' "गुरूनाथ"ने "शनया"कडे आकर्षित होणं हा "राधिका"चा दोष आहे का?

“गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखिका : नीलिमा देशपांडे 

===

जगात कुठेही नवरा-बायकोचं भांडण म्हणजे इतरांसाठी करमणुकीचा कार्यक्रम असतो. खरं काय खोटं काय, त्यांचं त्यांनाच माहित असतं. पण लोक मात्र आपापल्या कुवतीप्रमाणे एका कुणाची बाजू घेऊन बोलत असतात. बरेचदा त्यात स्व-सहानुभूती दडलेली असते.

आणि अशावेळी दोन्ही बाजू जर आपल्याला दिसत असतील तर मग बोलायलाच नको.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मराठी मालिकेने हीच मानसिकता ओळखून आपल्या कथेचं सूत्र रचलं आहे.

एक कॉलेजमधली जोडी प्रेमात पडते. गुरुनाथ आणि राधिका. मग ही जोडी लग्न करते, पुढे मोठ्या शहरात येऊन स्थायिक होते. त्याची मेहनत आणि त्याची हुशारी त्याला उच्चपदावर घेऊन जात असताना, ती मात्र संसार, लहान मुल आणि त्याला हवं नको पाहण्यात व्यग्र झालेली आहे.

सर्वसाधारणपणे हेचं घडतं सगळ्यांच्या आयुष्यात. पण इथे मात्र एक गडबड होते.

 

gurunath-shanaya-inmarathi
zee5.com

अचानक मोठ्या शहराची हवा आणि आपल्याला सापडलेलं आपलचं नवीन रूप – गुरूनाथला वेगळा विचार करायला भाग पाडतं. ऑफिसमध्ये नव्याने रुजू झालेली, चुलबुली कलिग शनाया त्याला आवडू लागते.

संसाराच्या रगाड्यात अडकलेली राधिका आणखीच गबाळी होत जाते.  इकडे बॉस आपल्या प्रेमात आहे हे लक्षात आल्यावर शनाया अधिकच सुंदर बनत जाते…!

आपल्या आजूबाजूला घडावी इतकी साधी सरळ कथा.

मग सुरु होते कुरघोडी. राधिकाने त्यांना रंगेहाथ पकडणं किंवा गुरुनाथने राधिकाची गोची करून ठेवणं.

मुळात आपल्याकडे संसार हे साधारणपणे एक मुल झालं की असेच नीरस बनतात. त्याला कारणं वेगवेगळी असतील. पण नीरसता तीच आणि तशीच. १९६० नंतर स्त्री कमवायला म्हणून बाहेत पडली. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा पीठात मीठ या मदतीच्या भावनेने पैसे कमवू लागली. तरी तिच्या मागे असणारा घराचा गाडा तिलाच ओढायचा होता.

त्यामुळे स्त्री मॉडर्न झाली तरी घर सुटलं नाही…!

आजही प्रत्येकाला कमावणारी बायको हवी असली तरी – घरकाम तिने केलं (च) पाहिजे हा अट्टहास असतोच. इथे तर राधिका घरात राहणारी स्त्री, स्वयंपाकापलिकडे तिची धाव नाही. असं हे पात्र आहे. (आता जरी त्यात १८० अंशात फरक पडला असेल तरी पात्राची मूळ धाटणी अशीच आहे.) त्यातून तिला फॅशन कळत नाही. छान दिसण्याची इच्छा नाही. बघावं तेव्हा घर आणि घर.

 

radhika-inmarathi
ozee.com

या उलट शनायाला छान दिसण्यापलीकडे काही सुचत नाही. शिवाय गुरुनाथने बघितलेलं व्यावसायिक विश्व तिला कळतं. आणि कथा एकप्रकारे त्यांच्या प्रेमाला योग्य ठरवते…!

दुसरीकडे आहे समाज, आपल्या चालीरीती, आपली संस्कृती आणि असंच काहीबाही…

मग राधिकाला जाणीव होते. तिच्यातलं उत्तम स्वयपाकाचं कसब लक्षात घेवून ती मसाले विकते. त्यासाठी दारोदार वणवण फिरते. अचानक तिचा बिझनेस वाढतो आणि ती मोठ्या कंपनीची मालकीण होते. यात अधिकची पात्र शेजारी, मित्रमंडळी तिला मदत करतात.

कारण, तिची बाजू सत्याची आहे.

एकूणच कोणत्याही कथानकात एक बाजू सत्याची आणि अन्याय सहन करण्याची असणं आवश्यक असतं. तसं इथे आहे.

पण – सत्य आणि अन्याय यांच्या मध्ये सुद्धा काही घडत असतं आणि त्याची दखल घेतली न गेल्याने कथा वास्तवात राहत नाही.

शनाया खूपच “गयीगुजरी” दाखवली आहे. ना तिला ऑफिसचं काम उत्तम जमतं ना घरातलं. तिच्या ग्यारीला कळत आहे की ती त्याला पैशासाठी, चैनीसाठी वापरते आहे. आणि तरीही त्याचं तिच्यावर प्रेम आहे असा त्याचा दावा आहे. “ग्यारी पैसे देईल तोपर्यंत ठीक. नसेल तर मग तो नको.” एवढंच शनयाला कळतं. बाकी पुढे आयुष्याचं काय याचा या मुलीला जराही विचार नाही.

 

shanaya-inmarathi
charmboard.com

अशा मुलीबरोबर केवळ ती सुंदर आहे म्हणून कोणी किती सहन करू शकेल ? हा प्रश्नच आहे.

इकडे राधिका सती-सावित्रीच्या पावलावर उभी आहे. वेडा झालेला नवरा त्या शनायाच्या मागे आणि ही त्याच्यामागे. स्वतःच्या पायांवर उभ राहून स्वतःची कंपनी काढली तरी तिचा अट्टहास तोच राहतो हे पटत नाही. एवढ्या दिवसांत ना तिची भाषा बदलली ना तिला कळलं की आपल्या नवऱ्याला काय हवं आहे.

काही ठिकाणी तिने ऑफिसासाठी म्हणून घातलेले कपडे आणि पाठीवर सोडलेले मोकळे केस हास्यास्पद वाटावे इतके कसेतरी दिसतात.
परंतु, आपल्याकडे समाजाच्या विशिष्ठ अपेक्षा असतात. विशेषतः बाईकडून. त्यात परत लग्न झालेली बाई – एका मुलाची आई : तिने नेहमी सावरून राहायला हवं, तिने कोणतीही परिस्थिती शांतपणे हाताळायला हवी.

“पुरुषच तो – असं होतं कधी कधी.” , “समजून घ्यायला हवं.” , “तो तसं वागला म्हणून हिने पण तसचं वागता कामा नये.”…!

आता दुसरी स्त्री – त्याच्या आयुष्यात येणारी, लग्नानंतरची. तिलामात्र यातला एकही नियम लागू नाही…!

तिने मनमौजी असलं पाहिजे. तिला हवं ते ती करू शकते. तिला काहीच येत नसतं, जे घराच्या बाईला येतं. म्हणजे येत असेल ही, पण ते मान्य नाही. स्वयंपाक ही नाही आणि जुळवून घेणं ही नाही…! बस- आपली सामाजिक मानसिकता अशीच आहे.

ह्या सगळ्या गोंधळात, एक महत्वाचा अंडरकरंट अदृश्य होऊन जातो.

“गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का?

 

shanaya-gari-inmarathi
India.com

राधिका – एक संसारी स्त्री  घर, लहान मुल यात गुरफटलेली. सामान्यपणे ही स्टेज सगळ्यांच बायकांच्या आयुष्यात येते. या जबाबदाऱ्या इतक्या वाढतात की लग्नानंतरचा नवथर प्रणय कमी होत जातो. प्रायोरिटी बदलते. आणि सुरुवात होते शनायाच्या आगमनाची.

खरेच, शनायाच्या या एन्ट्रीमागे राधिकाचा दोष आहे का ?

तसं बघायला गेलं तर आणि प्रामाणिकपणे मान्य करायचं झालं तर – नक्कीच आहे. आपल्या जोडीदाराला काय आवडतं काय नाही त्याचं रोजचं ऑफिसच आयुष्य, त्याचं वेगळं विश्व तिने समजून घ्यायला हवं होतं.

बदल होत असतात. सगळेच बदल आपल्याला पेलत नसले तरी टिकून राहण्यासाठी काही बदल अत्यावश्यक असतात. आपलं बोलणं चालणं, वागणं, राहणीमान आणि मुख्य म्हणजे स्वभाव हे सगळं एक पॅकेज असतं आणि यातून तयार होते आपली पर्सनॅलिटी.

कितीही नाकारलं तरी बाह्यरुपाला एक किंमत असतेच असते. “आयडीयलिझम” च्या नजरेतून कितीही अप्रिय वाटलं तरी “वास्तविकते”तील क्रूर सत्य आहे हे.

दिसणं त्यातही सुंदर, टापटीप असणं हे समाजात वावरताना आवर्जून बघितलं जातं. हे चूक की बरोबर हा प्रश्नच नाही. आहे हे असं आहे.

कितीही नाकारलं तरी सुंदर जोडीदार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. वधुवरसूचकच्या यादीत आज ही सुंदर गोरी चष्मा नको – हे बदललेलं नाही. मिथ्या मोठेपणा दाखवणाऱ्यानी हे म्हणून दाखवावं – हो मला कुरूप बायको हवी आहे, किंवा मला कुरूप सून, वहिनी हवी आहे…!

सौंदर्याच्या व्याख्या वेगळ्या असल्या तरी, प्रेझेंटेबल असणं हे सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट आहे.

 

radhika-housewife-inmarathi
Charmboard.com

आपण कितीही स्त्रीवाद आणि स्वातंत्र्य म्हंटल तरी संसार करताना काही गोष्टी आपसूक येतात, पैकी एकमेकांना आवडत राहू ,किमान कंटाळवाणे होणार नाही याची काळजी घेणं आलंच.

त्यामुळे राधिकाने तिच्या जबाबदा-या सांभाळताना एकीकडे हा विचारही करायला हवा होता.

बरेचदा जोडीदाराला(त्याला/तिला) आपला विचार होतोय ही कल्पनासुद्धा सुखावह असते.

अर्थात, ही झाली एक बाजू. टाळी एका हाताने वाजत नाही, चूक तर गुरूनाथची सुद्धा आहे.

आपलं बदलेल विश्व तिच्या आताच्या जबाबदा-यांना बघता, ती कितपत समजून घेऊ शकेल याचा साधा विचारही त्याच्याकडे नाही. तिच्यातली प्रत्येक गोष्ट त्याला हल्ली फक्त इरिटेट करते आहे…!

ह्या सगळ्यात आपल्या समाजाची दांभिक मानसिकता देखील उघडी पडते.

एक मिनिट विचार करा. राधिकाला स्वयंपाक येत नाही, ती मुलाला नीट सांभाळू शकत नाही. पण राधिका “सुंदर” आहे. शनाया दिसायला ठीक आहे पण हुशार आहे. ती बिझनेस सांभाळते आणि घरसुद्धा. तरीही गुरु आणि शनायाच्या नात्याला कुणी मान्यता देईल?

 

mazya-navryachi-bayko-inmarathi
dailymotion.com

एकूणच आपलाकडे या नात्यातून नक्की काय मिळत आहे, ते किती परिपूर्ण भरलेलं आहे या पेक्षा ही नातं “कोणतं” आहे, त्याचं “लेबल” काय आहे याला महत्त्व देतात. आणि मग सुरु होतं  मनोरंजन. प्रत्येकाला बायको अशीच हवी आहे, राधिकासारखी आणि जोडीला एक मैत्रीणसुद्धा शनाया सारखी. गुरुनाथ सगळेच आहेत.

अर्थात, मनोरंजनासाठी या मालिका असल्या तरी त्यातून एक विचार व्यक्त होत असतोच. एक छुपा संदेश त्यातून पोहोचत असतो.

तेव्हा या अजिबात नवीन विषय नसलेल्या विषयाला रंगवताना – जरा हट के असं काही असतं तर अजून आवडलं असतं. पुरुषांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होण्याचा धोका इथे गुरुचे बाबा आणि नाना यांनी समर्थपणे पेलला आहे. राधिकाची मैत्रीण आणि तिचा नवरा -गुप्तेभाऊ – ही पात्र रचना ही चांगली जमली आहे.

आता ही मालिका घटस्फोटापर्यंत आलेली आहे. नक्की काय घडत पुढे ते कळेलच. राधिकाला शेवटपर्यंत समर्थ आणि स्वतंत्र विचारांचं दाखवलं तर एक नवीन चांगला पायंडा पडेल.

नवरा, बायको आणि त्यांच्यात येणारी तिसरी व्यक्ती दुख:द असते यात शंकाच नाही. तरीसुद्धा जे घडत आहे ते त्याने किंवा तिने पेलून न्यायचं आहे – त्याच्यासह किंवा त्याच्याविना हा निर्णय घेता आला की आयुष्य सोपं होऊन जातं.

राधिका होऊन जगताना आपल्यातल्या अस्तित्वाची किंमत शून्य होत नाही ना याचा सारासार विचार हवा. आणि गुरुनाथ होताना आपल्यामुळे कोणती घडी विस्कटत नाही ना याचा विचार हवाच हवा. शनाया होण्यासाठी बिनडोक असण हीच पात्रता असल्याने त्याबद्दल नं बोललेलंच बरं…!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?