' "मुस्लिम महिलांचे" कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे "हिंदुत्ववादी मोदी": भाऊ तोरसेकर

“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

एखादा माणूस किती नशिबवान आहे ते त्याच्या शत्रू वा प्रतिस्पर्ध्यांच्या वागण्यातून कळत असते. म्हणजे असे, की त्याला गोत्यात आणायला त्याचे दुष्मन टपलेले असतात.

पण विरोधकांच्या अशा प्रत्येक डावपेचातून त्याच व्यक्तीला लाभ मिळत असेल तर त्याला नशीब म्हणावे लागते. कारण अनेकदा असे होते, की त्या माणसाने कितीही प्रयत्न करून जी गोष्ट साध्य झाली नसती, ती केवळ शत्रूच्या खुळ्या डावपेचामुळे सिद्ध होत असते.

नरेंद्र मोदी हा जगातला आजचा तसा एक नशिबवान माणूस आहे. त्याचे शत्रू त्याला जितका खड्ड्यात घालायचा प्रयत्न करतात, तितका त्याचा लाभ होत असतो.

किंबहूना त्याने कितीही प्रयत्न करून जो लाभ त्याला मिळाला नसता, तो त्याच्या विरोधातल्या कारवायांनी त्याला मिळत राहिला आहे. मागल्या लोकसभेत तेच झाले आणि आताही त्याच दिशेने विरोधकांची वाटचाल होताना दिसते आहे.

अन्यथा इतक्यात अविश्वास प्रस्ताव आणायचे काहीही प्रयोजन नव्हते आणि तेलगू देसम पक्षाने तसा प्रस्ताव आणला असताना, सोनिया गांधींनी त्याला प्रतिष्ठेचा विषय बनवायचे काहीही कारण नव्हते.

त्याची प्रचिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आली. तसा प्रस्ताव आणला गेला आणि सभापती सुमित्रा महाजन यांनी तो तात्काळ स्विकारून दुसर्‍याच दिवशी त्यावरील चर्चा घोषित करून टाकली. असे सहसा होत नाही.

शक्यतो, अविश्वास प्रस्ताव हा अधिवेशनाच्या अखेरच्या पर्वात आणला जातो. पण जेव्हा सरकार डळमळीत असते तेव्हा तो तात्काळ आणला जातो आणि सरकार तो स्विकारायला नकार देत असते.

इथे अविश्वास प्रस्ताव लगेच स्विकारून मोदी सरकारने विरोधकांना पहिल्याच फ़ेरीत मात दिली. कारण तो आरंभीच फ़ेटाळला गेला, म्हणजे पुढे कामकाजात विरोधकांना हिणवून काम रेटून नेता येणार.

 

NoConfidence-Motion-inmarathi
afternoonvoice.com

पहिली गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्ष भाजपाकडे आजही स्वपक्षीय बहूमत आहे. अधिक एनडीए म्हटल्या जाणार्‍या सत्ताधारी आघाडीच्या मागे आजही लोकसभेत ३०० हून अधिक सदस्यांचे पक्के पाठबळ आहे.

दुसरी गोष्ट विरोधी पक्ष म्हणून जे लहानमोठे दोनतीन डझन पक्ष आहेत, त्यापैकी दिडशेहून अधिक सदस्य कॉग्रेसच्या नेतृत्वाला अजून उघड मान्यता द्यायला राजी नाहीत. त्यापैकी कोणी पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांना युपीएचे म्होरके मानायला तयार नाहीत.

ही कॉग्रेसची समस्या नसून तथाकथित विरोधी एकजुटीचीही समस्या आहे. जाहिर कार्यक्रमात भाजपा वा मोदी विरोधात छाती ठोकून विरोधी पक्षाचे नेते बोलत असतात. पण एकदिलाने एकजुटीने मैदानात येण्याविषयी त्यांच्यात एकमत होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

पण वाहिन्यांच्या चर्चेत ते सत्य कुठलाही विरोधी नेता प्रवक्ता मान्य करीत नाही. अविश्वास प्रस्तावाच्या निमीत्ताने त्याचाच मुखवटा टरटरा फ़ाडून टाकायची संधी मोदींनी घेतलेली आहे. म्हणून तो प्रस्ताव लांबवण्यापेक्षा अधिवेशनाच्या आरंभीच घेण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभेचे निकाल व तिथल्या संयुक्त सरकारच्या नाट्यानंतर विरोधकांना एकजुटीची सुरसुरी आलेली होती. त्या नाट्याचा पर्दाफ़ाश करण्याची संधी यातून मोदींना साधायची आहे.

कारण अविश्वास प्रस्ताव खरोखरीच मताला टाकला गेल्यास तो संमत होण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण आकडेच विरोधी पक्षाची ताकद दाखवणारे आहेत. पण खरोखर मतदान झाले, तर सरकारच्या बहूमतापेक्षाही विरोधी बेदिलीचे प्रदर्शन होणार.

अल्पमतात असलेले विरोधी पक्षही एकदिलाने उभे नाहीत, त्याचा पुरावा यातून मिळू शकतो. किंबहूना तो सामान्य जनतेला आपल्या डोळ्यांनी बघता यावा, म्हणून मोदी सरकारने हा प्रस्ताव अधिवेशनाचा आरंभीच घेऊन विरोधकांना पहिल्याच फ़ेरीत धोबीपछाड दिलेला आहे.

सत्ताधारी एनडीएची संख्या सव्वा तीनशे खासदारांची आहे. म्हणजे़च विरोधात उरलेले सदस्य फ़क्त दोनशेहून थोडे अधिक. त्यात पुन्हा अण्णा द्रमुक, बीजेडी व तेलंगणा समिती कधीच विरोधकांच्या सुरात सुर घालून पुढे येत नाहीत.

ह्या तीन पक्षांचे सदस्य ५८ आहेत आणि त्यांनी मतदानात तटस्थ भूमिका घेतली, तरी उरलेले विरोधी पक्ष एकजुटीतही केविलवाणे होऊन जातात. किंबहूना मोदींना तेच तर जनतेसमोर मांडायचे आहे.

इतक्या बारकाईने आपली रणनिती व डावपेचांचॊ विचारपुर्वक मांडणी करणार्‍या नेत्याशी झुंज देणे सोपे नसते. त्याला अशा पोरकट डावपेचात पकडण्यापेक्षा आगामी लोकसभेत कशी टक्कर द्यावी, याची सुक्ष्म रणनिती आखणे अगत्याचे असते. पण त्या नावाने शून्य आहे.

मागल्या लोकसभा मतदानात मोदींनी प्रचारात कुठेही हिंदुत्व किंवा मंदिर वगैरे विषय आणले नाहीत. इस्लाम विरोधात अवाक्षर उच्चारले नाही. पण मोदी व भाजपा कसा हिंदूत्ववादी पक्ष आहे, त्याचा डंका विरोधकच पिटत होते आणि त्याचा सर्वाधिक लाभ मोदींना मिळाला.

 

No-Confidence-motion-inmarathi
telanganatoday.com

आताही पंतप्रधानपद संभाळताना मोदींनी हिंदूत्व शब्दात कुठेही अडकणार नाही याची काटेकोर काळजी घेतलेली आहे. पण दरम्यान चार वर्षे त्यांच्यावर सतत हिंदूत्वाचे पक्षपाती म्हणून आरोप होत राहिले आहेत.

दरम्यान मोदींनी मुस्लिम महिलांचा विषय नाजुकपणे हाताळून, त्या मतदारात मोठी सहानुभूती निर्माण केलेली आहे. तलाकपिडॊत मुस्लिम महिलांना राजकीय तत्वज्ञानाशी काडीचे कर्तव्य नसते. आपल्या आयुष्यातल्या अन्याय अत्याचाराशी कर्तव्य असते. त्यांना मोदींनी चुचकारले आहे.

त्या़चवेळी मुस्लिम धर्मियातील शिया-सुन्नी पंथातली दरी वाढवण्याचाही चतुराईने प्रयास केलेला आहे. आपण मुस्लिम विरोधी असण्यापेक्षा पुरोगामी पक्ष, मुस्लिमातील मौलवी व सुन्नी कट्टर पंथीयांचे पाठीराखे असल्याचे चित्र मोदींनी छानपैकी रंगवून घेतलेले आहे.

लोकसभेच्या वा राष्ट्रीय राजकारणात उतरल्यापासून मोदींनी कधीही मुस्लिमंना दुखावणारे विधान केलेले नाही. पण त्याचवेळी हिंदूच्या भावनांची आपण कदर करतो, असे संकेत सातत्याने दिलेले आहेत. आपण हिंदूहिताला प्राधान्य देतो असे दाखवताना मुस्लिम विरोधी असल्याचे त्यांना कधी बोलावेही लागलेले नाही. उलट आपण मुस्लिम लांगुलचालन करत नसल्याचे मात्र मोदी अगत्याने दाखवित असतात.

हिंदूंना तितकेच पुरेसे असते. हिंदूत्वाचा मुद्दा तेवढ्यापुरता मर्यादित आहे. कट्टरता हिंदू समाजाला मान्य नाही आणि त्याला त्या लोकसंख्येत कधी प्रतिसादही मिळत नाही.

पण आपल्यावर अन्याय वा पक्षपात होऊ नये ही माफ़क अपेक्षा आहे. ती जोपासून मोदींनी इतकी मजल मारली आहे. त्यामुळेच मोदींना कट्टर हिंदूत्ववा़दी ठरवण्याचे सर्व प्रयास कायम फ़सत गेले आहेत.

बोलघेवडे मुस्लिम नेते व धर्ममार्तंड सोडल्यास एकूण मुस्लिम लोकसंख्येत मोदींविषयी प्रतिमा गेल्या चार वर्षात उजळत गेली आहे.

त्यामुळेच शियापंथीय मुस्लिमांनी अयोध्येतील बाबरीच्या जमिनीचा दावा सोडून देण्यापर्यंत मजल मारली आहे. थोडक्यात चार वर्षापुर्वी मोदींच्या बाबतीत मुस्लिमांचे जे कटू मत होते, त्यात मोठा फ़रक पडलेला आहे.

मुस्लिम व्होटबॅन्क म्हणतात, तिची संख्या अधिकच घटली आहे. त्याचवेळी हिंदूंमधील अनेक मवाळ लोकही हळुहळू पुरोगामी मुस्लिम पक्षपाताने आणखीनच दुरावलेले आहेत.

अशावेळी हिंदूंच्या नाजूक भावनांना पुरोगाम्यांनी जपण्याची गरज आहे. कारण त्यांना मिळू शकणार्‍या मुस्लिम मतांची संख्या घटली आहे आणि त्यांनाही हिंदू मतांचे राजकारण करणे भाग आहे.

अशा प्रतिकुल स्थितीत पुन्हा शशी थरूर यांनी हिंदू पाकिस्तान व हिंदू तालिबान अशी भाषा करणे, म्हणजे मोदींना पुढली लोकसभा आंदण देण्यासारखा प्रकार आहे. तेच जर राहुल वा त्यांचे सहकारी करत असतील, तर मोदींना नशिबवान नाहीतर काय म्हणायचे?

 

modi-gandhi-inmarathi
dnaindia.com

भारत तेरे टुकडे होंगे, अशा घोषणा देणार्‍यांपासून कुठल्याही बाबतीत थेट पाकिस्तानच्या समर्थनाला उभे रहाण्यातून कॉग्रेस व पुरोगाम्यांनी आपली विश्वासार्हता मवाळ वा तटस्थ भारतीयांच्या मनातूनही गमावलेली आहे.

मोदी वा भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला विरोध करणे समजू शकते. पण थेट पाकिस्तानच्या समर्थनाला जाणे किंवा त्यासाठी भारतीय सेनेवरही बेछूट आरोप करण्याने अनेक मतदारांना पुरोगामी पक्ष व कॉग्रेसने विचलीत केलेले आहे.

तुलनेने मोदींनी कुठलीही कट्टर हिंदूत्ववादी भूमिका घेतलेली नाही वा तिचा वास येईला असेही काही केलेले नाही. मग अशा टोकाला जाऊन विरोध करण्याने काय साध्य होते?

पुरोगामी स्वत:विषयीच शंका निर्माण करीत असतात. मोदी त्याचा लाभ उठवित जातात. हेच मागल्या लोकसभेत झाले आणि आता त्याचीच पुनरावृत्ती सुरू झाली आहे.

मागल्या लोकसभेपुर्वी सुशिलकुमार शिंदे वा त्यांच्याआधी चिदंबरम या गृहमंत्र्यांनी हिंदू दहशतवादाची भाषा वापरलेली होती. अर्थात त्यातून त्यांना एकगठ्ठा मुस्लिम मते मिळावी, अशीच अपेक्षा असणार.

पण ती मिळू शकली नाहीत. उलट त्या नादात कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात हिंदू मते गमवावी लागली. मग जी चुक इतकी मोठी किंमत मोजायला लावते, तीच पुन्हा करण्याला शहाणपणा वा रणनिती मानावे काय?

मोदी वा भाजपाला लाभदायक ठरू शकेल, अशा स्वरूपाची भूमिका कोणतेही कारण नसताना कॉग्रेस वा विरोधी पक्ष घेत असतील, तर त्याला मोदींचे नशीब मानावे लागते.

कारण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणारा शत्रू असला, तर किमान नशिबाचा लढवय्याही मोठा विजय मिळवू शकतो. मोदींचे तेच झालेले आहे.

त्यांची कुवत व कष्टाचे फ़ळ जितके मिळाले पाहिजे, त्यापेक्षा प्रतिस्पर्ध्यांच्या मुर्खपणाचा लाभ त्यांना अधिक मिळत राहिलेला आहे. मग त्या गुजरातच्या निवडणूका असोत, किंवा लोकसभेचे मतदान असो.

२००२ साली दंगली नंतर गुजरातची विधानसभा मध्यावधी झाली. ती जिंकल्यावर मोदींची एक सत्कारसभा गोपिनाथ मुंडे यांनी शिवाजीपार्कला योजलेली होती. त्यात बोलताना मोदी काय म्हणाले होते?

“झाला तो विजय माझा नाही, किंवा गुजरातच्या मतदाराला मला विजयी करायचे नव्हते. गुजरातची जनता कॉग्रेसला पराभूत करायला उतावळी झाली होती. पर्याय म्हणून मोदी समोर होता आणि त्याचा मला लाभ मिळाला.”

माणुस इतके स्पष्टपणे आपल्याविषयी सत्य बोलत असताना, त्याचा विचारही ज्यांना करायचा नाही, ते मोदींना पराभूत कसे करणार?

आताही संसद अधिवेशनापुर्वी मोदींनी एक गुगली टाकलेली होती. कुठल्या तरी उर्दू वर्तमानपत्रात राहुल गांधींचे एक वादग्रस्त विधान प्रसिद्ध झाले. कॉग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचे ते विधान होते.

त्याचा पक्षाने व इतर नेत्यांनीही इन्कार केला होता. पण तो धागा पकडून मोदींनी एक मल्लीनाथी केली. कॉग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असायला अजिबात हरकत नाही. पण तो त्यातल्या फ़क्त पुरूषांचा पक्ष आहे, की त्याला मुस्लिम महिलांचीही काही फ़िकीर आहे? असा सवाल मोदींनी केला आणि कॉग्रेस गडबडून गेली.

 

Rediff.com

राहुलच्या त्या विधानाचा विपर्यास झाला, किंवा राहुल तसे बोललेच नाहीत असला खुलासा करण्यात पक्ष गर्क होऊन गेला. पण त्यापैकी कोणाला मोदी त्यातून कोणता संकेत देत आहेत वा कुठली रणनिती सांगत आहेत, त्याचा शोध घेण्या्ची गरज भासलेली नाही.

२०१९ सालात आपण कुठल्या मतदाराला लक्ष्य करीत आहोत, त्याची जाहिर वाच्यता मोदींनी यातून केलेली आहे.

ज्या मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यावर पुरोगामी पक्ष राजकारण खेळतात, त्यातला मोठा हिस्सा आपण फ़ोडलेला आहे, अशीच घोषणा मोदी त्यातून करीत असतात. कॉग्रेस हा मुस्लिम पुरूषांचा पक्ष म्हणजे मुस्लिम महिलांचाही शत्रू आहे. म्हणून त्या महिलांनी भाजपकडे यावे, असे त्यातले आवाहन आहे.

हिंदू पाकिस्तान वा हिंदू तालिबान व हिंदू दहशतवाद असल्या गर्जना करून मुस्लिम मते कॉग्रेस मिळवू शकली नाही, की पुरोगामी पक्षांना ती व्होटबॅन्क तारू शकलेली नव्हती. आता तीच दिवाळखोरीत गेलेली व्होटबॅन्क मुस्लिम महिलांनीही सोडलेली आहे, इतकाच त्याचा अर्थ आहे.

हिंदू मते तुमच्या मुर्खपणाने आपल्याला मिळणारच आहेत. पण आपण मुस्लिम महिला व अन्य मुस्लिम पंथांच्या मतदाराना गोळा करीत आहोत, असा संकेत मोदींनी त्यातून दिला आहे.

आपले लक्ष्य केवळ हिंदू मतांचे नसून मुस्लिम धर्मांध नेते व धर्ममार्तंडांना कंटाळलेले मुस्लिमही आपल्या व्होटबॅन्केत आपण सामावून घेत असल्याचा तो सिग्नल आहे. तर त्याला कसे सामोरे जावे, याचा विचार कॉग्रेसने करायला हवा.

तर शशी थरूर वा त्यांच्यासारखे कॉग्रेस नेते आणखी तटस्थ हिंदूंना भाजपाच्या गोटात ढकलण्याचे कष्ट उपसू लागलेले आहेत, मग याला काय म्हणायचे?

मराठीत उक्ती आहे. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’. मोदींची अवस्था तशीच नाही काय? ते आपल्या परीने व पक्षाला कामाला जुंपून अधिकाधिक मते मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर राहुल व त्यांचे बगलबच्चे त्यांच्या गोटातल्या हिंदूंनाही भाजपाच्या तंबूत पाठवायला उतावळे झालेले आहेत. याला नशिब नाही तर दुसरे काय म्हणता येईल?

मागल्या वेळी एका समारंभात मुस्लिम टोपी स्विकारण्यास नकार देऊन मोदींनी दुखावलेल्या हिंदूंची सहानुभूती मिळवली होती. आज त्यांना तशा हिंदूमतांची कुमक पुरवण्याचे काम कॉग्रेसच्या नव्या नेत्यांनी हाती घेतले आहे.

उत्तरप्रदेशात अशा व्होटबॅन्केचा सफ़ाया होऊन अखिलेश मायावती काही शिकले नाहीत. बंगालमध्ये ममता काही शिकायला राजी नाहीत. चंद्राबाबू आत्महत्येला निघाले आहेत. यापेक्षा विद्यमान पंतप्रधानाचे नशिब काय असू शकते? त्यात अविश्वास प्रस्तावा़चे नाटक म्हणजे सोनेपे सुहागाच म्हणायचे ना?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

One thought on ““मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर

  • August 8, 2018 at 2:53 pm
    Permalink

    श्री भाऊ आपले विश्लेषण खरोखरच ‘विश्लेषण’ असते नाही तर आज काल लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स ही वर्तमान पत्र लहान मुलाची ‘शी’ उचलन्या साठि सुधा लायकैची नाहीत .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?