' काँग्रेसमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व अपरिहार्य असण्याचं कुणीच नं सांगितलेलं खरं कारण – InMarathi

काँग्रेसमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व अपरिहार्य असण्याचं कुणीच नं सांगितलेलं खरं कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : शैलेंद्र कवाडे

===

तर राहुल गांधीनी प्रचंड प्रयत्न करूनही आज त्यांची अवस्था गोल खाचेतल्या चौकोनी तुकड्यासारखीच आहे. ते जिथे जायला बघातायेत, तिथे पोहचणे त्यांना जमत नाहीये. खरंतर, राहुल गांधी यांचा स्वभाव किंवा घडण, राजकारणासाठी नाहीच हे पुरेसं स्पष्ट झालयं,

हे सगळं सगळ्यांना कळतंय पण तरीही काँग्रेसमधून कोणताही पर्याय पुढे येत नाहीये, बरीच लोकं याला एकतर काँग्रेसच्या नेत्यांची वैचारिक गुलामगिरी समजतात किंवा त्यांचे गांधी परिवारावरचे प्रेम समजतात. हे दोन्ही समज जरासे भाबडेपणाचे आहेत.

राहुल गांधी नावाची अपरिहार्यता समजून घेण्यासाठी आधी सध्याचा किंवा मागच्या ३०-४० वर्षातील काँग्रेस पक्ष समजून घ्यायला लागेल.

काँग्रेस ही एक राजकीय व्यवस्था आहे, ज्यात विविध नेते आपापली संस्थाने सांभाळत असतात(काँग्रेसमध्ये कार्यकर्ते नाहीयेत, जे असतात ते नेत्यांचे कार्यकर्ते असतात). शक्यतो या संस्थानात इतर कुणाचाही हस्तक्षेप त्या नेत्यांना सहन होतं नाही. हाय कमांड वगैरे फक्त राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय कामं करून देण्यासाठी आणि या जहागिरदारांमधील परस्परसंबंध coordinate करण्यासाठी असतात.

 

congress-plenary-session-inmarathi

ही सिस्टीम जुन्या रोमन साम्राज्यासारखी किंवा जराशी पेशवाईसारखी आहे, ज्यात प्रत्येक जहागीरदार आपापली जहागिरी सांभाळतो आणि नैतृत्व सगळ्या जहागिरदारांना सांभाळते.

हे ही वाचा – आता ‘उरलेल्या’ काँग्रेसचं करायचं काय? वाचा अप्रतिम विश्लेषण

जहागीरदार नैतृत्वाला ताकत देतो आणि नैतृत्व जहागिरदाराला राजमान्यता देते. नैतृत्वावर स्वतःची इमेज सांभाळण्याची, घडवण्याची जबाबदारी असते, जहागिरदारांनी तो लोड घ्यायचा नसतो. एकदा ही जहागीरदार सिस्टीम समजून घेतली की भारतीय राजकारणात घराणेशाही का आहे ते सहज लक्षात येतं.

पंडित नेहरूंच्या अस्तानंतर बांगलादेश फाळणीचा आणि आणीबाणीचा कालखंड सोडल्यास, अगदी इंदिरा गांधींचाही पक्षावर एकछत्री अंमल नव्हताच.

इंदिराजी तिथे होत्या कारण त्या पक्ष उत्कृष्ट मॅनेज करून, सगळ्या नेत्यांची कामं करून द्यायच्या.

थोडक्यात ज्याचा वाटा त्याला दिला जायचा. त्या काळातही ज्यांची महत्वाकांक्षा जास्त असायची ते नेते बंड करायचेच. पण शक्यतो जहागिरी व्यवस्थेत न होणारी ढवळाढवळ आणि सत्तेचा समतोल राखणे एवढ्यावर सगळे खुश असायचे.

 

indira-inmarathi

 

जेंव्हा या जहागीरदारांचे आपपसातले संघर्ष वाढायचे तेंव्हा केंद्रीय नैतृत्व बिनचेहऱ्याच्या नेत्यांना काही काळ पुढे करायचे. बाबासाहेब भोसले यांचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे ही केंद्रीय नैतृत्वाची मनमानी नसून त्यांची अपरिहार्यता होती हे लक्षात घ्यायला हवं.

वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या हे जहागीरदार आपापली संस्थाने सांभाळून होते. आता या जहागीरदार लोकांची अपरिहार्यता समजून घ्या. हे सगळे नेते आपापल्या भागात स्वयंभू आहेत. आपापल्या भागातील सगळ्या संस्था, सगळे कारभार ते सांभाळतात. स्वतः मजबूत होतात.

कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये पक्षाकडून निवडणूक लढवायला निधी मिळायचा नाही, नेते सक्षम असायचे.

पण या नेत्यांची आपापसात भांडण आहेत. आपल्यातल्याच कुणाही एकाला नेता होऊ देणे त्यांना अजिबात मानवणारे नाही. जर एखाद्याने तो प्रयत्न केला तर त्याचा मागे एक गट उभा राहिलंही, पण त्याच्या विरुद्ध तितकाच मोठा गट उभा राहतो.

शरद पवारांना काँग्रेसमध्ये कधीही स्वस्थता लाभली नाही याचं कारण हे आहे. पवारांची महत्त्वाकांक्षा काँग्रेसला पचण्यासारखी नव्हती. त्याहून जास्त फरफट नारायण राणेंची झाली कारण त्यांचा या जहागीरदार सिस्टिमचा अभ्यासच नव्हता. ते उगाच भाईगिरी करायला गेले.

तर या सगळ्या सरंजामी नेत्यांना असा चेहरा हवा असतो जो सर्वमान्य असेल, शक्यतो त्यांच्या राज्यात दखल देणार नाही आणि ज्याला काही एक इमेज असेल, पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे तो त्यांच्यातीलच एक नसेल.

हा नेता त्यांच्यातीलच असल्यास तो सर्वमान्य होणारच नाही. मनमोहन सिंग केवळ सोनियजींचा आशिर्वाद होता म्हणून पंतप्रधान नाही झाले तर या सगळ्या नेत्यांना, आपल्यातीलच कुणाला मोठे होऊ द्यायचे नव्हते म्हणून पंतप्रधान झाले.

किंबहुना, नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष पक्षाने घालवल्यावर सोनिया गांधी परत आल्या त्यामागेही हीच सोय होती. संरजामशाही सुरू राहण्यासाठी बाहेरील व्यक्ती असणे या जहागीरदाराना नेहमीच आवश्यक वाटते. राहुल किंवा प्रियांका यांच्या पलीकडे न पाहणे याच अपरिहार्य व्यवस्थेतून आलंय.

 

rahul-gandhi-marathipizza01

 

पण या दरम्यान एक बदल घडलाय, पूर्वी सामान्य माणसाला माहिती मिळण्याचे स्रोत कमी होते. आता फेसबुकसारखी माध्यम थेट जगाच्या चावडीचे काम करतायेत. हल्ली गावातील अनेक समस्या व्हाट्सअपच्या ग्रुपवर मांडल्या जातात. गावातील राजकारण व्हाट्सअप ग्रुपवर खेळले जाते. ह्या ओव्हरएक्सपोजरमुळे सामान्य प्रजा अति जागृत झालीय.

ह्या माध्यमातून राहुल गांधींचा पप्पू घडणे हा काँग्रेसच्या मुळांवर घाव होता. त्यामुळेच अनेक जहागीरदार हवालदिल होऊन भाजपची वाट चालले.

सध्या काँग्रेसपुढे धर्मसंकट उभे आहे, राहुल गांधी या चेहऱ्याला मत मिळणार नाहीत आणि इतर कुणाला पुढे केल्यास पक्ष एकसंध राहणार नाही. जो पर्यंत यातील एक शक्यता खोटी ठरत नाही तोपर्यंत मोदीजींना भीती नाही.

===

हे ही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदी सुभाषचंद्र बोस यांची निवड गांधीजींच्या जिव्हारी का लागली?

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?