' अटल सरकार केवळ १ मताने का हरलं अविश्वास ठराव? इतिहासाचा असाही एक धांडोळा – InMarathi

अटल सरकार केवळ १ मताने का हरलं अविश्वास ठराव? इतिहासाचा असाही एक धांडोळा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नुकतीच नरेंद्र मोदी सरकार ने No confidence Motion म्हणजेच विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाचा सामना केला. यामध्ये मोदींच्या भारतीय जनता पार्टीने आरामात ३२५ मते कमावून हा अविश्वास प्रस्ताव जिंकला. त्यावेळी भाजप च्या नेत्यांना जुन्या आठवणी येणे साहजिक होते. गेल्या १५ वर्षातील हा लोकसभेतील पहिला अविश्वास प्रस्ताव होता.

या अगोदर दोन वेळा अविश्वास प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातला संस्मरणीय प्रस्ताव जो केवळ १ मताच्या फरकावर हरला किंवा जिंकला गेला होता त्यावेळी देखील सत्ताधारी पक्ष हा भाजप होता आणि विद्यमान पंतप्रधान होते मा. अटलबिहारी वाजपेयी.

१९९९ साली अटलबिहारी वाजपेयी केवळ १ मताने अविश्वास प्रस्ताव हरले होते. त्याची जखम आजही प्रत्येक भाजप नेत्याच्या मनात कुठेतरी सलत असते. काल परवा सभागृहात झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळी भाजपाने आरामात बाजी मारली तेव्हा १९९९ ला केवळ एका मतासाठी त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले होते.

 

atal-bihari-inmarathi
youtube.com

१९९६ चा काळ आठवा. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली ती १३ दिवसांनी पदावरून पायउतार होण्यासाठीच. 

वाजपेयी सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाहीत त्यामुळे केवळ १३ दिवसात त्यांना राजीनामा देवून सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्यावेळी सभागृहात वाजपेयी यांनी १ तासाचे भाषण दिले त्याची आठवण विरोधकांना आहे. वाजपेयी आपल्या मृदू वाणी आणि भाषण शैलीसाठी प्रसिद्ध होते मात्र यावेळी सभागृहातील त्यांचे भाषण आक्रमक झाले.

“कॉंग्रेस भारतीय जनता पक्षाला हटविण्यासाठी अवैध मार्गांचा अवलंब करत आहे. ज्या पक्षाचे एकटे मंत्री आज सभागृहात आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाला पायउतार करण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष म्हणजे पावसावर उगवलेल्या आळंबीसारखा वाढलेला पक्ष नाही आम्ही ४० वर्षापासून तळागाळात कामे करून वर आले आहोत. जरी आम्ही विरोधी बाकावर बसलो तरी राष्ट्र उभारणी मध्ये आमचा सहभाग आम्ही देवू”

त्यांच्या भाषणातील हे शब्द ऐकून त्यावेळी सारे सभागृह स्तब्ध झाले होते.

त्यानंतर देखील १९९८ साली वाजपेयी सरकार सत्तेवर आले परंतु त्यानंतर देखील १३ महिन्यात एप्रिल १९९९ ला त्यांच्या सरकार ला पुन्हा अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला. वाजपेयींचं किंवा फक्त भारतीय जनता पार्टीचे तेव्हा बहुमत नव्हते. मित्र पक्षाला बरोबर घेवून वाजपेयी यांनी (National Democratic Alliance) NDA ची मोट बांधली होती.

 

atali-inmarathi
asianews.press

परंतु सरकार पुन्हा एकदा पाडण्यासाठी सज्ज असलेल्या विरोधी पक्षाने अविश्वास ठराव दाखल केला. १७ एप्रिल १९९९ ला संसदेत अविश्वास ठरावाचे नाट्य चालू झाले. त्यावेळी पक्षाचे तडफदार आणि वाजपेयींच्या विश्वासातले मंत्री प्रमोद महाजन यांनी प्रत्येक मत भाजप च्या पारड्यात कसे पडेल यासाठी बरेच प्रयास केले.

मात्र सभागृहात प्रत्यक्ष खेळ सुरु होण्यापूर्वी जे भाजप च्या बरोबर आहेत असे दाखवत होते त्यांनी आपला रोख बदलला. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आपण विद्यमान सरकारच्या विरोधात आहोत हे जाहीर केले.

त्यानंतर अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या जयललिता यांनी आपण NDA मधून बाहेर पडत आहोत असे जाहीर करून सरकार वर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यावर जोर दिला.

सभागृहात ज्यावेळी मतदान सुरु झाले तेव्हा NDA मधून अण्णा द्रमुक बरोबर इतर मित्र पक्षांनी ही सरकार च्या विरोधात मतदान केले. इतके असूनही जेंव्हा स्क्रीन वर निकाल झळकला ते पाहून अटलबिहारी वाजपेयी स्तब्ध झाले. भाजपच्या बाजूने २६९ मते होती आणि विरोधी बाजूने २७०. केवळ एका मताने भाजप अविश्वास प्रस्ताव हरला.

 

vajpayee-inmarathi
youtube.com

विरोधी कॉंग्रेस मध्ये आनंदी वातावरण पसरले. आणि भाजप च्या कार्यालयात शोककळा पसरली.

प्रमोद महाजन यांना अनेकांनी या पराभवासाठी जबाबदार धरले. काही नेत्यांनी यावर अण्णा द्रमुक च्या दयेवर चालणारे सरकार आज ना उद्या पडणारच होते अशी प्रतिक्रिया दिली.

जेव्हा भाजप चे सारे दिग्गज नेते प्रधानमंत्री कार्यालयात जमले तेव्हा राजस्थान च्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या आई विजयाराजे सिंदिया यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी त्यांचे सांत्वन अटलबिहारी वाजपेयी यांनी केले. हे चित्र प्रत्येक भाजप नेत्याच्या कायम लक्षात राहील.

त्यानंतर सोनिया गांधी यांनाही बहुमत प्रस्थापित करण्यात अपयश आल्याने १९९९ ला पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या त्यात भाजप ५४३ पैकी ३०३ सीट जिंकून बहुमताने सत्तेवर आले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?