' मा. फडणविसांच्या कचखाऊ राजकारणापायी त्यांच्याकडून असलेल्या आशा मावळू लागल्या आहेत! – InMarathi

मा. फडणविसांच्या कचखाऊ राजकारणापायी त्यांच्याकडून असलेल्या आशा मावळू लागल्या आहेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

फडणवीसांनी पांडुरंग दर्शनास जाता नं येण्याची बातमी वाचल्या वाचल्या मला त्यांच्या “वेगळा विदर्भ” प्रश्नावर दिलेल्या उत्तराची आठवण झाली.

“राज्य छोटे असावेत, ही भाजपची जुनी भूमिका आहे. पण लक्षात घ्या, विदर्भ वेगळा करणार म्हणजे नेमकं काय करणार हे नीट ठरवायला हवं. ते “वेगळं राज्य” झालं तरी लोक दुरावायला नकोत. शेवटी विदर्भातला शेतकरीसुद्धा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकवतोच…”

ह्याच विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकवता आलं नाही फडणवीसांना.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताच्या पूजेला जाता येणार नाही असं सांगावं लागतंय, ह्याच्या इतकी असहायता कोणती?

 

Maratha Karnti Morcha
afternoonvoice.com

देवेंद्र फडणवीसांबद्दल गोंधळात पडायला होतंय. त्यांच्यावर रागवावं की सहानुभूती बाळगावी कळत नाही. एक मात्र नक्की, त्यांच्यातल्या “राजकारणी” बद्दल कौतुक वाटतं. पण राजकीय खेळीच्या “रिसीव्हिंग एन्ड” ला असलेला एक असहाय, हतबल नागरिक म्हणून आमच्या अपेक्षा पूर्ण करू नं शकणाऱ्या मुख्यमंत्र्याबद्दल राग किंवा सहानुभूतीच वाटू शकते.

गेल्या तीन वर्षांत फडणवीसांवर एकामागे एक राजकीय हल्ले झालेत.

आणि बहुतेक सर्वच हल्ल्यांना त्यांनी एका कुशल राजकारण्याला शोभेल असाच प्रतिकार केलाय. एकनाथ खडसेंच्या गच्छंतीपासून त्यांच्या राजकीय “कौशल्याची” चुणूक दिसू लागली होती. (तशी ती “युती तुटली” हे घोषीत करणाऱ्या पत्रकार परिषदेतच अनेकांनी जोखली होती.)

पण ह्या राजकीय कुरघोड्यांमध्ये, एक मातब्बर राजकारणी जिंकत असला तरी सामान्य जनतेचं दीर्घकालीन हित बघण्याची जबाबदारी असणारा मुख्यमंत्री मात्र सतत परास्त होतोय की काय असं राहून राहून वाटतंय.

मराठा मोर्चा, शेतकरी मोर्चा, कोरेगाव भीमा…

ह्या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण कमालीचं गढूळ होत चाललं आहे. जातीय/सामाजिक पॅचेस अधिकच घट्ट, खोल होत आहेत. ह्या सर्व मोर्चा-चळवळ-दंगली विरोधकांनी राजकीय हेतूंनीच चालवल्या आहेत आणि आमचे मुख्यमंत्री फक्त “फडणवीस” आहेत म्हणून हे केलं जातंय, असं नेहेमी म्हटलं/भासवलं जातं. ते खरं असेलही.

 

maratha-morcha-inmarathi
freepress.com

म्हणून काय झालं?

विरोधक क्षुद्र राजकारण करताहेत, म्हणून काय झालं? तुम्ही त्यावर बहुतेकवेळा नरो वा कुंजरो वा भूमिका का घेता? ह्या सर्वच्या सर्व घटना व त्यांच्या पर्यवसानांची पूर्व कल्पना उभ्या महाराष्ट्राला येत होती, ती तुम्हाला येऊ नये का?

गृहमंत्री म्हणून इंटेलिजन्स तुमच्याच हाताशी असताना समाज कंटक काय काय करू पहाताहेत हे तुम्हाला आधीच का कळू नये? लोकल-बस-रिक्षात बसलेला आमचा शेजारी whatsapp वर जे व्हिडीओ बघतोय त्यावरूनच आम्हाला कळतं की पुढील काही दिवसांत काहीतरी भयंकर घडणार आहे. तुम्हाला हे का कळू नये?

साधा तर्क हे सांगतो की तुम्हाला सगळं काही ठाऊक असतं. पण तुम्ही घटना घडण्याआधीपासूनच नरो वा कुंजरो वा भूमिका घेण्याचा निर्णय घेऊन बसलेले असता.

कोरेगाव भीमा दंगल घडल्यानंतर तुम्हाला कठोर कार्यवाही का करता आली नाही हा फार नंतरचा प्रश्न आहे. तुम्ही कोरेगाव भीमा दंगल घडूच कशी दिली हा सर्वात पहिला प्रश्न आहे. तुमच्यातील कुशल राजकीय मातब्बर विनाशाय च दुष्कृताम का करू धजावत नाही?

तुमच्यावर हेत्वारोप होतील म्हणून समाजाचं नुकसान होऊ देताय का? हा विचार मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वीच करायला नको होता का?

तुमच्यापर्यंत इंटेलिजन्स पोहोचतच नाहीये, हे पटत नाही. (जर ते खरं असेल, तर मग तर परिस्थिती अजूनच भयावह आहे.) इंटेलिजन्स पोहोचूनही तुम्ही कृती करत नाही आहात, संभाव्य अप्रिय परिस्थितीला गर्भातच संपवत नाही आहात हे खरंच अनाकलनीय आहे. तुमच्या राजकीय कौशल्याचा उपयोग जनतेला होत नसेल तर मग तुमचा उपयोगच काय?

 

devendra-fadanvis-inmarathi
abpmaza.com

कालची आत्महत्या फडणवीसांना नक्कीच टाळता आली असती. हे अख्खं प्रकरण टाळता आलं असतं. दुर्दैवाने तसं होत नाहीये, त्याचं वाईट वाटतंय.

जात पाहून मुद्दाम टार्गेट होत आहेत म्हणून फक्त सहानुभूती बाळगू शकतो. क्लीनचिट नाही देऊ शकत. कारण तुमच्याकडून अपेक्षा फार वेगळी, फार मोठी होती.

फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा एक जुना प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला होता. आमच्या एक नागपूरच्या परिचित कुटुंबाने फार पूर्वी सांगितलेली घटना.

ह्या कुटुंबाची जमीन कोणातरी गुंडाने हडपली होती. सोडतच नव्हता. कोर्ट कचेरी करायची ह्यांची मानसिकता नाही, हिम्मत नाही, तेवढी ऐपत ही नाही. भीत भीत, दूर दूरची ओळख काढून फडणवीसांकडे गेले. त्यांना सगळी कथा सांगितली. फडणवीसांनी शांतपणे ऐकून घेतलं. “पुढच्या आठवड्यात या” एवढंच म्हणाले.

ह्या कुटुंबाला तशीही फारशी आशा नव्हती. त्यामुळे हा थंडपणा दुखावून गेला, तरी धक्का वगैरे काही बसला नाही.

सात दिवसांनी “जाऊन तर बघू” म्हणून गेले, तर त्याच थंडपणे फडणवीस म्हणाले,

“तुमची जमीन मोकळी झाली आहे. करा त्यावर काय करायचं ते.”

हे लोक चाटच पडले.

थोडी हिम्मत करून म्हणाले,

“तुमचं काय… … …?”

“काय? तुमची जमीन आहे ना? मोकळी झाली आहे… माझं काय?”

आपण आजकाल फेसबुक whatsapp वर ह्या अश्या कथा नेहेमी वाचतो. त्यात तथ्यांश किती असतो हे आपल्याला माहितीच आहे. पण हा माझ्या समोर, माझ्या परिचिताने सांगितलेला स्वतःचा अनुभव होता. त्यामुळे फडणवीसांना टीव्हीवर बघताना खूप सकारत्मक, आशावादी भाव असायचा मनात.

 

devendra-fadnavis_inmarathi
indiatoday.com

गेल्या तीन चार वर्षात हाच प्रसंग आठवून त्यांच्याबद्दल आशा कायम ठेवून होतो.

पण गेल्या काही दिवसांत जे घडतंय ते पाहून आता, राग किंवा सहानुभूती, एवढंच वाटू शकतं असं वाटतंय.

आशा मावळू लागलीय.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?