजीफ्रॉकात नाही खेळता येत.

इंग्लंडच्या वातावरणात खेळताना स्विंग गोलंदाजीविरुद्ध खेळायचं साइडऑन तंत्र, योग्य चेंडू सोडायची कला, चेंडूवर जाण्यापेक्षा चेंडूची वाट पाहण्याचा संयम आणि एखाद्या उत्तम चेंडूवर बीट झाल्यावरही तो चेंडू विसरून नव्याने आव्हान स्वीकारायची जिद्द, टेंपरामेंट ही फलंदाजीची महत्त्वाची वस्त्र् आहेत.

===

हे पण वाचा:

‘हिंदुस्थान हरला, कोहली जिंकला’: द्वारकानाथ संझगिरी

भारतीय संघाचा पराभव, इतिहासाची पुनरावृत्ती नको रे बाबा! : द्वारकानाथ संझगिरी

===

ती तुमच्याकडे नसतील तर तुम्ही उघडे पडता.

जेव्हा वेंगसरकर, गावसकर, विश्वनाथ, अझरुद्दीन, सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, अगदी बांगरने इंग्लंडमध्ये धावा केल्या त्यावेळी खेळपट्ट्या काय हिंदुस्थानातून आयात केल्या होत्या?

की पावसाला यज्ञ करून, इंद्राला विनंती करून रोखलं होतं? की समोर दर्जेदार गोलंदाज नव्हते? तेव्हा ऍण्डरसन नसेल, तर बॉथम होता. बॉथम नसेल तर आणि कुणी!

१९८६ साली यापेक्षा भयाण वातावरण लिडसला होत. तीन दिवस आणि एका चेंडूत ही मॅच संपली होती. ती हिंदुस्थानने जिंकली होती.

मदनलाल-बिन्नीने नुसत्या स्विंगवर विकेट्स काढल्या होत्या. म्हणजे, वातावरण आणि खेळपट्टी काय असेल विचार करा.

 

india vs england-inmarathi02
quora.com

मला आठवतंय, सुनील गावसकर तेव्हा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर मला म्हणाला होता,

-‘‘अरे, कसोटीचे दोनच दिवस झाले आहेत आणि माझ्या दोन्ही इनिंग संपल्या आहेत?’’

त्या खेळपट्टीवर वेंगसरकरने शतक ठोकताना तो असा खेळला की, विमानांच्या रनवेवर बॅटिंग करतोय.

आपल्या आजच्या खेळाडूंची तंत्रं टी-20 आणि वनडेमुळे ‘भेसळयुक्त’ झालीयत. बॅट आऊट स्विंगवर अशी झेपावते की, त्या आवेगाने मुलीसुद्धा सलमानकडे झेपावत नाहीत. हिंदुस्थानात एक पाय पुढे टाकून कुणालाही ठोकून काढता येतं. दिवसभर खेळता येतं.

मग पुजारा ‘द्रविड’ होतो इतर सर्व वाघ होतात. फलंदाजी जागतिक दर्जाची मानली जाते.

पुन्हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत गेलो की हे सर्व दारिद्र्य रेषेखालचे द्रविड, लक्ष्मण, गावसकर वगैरे होतात. एकही फलंदाज लॉर्डस् वर जिद्दीने उभा राहिला असं त्या च्या देहबोलीवरून वाटलं नाही.

इंग्लंडच्या पहिल्या डावात सुरुवातीला किमान वेगवान गोलंदाजांकडे प्रतिशोध घेण्याची रग आहे असं वाटलं. पण वोक्स, बेअरष्ट्रोने हल्ला केल्यावर त्यांनीही खांदे टाकले. कर्णधारही गोंधळला.

 

india vs england-inmarathi03
hindustantimes.com

आक्रमण करून विकेट्स घ्याव्यात की धावा वाचवाव्यात हा पेच कर्णधाराला सोडवता आला नाही. पॅव्हेलियनमध्ये बसलेले ‘चाणक्य’ही काही करू शकलेले नाहीत. तेसुद्धा हिंदुस्थानात ‘चाणक्य’ असतात. कारण तिथे खेळपट्टी आपल्याला हवी तशी तयार करून घेता येते.

रोड रोलरखाली ‘पिचल्या’ जाणाऱ्या डांबराच्या आणि हिंदुस्थानी संघाच्या भावना लॉर्डस् वर सारख्या होत्या.

पण पुढे काय, हा प्रश्न आहेच. लॉर्डप्रमाणे पॅव्हेलियनध्येच विकेट टाकून नंतर खेळपट्टीवर पंचांकडे जाऊन डेथ सर्टिफिकेट घ्यायचं की लढायचं हे त्यांना ठरवावं लागेल. इथून कोसळणं फारच सोप्पं आहे, उठून लढणं कठीण आहे.

आपली पाठ सांभाळत विराट कोहलीला शेलारमामा व्हावं लागेल.

गडाचे दोर कापावे लागतील. त्याची फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याच्या कारकीर्दीतली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कसोटी आहे. एजबॅस्टनवर त्याने गेलेली पत मिळवलीय. आता फलंदाज म्हणून त्याला ती टिकवायची आहे आणि गलितगात्र झालेल्या इतर फलंदाजांमध्ये ऊर्जा भरायची आहे.

आपण फार फार तर देव पाण्यात ठेवू शकतो. पण देव हा लढवय्यांच्या मागे राहतो. म्हणून म्हणतात,

‘प्रयत्नांती परमेश्वर’! पाहूया पुढे परमेश्वर दिसतो का?

===

हे पण वाचा:

भारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणाऱ्या मोहम्मद कैफला लक्षात ठेवायला हवं!

भारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?