निळावंती : पशु पक्ष्यांना “ताब्यात” ठेवण्याची तांत्रिक शक्ती देणाऱ्या ग्रंथाचं अगम्य गूढ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात तंत्र विद्या नावाचा एक सेगमेंट आहे. ह्या तंत्रविद्या एक तर मुख्य प्रवाहात जीवन जगणाऱ्या लोकांपासून कोसो दूर असतात. गुप्त असतात. आणि या नवीन जमान्यात ना त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवतं ना त्या कुणाला माहीत पडतात. याचा अर्थ असा नाही की या विद्या मिळवणारे लोक संपलेत.

प्राचीन काळापासून अनेक गुप्त विद्या किंवा तंत्र विद्या जगाच्या पाठीवर चालत आलेल्या आहेत.

आफ्रिकेतील व्हुडू जामातीच्या काळ्या जादूच्या गोष्टी असतील किंवा दक्षिण भारतातील स्मशान साधना करणाऱ्या योग्यांच्या गोष्टी असतील मानवी समाजापासून लांब एकांतात कुणी ना कुणी गूढ जंगलात काळोखगर्भात अशा गुप्तविद्यांची साधना करत असतात.

ज्यांनी ज्यांनी अशा साधना केल्या त्यांनी त्याबाबत ग्रंथ देखील लिहून ठेवले आहेत. काळाच्या ओघात हे ग्रंथ देखील आता नष्ट झालेत किंवा गुप्त ठिकाणी फक्त विशिष्ट संप्रदायातील लोकांच्या हाताला येतील असे ठेवलेले आहेत.

या ग्रंथात पृथ्वी, आप, तेज, वायु, अग्नी या पंचमहाभूतांवर विजय मिळवण्यासाठी आणि सृष्टीतील चित्र विचित्र गूढ गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी गुप्त साधना सांगितलेल्या असतात.

अशा ग्रंथांपैकी कुप्रसिद्ध आणि गूढ असा ग्रंथ म्हणजे निळावंती.

 

nilavanti-inmarathi
amazon.in

हा ग्रंथ आता पाहायला मिळत नाही. भारत सरकारनी याच्या छपाईवर बंदी आणली आहे आणि ही बंदी स्वातंत्र्यापूर्व काळात आणली गेली आहे.

त्यामुळे हा ग्रंथ आता कुठेही मिळत नाही आणि जे लोक हा ग्रंथ त्यांच्याकडे असल्याचा दावा करतात त्यात फारसे तथ्य नसते.

या ग्रंथावर बंदी आणण्याचे मुख्य कारण होते जी कोणी माणसे या ग्रंथाच्या संपर्कात येत असत त्यांचे रहस्यमयरित्या मृत्यू होत असत.

याचे कारण निळावंती या ग्रंथाचा मुख्य विषयच आहे पशु पक्ष्यांची गूढ भाषा समजावून घेणे आणि त्यांच्याकडून जमिनीवर अथवा जमिनीखाली असलेल्या धनाच्या साठ्यांचा शोध घेणे. जे पशु पक्षी असतात त्यांना गुप्तधनाचे साठे कुठे असतील ते ठावूक असते.

जर त्यांची भाषा शिकून त्यांना वश करून घेतलं तर त्यांच्याकडून अशा धनाच्या साठ्याचा तपास लागू शकतो हा निळावंती ग्रंथाचा मुख्य आशय आहे.

 

nilavanti-inmarathi01
vtvgujarati.com

या ग्रंथाची ग्रंथकर्ती म्हणजेच लेखिका आहे निळावंती. आता ही निळावंती सुद्धा तिच्या पुस्तका प्रमाणेच गूढ आहे. तिच्या बद्दल कसलीही विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. ती जिवंत आहे फक्त लोकशाहीरांनी सांगितलेल्या लोककथांच्या माध्यमातून.

पिढ्यानपिढ्या ज्या लोककथा तिच्याबद्दल सांगितल्या जातात त्यानुसार निळावंती ही एका धनिकाची कन्या होती.

तिला अशी पशु पक्ष्यांची भाषा कळायची. तिच्याच कथांचे आख्यान म्हणजे निळावंती. ती कुडमुडे ज्योतिषी, हस्तसामुद्रिक बघणारे ज्योतिषी पिंगळे यांनी लोककथेच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे. ही कथापोथी ज्यांनी वाचली त्यांना विद्या अवगत होते, पण त्यासाठी बरंच काही गमवावं लागतं.


ही निळावंतीची कथा एका बैठकीत पूर्णपणे ऐकू नये आणि सांगणा-यानेही संपूर्ण सांगू नये असंही म्हणतात.

हा ग्रंथ वाचणारा पूर्ण वेडा तरी होतो किंवा ६ महिन्यात मृत्यू पावतो असे प्रवाद आहेत.

 

nilavanti-inmarathi02
akck.in

मारूती चितमपल्ली यांनी याच नावाचा एक लेखसंग्रह लिहिला आहे. उत्तम कांबळे यांनी देखील यावर एक लेख लिहिला होता. जुन्या लेखकांचा धांडोळा घ्यायचा म्हटलं तर शाहिरीमध्ये सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या हैबतीबाबा पुसे यांनी १८ व्या शतकात निळावंतीवर त्यांची शाहिरी लिहिली आहे.

निळावंती वर त्यांचे अनेक आख्यान आहेत. श्रेष्ठ पतिव्रता म्हणून तिचा या आख्यानात उल्लेख येतो. हे शाहीर आख्यान निळावंतीच्या अनेक कथा सांगते.

उदा. एकदा सासऱ्याबरोबर निळावंती माहेरी जात असता तिला मुंगसाची जोडी दिसते. त्यातील मुंगशिण निळावंती बरोबर संवाद साधते. मुंगुसाची बायको तिला आपला नवरा आंधळा असल्याचे सांगते. त्यावर निळावंती मण्याचा लाल तुकडा लावून मुंगुसाला डोळे देते.

कधी कधी या आख्यानात तिला पिंगळा भेटतो. तो तिला डोक्यावरील मणी असलेल्या सापाची गोष्ट सांगतो.

 

nilawanti story inmarathi

 

मग पिंगळा आणि मुंगसांचा फौजफाटा घेऊन निळावंती तो मणी शोधायला जाते. तिला तो साप दिसतो जो डोक्यावरच्या मण्याच्या उजेडात भक्ष्य शोधत असतो. मुंगुसाच्या मदतीने सापाला घाबरवून मणी उचलला जातो.

त्यानंतर पुन्हा दुसऱ्या खजिन्याच्या शोधात निळावंतीवरील आख्यायिका सुरु राहते. पिढी दर पिढी सुरु राहते.

निळावंती साठी अनेक पशु पक्ष्यांची फौज काम करायची तिला कुठले कुठले धनसाठे सांगायची.

या निळावंतीचे बापाने लग्न करून दिले होते. लग्नानंतर एके दिवशी अचानक मध्यरात्री तिच्या कानावर कोल्हेकुई ऐकू आली. तिने लक्ष देवून ऐकले तेव्हा लक्षात आले की –

कोल्हे तिला हाक मारून सांगत होते की, नदीतून एक प्रेत वाहत येतं आहे. त्याच्या कमरेला दोन लाल चिंध्या किंवा दोऱ्याच्या गाठी आहेत त्यात अमुल्य मणी बांधलेले आहेत.

ते ऐकून ती मध्यरात्री घर सोडून नदीच्या दिशेनं गेली. तिला कोल्ह्याने सांगितल्याप्रमाणे प्रेत दिसले. त्याच्या कमरेला गाठी दिसल्या, तिनं हातानं त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पण शक्य झालं नाही तेव्हा तिने त्या दाताने कुरतडण्याचा प्रयत्न केला.

तिच्या पाठोपाठ ही मध्यरात्री उठून कुठे गेली हे शोधायला आलेल्या नवऱ्याला हा प्रकार दिसला. त्याला वाटले ती प्रेत खातेय. नवऱ्यानं हे स्वतः पाहिल्याने त्याने तिला घराच्या बाहेर काढले.

बस! यानंतर ती कुठे गेली तिने काय केले याबद्दल ची माहिती उपलब्ध नाही.

या निळावंतीला कावळा, चिमणी, टिटवी, पाल, घुबड, कोकिळा, बगळा आदी सर्वांच्या भाषा अवगत होत्या. ती त्यांच्याशी संवाद करायची.

प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत यांनी हा ग्रंथ मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.

 

nilavanti-inmarathi03
insearchofsupernaturalgod.wordpress.com

आजही निळावंती बाबत कुठेही पुराव्यासह माहिती उपलब्ध नाही. ही पोथी मोडी संस्कृत आणि मोडी लिपीमध्ये ताम्र पानावर लिहिली आहे.

असे म्हणतात की या पुस्तकातील मंत्राची शक्ती अशी आहे कि जगभरातील अथवा जगात नसणारी व फक्त कल्पनेत अथवा स्वप्नात दिसणारी कोणतीही गोष्ट तुमच्याशी संपर्क करू शकते.

यात अनेक श्लोक आणि मंत्र आहेत. मुंगीपासून सुरुवात होते. मुंगीची भाषा कशी शिकायची इथून सुरुवात झाल्यावर टप्प्या टप्प्याने पुढील प्राण्यांची भाषा कशी शिकता येते त्यासाठी कुठले मंत्र आणि साधना करावी लागते याची माहिती यात आहे.

परंतु याबाबत सत्य काय असत्य काय याचा उलगडा आजपर्यंत होवू शकलेला नाही. लोककथांचं आणि आख्यायिकांचं गूढ जाळं आजही निळावंती भोवती कायम आहे.

ते जाळे उलगडून खरी निळावंती आपल्या हाती लागणे मुश्कील आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “निळावंती : पशु पक्ष्यांना “ताब्यात” ठेवण्याची तांत्रिक शक्ती देणाऱ्या ग्रंथाचं अगम्य गूढ

  • September 11, 2019 at 10:25 pm
    Permalink

    Nice Information

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?