' ताजमहाल आणि राष्ट्रपती भवन सुद्धा विकणारा भारताच्या इतिहासातला चलाख महाचोर! – InMarathi

ताजमहाल आणि राष्ट्रपती भवन सुद्धा विकणारा भारताच्या इतिहासातला चलाख महाचोर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या इतिहासात अशी एक वल्ली होऊन गेली ज्याचे किस्से आजही लोकांच्या तोंडी आहेत. नटवरलाल नामक हा ठक काही छोटा मोठा चोर नव्हता.

याने अशा मोठमोठ्या चोऱ्या केल्यात की ज्याबद्दल आपण विचार सुद्धा करू शकणार नाही. नटवरलालकडे लोकांना फसविण्याची चलाखी होती.

लोक त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि बोलण्यातील आत्मविश्वासाने इतके भारावले जात की ते सहजच त्याच्या जाळ्यात अडकत.

नटरवरलालने तीन वेळा आग्र्याचा ताजमहाल, दोन वेळा लाल किल्ला आणि एकदा चक्क राष्ट्रपती भवन सुद्धा विकून टाकले होते.

 

kumar-inmarathi

 

नटवरलालचे खरे नाव मिथिलेश कुमार श्रीवास्तव असे होते. असे म्हणतात की, मिथिलेश कुमार श्रीवास्तव याने आपल्या आयुष्यात पोलिसांपासून वाचण्यासाठी ५६ नावे घेतली होती. मात्र लोक त्यांना नटवरलाल या नावाने जास्त ओळखत.

मिथिलेश कुमार श्रीवास्तव याच्या ठगेगिरीचे खूप किस्से आहेत पण त्याआधी जाणून घेऊयात मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवर लाल याच्या खाजगी आयुष्याबद्दल.

मिथिलेश कुमार श्रीवास्तव यांचा जन्म बिहारच्या सीवान जिल्ह्यातील जीरादेई गावात झाला. मिथिलेश कुमार यांच्या पत्नीचे निधन लग्नानंतर थोड्याच काळात झाले होते. त्यांना कोणी अपत्य सुद्धा नव्हते.

असे म्हणतात की मिथिलेश कुमार यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. त्यांना थोडेफार इंग्रजी सुद्धा बोलता येत असे. काही काळ त्यांनी पटवारीची नोकरी सुद्धा केली होती. पण त्यांचं मन वकिली आणि पटवारी पद सांभाळण्यात रमले नाही.

तर हेराफेरी, ठगेगिरी यातच त्यांना जास्त इंटरेस्ट होता. त्यांनी आपल्या आयुष्यात लोकांना ठकविण्याचे अनेक कारनामे केले ज्यांची चर्चा अजूनही होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – डिफेन्स मिनिस्टरपासून आयफोनच्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देणारा चलाख चोर!

===

नटवरलाल यांना एक कला अवगत होती, ती म्हणजे ते कोणत्याही व्यक्तीची हुबेहूब सही करत असत. असं सांगतात की एकदा नटवरलाल यांच्या गावात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते.

तिथे नटवरलाल यांनी आपल्या या कलेचा नमुना लोकांसमोर ठेवण्यासाठी डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या समोर त्यांची हुबेहूब स्वाक्षरी केली आणि उपस्थितांना बुचकळ्यात पाडलं.

आपल्या याच कलेचा फायदा घेत त्यांनी पहिला गंडा घातला तो आपल्या शेजाऱ्याला. त्याने आपल्या शेजाऱ्याच्या चेकवर खोटी सही करून १००० रुपये काढले आणि चालू झाला त्याचा ठगेगिरीचा प्रवास.

यानंतर त्याने एकाहून एक सरस असे ठगेगिरीचे गुन्हे केले. त्यातले महत्त्वाचे काही पुढीलप्रमाणे-

ताजमहाल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन विकण्याचे नटवरलालचे किस्से सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. त्याने ,तीनवेळा ताजमहाल, दोनदा लाल किल्ला आणि एकदा तर चक्क राष्ट्रपती भवन विकून टाकले.

असं म्हणतात की नटवरलालने राष्ट्रपतींच्या बनावट सहीने या वास्तूंची विक्री केली होती.

नटवरलाल याने केवळ सरकारलाच नाही तर मोठमोठ्या उद्योगपतींना सुद्धा ठकविले होते. उसने घेण्यासाठी त्याने सर्वांत जास्त सरकारी कर्मचारी आणि मध्यमवर्गीय लोकांना टार्गेट केले होते.

त्याची इंग्रजी भाषा कच्ची होती म्हणून नाहीतर त्याने विदेशी पर्यटक सुद्धा सोडले नसते. नटवरलालवर उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये फसवणुकीच्या शंभरहून अधिक तक्रारी केल्या गेल्या होत्या.

या राज्यांच्या पोलिसांनी मिथिलेशवर बक्षीससुद्धा लावले होते. आपल्या जीवनकाळात नटवरलाल ९ वेळा पकडला गेला होता आणि केवळ ११ वर्षं तुरुंगात राहिला. फसवणुकीच्या ३० गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा मिळू शकली नाही.

 

letterinmarathi

 

नटवरलाल ज्याप्रकारे डोके लढवून फसवणूक करायचा तशाच सहजपणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जायचा.

तो कित्येकदा पोलिसांना चुकवून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. एकदा फसवणुकीच्या एका प्रकरणात त्याला दिल्लीच्या तिहार जेलमधून कानपूरला कोर्टात हजर करण्यात येणार होते.

त्याला तिथे नेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या पोलिसांचे दोन शिपाई आणि एक हवालदार असे लोक पाठवण्यात आले होते.

नटवरलाल तेव्हा साधारण ७५ वर्षांचे असतील. दिल्ली रेल्वे स्थानकावर खूप गर्दी होती. ते रेल्वेच्या बाकड्यावर बसून धापा टाकत होते. त्यांनी यूपी पोलिसातील जवानाला सांगितले की,

“माझं शरीर कापतंय, मला बाहेरून औषध आणून देशील का? जेव्हा माझे नातेवाईक मला भेटायला येतील तेव्हा तुला तुझे पैसे मी परत करेन.”

त्यानंतर तो जवान औषध आणायला गेला. आता नटवरलाल जवळ दोन पोलीस राहिले होते. त्यांच्यापैकी एकाला त्याने पाणी आणायला पाठवले.

उरलेल्या हवालदाराला त्याने आपल्याला बाथरूमला जायचे असल्याचे सांगितले. आपल्याला गर्दीतून एकट्याला चालायला त्रास होईल असे सांगून एक दोरी स्वतःला बांधून तो त्या हवालदाराला घेऊन गेला.

त्याने हवालदाराला दोर धरून त्याच्याबरोबर यायला सांगितले जेणेकरून लोक त्याला वाट मोकळी करून देतील. त्यानंतर मिथिलेश उर्फ नटवरलालने गर्दीचा फायदा घेत दोरी सोडून कधी पोबारा केला ते हवालदाराला कळलेच नाही.

नटवरलाल फरार झाल्यावर तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. याआधी सुद्धा नटवरलाल पोलिसांच्या डोळ्यात धूळ चारून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

 

mithilesh-inmarathi

 

नटवरलाल स्वतःला गरीबांचा देव मानत असे. तो सांगायचा की त्याने लोकांना ठकवून मिळवलेले पैसे तो गरिबांमध्ये आणि गरजूंना वाटत असे. त्याला आपल्या वागण्याबद्दल काहीच पश्चात्तापाची भावना नव्हती.

तो स्वतःला रॉबिनहुड समजत असे. तो सांगायचा की मी कधी लोकांना धाक दाखवून किंवा मारामारी करून लोकांकडून पैसे उकळले नाहीत.

कारणे सांगून लोकांकडून पैसे मागितले आणि लोकांनी ते दिले. यात माझी काय चूक?

नटवरलालला इतका आत्मविश्वास होता की एकदा तर त्याने कोर्टात खुद्द न्यायाधीशांना असे सांगितले की, जजसाहेब माझ्याकडे बोलण्याचे असे कसब आहे की तुम्ही जरी १० मिनिटे माझ्याशी बोललात तर तुम्ही मला हवा तोच निर्णय घ्याल.

असा हा नटवरलाल भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपली ओळख लपवून फिरत असे. त्याला शेवटचे बिहारच्या दरभंगा रेल्वे स्थानकावर पाहिले गेले होते जिथे एका पोलिसवाल्याने त्याला ओळखले होते.

तो पोलीस त्याला लहानपणापासून ओळखत होता. नटवरलाल सुद्धा समजून चुकला की त्याने आपल्याला ओळखले आहे. पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचेतोवर तो फरार झाला होता.

===

हे ही वाचा – सगळ्यांना फसवून चक्क न्यायाधीशांच्या खुर्चीत बसणाऱ्या या हुशार चोराचे प्रताप वाचून तुम्हीही थक्क व्हाल…!

===

 

natvar-inmarathi

 

असे म्हणतात की जवळच उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या डब्ब्यात नटवरलालचे कपडे मिळाले आणि गार्डचा युनिफॉर्म गायब झाला होता.

यानंतर २००४ मध्ये नटवरलालचे नाव समोर आले होते. तेव्हा एका वकिलाने सांगितले की नटवरलालने त्याच्या मृत्युपत्राची फाईल त्याला सोपविली आहे.

काही लोकांचे म्हणणे होते की त्याचा मृत्यू २००९ मध्ये झाला, तर त्याच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार नटवरलाल १९९६ मध्येच गेले होते.

त्यामुळे नटवरलालच्या मृत्यूबद्दल काहीच ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे इतिहासातील सर्वात मोठ्या ठकाने आपल्या मृत्यूबद्दल देखील लोकांना ठकविले.

मिथिलेश कुमारचे नटवरलाल नाव आज इतके प्रसिद्ध झाले आहे की कोणी ठगगिरी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लोक त्याला नटवरलाल म्हणून संबोधतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – पाकिटमार ते बिकिनी किलर: तिहार फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा थरारक जीवनपट!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?