' स्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…हार्डकोर्टवरची गुलमोहर! – InMarathi

स्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…हार्डकोर्टवरची गुलमोहर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – सौरभ गणपत्ये 

===

ती परी होती. स्वप्नांची राणी होती अनेकांच्या. तिचं सौंदर्य आजही खुलून दिसतं. तिची उंची, तो सडसडीत बांधा, सोनेरी केस, निळे डोळे, करारी बाणा, प्रखर बुद्धिमत्ता, आणि सगळंच वेगळं. हिटलरने जी आर्य वंशाची जपमाळ लावली होती ती त्याच्यावेळच्या असल्याच व्यक्तींकडे बघून लावली होती. हिरवळीवर ती पांढरा गुलाब वाटे. मातीवर ती पिवळा जास्वंद वाटत असे. हार्डकोर्टवर ती गुलमोहर असे.

ती वावरायला लागली की घरातलं कोणी खेळतोय असं वाटत असे. ही गोष्ट तितकीच खरी की तिला बघायला जगभर लोक टीव्हीला खिळून राहात.

 

steffi graph image inmarathi

 

तिचा तो जोरकस फोरहँड तितकाच तिखट बॅकहँड तिची ओळख होती. चेंडूपर्यंत ती सहज पोहोचत असे. मागे धावत जाऊन चेंडू जोरात मारायच्या प्रकारात ती कमीच राहिली. नाही जमत तर फार पुढे धावत जात नेटपाशी चेंडू उचलून मारणं तिने फार कधी केलं नाही. वाघीण किंवा सिंहीण आपल्याच शर्तींवर जगते.

१९८८ साली स्टेफी ग्राफने सगळ्या ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आणि वर ऑलिम्पिक सुवर्णपदकही जिंकलं. मार्टिना नवरातिलोव्हाच्या कारकिर्दीची तिन्हीसांज आणि स्टेफी ग्राफची पहाट या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या. नवरातिलोव्हा नंतर कोण हा प्रश्न तिने सोडवला.

क्रीडा प्रकारात लोकप्रियता मिळवायचे दोन मार्ग असतात. सर्वात महत्वाचा म्हणजे तुम्ही कमालीचे देखणे असायला हवात आणि दुसरा म्हणजे अर्थातच तुमचा खेळ तुफान असायला हवा.

पैकी पुरुष खेळाडू फारच देखणा असेल आणि त्याचा खेळ खास नसेल तर त्याला शिव्याशाप लवकर बसतात. महिला खेळाडू कमालीची देखणी असेल आणि तिचा खेळ फार नसेल तरी तिची लोकप्रियता टिकून राहू शकते.

तुमचे सामने बघायला स्टेडियम फुल होतं. खेळाने ओळख मिळते आणि जमल्यास मॉडेलिंग सारख्या क्षेत्रातूनही पैसे मिळवता येतात. आना कुर्निकोव्हाने हेच केलं. दोन वर्षे टेनिसमधून बाहेर पडूनही मारिया शारापोव्हाला बघायला आजही गर्दी होते.

परंतु हेच सौंदर्य कधीही महिला खेळाडूचा मोठा शत्रू होऊ शकतं. त्याला मिरवायचा नादात अनेकदा खेळाकडेही दुर्लक्ष होऊ शकतं. स्टेफी ग्राफ वेगळी ठरली ती इथे.

१९ वर्षांची स्टेफी बघणं हा अक्षरशः “एक अनुभव” होता. पण पुढे पुढे जसा खेळ पसरत गेला तसतसा स्टेफीच्या चेहऱ्यावर तो खेळ दिसायला लागला. कोवळेपणाची जागा दणकटपणाने घेतली. नजरेतल्या निरागसपणाची जागा करारीपणाने घेतली. ती स्वतःवर केवढी मेहनत घेत आहे हे तिच्या चेहऱ्यावरूनही जाणवायला लागलं.

मधल्या काळात मोनिका सेलेसने तिच्या अस्तित्वावर मोठं चिन्ह उभं केलं. उंच, वेगवान, दणकट, आणि डावखुरी मोनिका सेलेस म्हणजे सरळ शब्दांत आजचा राफेल नदाल. एकामागोमाग एक मोनिका स्टेफीचं राज्य खालसा करू लागली. विम्बल्डन स्टेफीच्या नावे आणि बाकी सगळं मोनिकाच्या नावे असंच दिसू लागलं.

आणि त्यावेळेस नेमका घात झाला.

स्टेफी ग्राफच्या जाज्वल्य यशात दुर्दैवाने गुंथर पार्शचाही मोठा वाटा आहे. माथेफिरू गुंथरने मोनिकावर सुऱ्याने हल्ला केला. तिच्या खांद्यात पाच इंच खोल जखम झाली. मोनिका कोसळली रडली आणि जवळपास संपली.

हे ही वाचा भर मॅचमध्ये टेनिस चॅम्पियनच्या पाठीत खंजीर… करिअर कायमचं बरबाद…

३९ वर्षांच्या गुंथरसाठी पंचविशीही न ओलांडलेली स्टेफी स्वप्नांची राणी होती. तो तिच्या इतका प्रेमात पडला होता आणि त्याने तिचा इतका प्रचंड ध्यास घेतला होता की पोलिसांना जबानीत त्याने एक अत्यंत खाजगी गोष्ट सांगितली.

“तिचं नाव स्टेफी नसून स्टिफनी आहे”.

यानंतर पुढची सगळी वर्ष स्टेफी ग्राफची होती. ती वर्षे वादळी होती. ग्रॅबियेला सबतीनीने तिला आव्हान द्यायचा प्रयत्न केला पण नाही जमलं. आरांता सांचेज व्हिकारियोने काही काळ तिचा क्रमांक एक हिरावून घेतला पण स्टेफीने तिला फार काळ तिथे राहू दिलं नाही.

 

steffi graph inmarathi

 

खेळाची जबरदस्त जाण आणि कधीही परिस्थती पालटवण्याची क्षमता यामुळे स्टेफी बहुतांश पहिल्या नंबरवरच राहिली. विम्बी ग्रासकोर्टला एकदा याना नोव्होत्नाने दुसरा सेट वादळी जिंकून तिसऱ्या सेटला निर्णायक १-४ अशी आघाडी घेतली होती. तिकडून स्टेफीने सामना फिरवला.

अंतिम सामना खेळतानाही तो एकतर्फी कसा होईल याकडे तिचा कल असे. जर्मन माणसं कशाची बनलेली असतात, काहीच सांगता येत नाही.

मधल्यामध्ये काही धक्कादायक पराभव तिच्या वाट्याला आले. जेनिफर कप्रियतेने तिला ऑलिम्पिकला हरवली. मध्येच एकदा येलेना डोकीकने तिला विम्बल्डनला पहिल्याच फेरीत हरवली. पहिल्याच फेरीत पराभूत होणारी पहिलीच गतविजेती ती ठरली . पण ते तेवढंच. असे उतार चढाव येतातच.

सगळ्यात भन्नाट आणि धक्कादायक होती ती तिची निवृत्ती.

लिंडसे डेव्हनपोर्टने आधी काहीवेळा तिला हरवली होती. त्यावर्षीचं फ्रेंच ओपन स्टेफीने काढलं होतं. पण विम्बल्डनला डेव्हनपोर्ट तिला भारी पडेल अशी भीती होतीच. आणि झालंही तसच.

सहा फुटाच्या दणकेबाज डेव्हनपोर्टने स्टेफीला तीन सेटमध्ये पराभव दाखवला आणि स्टेफी तडकाफडकी निवृत्त झाली. येणारा काळ आपला असेल का? हा तिला प्रश्न होता. तिशी जवळ आल्यानंतर नव्या दमाच्या मुलींसमोर आपण टिकू का अशी तिला शंका होती.

आणि ती अत्यंत रास्त होती.

कारण त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे २००० साली व्हीनस विलियम्सने विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन काढली आणि पाठोपाठ सेरेना आली. अजून या बहिणी थांबत नाहीयेत. अजून खेळत बसली असती तर दमलेल्या थकलेल्या स्टेफीचा यांनी पालापाचोळा करायला घेतला असता.

मला आपल्याकडचे सुपरस्टार लोक आठवले. प्रत्येक खेळात वैयक्तिक विक्रमापुढे संघहित कुर्बान करणारी आपली निवड समिती आठवली.

बोरिस बेकरशी स्टेफी लग्न करेल असं अनेकांना वाटे. कारण दोघेही जर्मन. हिने एकेकाळचा गयागुजरा, इतका, की वाट्टेल त्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये असल्याने विम्बल्डनला प्रवेश नाकारला गेलेला आणि नंतर खूपच सुधारलेला आंद्रे अगास्सी निवडला.

 

Andre-Agassi-Steffi-Graf-inmarathi
Tom Wargacki/WireImage

 

त्यालाही ब्रुक शिल्डपेक्षा ही जास्त शोभून दिसली. त्यानेही पुढे ग्रँडस्लॅम पूर्ण करून मध्येच ऑलिम्पिक पदक मिळवलं. अगदी पार राफेल नदालशीही तो झुंजला.

 

steffi graph andre agase inmarathi

 

शांत, कुठेच चर्चेत नाही, अत्यंत सभ्य वागणूक असणाऱ्या स्टेफी ग्राफने वयाच्या पन्नाशीत प्रवेश केला. आणि –

याला हवं तर कोणी वर्णवादी किंवा वंशवाद म्हणा, With all due respect to Serena and Venus, पण स्टेफी ग्राफ नंतर गेल्या २० वर्षांत मुलींची टेनिसची संपूर्ण मॅच मी तरी बघितली नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?