' आर्थिक संकटातून मार्ग काढायचा असेल तर गुंतवणूकीचे हे स्मार्ट उपाय एकदा तरी ट्राय करून बघा – InMarathi

आर्थिक संकटातून मार्ग काढायचा असेल तर गुंतवणूकीचे हे स्मार्ट उपाय एकदा तरी ट्राय करून बघा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – नितीन माळी
—-

काळा पैसा आणि वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत सरकारने ५०० आणि १००० च्या नोटांचे विमुद्राकरण केले आणि देशात एकच खळबळ उडाली.

अर्थकारणातील ही महत्वाची घटना मानली जाते,  त्यामुळे संकटाच्या काळात अशी खळबळ उडणं साहजिकच होतं. ह्यातून आपण काय शिकण्यासारखं आहे?

अशीच आर्थिक परिस्थिती छोट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात उद्भवली तर काय होईल ? अश्या वेळी तारांबळ उडू नये म्हणून कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ह्यावर उत्तर एकच- आर्थिक नियोजन करणे आणि समृध्द जीवन जगणे !

 

finanace-planning-marathipizza02

स्रोत

 

आर्थिक नियोजन करणे म्हणजे नेमके काय करणे?

आपल्या गरजा, ध्येय, उद्दिष्टे यांची कालावधीनुसार वर्गवारी करून त्यानुसार तरतुदीचे नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन करणे होय.

आर्थिक नियोजन का करावे?

प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही चढउतार होत असतात आणि त्यामुळे आपल्यासमोर आर्थिक संकट उभे राहते, अशी संकटे व्यवसायात, कुटुंबात येऊ शकतात. जर आपले पुरेसे आर्थिक नियोजन नसेल तर आपली खूप हानी होऊ शकते, कर्जबाजारीपणा येऊ शकतो.

हे होऊ नये म्हणून सर्वांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रत्येकाने स्वतःचे आर्थिक नियोजन केलेचं पाहिजे. आर्थिक नियोजन हा विषय क्लिष्ट आणि अगदीच नकोसा वाटणारा आहे. आर्थिक नियोजन जेवढया लवकर सुरु करालं तेवढं फायद्याचं आहे.

तरुणांनी शिस्त लावून घेतल्यास पुढील काळात ह्याचे फायदे नक्की मिळतील . हे आर्थिक नियोजन कसं करावं, खर्च कसे मॅनेज करावेत, गुंतवणूक कुठे करावी हे आपण बघूया.

 

savings money InMarathi

 

बऱ्याच अर्थतज्ञांनी आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारण पणे काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, ज्यावर आर्थिक नियोजन अवलंबून असते.

ते म्हणजे वय, उत्पन्न, उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षित रिटर्न, आणि उपलब्ध शिल्लक. इतरही बरेच मुद्दे आहेत पण वर दिलेली प्रमुख आहेत.

आर्थिक नियोजन करावयाची तीन पायरी संकल्पना पुढीलप्रमाणे:

  • जीवन विमा – Life Insurance आणि आरोग्य विमा – Health Insurance
  • सेविंग्स (Fund Saving ).
  • गुंतवणूक (Investment )

आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे प्रत्येकाचा जीवन विमा (Life Insurance) आणि आरोग्य विमा (Health Insurance) असलाचं पाहिजे.

विचार करा, जर दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात कर्त्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर काय संकट कोसळेल? मानसिक आधार तर जाईलच पण आर्थिक आधार पण जाईल.

वाढती महागाई, त्यात खाणारी २-३ तोंडे, लहान मुले असतील तर त्यांचे संगोपन, त्यांचं शिक्षण, वडीलधारी लोकांचे आजारपण, नंतर मुलांचं लग्न कसं होणार? हे सर्व प्रश्न आ वासून उभे राहतील, म्हणूनच सर्वात आधी प्रत्येकाचा जीवन विमा आणि आरोग्य विमा असणे आजची गरज आहे.

 

life Insurance InMarathi

स्रोत

 

जीवन विमा घेताना नेहमीचा जीवन विमा घेण्यापेक्षा टर्म इंश्युरन्स घ्यावा. हा एक अतिशय सोपा व साधा प्रकार आहे. यात फिक्स असा वार्षिक कमी हप्ता भरावा लागतो आणि विमेदाराचा मृत्यू झाला तरच त्याच्या वारसाला विम्याची एकरकमी रक्कम मिळते.

ह्यात एक गोष्ट फार महत्वाची ती म्हणजे विमा संरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच मुदतपूर्तीनंतर कोणतीही रक्कम विमेदारास मिळत नाही.

आपलं पहिले लक्ष्य म्हणजे शुद्ध विमा असला पाहिजे, परताव्याचा विचार ह्या पायरीवर करू नका. विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत करू नका.

जीवन विमा किती रकमेचा असावा ?

साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे दहा पट कव्हर असावा.

म्हणजे समजा ३० वर्ष वयाची व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे तर जीवन विमा ३० लाखाचा असावा. त्यासाठी त्याला वार्षिक फक्त ६ हजार रुपयांचा कायम स्वरूपी प्रीमियम भरावा लागतो.

जीवन विमा घेताना कमी वयात असताना घेतला गेला पाहिजे जेणे करून वार्षिक प्रीमियम कमी भरावा लागतो. ज्या कंपनीचा विमा घेताय त्याचा क्‍लेम सेटलमेंट Ratio जास्त असेल असाच बघून घ्यावा.

दारू किंवा सिगारेट घेत असाल/ नसाल तर खरी माहिती दिली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योजनेसाठी वारसदार (Nominee) ठरवलेला असला पाहिजे.

विमा कितीही रकमेचा घेता येतो. ह्या संदर्भातील माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.

आरोग्य विमा:

जीवन विम्यानंतर आरोग्य विमादेखील महत्वाचा बनत चालला आहे . ह्याचे कारण म्हणजे वाढत चाललेला रुग्णालयातील महागडा औषधोपचार आणि नवनवीन उद्भवलेले आजार…! त्यामुळे प्रत्येकाचा आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.

 

health insurance

 

आपला आरोग्य विमा किमान ४-५ लाखांचा तर असावाच. ह्या मध्ये विमा कंपनी कुठे कुठे सुविधा देते, कोणकोणते आजार समाविष्ट आहेत, कोणते नाही आहेत, नो क्लेम चा फायदा, महिलांसाठी मॅटर्निटी सुविधा देतायेत की नाही, आजारा पूर्वी आणि नंतर किती दिवसाचा खर्च स्वीकारणार, चालू आजाराचे खर्च करणार की नाही ह्या बाबी तपासून घ्याव्यात.

आरोग्य विमा एकट्यासाठी किंवा कुटुंबासाठी एकत्रित (फ्लोटर प्लॅन) घेता येतो.

आर्थिक नियोजनाची दुसरी पायरी म्हणजे पैसा साठवणूक (Savings):

लहान पल्ल्याच्या ध्येयांसाठी म्हणजे घर चालवण्यासाठी दैनंदिन घरखर्च, वाहन व इंधन खर्च, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, पाहुणे आले-गेले त्यांचा खर्च, एखादी सहल, पार्टी, मनोरंजन, कर्ज हप्ते किंवा विम्याचे हप्ते, ह्यासाठी ठराविक शिल्लक रक्कम मिळकतीतून बाजूला काढून साठवून ठेवली पाहिजे.

सेविंग किती करावी?

सेविंग करण्यासाठी विशिष्ट असा फॉर्म्युला नाही. साधारण कमीत कमी १० टक्के तरी सेविंग असायलाच हवी. (फक्त सेविंग, गुंतवणूक नाही) जास्त सेविंग करू नये.

सेविंग करून उरलेले पैसे गुंतवणुकीत टाकावे.

प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट (हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफेट ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते.) ह्यांच्या मते महिन्याला मिळणाऱ्या मिळकतीमधून सर्वात आधी सेविंग करावे, सेविंग करून नंतर उरलेले पैसे खर्चकामासाठी उपयोग करावे.

आपण आतापर्यंत उलटे म्हणजे पहिला खर्च मग त्यातून उरले तर सेविंग असं करत आलोय जे  व्यावहारिकदृष्ट्या चुकीचं आहे.

 

Woman with coins in jar

स्रोत

सेविंग कुठे करावी?

मासिक ठराविक रक्कम आपण बँकेत किंवा घरी ठेवावी जेणेकरून कधीही गरजेनुसार काढता/ वापरता येईल. काही रकमेचे रिकरिंग (RD) चालू करावे त्यातून आपण विम्याचे हप्ते देऊ शकतो.

ह्या पायरीमध्ये आपण रकमेच्या रिटर्न्सबद्दल विचार करू नये. ही सुद्धा शुद्ध साठवणूक आहे.

आर्थिक नियोजनाची तिसरी पायरी म्हणजे गुंतवणूक(Investment ) :

मध्यम किंवा मोठ्या पल्ल्याच्या ध्येयांसाठी जसे घर घेणे, लग्न कार्य करणे, परदेशी सहल, चारचाकी गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, वृद्धापकाळात पेन्शन ह्या गोष्टीसाठी वेगळी तरतूद असायला हवी.

सेविंग मधून वरील ध्येयं पूर्ण  होऊ शकत नाही कारण सेविंग रक्कम मधून मिळणारा परतावा खुपच कमी असतो. महागाई दर वर्षी सरासरी ७% दराने वाढत आहे, नुसत्या काही सेविंगने आपली दीर्घ उद्दिष्टे पूर्ण करणे शक्यच नाही, म्हणून मार्केट मध्ये अश्या काही स्कीम्स आहेत ज्या मधून काही ठिकाणी जोखीम वापरून, तर काही ठिकाणी बिनदिक्कतपणे आपण गुंतवणूक करू शकतो.

आणि महागाई वर मात करून जास्ती रिटर्न्स मिळवून आपली ध्येयं पूर्ण करू शकतो.

finanace-planning-marathipizza04

स्रोत

 

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी ?

कमी प्रमाणात बँक मुदत ठेवींचा पर्याय सुद्धा चांगला आहे. ह्यामध्ये रिस्क काहीच नाही परंतु परतावा जास्ती मिळणार नाही. ७ टक्के च्या आसपास सामान्य रिटर्न्स मिळतील.

काही प्रमाणात म्युच्युअल फंडच्या योजनेत गुंतवणूक करावी.

म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकीचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते.

शेअर बाजार म्हणजे जुगार असं सरसकट मतं मांडणे चुकीचं आहे. खरं म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे.

शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी ज्यांच्याकडे नॉलेज नसते त्यांच्यासाठीचं म्युचुअल फंड ही संकल्पना पुढे आली. कारण म्युचुअल फंड मधील राशीचे नियोजन, व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे तज्ञ मंडळी, फंड मॅनेजर असतो.

इथे आपल्याला पैसे देण्याव्यतिरिक्त काहीच करायला लागत नाही. तज्ज्ञ टीम आणि फंड मॅनेजर शेअर बाजारातील घडामोडींचा अभ्यास करून आपला पैसा योग्य ठिकाणी लावून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देतात.

ह्यामध्ये कमी रिस्क, मध्यम रिस्क आणि जास्ती रिस्क अशी सुविधा आहे, SIP द्वारे आपण ठराविक रक्कमेची गुंतवणूक करू शकता.

म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP हा गुंतवणूक पर्याय छोट्या आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय परिणामकारक ठरतो.

 

sip inmarathi
the finance express

 

विशेष म्हणजे रिटर्न्स चक्रदरवाढ (कॉमपौंडिंग) पद्धतीने मिळते, म्हणून म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही लॉन्ग टर्म म्हणजे १० वर्ष, १५ वर्ष, २० वर्ष असेल तर भरपूर फायदा मिळवता येतो.

काही रक्कम आपण निवृत्तीसाठी म्हणून आताच बाजूला काढून ठेऊ शकतो. त्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये तरतूद करून ठेवावी.

नियमित केलेल्या २०-२५ वर्षे गुंतवणुकीमुळे भरपूर असा निधी सहज जमा होऊ शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खातं किमान १५ वर्षांचं असतं.

ह्यामध्ये वार्षिक रु. १.५ लाख बचत करता येते. साधारण व्याजदर ८.२ टक्केच्या आसपास कमी-अधिक असतो , हे व्याजदर दरवर्षी बदलत असतात. कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्टात पीपीएफचे खातं उघडता येतं.

थोडी गुंतवणूक सोन्यामध्ये देखील करायला हरकत नाही. गोल्ड फंड मध्ये जास्त चांगले पर्याय आहेत. सोने/चांदी यातील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

gold fund inmarathhi

 

काही ठरावीक रक्कम नियमीतपणे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यास सुद्धा हरकत नाही पण हे करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञ व्यक्ती ह्यांचे मार्गदर्शन जरूर घ्या. शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याऐवजी दीर्घ काळासाठी शेअर खरेदी करून निवांत राहा. आतापर्यंत शेअरमार्केट १०० पासून ते २९००० पर्यंत गाठलेली पातळी वरून तुम्ही अंदाज लावू शकता की बाजाराने किती परतावा दिला आहे.

फक्त प्राप्तिकर बचतीसाठी इन्शुरन्स किंवा PPF घेऊ नका. हीच गोष्ट करणे चुकीचे आहे. त्याऐवजी इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS) आहेत. अशा योजनेमध्ये गुंतवणूक करून कलम 80 सीअंतर्गत प्राप्तिकर वाचविता येतो आणि सोबत चांगला परतावा म्हणजे रिटर्न्स पण मिळतात. साधारण१७  टक्केच्या आसपास इतका घसघशीत परतावा ह्यामध्ये मिळतो .

आपली सगळी पुंजी एकाच क्षेत्रात गुंतवू नका, त्याचे वर्गीकरण करा आणि निश्चिंत राहा !

finanace-planning-marathipizza05

स्रोत

 

इथे मोजक्याच शब्दात आर्थिक नियोजन ह्या विषयावर काही मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत.

तर अश्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केले तर कोणत्याही कठीण परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. पण हे लक्षात ठेवा की, असे नियोजन करताना कुटुंबातील सदस्यांचे आणि तज्ञ गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?