पाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आयुष्य जगायला काय लागतं? प्रेम करणारे आई-बाप, राहायला आरामदायक घर, दोन वेळचं जेवण, रात्रीची उबदार झोप आणि मनसोक्तपणे सोशल मीडिया अनुभवण्यासाठी अनलिमिटेड नेट पॅक. हे सुख बहुतांशी आपल्या सगळ्यांकडे असतं.

आपण जगतो, जगताना बऱ्याच अशा गोष्टी दिसतात ज्या आपल्याकडे नसतात. मग जगता जगता स्वत:ला आणि आयुष्याला कोसण्याचा प्रकार सुरु होतो.

 

angry-face-inmarathi
lovetoknow.com

नोकरी नाही, पैसा नाही, अजून चांगलं घर नाही, महागडे मोबाईल्स नाहीत. अशामध्ये वडीलधाऱ्या माणसांनी आपल्यापेक्षा हलाखीत जीवन जगणाऱ्या माणसांचे उदाहरण दिले तर ती उदाहरणे आणि उदाहरणे सांगणारे लोक दोन्ही डोक्यात जातात.

कारण आपल्यासाठी आयुष्य म्हणजे सरळ २+२= ४ असा खेळ असतो.

आत्तापर्यंत सगळ्या वस्तू विनासायास किंवा थोडेफार कष्ट करून मिळालेल्या असतात त्यामुळे आपल्या म्हणण्याप्रमाणेच पुढचं आयुष्य सुद्धा जगता आलं पाहिजे असा आपला हेका असतो.

याच्या उलट ज्या लोकांकडे ना घर असते, ना आई- वडील, ना कसला पैसा, ना दोन वेळचं अन्न, ना कसली करमणूक. ही अशी लोक मग कशावर जगतात?

याचं उत्तर देता येईल –

असे लोक स्वत:च्या आत पेटलेल्या ध्येयाच्या ज्वालेवर जगतात.

भूक असो, तहान असो, शारीरिक वेदना असो नाहीतर तुटलेली नाती असोत आत मध्ये जी Burning desire पेटलेली असते, ती घर-दार, पैसा, अन्न अशा सगळ्या गोष्टींची भूक पचवते.

Legends कधी जन्माला येत नाहीत. फार फार तर तोंडात चांदीचा चमचा घेवून एखादा संजू- बिंजू जन्म घेतो ज्याच्या संपूर्ण आयुष्याचा ठेका बापाने आपल्या थकलेल्या शिरावर घेतलेला असतो. Legend तर घडवला जातो. ठोकून- ठाकून, परिस्थतीचे फटके खावून. आणि जेव्हा असा legend घडतो तेव्हा लोक त्याला “यशस्वी जयस्वाल” म्हणून ओळखतात.

 

yashasvi jaiswal inmarathi

 

मुंबई क्रिकेट ची पंढरी आहे. सुनील गावसकर असो, सचिन तेंडूलकर असो, अजित आगरकर असो मुंबई ने भारताला अनेक चमकदार खेळाडू दिले ज्यांनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलंय. मुंबई चा हा नावलौकिक स्वत:च्या शिरावर घेवून खेळण्यासाठी आता सज्ज होतोय “यशस्वी जयस्वाल” हा १७ वर्षाचा खेळाडू.

हा मुलगा सध्या मुंबई साठी १९ वर्षाखालील टीम मध्ये खेळतो. त्याच्या प्रशिक्षकाला त्याच्यात ती चमक, तो जसबा दिसतो जो हर एका सामान्य व्यक्तीला असामान्य बनवू शकतो.

यशस्वी ने गेल्या ५ वर्षात आत्तापर्यंत ४९ शतके लगावली आहेत. गोलंदाजाच्या मनाचा अंदाज घेवून त्याला फटकावणारा पहिल्या फळीतला अव्वल दर्जाचा फलंदाज असा लौकिक त्याने कमावलाय. त्याच्याकडून सगळ्यांनाच फार मोठ्या अपेक्षा आहेत.

पण याच यशस्वी चा संघर्ष जर ऐकला तर ऐकणाऱ्याचे डोळे पाणावल्या शिवाय राहत नाहीत.

उत्तरप्रदेशातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या, आपल्या वडिलांचं तिसरं अपत्य असलेल्या, यशस्वी ने क्रिकेट साठी ११ व्या वर्षी घर सोडलं. त्याला वडिलांनी कसलाही आक्षेप घ्यायचं कारण नव्हतं. कारण खाणारं एक तोंड तसंही कमी झालं तर बरच होतं त्यांना.

 

jaiswal-inmarathi
hindustatimes.com

यशस्वी मुंबईत आपल्या काकांकडे राहायला आला, पण चाळीच्या १० बाय १० च्या घरात आधीच ७ माणसे दाटीवाटीने समावून घेणाऱ्या त्या खोलीत यशस्वी ला जागा नव्हती. यशस्वीचा काका तेव्हा मुंबई च्या आझाद मैदानावर असलेल्या मुस्लीम युनायटेड क्लब मध्ये मॅनेजर होता.

क्लबच्या मालकाला सांगून त्याने यशस्वी ला मोकळ्या मैदानात एका छोट्या प्लास्टिक च्या तंबूत राहू देण्याची परवानगी मिळवली आणि वयाच्या ११ व्या वर्षी यशस्वी त्याच्या आकाराच्या प्लास्टिक तंबू मध्ये राहायला गेला.

पण – नुसतं राहून भागणार नव्हतं. क्रिकेट चा खर्च भागवायचा तर काही काम तर केलं पाहिजे! म्हणून एका डेअरी मध्ये रात्रपाळी चं काम त्याने मिळवलं.

दिवसभर ग्राउंड वर सराव, खायची प्यायची सोय नाही, अनेक रात्री उपाशी राहायचं. उपाशी पोटी झोपी जाण्याची ही मोकळीक नव्हती… नाहीतर रात्रपाळीचं काम कोण बघणार…!

दिवस कष्ट करण्यात आणि रात्र उघड्या डोळ्यांनी टक्क बघण्यात निघून जायची.

फक्त ११ वर्षाचं मुल. झोप सहन न झाल्याने एक दिवस डेअरी मध्ये गाढ झोपी गेलं. सकाळ उजाडली ती डेअरी मालकाच्या ओरडण्याने. यशस्वी त्याच्या सामानासकट डेअरी मधून बाहेर फेकला गेला.

आता जगायला आणि राहायला फक्त आझाद मैदान मोकळं होतं. उन असो, वारा असो, पावूस असो आझाद मैदानाच्या कोपऱ्यात उभा केलेला छोटासा तंबू म्हणजे यशस्वी चं सर्वस्व होता.

त्याने मिडीया समोर आपली ही कहाणी सांगताना अनेक गोष्टींचे पदर उलगडले आहेत. आठवड्याच्या २००-३०० रुपयासाठी त्याला दिवस दिवस क्रिकेट मॅचेस खेळाव्या लागायच्या. त्यातून ही भागायचं नाही म्हणून तो आझाद मैदानावर पाणीपुरी विकायचा. अशा वेळी अनेकदा त्याचे टीममेट्स तिथे येवून त्याला चिडवायचे.

यावर “तुला अशा चिडवण्याचं कधी वाईट वाटलं का”? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा हा १७ वर्षाचा मुलगा फक्त हसला आणि बोलला

“ नाही! कधीच नाही. माझ्या टीममेट्स ना बेघर होणं म्हणजे काय असतं याचा कधी अनुभव नव्हता, दिवस दिवस उपाशी राहाणं कसं असतं त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी पाणीपुरी विकली नव्हती त्यामुळे माझ्या वेदना त्यांनी समजून घ्याव्या अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून कशी ठेवणार?!”

यशस्वी ५ वर्षे छोट्याश्या तंबू मध्ये आझाद मैदानात आई वडिलांपासून दूर संघर्ष करत राहिला. दिवस तर कसाही निघून जायचा. कामात किंवा क्रिकेट खेळण्यात. पण रात्री मात्र त्याच्या अंगावर येत राहायच्या.

उन्हाळ्यात तंबुचं प्लास्टिक प्रचंड तापलेलं असायचं त्याला थंड करण्याची सोय नसायची. कधी काळी जेवण मिळालच तर ते तंबू मध्ये जपून मेणबत्ती लावून त्याच्या प्रकाशामध्ये खावं लागायचं. अनेकदा डोळ्यात पाणी यायचं. अगदी हमसाहमशी रडण्यापर्यंत वेळ यायची. कधी घरच्यांची आठवण असायची.

पण बरेचदा व्हायचं असं की रात्री आझाद मैदाना वर तर कुठलं शौचालय नसायचं. मैदानाबाहेर ची दुकाने रात्री बंद होवून गेलेली असायची. त्यामुळे साधं मल मुत्र विसर्जन जरी करायचं म्हटलं तरी त्याला सकाळपर्यंत वाट पाहावी लागायची.

पोटात अन्न- पाणी आणि पाठीवर फिरणारा कसलाही आपुलकीचा हात नसताना, कुठली आग त्याच्यामध्ये पेटत होती माहीत नाही – पण तरीही हा मुलगा अन्न, वस्त्र, निवारा अशा कसल्याच मुलभूत गोष्टी स्वत:जवळ नसताना ही लढला, लढत राहिला.

स्वत:च्या कामगिरीने त्याने आपलं मुंबई संघातलं स्थान पक्क बनवलं. यशस्वी चे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी यशस्वी च्या संघर्षात त्याला मदत केली.

 

jwala singh yashaswi jaiswal trainer inmarathi

 

आता यशस्वी मुंबई च्या कदमवाडी भागातील एका चाळीत राहतो. त्याच्यासाठी चाळीची ती रूम म्हणजे स्वर्ग आहे. इतकी वर्षे उघड्या आकाशाखाली झेललेली वादळे संपून एक छप्पर आणि चार भिंती तर मिळाल्यात हेच माझं मोठं भाग्य असं तो बोलतो.

तब्बल ६ वर्षाच्या अनन्वित संघर्षा नंतर यशस्वी ची श्रीलंके ला जाणाऱ्या १९ वर्षाखालील भारतीय टीम मध्ये निवड झाली आहे.

“तुला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजाचा सामना करावा लागेल याचं तुला काही दडपण आहे का?” असा प्रश्न जेव्हा त्याला विचारला गेला, तेव्हा त्याने उत्तर दिलं –

“दडपण? आयुष्य गेलं दडपण झेलण्यात आणि दडपणाखाली जगण्यात! मी तर रन्स काढणार आणि कुठल्याही गोलंदाजा चा यशस्वीपणे सामना ही करून दाखवणार. त्याचं मला दडपण नाही. पण आत्ता, आज रात्री, माझ्या पुढ्यात अन्न असेल की नाही या गोष्टीचं मात्र मला जरूर दडपण आहे!”

त्याची कहाणी ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाचं मन त्याचे हे शब्द ऐकून त्याच्याबद्दल अभिमानाने ऊर भरून आल्याशिवाय राहात नाही. इतक्या अचाट अडचणीमध्ये पुढे जाण्याचा त्याचा दृढनिश्चय, त्याचं खेळाबद्दलचं प्रेम, आणि बाह्य परिस्थती मधली अनेक वादळे झेलून देखील न विझलेली हृदयातली आग त्याला आज इथपर्यंत घेवून आली आहे. तशीच ती त्याला अजून पुढे घेवून जाईल यात शंका नाही.

“यशस्वी जयस्वाल” हे नाव उद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये धोनी आणि कोहली सारखेच मानाने झळकेल असा आत्मविश्वास आज आपल्याला यशस्वी देतो.

Hats off to you Yashasvi. आम्हाला तुझा अभिमान वाटतो!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Adv. Anjali Zarkar

Lawyer by profession. belletrist by heart!

    anjali-zarkar has 17 posts and counting.See all posts by anjali-zarkar

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?