' पुरुषांच्या वखवखलेल्या वासनेतून उभी राहिलेल्या भारतीय 'स्टंट-वूमन'ची कहाणी

पुरुषांच्या वखवखलेल्या वासनेतून उभी राहिलेल्या भारतीय ‘स्टंट-वूमन’ची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गीता टंडन ही भारताची पहिली stuntwoman. तिची ही कामगिरी प्रशंसनीयच आहे. पण तिच्या हसतमुख चेहऱ्यामागे लपलीये तिची संघर्षकथा. ऐकूयात तिच्याच शब्दात:

ती सांगते,

वयाच्या १५ व्या वर्षी माझं लग्न झालं. माझी आई मी दहा वर्षांची असतानाच वारली आणि माझे वडील उध्वस्त झाले. त्यांच्या एकट्यावर आम्हा चार भावंडांची जबाबदारी येऊन पडली.

आजूबाजूच्या लोकांनी वडिलांना सांगायला सुरुवात केली की मुली मोठ्या झाल्या आहेत, त्यांच्या लग्नाचं बघायला हवं. लग्न माझं आयुष्य चांगल्या तऱ्हेने बदलून टाकेल असं मला वाटत होतं.

मला वाटलं होतं की मला माझ्या स्वतःच्या गोष्टी मिळतील, मला स्वतःला आमच्यासाठी जेवण बनविता येईल, पोट भरेल इतकं अन्न मिळेल.

मला माझ्या सासु सासऱ्यांचं पहावं लागेल याबद्दल मला काहीच वाटलं नाही कारण स्वतःच्या घरी सुद्धा मी झगडतच होते.

माझ्या वडिलांनी शेजारपाजाऱ्यांच्या सांगण्यावरून एका सधन घरातील मुलगा माझ्यासाठी वर म्हणून शोधला. ठरल्यापासून दोन दिवसांतच माझं लग्न झालं. तेव्हा मी फक्त १५ वर्षांची होते.

मला संभोग(sex) वगैरे बद्दल काहीच माहीत नव्हते आणि खरे तर मला त्याची भीती वाटायची.

कारण ते काय करतात हे मला आई लवकर गेल्यामुळे कोणी सांगितलंच नव्हतं. पण तरीही आईशिवाय वाढूनही काय चूक काय बरोबर हे मला कळत होतं.

माझ्या सासरची माणसं माझ्या नवऱ्याला मला आणखी त्रास द्यायला प्रवृत्त करायची. माझा नवरा रोज रात्री माझ्याबरोबर वाईट वागायचा. तो रात्री २ वाजेपर्यंत दारू प्यायचा, बरोबर काहीतरी खात बसायचा, दारू संपली की प्लेट भिंतीवर भिरकावून द्यायचा. त्याचा अर्थ माझं झालंय, आता सगळं साफ करून घे असा असायचा.

 

 

मी चिडून त्याला म्हटलं की मी तुझी नोकर नाही तू केलेली घाण साफ करायला, तर मला म्हणायचा मग कशाला आणलय तुला लग्न करून या घरात?

एके दिवशी सकाळी मी माझं आवरत असताना माझी सासरची माणसं आमच्याकडे आली.

ती माझ्या नवऱ्याशी तावातावाने काही बोलत होती. त्यांना आमचा राहता फ्लॅट हिरावून घ्यायचा होता. त्याच्या आईने त्याला सांगितले, तुला एका मुलीला सांभाळता येत नाही ? तिच्यावर अत्याचार कर. बघू तिच्या घरचे काय करतात ते.

त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी तो माझ्या जवळ यायला लागला आणि मी घाबरले. संध्याकाळचे ७ वाजले होते. त्याने भरपूर दारू प्यायली होती. त्याने मला थोबाडीत मारली आणि माझे केस ओढायला लागला.

त्यानंतर दर दिवशी तो मला विवस्त्र करायचा. तरीही मी शांत राहिले तर मला चावायचा.

त्याला मला घरातून बाहेर काढायचे होते. पण मी त्याला ठणकावून सांगितलं होतं काहीही झालं तरीही मी हे घर सोडणार नाही.

मला असं वाटलं होतं की मला दिवस गेले मूल झालं तर हा मला जबरदस्ती करणार नाही. पण प्रसूतीच्या तिसऱ्या महिन्यातच त्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली.

त्याने मला सगळ्या पद्धतीने त्रास देऊन झाला. मला गॅस सिलेंडरने मारण्यापर्यंत त्याची मजल गेली. मी जेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट राहिले तेव्हा त्याने एकदा माझं डोकं सहा ते सात वेळा भिंतीवर आपटलं.

मला गरगरल्यासारखं झालं. मी घरातून बाहेर पडून रिक्षाने जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल सगळं ऐकून घेऊन काहीच न करता मलाच माझ्या बहिणीच्या घरी किंवा इतर नातेवाईकांच्या घरी जाऊन राहण्याचा सल्ला दिला.

मग नवऱ्याशी काही संबंध सुधारता येताहेत का ते स्वतःच बघ असे मला सांगितले. त्याचा काहीच फायदा नव्हता. मी अजून त्याच्यासोबत राहिले असते तर त्याने मला अत्यंत क्रूरपणे मारून टाकले असते.

 

domestic-violence-inmarathi

हे ही वाचा – एक विलक्षण स्त्री, जिचा पुनर्जन्म झालाय अशी ग्वाही महात्मा गांधींनी दिली होती

त्या क्षणाला मी ठरवले की स्वतःला सिद्ध करायचे. मी परत जाऊन नवऱ्याला सांगितले की मी घर सोडून जाते आहे. तो चिडला, अंगावर धावून गेला. पण मी पळून जाण्यात यशस्वी झाले. माझा नवरा हातात चाकू घेऊन माझा पाठलाग करत होता.

मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचले. तिच्या घरी पोचल्यावर तिचा नवरा मला म्हणाला की तू इथे राहू शकतेस. तू मला बहिणीसारखीच आहेस. त्यांनी मला त्यांच्या पंखाखाली घेतले. गेल्या काही वर्षांत हे शब्द माझ्या कानावरच पडले नव्हते.

पण हे सुखदेखील माझ्या नवऱ्याने फार काळ मला लाभू दिले नाही. त्याने माझ्या मेहुण्याची रिक्षा जाळली. त्यामुळे मला त्यांच्या घरातून बाहेर पडावे लागले.

त्यानंतर मी एका गुरुद्वारात जाऊन पोचले. तिथल्या धर्मोपदेशकाला भेटले आणि त्यांना मला कुठे रहायला जागा मिळू शकेल का असे विचारले. त्यांनी मला गुरुद्वारात राहण्याची परवानगी दिली. मी तिथे माझ्या मुलांसोबत पाच दिवस आसरा घेतला.

मला झोपायला एक चटई आणि पांघरायला एक ब्लँकेट देण्यात आलं. आम्ही गुरुद्वारात देण्यात येणारे अन्न आणि दूध यांवर उदरनिर्वाह करत होतो.

मला त्यांच्या पोटापाण्याची काहीतरी सोय बघायला हवी याची जाणीव होत होती. मला त्यांना एक हक्काचे छप्पर द्यायचे होते. त्याचे भाडे भरण्यासाठी पैसे हवे होते. त्यासाठी मला कमवायला सुरुवात करणे गरजेचे होते.

माझा नवरा मला म्हणायचा,

“तू स्वतःच्या जगण्यासाठी काहीच करू शकणार नाहीस. तू काही फार शिकलेली नाहीस. तू फारतर डान्स बारमध्ये नर्तकी म्हणून काम करू शकतेस नाहीतर एखाद्याची रखेल म्हणून राहू शकतेस.”

पण मी असं काही करणार नाही आणि कष्टाने मुलांना वाढवीन हे माझं पक्कं होतं.

तिथे मला एक बाई भेटली जिने मला तिच्या घरी घरकामात मदत करायला सांगितली. तिनेच मला एक भाड्याचं घर सुचवलं. तिथे पाणी नव्हतं आणि वीजसुद्धा. पण मी तिथे रहायला तयार झाले.

 

Geeta-tondon-inmarathi

 

काही दिवसांनी तिने मला विचारले, मी पैसे कमवण्यासाठी काय करू शकते? मी तिला म्हटलं, मी चार घरांमध्ये स्वयंपाकाची कामं घेऊ शकते. त्यातून मला कुटुंबासाठी चांगले उत्पन्न मिळवता येईल.

पण तिने मला एखाद्या पुरुषाची रखेल बनण्याचा मार्ग सुचवला, जेणेकरून तो माझ्या मुलांची काळजी घेईल. मला माझ्या नवऱ्याचे शब्द आठवले.

मी तिला नकार तर दिलाच आणि तिला सांगितलं हा पर्याय माझ्यासमोर यापुढे कधीच ठेऊ नको. मी लगेचच ते घर सोडलं आणि पुन्हा माझा मुक्काम बहिणीच्या घरी हलविला.

काही दिवसांनी माझ्या बहिणीने एका खानावळीत माझ्यासाठी स्वयंपाकीची जागा सुचविली. मला रोज पाचशे पोळ्या करण्याचे काम मिळाले. त्याने मला महिन्याचे १२०० रुपये देण्याचे कबुल केले. काहीही पुढचा विचार न करता मी हो म्हटलं.

मी सकाळी २५० आणि संध्याकाळी २५० अशा दिवसभरात ५०० पोळ्या करायचे. जाताना खानावळीतलेच काही अन्न दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी मी घेऊन जात असे.

काही काळाने मी भाड्याच्या नवीन घरात रहायला गेले. मी खानावळीत काम करणेही बंद केले.

इथे आल्यावर मला नवीन मैत्रिणी मिळाल्या. मी त्यांना रोज चांगले कपडे घालून कामावर जाताना पहायचे. मी एकदा त्यांना विचारलं त्या इतक्या तयार होऊन रोज कुठे जातात? त्यांनी मला सांगितले की त्या मसाज करायला पार्लरमध्ये जातात आणि त्यांना कामाचा मोबदलाही चांगला मिळतो. मी त्यांना मला काम मिळवून द्यायला सांगितलं आणि त्या तयारही झाल्या.

मसाज पार्लरचे सत्य

दुसऱ्या दिवशी, मी पार्लरमध्ये गेले.. तिथे त्यांनी माझी ओळख एक मोठ्या बाईशी करून दिली. तिने मला विचारले की मला मसाज कसा करतात याची माहिती आहे ना? मी तिला हो म्हटले.

ती मला ८००० रुपये द्यायला तयार झाली. मी त्याक्षणी जॉब करायला तयार झाले. तेव्हाच मी पाहिले आत येणारं एक गिऱ्हाईक अत्यंत गलिच्छ माणूस होता. मला काहीच समजलं नाही आणि मी विचारलं, आपल्याला पुरुषांनाही मसाज करावा लागतो का?

तिथल्या एका मुलीने मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. तेवढ्यात एक मुलगी आतून हुंदके देत बाहेर आली. तिचं गिऱ्हाईक माझ्यासमोरून बाहेर गेलं. ती रडतच म्हणाली की त्याने तिला शरीरसंबंधांसाठी विचारले.

 

gurgaon-massage-inmarathi

 

माझ्या अंगावर काटा आला. मला कळून चुकलं की ते नावाला पार्लर होतं. तिथे अश्लील धंदे चालायचे. मी त्याक्षणी तिथून पळ काढला.

माझ्या मुलांच्या काळजीने मला रडू आवरत नव्हतं. त्या रात्री मी देवाकडे प्रार्थना केली की मला माझं शरीर विकायला लावू नको आणि भीक मागायला लावू नको. हे सोडून मी काहीही करायला तयार आहे.

मी माझ्या वडिलांना माझ्यासाठी नोकरी शोधण्यास सांगितली. ते लोकांच्या घरी भक्तीरस असलेले धार्मिक कार्यक्रम आयोजित करत.

त्यांनी मला त्यातल्या एकाचा नंबर दिला. योगायोगाने त्यांचा एक डान्स ग्रुप होता. त्यांनी मला त्या ग्रुपमध्ये येण्यास सांगितले.

त्या नृत्यांगनांना पैसे दिले जात. शिवाय स्नॅक्स आणि जेवण मिळत असे. मी ही संधी घेतली. ते मला प्रत्येक कार्यक्रमाचे ४०० रुपये देत जी माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती.

एका कार्यक्रमात मी माझ्या एका मैत्रिणीला भेटले. तिने मला सांगितले की तिची आणखी एक मैत्रीण माझ्यासारखीच दिसते. ती चित्रपटात धाडसी दृश्य (stunts) करते. मला ते आव्हानात्मक वाटले. तिच्या मदतीने मी या क्षेत्रात पाऊल टाकले.

आम्ही लडाखला गेलो. त्यांनी मला fire body suit घालायला दिला. आणि त्यावरून costume दिला. आणि त्याला आग लावली. त्या आगीच्या झळांनी माझा चेहरा भाजला. पण माझ्यावर उपचार झाले.

मी घरी आल्यावर माझी मुलं आणि भावाने मला असं धोकादायक काम करण्याबद्दल टोकले. पण मी आता मागे फिरणार नव्हते. आणि मी एकामागोमाग एक कामे घेत गेले.

त्या बळावर मी माझ्या मुलांना चांगल्या शाळेत घातलं. आणि त्यांचं आयुष्य सुधारलं.

आज मी माझ्या हिमतीवर ठिकाणी येऊन पोहचले इथे पोचायला कोणत्याही पुरुषाची मदत घ्यावी लागली नाही. बाईने प्रत्येक वेळेस दुय्यम असायची गरज नाही. तिने स्वतःनेच तिचा आधार बनायला हवं.

 

geetha-inmarathi

 

गीताची गोष्ट ही हिम्मत आणि शौर्याची गोष्ट आहे. गीता अशी व्यक्ती आहे जी अन्यायापुढे झुकली नाही. जिने हालअपेष्टा आणि अत्याचार आपल्या आयुष्यातून वजा केले. जिने कामाला देव मानलं. जिने स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला सांगितला. स्वातंत्र्य ही कवीकल्पना नाही.

स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहता येणं. एका कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या मुलीचा stunt woman पर्यंतचा प्रवास आपल्याला थक्क करून सोडतो.

गीता ही एकमेव stunt woman आहे जिने कमीत कमी प्रयत्नांत कार chases यशस्वी केले आहेत, आणि ते देखील कमीत कमी ट्रेनिंगमध्ये.

===

हे ही वाचा – म्हटलं तर “तसली” बाई, म्हटलं तर २० भाषांमध्ये रसाळ अभंग रचणारी महान स्त्री!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?