' सिस्टीमच्या भ्रष्टाचाराची अदृश्य साखळी एकदातरी उघड्या डोळ्यांनी बघाच!

सिस्टीमच्या भ्रष्टाचाराची अदृश्य साखळी एकदातरी उघड्या डोळ्यांनी बघाच!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : संजीव चांदोरकर

===

सिस्टीम तुम्हाला आजूबाजूच्या घटनांकडे सुट्या सुट्या म्हणून पाहायला प्रवृत्त करत असते. पण तुम्हाला सिस्टिम कशी चालते हे समजून घ्यायचे असेल तर सुटेसुटे वाटणारे विविध “बिंदू” जोडायला शिकले पाहिजे. आणि सिस्टीम कशी चालते हे समजून घेणे हे सिस्टीम मध्ये बदल घडवून आणण्यासाठी पूर्वअट आहे!

 

System Nexus Intricacies inmarathi
videoblocks.com

खाली वरवर सुट्या वाटणाऱ्या पाच गोष्टी नमूद केल्या आहेत.

(१) महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात १३,००० दुचाकीस्वार ठार आणि २०,००० गंभीर जखमी.म्हणजे दररोज ३० जण गंभीर अपघात त्यातील १० जण मरतात. दररोज ! (लोकसत्ता जुलै ३) हे आकडे फक्त महाराष्ट्रातील आहेत. म्हणजे देशातील काही पटींनी जास्त असतील. आणि हे प्रमाण वाढते आहे. का वाढते आहे ? तर दुचाकीस्वार वाढत आहेत.

(२) देशात विकल्या जाणाऱ्या दुचाकींची संख्या (Source: Auto Manufacturers Association)

२०१२-१३ : १४० लाख

२०१३-१४ : १५० लाख

२०१४-१५ : १६० लाख

२०१५-१६ : १६५ लाख

२०१६-१७ : १७६ लाख

२०१७-१८ : २०० लाख

दुचाकींचा खप का वाढत आहे? लोकांकडे एव्हढे पैसे कोठून आले?

(३) बँक व एनबीएफसी यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या वाहन कर्जात (व्हेईकल लोन मार्केट) गेली अनेक वर्षे दर साल दर शेकडा ३५ टक्क्यांनी वाढ

(४) देशातील सार्वजनिक वाहतूक, मग ती शहरांतर्गत असेल (मुंबईतील बेस्ट, पुण्यातील पीएमटी) किंवा राज्यांतर्गत असेल (आपली एसटी) त्याची गुणवता खालावत चालली आहे

(५) शहरातील, राज्यातील, आंतरराज्य रस्त्यांची अवस्था चांगली नाही. खड्डे असतात वगैरे. वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. वाहतूक व्यवस्थापनात बेशिस्त आहे.

वरकरणी सुट्या सुट्या वाटणाऱ्या घटना, बातम्या, आकडेवारी, निरीक्षणे एकमेकांशी जैवपणे निगडित असू शकतात. परस्परांशी संबंधित असतात.

वरच्या पाच बिंदूचा परस्पर संबंध तपासून बघूया :

संपूर्ण देशात सार्वजनिक वाहतुकीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना नागरिक आपापली वाहने ठेवणे गरजेचे वाटू लागले आहे. सामान्य माणसाला परवडणारे वाहन म्हणजे दुचाकी. तांत्रिकदृष्ट्या बघितले तर दुचाकी खरेदी करण्याचा निर्णय त्या व्यक्तीने घेतला आहे.

पण बाह्य परिस्थितीने (सार्वजनिक वाहतूक नसणे) त्याला विशिष्ट निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. हे आकळणे म्हणजे अंतर्दृष्टी कमावणे!

पण सामान्य लोकांकडे एक एक लाखाची दुचाकी घेण्याएव्हढे पैसे नसतात. मग बँका, एनबीएफसी पुढे येतात. त्यांच्याकडे कर्ज देण्यासाठी एव्हढे भांडवल जमा झाले आहे कि कर्ज घेणाऱ्यांपेक्षा कर्ज देणाऱ्यांचा उत्साह जास्त आहे. वस्त्यांमध्ये व गावांमध्ये फिरून वाहन कर्जे मंजूर केली जात आहेत. (बँकिंग, एनबीएफसी कडे कर्जे द्यायला भांडवल कोठून आले हा पुढच्या पायरीचा प्रश्न. पण तो आता नको).

त्यातून दरवर्षी कोट्यवधी दुचाकी विकणे शक्य होत आहे. २०१७-१८ मध्ये दररोज अंदाजे ५५,००० दुचाकी विकल्या गेल्या. दररोज ५५,००० ! विक्री करणारे एजंट १२ तास काम करतात असे धरले तर मिनिटाला ८० दुचाकी विकल्या जात आहेत.

समजा उद्या शहरातील, राज्यातील सार्वजनिक वाहतूक अगदी आदर्श पद्धतीने चालत आहे असे गृहीत धरू.

असं घडलं तर दुचाकी वाहनांचा खप कमी होईल कि नाही ? म्हणजे मग असे म्हणायचे का कि सार्वजनिक वाहतूक अशीच कुढत लंगडत चालण्यामध्ये देशातील वाहन उद्योग आणि वाहन कर्ज उद्योग यांचे हितसंबंध आहेत का? तुम्हीच विचार करा!

समजा सगळे रस्ते खड्डे विरहित आहेत असे गृहीत धरू. वाहनांना शिस्त लावली आहे असे गृहीत धरू.

असं घडलं तर अपघातांचे प्रमाण कमी होईल कि नाही? मग रस्त्यावर कमी खड्डे असणे, वाहनांना शिस्त लावणे याची जबाबदारी कोणाची? प्रत्येक नागरिकांची? कि एखादी केंद्रीय संस्था असेल तर अधिक बरे?

सार्वजनिक वाहतूक सुधारणे, त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी करणे, रस्ते नीट ठेवणे, वाहतुकीला शिस्त लावणे या सगळ्याची आधुनिक औद्योगिक समाजात जबाबदारी कोणाची असते?

विचार करण्याचे दोन भिन्न दृष्टिकोन:

पहिला: सगळ्या घटना, आकडेवारी, माहिती सुटी सुटी बघायची.

समोर घडणाऱ्या घटनांना त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील व्यक्तिगत घटना मानायचे. अपघात, मृत्यू यांना व्यक्तिगत शोकांतिका म्हणायच्या. मुळात समाज असे काही नसतेच. माणसे सुटी सुटी ऍटम सारखी असतात. ती चांगली असतात किंवा वाईट असतात. ती जबाबदार असतात किंवा बेजबाबदार असतात.

आणि सरते शेवटी प्रत्येकाचे नशीब असते. त्याची वेळ आली कि तो मरणारच. यात शासनसंस्थेचा नावाला देखील उल्लेख केला जात नाही. हा एक दृष्टिकोन झाला. जो आज सर्वात प्रचलित दृष्टिकोन आहे.

दुसरा: समोर घडणाऱ्या घटना, आकडेवारी यांच्याकडे सुटे सुटे न बघता समग्रतेने (होलिस्टिक) बघणे.

शासनाची धोरणे, किंवा धोरणे बनवायला नकार, पुरेशा अर्थसंकल्पीय तरतुदी नसणे, लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला धंदा करण्याची एक संधी म्हणून बघणारी एक उत्पादक प्रणाली या सगळ्याचा परस्पर संबंध असतो – अशा धारणेतून आजूबाजूच्या जगाकडे बघणे हा दुसरा दृष्टिकोन असतो.

हा फक्त वैचारिक दृष्टिकोनाचा भाग नाहीये. तर संवेदनशीलतेचा देखील आहे.

दररोज दहा दुचाकीस्वार, सगळे तरुण वयातील असणार, मरत असतील. अजून पंधरा दररोज जायबंदी होत असतील तर समाज म्हणून हि केव्हढी ट्रॅजेडी आहे. सगळा दोष त्या मेलेल्या व जायबंदी झालेल्या तरुणावर टाकायला मन धजावेल?

हा समग्र दृष्टिकोन एकदा आत्मसात केला कि तुमची नजर बदलते. देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक महत्वाच्या घडामोंडीकडे तुम्ही स्वतंत्रपणे बघू शकता. मग नोटबंदीचा निर्णय असो नाहीतर, आरोग्य विमा योजनेचा, युरोपमधील ब्रेक्सिट असो किंवा चीनने स्थापन केलेल्या एआयआयबीचा!

मग तुम्ही शासनाच्या प्रवक्त्यांकडून जी आर्ग्युमेंट्स / समर्थने दिली जातात त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही. मग सरकार कोणाचेही असो. भाजपचे असो व काँग्रेसचे असो. पंतप्रधान कोणीही असो.

स्वतंत्र, समग्र विचार करण्याची कुवत अंगी बाणवल्यामुळे फक्त तुम्ही सशक्त होत नसता तर तुम्ही देशातील लोकशाही बळकट करत असता!

मी दुसरा दृष्टिकोन अंगी बाणवण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्ही?

===

लेखक TISS मध्ये प्राध्यापक आहेत.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?