' तुम्ही 'ट्रेक लव्हर' असाल तर गड किल्ल्यांवर जाताना 'या' गोष्टी चुकूनही विसरु नका!

तुम्ही ‘ट्रेक लव्हर’ असाल तर गड किल्ल्यांवर जाताना ‘या’ गोष्टी चुकूनही विसरु नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ट्रेकिंगची आवड भरपुर जणांना असते, आणि कोणताही ट्रेकर अगदी साध्यातला साधा ट्रेक करताना तितकाच उत्सुक असतो! बहुतांश आपल्या इथे ट्रेकिंग हे दोनच सीझन मध्ये केले जाते!

हिवाळा आणि पावसाळा, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त उंचीचे ट्रेक केल्याने तब्येत बिघडायची शक्यता असते शिवाय उन्हाळ्यात सगळीकडेच पाण्याचा तुटवडा सुद्धा असतो!

त्यामुळे बऱ्याचदा पावसाळा किंवा हिवाळच उत्तम ठरतो, त्यातूनही पवसाळ्यातल्या ट्रेक ची मजा काही औरच!

पावसाळा !! म्हणजे साधारण जून  ते ऑक्टोबर हा चार महिन्यांचा काळ. या काळात भटकंती प्रिय असणाऱ्या तरुणाईला वेध लागतात ते ट्रेकिंगचे.

पावसाळा हा ऋतू महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्यासाठीचा सर्वोत्तम ऋतू आहे.

आल्हाददायक वातावरणात, आपल्या इतिहासाच्या, निसर्गाच्या.. आणि त्या अंतर्मुख करणाऱ्या शांततेच्या सानिध्यात जायला कुणाला आवडणार नाही?

अशा वातावरणात कुणाला ट्रेकिंगचा मोह झाला नाही तरच नवल!

 

trekking-inmarathi
thefortsofsahyadri.blogspot.com

 

यामध्ये सगळ्याच प्रकारचे ट्रेकर्स आले. जसे यात्रेत येणारे लोक असतात ना तसे.

गावाकडे यात्रेत येणाऱ्या लोकांचे तीन प्रकार सांगतात. एक हौसे ज्यांना फिरण्याची हौस असते. नवनवीन काही पाहायला ते आतुर असतात. दुसरे नवसे ज्यांचा एखादा जुना नवस असतो, असे श्रद्धाळू, जे नियमित, त्याच श्रद्धेने येत असतात.

तिसरे गवसे ज्यांचा खरा उद्देश यात्रेत काही मिळते का, कुठे हात मारता येतो का हे पाहणे असते…!

ट्रेकर्स मध्येपण असेच काहीसे प्रकार दिसतात. काहींना फिरण्याची हौस असते, घराच्या बाहेर पडलेली त्यांची पाऊले सतत नव्या वाटा शोधत असतात. यांच्या फिरण्याला बंधन असत नाही.

यांना तुम्ही फक्त येणार का? एवढे विचारायचा अवकाश, हे निघालेच समजा.

दुसरे नवसे…हे अगदी श्रद्धेने गडकिल्ल्यांच्या वाटा तुडवतात.

गडांच्या संवर्धनासाठी झटणारे, त्यावर स्वछता टिकवणे, नव्या पिढीला हा वारसा मिळावा म्हणून वेगवेगळे कार्यक्रम घेणारे असे हे लोक. यांचा वसा संवर्धनाचा.

 

pratapgad inmarathi
goibigo

 

तिसरे गवसे, यांना करायची असते ती मौज.

त्यांच्या या मौजेमध्ये त्यांना आपण कुठे आहोत याच देखील भान राहत नाही. यांची आणखी लक्षण इथे सांगणे नको. तुम्ही ही पावसाळ्यात फिरणारे असाल तर तुम्हाला एव्हाना ते लक्षात ही आले असेलच.

हल्ली यांची संख्या वाढते आहे. असो. पावसाळ्यात फिरण्याची मजा मात्र काही औरच असते.

पावसाळा जसा आपल्या सोबत घराबाहेर पडण्याची उर्मी घेऊन येतो, सृष्टीची नवी रूपे दाखवतो तसाच तो आपल्या सोबत काही धोके देखील घेऊन येतो.

पावसाळा जसा फिरायला उत्तम काळ तसाच तो अपघातांना आमंत्रण देणारा ही असतो. त्यामुळे पावसाळ्यात फिरताना काळजी घेतली पाहिजे.

फिरण्यासाठी घरातून बाहेर पडण्याआधी आपल्याला आवश्यक सगळ्या वस्तू आहेत का नसतील तर त्यांची जमवा जमाव केली पाहिजे.

चांगले, न घासरणारे बूट, त्यांच्यातुन पाण्याचा निचरा होईल याची सोय असावी. पाठीवर एक सॅक, या सॅक मध्ये पाणी जाणार नाही अशी ती असावी. त्यात भूक भागवतील असे पदार्थ सोबत न्यावेत.

अंगावर भिजले तरी लवकर कोरडे होतील असे कपडे आणि सोबत अधिकचे कोरडे कपडे अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर गडकिल्ले फिरणार असाल तर हात मोकळे हवेत.

 

trek-inmarathi
wildboots.in

 

जे घ्यायचे ते पाठीवरच्या सॅक मध्ये. विजेरी(टॉर्च) सोबत असलीच पाहिजे. जर भटकण्याचे नियोजन चुकले तर परतायला उशीर होऊ शकतो.

अन घराबाहेर उजेडाचा एकच स्रोत तो म्हणजे सूर्य. तो एकदा परत निघून गेला, त्यानंतर त्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही.

जंगल ट्रेक असेल तर पूर्ण अंग झाकणारे कपडे हवेत. वेगवेगळे कीटक, डास यांचा त्रास होणार नाही.

पावसाळ्यात जळवा देखील चिकटू शकतात तेंव्हा त्यासाठी तुमच्या सॅक मध्ये मीठ आणि काही जखम झाली तर म्हणून हळद असली पाहिजे.

खरी खबरदारी घ्यायची असते ती घराबाहेर पडल्यावर. दरवर्षी आपण पर्यटकांच्या अपघाताच्या बातम्या वाचत असतो. काहींना जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ येते.

याला पुष्कळदा त्यांचाच हलगर्जीपणा कारणीभूत असतो.

आज जवळपास सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, त्यामुळे प्रत्येक क्षण टिपण्यासाठी लोक उतावीळ झालेली दिसतात.

त्यांचे लक्ष बऱ्याचदा याच गोष्टींवर असते अन सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करायला जाऊन आपला जीव गमावून बसतात.

पावसाळ्यात ज्या ठिकाणी जायचं आहे तिथली पूर्ण माहिती आधी करून घेतलेली हवी.

स्थानिक लोकांच्या सूचना अशा वेळी फार महत्वाच्या असतात. तिकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. आपले सगळे मित्र करताहेत म्हणून आपणही एखादी कृती करतो हे धोक्याचे ठरू शकते.

स्वतःला येत नसताना मित्रांच्या आग्रहाने पोहायला जाऊन जीव धोक्यात घालवणे असे प्रकार पूर्णतः टाळावेत.

पावसाळ्यामुळे वाटा निसरड्या झालेल्या असतात. गवत वाढलेले असते, अशावेळी काळजी घेऊनच चाललं पाहिजे, नाहीतर मित्रांशी गप्पा मारताना किंवा एखाद्या कोटीवर खळाळून हसताना तोल जाऊन आपलीच बत्तीशी खिळखिळी व्हायची.

 

andharban-jungle-trek-inmarathi
adventures365.in

 

धबधब्यांच्या प्रवाहापासून जरा अंतर राखलेले कधीही चांगले. अशा प्रवाहांना वेग असतो, त्यात वाहून जाण्याची नाहीतर किमान कपाळमोक्ष होण्याची शक्यता असते.

आपण जेंव्हा मित्रांसोबत जात असतो तेंव्हा आपल्यावर आणखी जबाबदारी वाढते. कारण आपली कोणतीही आततायी कृती सगळ्या आनंदावर विरजण घालू शकते.

काही शारिरीक त्रास असेल अथवा काही दुखापत झालेली असेल तर फिरायला जाण्याचा मोह टाळलेलाच बरा.

तिकडे जाउन अधिक त्रास झाला तर होणारी फजिती फार वाईट ठरेल शिवाय आपल्या सोबत्यांची देखील धावपळ होईल आणि एक आल्हाददायक अनुभव वाईट आठवण बनून जाईल.

काही जण अतिआत्मविश्वास दाखवतात याची काहीही गरज नाही. कुणाला प्रभावित करण्याच्या नादात भलतच काही करण्यात अर्थ नसतो.

 

trek inmarathi
treks and trails india

 

एखाद्या अवघड वाटेने जाताना आपल्या सोबतच्या सर्वांना तिथून जाता जमत नसेल तर कुणावरही जबरदस्ती करता कामा नये, सोप्या वाटेचा पर्याय निवडलेला कधीही हितकारक.

हे शक्य नसेल तर तिथून माघारी फिरा. कारण लक्षात ठेवा…सिर सलामत तो पगडी पचास.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?