'"दहशतवाद कसा संपवता येईल?": डॉ. अब्दुल कलामांचा प्रश्न आणि दिग्गजांची अप्रतिम उत्तरे

“दहशतवाद कसा संपवता येईल?”: डॉ. अब्दुल कलामांचा प्रश्न आणि दिग्गजांची अप्रतिम उत्तरे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असा प्रश्न जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर “दहशतवाद” असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांच्या रात्रीची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

सर्वच देश आपापल्या परीने ह्या समस्येशी दोन हात करीत आहेत.

लष्कर, नौदल, वायुसेना, पोलीस दल तसेच गुप्तचर संस्था ह्यांच्या मदतीने सर्व देश ह्या दहशतवादाशी लढा देत असले तरी दिवसेंदिवस ही समस्या अधिकाधिक बिकट होत चालली आहे.

ह्या समस्येविषयी तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक सुद्धा विचारमंथन करीत असतात. हल्ली सोशल मिडियामुळे तर देशविदेशातील लोकांशी विविध समस्यांवर चर्चा करणे सोपे झाले आहे.

जर सामान्य लोक ह्या समस्येचा इतका विचार करत असतील तर देशाचे प्रमुख म्हणजेच पंतप्रधान व राष्ट्रपती ह्यांना तर देशाच्या व देशातील नागरिकांच्या सुरक्षेविषयी अधिकच सतर्क राहावे लागते. त्या साठी सर्वच राष्ट्रातील राष्ट्रप्रमुख अनेक उपाययोजना करीत असतात.

आपल्या सर्वांचे लाडके माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम ह्यांचे देशाच्या सुरक्षेमध्ये अमुल्य योगदान आहे हे तर आपण सर्वच जाणतो. १९९८ साली झालेल्या पोखरण येथील अणुचाचणीचे प्रमुख समन्वयक डॉक्टर एपीजे अब्दुल कलम हे होते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ चे ते प्रमुख होते. त्यांनी वेळोवेळी भारताच्या सुरक्षेसाठी आपले अमुल्य योगदान दिले.

 

abdul kalam 2 InMarathi

 

२००७ साली एका सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी “दहशतवादाचा अंत होण्यासाठी आपण सर्वांनी काय करायला हवे?” असा प्रश्न उपस्थित करून ह्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणली.

ह्या चर्चेत सामान्य नागरिकांसह अनेक नामवंतांनीही आपले विचार मांडले. ह्या ऑनलाईन चर्चेला देशविदेशातील नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला व दहशतवाद कसा संपवता येईल ह्यावर अनेक उपाय सुचवले.

अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर,आंतरराष्ट्रीय कीर्तीचा टेनिस खेळाडू लिएंडर पेस व माजी पोलीस अधीक्षक किरण बेदी ह्यांनीही ह्यात आपले विचार मांडले.

सोशल मिडीयावर व्यक्त होताना कलाम म्हणतात की,

“आपला मानव समाज अस्तित्वात आल्यापासून ते आजपर्यंत सतत युद्ध सुरु आहे. ते युद्ध कधी आपापसात तर कधी दोन गटांत सुरु राहिले आहे. ह्याचमुळे जगाला दोन महायुद्धांना तोंड द्यावे लागले आहे. सध्या जगाच्या अनेक भागात युद्धे आणि दहशतवादाने उग्र स्वरूप धारण केले आहे. सध्या ६ अब्ज इतकी असलेली जागतिक लोकसंख्या २०२५ साली ८ अब्ज इतकी वाढेल आणि देशांतर्गत असेच आंतरराष्ट्रीय तणाव हा मानवजातीसमोर एक मोठा व गंभीर प्रश्न बनून उभा राहील.”

“जेव्हा दुष्टशक्ती संहारासाठी एकत्र येतात तेव्हा चांगले विचार व चांगल्या शक्तींना एकत्र येऊन दुष्ट शक्तींविरुद्ध लढावे लागते. ह्या पार्श्वभूमीवर जगातून दहशतवादाचा कायमचा नायनाट करण्यासाठी काय करता येईल? तुम्ही दिलेली उत्तरे प्रत्यक्षात आणली तर हे जग शांत, सुखी व सुरक्षित होऊ शकेल.”

कलामांच्या ह्या प्रश्नावर जवळजवळ ३१००० लोकांनी विविध उपाय सुचवले.

ह्या प्रश्नावर बोलताना किरण बेदी म्हणतात की,

 

Kiran_Bedi-INMARATHI
ndtv.com

“मी गेली ३३ वर्षे पोलीस म्हणून काम केले आहे. एक कारागृह चालवण्याची जबाबदारी पार पाडली आहे. ह्या क्षेत्रात काम करीत असताना मी अनेक गुन्हेगारांशी संवाद साधला तेव्हा माझ्या लक्षात आले कि दहशतवादी लोकांनी काही कृत्य करण्याआधीपासूनच त्यांच्या मनातच दहशतवाद रुजलेला असतो.

आपल्याला जर दहशतवाद संपवायचा असेल तर आधी ह्या लोकांच्या मनातून त्याचे उच्चाटन होणे आवश्यक आहे. कारण हिंसा आधी मनात रुजते आणि नंतर ती त्यांच्या कृतीत उतरते.

काही राजकीय, सामाजिक, धार्मिक हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर होतो. म्हणूनच सर्वप्रथम त्यांच्या मनातून दहशतवाद नष्ट झाला पाहिजे.

मनात दहशतवादाला अंकुर फुटण्याआधीच तो खुडला जाणे आवश्यक आहे. हे घडण्यासाठी त्या व्यक्तीच्या आईवडीलांनी, शिक्षकांनी, गुरूंनी व समाजाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

ह्याच प्रश्नाचे उत्तर देताना अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर म्हणतात की,

 

shree shree ravishankar-inmarathi
navjivanindia.com

“दहशतवाद संपवायचा असेल तर त्याचे मूळ कारण शोधून काढायला हवे. माझ्या मते दहशतवादाचे मूळ कारण मानसिक ताणताणाव आहे. ह्या सततच्या मानसिक तणावामुळे स्त्रिया व पुरुषांमध्ये हिंसेचे प्रमाण वाढते. ही हिंसा मग घरघुती हिंसा, सामाजिक हिंसा अशी वाढत जाऊन जागतिक दहशतवादाचे राक्षसी स्वरूप घेते. म्हणूनच मानसिक ताणावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

दहशतवादाचे दुसरे कारण म्हणजे माणसाची संकुचित विचारसरणी होय. माणसाचे हृदय विशाल असले की त्यात सर्वांसाठी स्थान असते.

परंतु कोत्या मनाची माणसे सर्वांसाठी डोकेदुखी निर्माण करतात.

नव्या पिढीमध्ये उदार अंत:करण व सर्वव्यापक विचारसरणी रुजवून त्यांचे विचारक्षेत्र रुंदावले पाहिजे. आपल्यात व समोरच्या व्यक्तीत कितीही आर्थिक, सामाजिक, भावनिक, धार्मिक तसेच अनेक बाबतीत फरक असला तरी त्या व्यक्तीला स्वीकारण्याची मनोवृत्ती जोपासायला हवी.”

ह्याच विषयावर भारताचा प्रसिद्ध टेनिसपटू लिएन्डर पेस ह्याचे असे म्हणणे आहे की,

 

leanderpaes-inmarathi
newsstate.com

“सर्वात भयंकर दहशतवाद म्हणजे धर्माच्या नावाखाली इतर धर्माच्या लोकांना ठार मारणे. केवळ ते माझ्या धर्माचे नाही म्हणून त्यांची हत्या केली तर आपला देव आपल्यावर खुश होईल असे मानणाऱ्या लोकांचा हा फार मोठा गैरसमज आहे. निष्पाप जीवांची हत्या कोणत्याही देवाला मान्य नाही. त्यामुळे धर्मासाठी एखाद्याचा जीव घेणे ही मानसिकता बदलायला हवी.

समाजात सर्वांना योग्य शिक्षण मिळायला हवे व दहशतवाद व त्याच्या गंभीर परिणामांविषयी जागरूकता पसरायला हवी.

एकमेकांविषयी सर्वांनीच आदर बाळगायला हवा व जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती ह्यावरून भेदभाव करू नये. दहशतवाद रोखण्यासाठी समाजातील सर्वांनीच आपापला खारीचा वाटा उचलायला हवा.”

हे आणि असे अनेक विचार विविध लोकांनी ह्या प्लॅटफॉर्मवर मांडले. त्यापैकी कलामांनी सर्वोत्कृष्ट दोन उत्तरे निवडली. त्यातील पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील ४१ वर्षीय सुगतो मित्रा ह्यांचे उत्तर सर्वोत्तम म्हणून घोषित करण्यात आले.

सुगतो मित्रा म्हणतात की,

ह्या जगात सत्ता अगदी मुठभर श्रीमंत, प्रबळ, प्रभावी लोकांच्या हातात एकवटली आहे.

अनेक वेळा ह्या लोकांनी ह्या सत्तेचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग केला, हे खरे असले तरीही अनेक वेळा ह्या सत्तेचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीही उपयोग केला गेला आहे. स्वतःच्या एका स्वार्थी हेतूसाठी सत्ताधीशांनी संपूर्ण समाजाचे भविष्य व वर्तमान पणाला लावले.

 

kashmir-inmarathi05
indianexpress.com

मित्रा पुढे असेही म्हणतात की,

दहशतवादाचे मूळ शोधून काढले पाहिजे. दहशतवादाचा जन्म का झाला, लोकांना आपले म्हणणे समाजापर्यंत किंवा सत्ताधीशांपर्यंत पोचवण्यासाठी हिंसेची गरज का भासली? असे तर नाही ना की, जगात काही लोकांच्या काही मुलभूत मागण्या होत्या आणि त्याकडे वारंवार दुर्लक्ष झाले किंवा सत्ताधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले?

त्यांच्या मागण्या जर साध्या आणि देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविणाऱ्या नसतील तर त्या पूर्ण करण्यात काय अडचण आहे? परंतु सत्य जर ह्याच्या उलट असेल तर ह्या मागण्या दुर्लक्ष करण्याजोग्याच आहेत. परंतु ही समस्या निरपेक्षपणे आणि निष्पक्षपणे सोडवायला हवी.

काश्मीरच्या बाबतीत पाकिस्तानचे धोरण व स्थानिक फुटीरतावाद्यांचे धोरण लक्षात घेता ह्या सर्व लोकांकडे सत्ताधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून त्यांच्या अवाजवी मागण्यांकडे लक्ष न देता काश्मीरप्रश्न सोडवायला हवा. भारत सरकारने काश्मिरी जनतेशी खास करून काश्मिरी तरुणांशी थेट संवाद साधायला हवा.

आम्हाला आमचे काश्मिरी बंधू भगिनी कायम आमच्याबरोबर हवे आहेत असा संदेश काश्मिरी जनतेपर्यंत पोहोचायला हवा.

आणि काश्मीर भारतात राहण्यासाठी काश्मिरी जनतेला विशेष सवलतींचे कुठलेही लालूच न देता ज्या सेवा व सुविधा इतर भारतीय जनतेला मिळतात. त्याच काश्मिरी जनतेला मिळायला हव्या.

कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे म्हणूनच काश्मिरी जनता ही इतर भारतीय जनतेपेक्षा वेगळी नाही. आणि म्हणूनच भारताच्या प्रगतीमध्ये भारतातील सर्व नागरिकांचा समान सहभाग असायला हवा. सर्वांना समान अधिकार, समान कर्तव्ये असायला हवी.

youth-inmarathi01
boldsky.com

काश्मिरी युवकांना दहशतवादाचा भयंकर चेहेरा व फुटीरतावाद्यांची संकुचित वृत्ती दाखवून द्यायला हवी. हेच धोरण भारताच्या ईशान्य भागातही राबवायला हवे. ह्या भागात सुधारणा व प्रगती व्हायला हवी. देशातील युवांना संधी मिळाली, शांततापूर्ण जीवन व आवश्यक गरजा सहज पूर्ण झाल्या तर देशातील युवा दहशतवादाकडे वळणार नाही.

व जे मुठभर लोक युवकांना चिथावणी देतील, त्यांना हेच युवा सडेतोड उत्तर देतील.

आज जगाची लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे व ह्याचा ताण नैसर्गिक संसाधनांवर येतो आहे. ह्या संसाधनांचे न्याय्य वितरण सर्वांत समानप्रकारे झाले तर जगातील बहुसंख्य लोक संतुष्ट मनाने आयुष्य जगतील व आपल्या मागण्यांसाठी हिंसेचा अवलंब करणार नाहीत.

परंतु प्रत्यक्षात असे घडत नसल्याने अनेक लोक तणावपूर्ण आयुष्य जगत आहेत. म्हणूनच लोकसंख्येला आळा घालणे हा दहशतवाद संपवण्यासाठीचा एक उपाय आहे.

जबाबदार व मोठ्या प्रगत राष्ट्रांनी दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्र येऊन कंबर कसायला हवी. तसेच सर्व राष्ट्रांनी ह्यासाठी सहकार्य करायला हवे.

ही एक आंतरराष्ट्रीय चळवळ व्हायला हवी. तसेच स्थानिक पातळीवर सर्वांनीच ह्यात आपापला वाटा उचलायला हवा. चांगल्या शक्तींनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन दहशतवाद मिटवण्यासाठी पावले उचलणे ही आज काळाची गरज आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““दहशतवाद कसा संपवता येईल?”: डॉ. अब्दुल कलामांचा प्रश्न आणि दिग्गजांची अप्रतिम उत्तरे

  • March 6, 2019 at 9:32 am
    Permalink

    मी कोणी दिग्गज नाही मात्र माझ्या मते दहशतवादाचा सरळ सरळ संबंध धर्माशी आहे, आणि तो धर्म म्हणजे इस्लाम.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?