' सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं; एकदा भेट द्यायलाच हवी

सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं; एकदा भेट द्यायलाच हवी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : सोमेश सहाने

===

कल्पना करा, पावसाळा चालू झालाय, वातावरणात थंडावा आलाय, निसर्गाने हिरवी शाल पांघरलीए, त्यावर धुकं सुर्यासोबत लपंडाव खेळतंय…

असा हा कवी मनाला भुरळ घालणारा पावसाळा, हौशी पर्यटकांना साद घालणारा सुद्धा आहे. हे निसर्गाचं मोहक रूप अधिक दूरवर डोंगरातून, जिथं कोणीही नसेल अशा निवांत जागून बघावं अस प्रत्येकाला वाटतं.

 

ghangad fort inmarathi
onacheaptrip.com

 

यातून किल्ल्यांवरची गर्दी वाढली. महाराजांच्या किर्तीने गच्च भरलेल्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या ह्या किल्ल्यांवर वावर वाढला. यातून स्थानिक लोकांना रोजगार निर्माण झाला, इतिहासा बद्दलची जाणही वाढली.

पण हे फक्त मोजक्याच जागी घडलं. बरेचसे किल्ले दुर्लक्षितच राहिले. काही दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थानी मात्र अशा दुर्लक्षित किल्ल्यांवर काम केलं.

तिथं जाण्याच्या वाटा सुकर केल्या. आणि यातून अशा दुर्गम किल्ल्यांना भेट देणं सामन्यांना शक्य होऊ लागलं.

पण आता या अपार प्रयत्नांतून जिर्णोध्दार झालेल्या किल्ल्यांना शक्य त्या मार्गाने सामान्य पर्यटकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आज आपण बघूयात अशाच प्रकाशझोतात नसलेल्या किल्ल्याबद्दल…

 

 

ताम्हिणी घाट पावसाळ्यात पुणे मुंबईतल्या पर्यटकांनी भरून जातो. धबधबे, जैवविविधता, शहरातल्या सुखसोयींपासून निवांत एक दिवस पावसाची मज्जा घ्यायला ही जागा पुण्यापासून तशी जवळ.

याच घाटवाटांचं संरक्षण करण्यासाठी शिवपूर्वकालीन काळापासून बांधलेले काही किल्ले आहेत. त्यातला एक म्हणजे घनगड.

इतिहासात तसा या किल्ल्याचा फारसा संदर्भ आढळत नाही असं जाणकार सांगतात, पण हा किल्ला शिवशाहीत टेहळणीसाठी वापरला जायचा. पुढे इंग्रजांनी इतर अनेक किल्यांप्रमाणे याही किल्ल्याची वाट फोडली.

अशा या भग्न अवस्थेत असणाऱ्या किल्ल्यावर फार कोणी जायचं नाही. किल्ल्यात शिरणारी वाटच फोडल्यामुळं खडतर प्रतावरोहन ( rock climbing ) करून वर जावं लागायचं.  असं करणारा एखादा हौशीच काय तो इथं येत असेल.

पाच वर्षांपूर्वी मिलिंद क्षीरसागर यांच्या पुढाकाराने चालणाऱ्या शिवाजी ट्रेल या संस्थेने किल्ल्यावर काम सुरू केलं. सरळ कड्याला शिडी लावली, पायऱ्या नीट केल्या, मंदिर नीट केलं.

गावकऱ्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमातून किल्ल्यांवरच्या टाक्यांमधील गाळ काढला गेला, आता त्या टाक्यांत पिण्याजोगं पाणी आहे.

हळूहळू इथं किल्ले भ्रमंतीला बाहेर पडणाऱ्या लोकांची ये जा ही सुरू झाली. असच एका रविवारी किल्ला शोधत शोधत गेलो आणि ट्रेक करून खाली आल्यावर आम्हाला शिवाजी ट्रेलचे क्षीरसागर सर भेटले.

त्यांनी या किल्ल्याबद्दलची अजून बरीच माहिती सांगितली, गावकऱ्यांबद्दलही सांगितलं. या उतरत्या वयातही तो माणूस हे काम न थकता करतो आहे.

 

fort-ghanagad-inmarathi
youtube.com

मग आम्ही वर्षातून दोन तीन वेळा तरी या किल्ल्यावर जायला लागलो.

पुण्यापासून अंदाजे ९० किलोमीटर असणाऱ्या घनगड ला सार्वजनिक वाहतुकीने जाणे तसे अवघड. भांबुरड्यापर्यंत बस जाते पण तिथून आत एकोले गावात पायीच जावं लागतं.

एकोले गावातूनच किल्ल्याला वाट जाते. पण आता बसही आत जाईल असा रस्ता झालाय.

किल्ल्यावरून सुधागड, तैलबैलाची भिंत स्पष्ट दिसतात. तिन्ही बाजुंनी असलेली दरी पावसाळ्यात धुक्याने भरून जाते. इथून दिसणारा ताम्हिणीचा परिसर अवाक करतो.

घनगड आणि तैलबैला मधली दरी इथून सुंदर दिसते. त्या दृश्यांच वर्णन करण्यापेक्षा सोबत फोटो जोडतोय ते अवश्य बघा.

किल्ल्यावर काही जागी तटबंदी, एक बुरुज, पाण्याच्या टाक्या, भग्न दरवाजा, गुहेत देवी, पायथ्याजवळच मंदिर अशी मोजकीच अवशेष आहेत. शिडी लावल्यामुळे प्रतावरोहणाची गरज राहिली नाही. अवघ्या अर्धा पाऊण तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो.

सोप्या प्रकारात मोडेल असा हा छोटासा ट्रेक. तरी आडवाटेला असल्याने कोणी जात नाही.

जवळ एखादं हॉटेलही नाही. पण पायथ्याच्या कुठल्याही घरात हाक मारावी आणि चुलीवरच्या गावरान जेवणावर ताव मारावा. गर्दी नसल्याने गावकारीही खमंग जेवण बनवतात. इथे जेवायला नेलेली लोकं अजून सुद्धा या चवीची आठवण काढतात.

 

ghangad-fort-inmarathi

 

असा हा एकदिवसीय प्लॅन आम्ही Trekism Adventures and outdoors च्या वतीनं दरवर्षी भरवतो. अशा अजून काही किल्ल्यांबद्दल नियमित आणि सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न असेल. त्याची भव्यता साकारता नाही अली तरी ओळख करून देण्याचा प्रयत्न करेन.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं; एकदा भेट द्यायलाच हवी

  • June 22, 2019 at 10:34 pm
    Permalink

    khoop changli mahiti milali

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?