' मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना एका हिंदुत्ववादी विचारवंताचा खडा सवाल : "धर्मग्रंथ की माणसं?"

मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना एका हिंदुत्ववादी विचारवंताचा खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं?”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एल्गार परिषदेत बोलल्या गेलेल्या प्रक्षिभक वक्तव्य आणि वितरित केलेल्या द्वेषपूर्ण साहित्याच्या विरोधात FIR दाखल करणाऱ्या तुषार दामगुडे ह्यांच्याविरुद्ध माध्यमांनी आघाडी उघडली आहे. तुषार दामगुडेंचा भिडे गुरुजींबरोबरचा फोटो वापरून त्यांच्यावर “हा भिडेंचा माणूस आहे” असे आरोप होताहेत.

 

tushar damgude sambhaji bhide inmarathi

 

परंतु ही भेट घडली तेव्हा तुषार दामगुडे आणि भिडे गुरुजी ह्यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली – हे मात्र लिहिलं जात नाहीये. हा फोटो फेसबुकवर टाकताना, तुषार दामगुडेंनी फोटोच्या कॅप्शन मध्ये काय लिहिलं होतं ते सोईस्करपणे लपवलं जात आहे.

माध्यमांनी चालवलेल्या ह्या प्रचाराचं कारण सांगता येत नाही. परंतु तुषार दामगुडेंचे विचार नेमके काय आहेत, कसे आहेत, त्यांची सामाजिक विषयांवरील भूमिका काय आहे, हिंदुत्ववाद-मनुस्मृती ह्यावर त्यांचे विचार कसे आहेत हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कळणे आवश्यक आहे.

तुषार दामगुडेंची ही बाजू जनतेसमोर यावी म्हणून त्यांचाच हा लेख इनमराठी च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. तुषार जींचे इतरही अनेक लेख इथे क्लिक करून वाचता येतील.

===

“हे पहा गुरुजी, माझं हिंदुत्व अत्यंत साधं आणि सरळ आहे.

अयोध्येला परतल्यावर सीतेने बक्षीस म्हणून हनुमानाला मोत्यांची माळ दिली. हनुमान त्या माळेतील मोती दाताने चावून फेकून देऊ लागला. ते पाहून सीतेने विचारले –

“अरे तु हे काय करतोय ?”

तर हनुमान उत्तरला “काही नाही मी यामध्ये माझा राम आहे का ते शोधतोय”.

तर गुरुजी माझं हिंदुत्व देखिल असंच आहे. ज्यामधे माझ्या हिंदू समाजाचं हित आहे ते ठेवायचं आणि बाकी सगळं टाकून द्यायचे.”

: प्रदीप (दादा) रावत

भिडे गुरुजीं बरोबर आमचा मनुस्मृती आणि इतर विषयांवर जो संवाद झाला त्यातील हा महत्त्वाचा भाग.

 

pradeep dada rawat sambhaji bhide guruji inmarathi

 

तर ज्याप्रमाणे मावोवादी मंडळी आंबेडकरी चळवळीमधे घुसून ती चळवळ hijack करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे काही परंपरा व वर्णवर्चस्ववादी मंडळी हिंदूत्वाच्या चळवळीमधे घुसून ती hijack करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या मंडळींमधे स्वतः काही करण्याची धमक अथवा शक्ती नाही म्हणुन ज्यांच्या मागे पाठबळ व जनसंग्रह आहे अशा व्यक्तींभोवती हे आपले जाळे व्यवस्थीत पेरतात व आपला agenda हळूच पुढे रेटतात.

आता थोडा इतिहास पहायला गेलं तर आपल्याला दिसेल की एकेकाळी आपल्याच घरातील काही मंडळी नाशिकचा राम असेल किंवा पंढरपुरचा पांडुरंग असेल यांच्या दर्शनासाठी लढाई करत होती. तेव्हा वर उल्लेख केलेल्या हxxxर मंडळींनी त्या मंदिरांचे दरवाजे लावून घेतले. परंपरा, रूढी यांचे हवाले देत या पददलीतांना जनावरापेक्षा हीन वागणुक दिली.

साने गुरुजी मंदिर प्रवेशासाठी प्राणांतीक उपोषणाला बसले परंतु “हिंदू हिता”चा झेंडा घेतलेल्या एकाही व्यक्तीला त्यांच्या बरोबर उपोषणाला बसावे असे वाटले नाही. हे सगळे अत्यंत दुर्दैवी नव्हे काय?

मंदिर प्रवेशासाठी हट्ट करणारी तीच मंडळी आता त्या राम आणि विठ्ठलाला शिवीगाळ करतात तर ही वेळ त्यांच्या वर कुणी आणली याचा अंतर्मुख होऊन आपण कधी विचार करणार काय?

बरं हे सगळे इतिहासात घडले म्हणावे तर आजही ज्या गोष्टींचे संदर्भ आणि उपयोजिता नाही ते विषय काढून वादंग माजवण्याची उठाठेव आपण का करायची हा मुख्य प्रश्न आहे.

गृहीत धरू की मनुस्मृती मध्ये लाख चांगल्या गोष्टी असतील. पण ते पुस्तक आज “अन्यायाचे प्रतिक” म्हणून ओळखले जाते याची आपल्याला कल्पना नाही काय? दरवर्षी त्या आंबेडकरी जनतेने उठायचे आणि ती मनुस्मृती जाळायची… त्यापेक्षा आपण सगळे मिळून एकदाची ती मनुस्मृती जाळून तो विषय संपवायचा – की त्यामध्ये काय काय ग्रेट तत्वज्ञान आहे याची लांबड लावत बसायची ?

ज्या पुस्तकं आणि परंपरांमुळे आपलाच लाखो लोकांचा जनसमुदाय अस्वस्थ होतो त्या पुस्तकं आणि परंपरांचे समर्थन आपण महामुर्खासारखे का करत बसतो?

 

manusmruti inmarathi

 

जिवंत माणसं की रद्दीत विकली जाणारी पुस्तकं – यामधील योग्य निवड आपणच करायची आहे.

एकीकडे आपण हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि धार्मिक व इतर बाबीत पंक्तिप्रपंच मांडायचा हे किळसवाणे नाही काय? संख्येने निम्म्या असलेल्या महिला या हिंदू नाहीत काय? त्यांच्या मध्ये सवाष्ण, विधवा, परित्यक्ता, रजस्वला, वांझ असे वेगवेगळे भेद करुन त्यांना हीन वागणुक देणाऱ्या प्रथा आणि त्यांचे समर्थन करण्याची आपल्याला लाज वाटत नाही काय?

फक्त अत्याधुनिक कपडे घातले आणि तंत्रज्ञान वापरले म्हणजे आपण अत्याधुनिक होत नाही. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरब राष्ट्र होत. पैशांच्या जोरावर जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान तेथे उपलब्ध असले तरी त्यांची मानसिकता अजून मध्ययुगीन कालखंडातीलच आहे.

आपल्या देशातील कचरा गोळा करणारी महिला दुचाकी वापरण्याचे स्वातंत्र्य उपभोगते, ते स्वातंत्र्य तेथील राजकन्या देखिल उपभोगु शकत नाही. मग आपल्याला या प्रकारचा रानटी जीवन जगणारा समाज घडवायचा आहे काय?

“भाव तिथे देव” किंवा ” जळी स्थळी माझा नारायण अस्तित्वात आहे ” हे संतवचन किंवा कथा सत्य असेल तर रजस्वला स्त्री ने किंवा अमुक ढमुक राज्याचा राजा नसलेल्या परंतु पदसिद्ध असलेल्या राष्ट्रपतीने देवाच्या मुर्तीला स्पर्श केल्याने आपल्यावर नेमके कोणते आकाश कोसळते ? वर आपण ह्या गोष्टींचे समर्थन का करतो हे देखिल मला समजत नाही…!

करायचेच असेल तर करण्यासारख्या अनेक गोष्टी तुमच्यापुढे उपलब्ध आहेत.

नितीन आगे प्रकरणात २३ साक्षीदार असताना त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा का झाली नाही यावर तुमच्या लेखण्या झिजवा. अथवा घशाला कोरड पडेपर्यंत चर्चा करा. नितीन आगेसाठी आंबेडकरी समाजानेच लढाई लढायची काय?

आणि मी माझ्या मराठा समाजाला देखिल हा प्रश्न विचारतो की –

कोपर्डीसाठी आपण एवढे मोर्चे काढले, मग एक मोर्चा नितीन आगेसाठी का काढला नाही? (लेख : ...तर नितीन आज ला न्याय मिळाला असता)

 

nitin age murder inmarathi

 

तुम्ही मला नेहमी विचारता ना की मावोवाद्यां विरोधात लढण्यासाठी आम्ही काय करू ते सांगा? तर हे बघा हेच ते काम आहे जे तुम्हाला करायचे आहे.

ज्या गोष्टींमुळे सामाजिक सलोखा बिघडतो त्या प्रत्येक प्रश्नात पुढे येऊन तुम्हाला ते प्रकरण धसास लावायचे आहे. माओवादी हxxxर आहेत. कारण त्यांना यातले एकही प्रकरण सोडवायचे नाही, तर चिघळवायचे आहे. दोन खऱ्या घटना घेऊन त्यामध्ये तीन खोट्या घटना मिसळून ते भ्रम निर्माण करतात. पण तुम्ही प्रामाणिकपणे यात सहभाग सहभाग घेतला तर मावोवाद्यांना कधी यश मिळणारच नाही.

पण आपल्याला हे सगळे करायला कुठे वेळ आहे?

आपल्याला मनुस्मृती कशी ग्रेट आहे, आपल्या परंपरा कशा महान आहेत हे चघळायचे असते.

किंवा ते दुसरे येxxवे आहेत जे वॅलेंनटाईन डे ला भगवा झेंडा घेऊन जबरदस्तीने रक्षाबंधन साजरा करायला जातात. एवढीच भगवा झेंडा घेऊन फिरायची हौस आहे तर तोच झेंडा घेऊन शेतकरी मोर्चात सामिल व्हा. की शेतकरी, कामगार, महिला, बालकं हिंदू नाहीत?

तुम्हाला अजून कल्पना नाही की तुमची गाठ कुणाशी पडलेली आहे. जे अटक केलेले लोक आहेत (कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात अटक झालेले), ते कुणी आंडूपांडु आहेत काय? वकिल, लेखक, प्राध्यापक, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, उत्तम संवाद साधू शकणारा तज्ञ – हे लोक साधे वाटतात काय?

यांना अटक झाल्यावर पोलिसांना ऍम्नेस्टी इंटरनॅशनल, चित्रपट कलाकार, वकिल, समाजसेवक यापासुन T.I.S.S. पर्यंत शेकडो लोकांची निषेधाची पत्रे आली.

हे लोक असा माईंड गेम खेळतात. पोलिसांवर, यंत्रणेवर दबाव निर्माण करतात.

तुम्ही असा “सभ्य” दबावगट तयार करू शकता काय? तुमच्यासाठी जनतेतून असं समर्थन उभं राहू शकतं काय? तुमच्याकडे एवढी अक्कल आणि संघटन आहे काय? बुद्रूक गावातून तरी तुमच्यासाठी पत्र येईल काय? शक्यच नाही.

कारण तुमचा संपूर्ण वेळ फेसबुकवर फुकट फौजदाऱ्या करण्यात आणि दुसऱ्यांना अक्कल शिकवण्यात जातो. तळागाळातील शोषित वंचित पीडितांना जोडण्यात नाही.

तोच वेळ सत्कारणी लावून वाचन आणि अभ्यास करा. रोमिला थापर सत्य असत्याची सरमिसळ करते तर तीच्या पेक्षा जास्त अभ्यास करुन पुस्तकं लिहा. माओवादी फ्रंट ऑर्गनायझेशन उभ्या करुन बुद्धीभेद करतात, तर तुम्ही प्रत्येकाने एक – एक उत्कृष्ट संघटन उभे करा. सकारात्मक कामे करा. महत्वाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी सहभाग घ्या.

नुसते शिवाजी शिवाजी करू नका. तर त्यांचे गुण आत्मसात करा. देश तोडण्याची खेळी खेळणाऱ्यांविरुद्ध शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरा.

 

shivaji maharaj-inmarathi04
historyfiles.co.uk

आणि सगळ्यात महत्वाचं –

ज्यामुळे “सकल हिंदू, बंधु बंधु” या घोषणेला बाधा पोहचते ती रूढी, परंपरा, पुस्तक -मग ते खुद्द आपल्या बापाने लिहिलेले असेल तरी – ते गाडून टाका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना एका हिंदुत्ववादी विचारवंताचा खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं?”

  • September 2, 2018 at 4:07 pm
    Permalink

    तुमचे मत आहे की आंबेडकरी समाजाला जे आवडत नाही ते सगळ्या हिंदूंनी सोडून द्यावे. आज ते मनुस्मृती जाळतात उद्या श्री गीता जाळतील परवा श्री भागवत पुराण जाळतील म्हणून हिंदूंनी त्यांच्या आस्था का सोडाव्यात ? मुळात आपण ज्यांना आंबेडकरी समाज म्हणत आहात ते लोक हिंदू नसून बौद्ध आहेत.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?