'लज्जारक्षणाय! संशय निग्रहणाय! : भाजपची जम्मू कश्मीरमधील आघाडीतून बाहेर पडण्याची खेळी!

लज्जारक्षणाय! संशय निग्रहणाय! : भाजपची जम्मू कश्मीरमधील आघाडीतून बाहेर पडण्याची खेळी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जम्मू काश्मीरमधल्या अत्यंत अनैसर्गिक आघाडीतून बाहेर आल्याबद्दल नरेंद्र मोदींच्या देशभरातल्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला ‘इन मराठी’ला मुंबईपर्यंत जाणवला. अत्यंत अनैसर्गिक अशी ही युती होती आणि त्याचवेळी ती अत्यंत अपरिहार्यही होती.

प्रश्न राज्य स्थापण्याचा नसतो, चालवण्याचा असतो. ज्या दिवशी तो पर्याय सापडतो त्यादिवशी सत्तांतराचा मार्ग मोकळा होत असतो.

एका अत्यंत अनवट प्रसंगी जम्मू काश्मीरमधील सत्तेतला वाटा भारतीय जनता पक्षाकडे चालत आला. काश्मीरमध्ये पीडीपीने चांगली बाजी मारली होती. तिकडे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती. पण त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने जम्मूमध्ये धुमाकूळ घातला होता. अर्थात याची सुरवात २०१४ पासूनच जाणवत होती.

नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर काश्मिरात काही तरुण मुली त्यांचे फोटो घेऊन नाचल्या होत्या तेंव्हाच या परिवर्तनाची चाहूल लागली होती. निवडणूक निकालांनी फार अपेक्षाभंग केला नाही. आणि जम्मूमधल्या कामगिरीच्या जोरावर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला.

ह्या सरकारची स्थापना अशी होती की सत्तेत भाजप म्हणजे सत्तेत जम्मू आणि सत्तेत जम्मू म्हणजे सत्तेत हिंदू. त्यामुळे ही एक अपरिहार्यता तयार झाली.

 

bjp-pdp-inmarathi
indianexpress.com

सत्तातुराणां ना भयं ना लज्जा, (हे वचन ही मराठी पत्रकारितेला आणि भाषेला ही कुमार केतकरांची देणगी) हे म्हणणं कितीही सोपं असलं तरी प्रत्येक वेळी जर त्रिशंकू विधान सभा झालेली असेल किंवा जर स्प्ष्ट बहुमत नसेल तर उपलब्ध पर्यायातूनच सरकार निर्मितीचा मार्ग जात असतो. साफ नाकारलेले गेलेले पक्ष जेंव्हा सरकार बनवतात तेंव्हा काय वाटतं याचा भाजपाला दांडगा अनुभव आहे.

त्यामुळे ह्या सरकार बनवण्यामागे काहीच गैर नव्हतं. फक्त ही जोडी पूर्णतया वेगळी किंवा म्हणूनच अनैसर्गिक होती. (स्टेफी ग्राफने आंद्रे आगासीशी लग्न केलं तेंव्हा अनेकांना असा फील आला).

मुफ्ती मोहम्मद सैद सत्तेत असे पर्यंत हा संसार कुरबुरी कुरबुरी होत चालला. मुळात मुफ्ती मोहम्मद सैद काही फार छान व्यक्ती नव्हते. रुबियाच्या अपहरणामागे त्यांचा हात उघड झाला होता. त्याबदल्यात काही अतिरेकी सोडावे लागले होते. तरीही मुख्यमंत्री म्हणून सैद लोकप्रिय होते.

त्यांच्या पैगंबरवासी होण्यानंतर जेंव्हा मेहबुबा मुफ्तीनीं सरकारस्थापनेसाठी आणि पर्यायाने भाजपच्या संगतीसाठी एवढा वेळ घेतला तेंव्हाच इकडे काही खरं नाही हे सिद्ध होत होतं.

बुऱ्हाण वाणीला ठार मारणं हा तात्कालिक भाग होता. प्रत्यक्षात बुऱ्हाण वाणी हा सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय हस्ती होता. अतिरेकी मारला गेला की व्यवस्थित मार्केटिंग करून त्याच्या जनाज्याला माणसं गोळा करणं हा त्याचा एकतर्फी कार्यक्रम असे.

अश्या वाणीला कंठस्नान घातल्यानंतर काश्मिरात दगडफेक सुरु झाली. कधीकाळी पत्रकारितेच्या नावाखाली अतिरेक्यांबरोबर स्कुटरवर बसून प्रवास केलेल्या पत्रकार महिला परिस्थिती रंगवून सांगू लागल्या.

 

burhan-wani-inmarathi
indiatoday.in

मेहबुबा मुफ्ती यांचा कारभार वडिलांपेक्षा खूपच वेगळा होता. त्यांचा काश्मिरीयतचा कंठशोष वडिलांपेक्षा कर्कश आणि कंठाळी होता. राज्यात त्या त्यांची हुकूमत चालवायला लागल्या. आणि त्यांच्याबरोबर सत्तेत असलेला पक्ष आणि पंतप्रधान हे अनुक्रमे काँग्रेस आणि डॉ. मनमोहनसिंग नसल्याने अरे ला कारेची प्रतिक्रिया उमटू लागली.

मधल्या काळात दगडफेक्यांना हेरून हेरून टिपणं सुरु झालं. रबरी गोळ्यांचा वापर करू नका असा दबाव लष्करावर आणला जाऊ लागला. त्याला उत्तर म्हणून मनमोहनसिंगांच्या काळातही असा वापर झाला होता असं दाखवून देण्याऐवजी – दुसरा पर्याय शोधला जाऊ लागला.

सरकारने “फुटीरतावाद्यांशी चर्चाच करायची नाही” असा पवित्रा घेतला खरा, परंतू लोकांमध्ये जाऊन त्यांना समजून घेणार कोण हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. मधल्या मध्ये “पाकिस्तानशी चर्चा होणार नाही” असं म्हणणाऱ्या पक्षाचे पंतप्रधान गुपचूप पाकिस्तानात जाऊन सदिच्छा भेटही देऊन आले. एकूणच या काश्मीरचे करायचे काय हा प्रश्नच अनुत्तरित होता.

 

kashmir-inmarathi
newindianexpress.com

सगळ्यात दुखावून टाकणारी गोष्ट होती ती म्हणजे दगडफेकीत हेरून पकडून ठेवलेल्या नागरिकांना सोडण्यासाठी मेहबुबा मुफ्तीन्नी दबाव आणला आणि ही गोष्ट भाजपच्या गळी उतरवली. भाजपवर या बाबतीत दुटप्पीपणाचा आरोप सरसकट होऊ शकतो.

सत्तेपायी भाजपने काश्मिरात बऱ्यापैकी त्याग केला. बराच अपमान झेलला. एवढंही करून भाजपने सत्ता सोडली नव्हती. पण तोच भाजप महाराष्ट्रात शिवसेनेवर रीतसर दादागिरी गाजवत राहिला. शिवसेनेशी वागलेला भाजप आणि मेहबुबांशी वागलेला भाजप हे दोन्ही एकच आहेत काय – इतका संशय यावा अशी परिस्थिती आली.

त्याचवेळी “नाही पटत सत्ता, तर बाहेर पडा” असे सरसकट भाजप समर्थक ही शिवसेनेला सुनावू लागले. आपला पक्ष काय किंमत मोजून काश्मीरात सत्तेत आहे याचा विसर पडत होता. म्हणजे निलाजऱ्यासारखे सत्तेत बसल्याचा आरोप आणि वर निष्क्रियतेचा रोग जडल्याचा संशय.

काहीही न करायचे बंधन घातलेला सिंह बाजारात बांधून आणला जावा आणि बाजारातल्या लोकांनी त्याची आयाळ, नखे कापून त्याला चिमटे काढावेत आणि सिंहाने चुपचाप सहन करावे अशी अवस्था लष्कराच्या जवानांची झाली.

एवढं लष्कराने नमतं घेऊनही पोटनिवडणुकीत सात टक्के मतदान घडलं.

 

kashmiri-youth-violence-marathipizza01
indiatimes.com

भाजपकडे यातून दोन मार्ग होते.

हात बांधून फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची, लष्कराला मागे आणायचं, पाकिस्तानशी चर्चा करायची… (त्यालाही ईदमध्ये पाकिस्तान आणि अतिरेक्यांनी मोडता घातला) किंवा दुसरा – ऑलाउट ऑपरेशन राबवायचं आणि प्रसंगी सत्तेतून बाहेर पडून सगळी सूत्र केंद्राच्या हातात द्यायची.

नरेंद्र मोदी सरकारने आता दुसरा बाणा निवडलाय. परिस्थिती अधिकच थरकारप उडवणारी झालीये. तूर्तास तरी हे पाऊल म्हणजे –

लज्जारक्षणाय! संशय निग्रहणाय!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 29 posts and counting.See all posts by sourabh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?