' राहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा

राहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव तेलगु देसमने आणला असला तरी विरोधी पक्षांच्या भाषणांमध्ये चर्चा फक्त आणि फक्त राहुल गांधींच्या भाषणाची झाली. नाही म्हणायला, तेलगु देसमचे खासदार असलेल्या जयदेव गल्ला यांच्या अमेरिकन इंग्रजीतील मुद्देसूद भाषणाचे कौतुक झाले, हे मान्य करायला हवे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४४ जागा मिळवलेला (सध्या ४८) कॉंग्रेससाठी या ठरावावर झालेल्या चर्चेत दोन हेतू साध्य करायचे होते.

पहिला – जर मोदींना हरवायला विरोधी पक्षांची आघाडी उभारायची असेल तर त्याचे नेतृत्त्व केवळ कॉंग्रेस करू शकतो हे दाखवून देणे.

दुसरा – विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्त्वही कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधींकडे असेल.

विरोधी पक्षांच्या एकत्रित बैठकीत या मागण्या मान्य करवून घ्यायची कॉंग्रेसची सोय नाही कारण तिथे कॉंग्रेसला ममता, मायावती, अखिलेश इ. प्रादेशिक नेत्यांकडून आव्हान मिळू शकतं.

 

nationaljanmat.com

या सर्व पक्षांचे सर्वोच्च नेते लोकसभेत नसल्यामुळे, तसेच त्यांच्या प्रादेशिक किंवा जातीय ओळखीच्या काही मर्यादा असल्यामुळे लोकसभेतील चर्चेचा फायदा घेऊन राहुल गांधींचे नेतृत्त्व विरोधकांच्या आघाडीवर थोपवायचे असा कॉंग्रेसचा डाव असावा.

लोकसभेतील चर्चेत पक्षाला सदस्य संख्येनुसार बोलायला वेळ मिळत असल्याने भाजपाला आपल्या सहापट जास्त वेळ आहे तसेच त्यांच्याकडे नरेंद्र मोदी या हुकुमाच्या एक्क्यासह अनेक चांगले वक्ते आहेत हे कॉंग्रेसच्या चाणक्यांना माहिती होते.

त्यामुळे तुल्यबळ नसलेल्या या कुस्तीत भाजपाला काहीतरी क्लृप्ती करून हरवायचे, एवढेच कॉंग्रेसच्या हातात होते.

राहुल गांधींच्या एक वक्ता म्हणून मर्यादा माहिती असल्यामुळे मोदींशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांना संसदीय चर्चेच्या… व्यक्तिगत आरोप न करणं, पुराव्याशिवाय न बोलणं, परराष्ट्र संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतील अशा गोष्टी टाळणं इ. मर्यादा सोडून बोलायला सांगण्यात आलं असावं.

यावर्षीच्या सुरूवातीला कॉंग्रेस आणि डोनाल्ड ट्रंप तसेच ब्रेक्झिटच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका यांच्यातील संबंध उघड झाले होते.

काल ज्या प्रकारे राहुल गांधी बोलले त्यावरील केंब्रिज अ‍ॅनालिटिका मॉडेलचा प्रभाव लगेच दिसून येतो.

केंब्रिज अ‍ॅनालिटिकाच्या कार्यपद्धतीची काही प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. पहिले म्हणजे निवडणुकीचे संदेश योग्य माणसांपर्यंत, योग्य वेळी पोहचवणे.

दुसरे म्हणजे कुंपणावर बसलेले मतदार ओळखणे, त्यांच्या मनात खोलवर दडलेली भीती किंवा काळजी जागृत करून त्या भीतीपोटी त्यांना मतदानाला प्रवृत्त करणे.

तिसरे – पुराव्यांवर आधारित तसेच सर्वांना साद घालेल अशा प्रचाराला सोडचिठ्ठी देत ज्यांच्या मनात ज्या प्रकारची भीती असेल, त्यांच्यापर्यंत त्या त्या विषयावरील संदेश तुकड्या तुकड्यात पोहचवून त्यांचे अनपेक्षित मतपरिवर्तन घडवून आणणे.

 

Cambridge analytica.Inmarathi5
radionz.co.nz

या पद्धतीचा फायदा डोनाल्ड ट्रंपसारख्या नवख्या, कुठलाही राजकीय अनुभव तसेच संघटनात्मक ताकद नसलेल्या उमेदवाराला झाला.

कालचे राहुल गांधींचे भाषण तपासले तर त्यात डोनाल्ड ट्रंपच्या भाषणांतील अनेक खाणाखुणा दिसतात. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे – उदा. संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी सरकारचे असलेले साटेलोटे, महिला सुरक्षा, शेतकरी कर्ज आणि पिकांचे हमीभाव… यात खोटेपणा आणि नाट्यमयता… ठासून भरली होती.

एक मोठा फरक म्हणजे, कॉंग्रेस राजकीय पटावर डावीकडे असल्यामुळे राहुल गांधींनी आपले भाषण आपणच खरे हिंदू आहोत आणि कॉंग्रेसची संकल्पना हीच खरी भारताची संकल्पना आहे अशा नोटवर संपवले.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ्फोटो आणि मथळा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बळेच मिठी मारण्याचे नाटक रचले गेले.

संसदेच्या आत हे घडत असताना, संसदेबाहेर कॉंग्रेसबद्दल हळवे असणारे पत्रकार, विचारवंत आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी लढाईच्या दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होती.

हे भाषण चालू असताना कोणाला त्यात क्षेपणास्त्रं दिसली तर कोणाला मुलुखमैदान तोफ, कोणाला राहुल गांधींची सच्चाई दिसली तर कोणाला भारताच्या संकल्पनेचा विजय.

कालच्या चर्चेला मोदी वि. राहुल गांधी अशी कलाटणी देण्यात कॉंग्रेस यशस्वी ठरला खरा… पण राहुल गांधींच्या अतिउत्साहामुळे त्यात माशी शिंकली.

नरेंद्र मोदींच्या जवळ जाऊन त्यांनी मोदींना उठा उठाचा जो धोशा लावला, तो सर्वसामान्य लोकांना दिसला.

 

rahul-wink-inmarathi
inkhabar.com

जेव्हा मोदींनी त्याला थंड प्रतिसाद दिला, तेव्हा बळजबरी त्यांच्या गळ्यात पडून राहुल गांधींनी स्वतःचे हसे करून घेतले. एवढेच नाही तर नंतर त्यांना आपल्या सहकाऱ्याला डोळा मारताना कॅमेराने टिपल्याने हे सगळे पूर्वनियोजित होते हे लोकांना कळून चुकले.

या चर्चेत फ्रान्सच्या अध्यक्षांना अकारण ओवणे राहुल गांधींना भारी पडले.

हा भारत-फ्रान्स संबंधांचा विषय असल्यामुळे फ्रान्सला याबाबत निवेदन जारी करावे लागले आणि त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या हातात आयतेच कोलीत सापडले.

याशिवाय मोदी भाषण करत असताना राहुल गांधी आपला चेहरा गंभीर ठेवू शकले नाहीत. मोदींच्या वक्तव्यांचा त्यांच्यावर होणारा प्रभाव ते चेहऱ्याचे विक्षेप आणि पुटपुटण्यातून प्रकट करत होते. त्यातच ते उघडे पडले.

महाभारताच्या युद्धात द्रोणाचार्यांनी जेव्हा युधिष्ठिरांना पकडण्यासाठी चक्रव्युव्ह रचले तेव्हा ते कसे फोडायचे हे ठाऊक असलेल्या अर्जुनाला रणांगणातून दूर नेण्यासाठी त्रिगर्त राजा सुशर्माकडे ही जबाबदारी देण्यात आली.

त्याने अर्जुनाला ललकारुन, त्याने स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन ही भूमिका बजावली. ्वीर अभिमन्यूमुळे द्रोणाचार्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. इथे राहुल यांच्याकडे लोकसभेतील रथी-महारथींना टाळून आपल्याला लक्ष्य करण्यास मोदींना ्प्रवृत्त करण्याची जबाबदारी होती. त्यात ते यशस्वी झाले.

 

Rediff.com

मोदींच्या भाषणातील सर्वात जास्त वेळ राहुल यांना लक्ष्य करण्यात गेला. पण सहज टाळण्यासारख्या आपल्या दोन तीन चुकांनी त्यांनी कॉंग्रेसची पिटाई आणि स्वतःचे हसे करुन घेतले.

कालच्या मतदानात राष्ट्रवादी वगळता ज्या विरोधी पक्षांनी अविश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिला ते तेलगु देसम, सीपीएम, तृणमूल आणि आप…कॉंग्रेससोबत लढणार नाहीत आणि लढले तर कॉंग्रेसला त्या त्या राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा सोडतील.

जे पक्ष कॉंग्रेससोबत येऊ शकतात, ते कालच्या मतदानात तटस्थ राहिले किंवा भाजपाच्या सोबत गेले.

काल नरेंद्र मोदींच्या भाषणाने भाजपाला नवीन हुरूप आला असला तरी आपण कॉंग्रेसने लावलेल्या जाळ्यात सापडता सापडता वाचलो हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

येत्या लोकसभा निवडणूक प्रचारात केंब्रिज अ‍ॅनालिटिकाच्या मॉडेलवर आधारलेल्या प्रचारात राहुल आपली ट्रंपगिरी अशीच चालू ठेवतात का याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?