' भयाण विनोदाची 'पगडी' : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची फेसबुक पोस्ट

भयाण विनोदाची ‘पगडी’ : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची फेसबुक पोस्ट

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सारासार विवेक असलेला नेता या विशेषणाला शरद पवार साहेब शेवटचे कधी जागले हा आता नक्कीच चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. तसंही मोदी सरकार आल्यापासून भल्याभल्यांनी पायाभूत समजूतदारपणाला मूठमाती दिलीच आहे.

‘जाणता राजा’ अशी उपमा मिळालेले पवार लोकांची जात आणि धर्म यांच्याबद्दल फारच जाणतेपणा ठेऊन असतात.

मागे ‘राजू शेट्टींच्या आंदोलनाने शेट्टी समाजाच्या साखर कारखान्यांना अधिक फायदा होतो’ असा भन्नाट शोध पवारांनी लावला होता. काहीच महिन्यांपूर्वी भाई वैद्य यांचा एका जाहीर समारंभात सत्कार करत असताना भाई वैद्य हे आडनावाने ‘वैद्य’ असले तरी त्यांच्या आडनावावर जाऊ नका, ते सीकेपी आहेत इतका खुल्ला बार पवारांनी उडवून दिला होता.

 

sharad pawar marathipizza
indianexpress.com

संभाजीराजे भोसले यांची राज्यसभेवर निवड झाल्यावर “आजच्या काळात पेशवे छत्रपतींना नेमू लागले आहेत” अशी मजल पवार साहेबांनी मारली होती. उसाच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टीची जात सुध्दा जाहीरपणे त्यांनी काढली. असे एक ना अनेक बरेच किस्से पवार साहेबांचे आहेत.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये पवारांचे साथीदार छगन भुजबळ यांनी तर कहरच केला. “निवडणुकांमध्ये जर आम्हाला मत दिलं नाहीत तर ‘फडणवीस’, ‘जावडेकर’ ‘गडकरी’, ‘जाजू’ अश्या आडनावांच्या लोकांच्या हातात सत्ता जाईल’ असा थेट इशारा भुजबळांनी दिला.

प्रश्न ‘चालेना कुटं अन बडवले भटं’ या मानसिकतेचा नाही. आपला राग कुठे ना कुठे काढणं ही अनेकांची रीत असते. प्रश्न आहे तो एकेकाळचा आणि आजच्याही जमानातल्या पुरोगाम्यांचा पुढारी असलेला मुरब्बी नेता इतका सैरभैर होतो त्याचा.

पवार साहेबांचा कौतुक वाटतं. मागे केंद्रात सरकार नवे आल्यावर जातीय दंगली वाढल्या असं ते म्हणाले होते. महाराष्ट्रात काही गटांना आता आपलंच राज्य आहे असं वाटू लागलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सत्ताबदलासाठी या दंगली वाढतील असा त्यांचा शोध होता. ए सी पी प्रद्युम्न ला जमला नसता इतका भारी शोध साहेबांनी उसापासून इथेनॉल काढावं तसा काढला.

पवार साहेब सलग चार वर्षे, “वीज,, पाणी, शेतकरी, कृषी आयात -निर्यात, शेतीमाल” अशा विषयांवर बोलतात. पण निवडणूक जसजशी जवळ येत चालते तसे त्यांच्या भाषणात काही उल्लेख बरोब्बर होतात. उल्लेख वारंवार येऊ लागतात. पण सत्तेविना गेल्या चार वर्षांमध्ये असे उल्लेख वारंवार होत आहेत.

 

sharad_pawar_inmarathi
indianexpress.com

राष्ट्रवादीच्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये पुणेरी पगडीऐवजी महात्मा फुले यांची पगडी (की पागोटे?) देण्याचे पवार साहेबांनी सूतोवाच केले.

याचा अर्थ स्पष्ट आहे. महात्मा फुले यांच्या सारखे पागोटे हा बहुजन अवतार असेल तर पुणेरी पगडी हा काय प्रकार आहे? हे सर्वांना ठाऊक आहे. पण मुळात पुणेरी पगडी हा प्रकार अभिजन नाही. या पगडीला सामान्यतः गोपाळ कृष्ण गोखले पगडी असं म्हणतात. ह्या पगडीचा त्याग म्हणजे गोखले यांच्या विचारांचा त्याग आहे. गोखले हे काँग्रेसचे एक प्रमुख मवाळ नेते होते.. काँग्रेसला बुद्धिमत्ता पुरविण्याचे काम ज्यांनी ज्यांनी केले त्यात गोपाळ कृष्ण गोखले हे आघाडीचे नाव आहे.

भारतीय संसदीय परंपरेत अर्थसंकल्पावरची भाषणे, सरकारवर विधायक टीका क्वचित प्रसंगी संसदेत सभात्याग या लोकशाहीच्या परंपरा गोखल्यांनीच सुरु केल्या. आज पवारांना त्यांची पगडी खटकली यावरून पवारांची लोकशाहीप्रती आणि मूळच्या काँग्रेसप्रती असलेली ‘श्रद्धा’च दिसून येते.

शरद पवारांबद्दल अनेकांना कमालीचा आदर आहे. अधूनमधून त्यांची असणारी विधाने (उदा: टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी हे विधान), प्रफुल्ल पटेलांनी मागेच केलेलं पवारांच्या पंतप्रधान होण्याबाबतचं विधान ह्या गोष्टींचा कोणी फॅन होण्याचीही हरकत नाही. शेतकरी आंदोलनाचा आवाका किती यावरून वाद होतील पण ते आंदोलन होत यात वादच नाही. ह्यावरून शरद पवारांची सतत काहीतरी करायची ऊर्जाच दिसून येते.

अथक अविरत कार्यरत असणारे शरद पवार हे मशीनपेक्षा जास्त क्रियाशील आहेत. माझा राजकारणाचा अनुभव पवारांएवढा नाही, पण तरीही काही गोष्टी मांडायचा मोह आवरत नाही.

 

sharadpawarpagdi-inmarathi
inmarathi.com

शरद पवार पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात असा अनेकांना विश्वास आहे. जो असणं योग्यच आहे, आणि पवारांच्या कुवतीबद्दल आणि योग्यतेबद्दल शंकाच नव्हती. २००३ साली एका कार्यक्रमात कै. आर आर पाटील म्हणाले होते, आमचा पक्ष लहान आहे पण आमचा नेता मोठाच आहे, त्यामुळे आम्हाला कमी समजू नका. त्यांनी भाजपच्या प्रवक्त्याला हे सांगताना “अब की बारी अटलबिहारी” चा दाखला दिला होता. १९८४ साली दोन जागा असताना भाजपने हे ध्येय ठेवलं होतं. पुढे ते तीनदा साध्य झालं.

पण पवारांची वाटचाल भाजपासारखी नाही. वागणूक आणि स्वभाव यात फरक असतो. वागणूक तात्कालिक असते आणि स्वभाव मात्र सार्वकालिक असतो. “साहेबांचं धोरण हे मेंदूला लकवा मारणारं असतं” असं पवारांचे अनुयायी सांगतात. याचा अर्थ पवारांचं राजकारणही कोणी समजू नये असा अर्थ होत नाही.

१९७८ मध्ये पवारांनी पुलोदचा प्रयोग केला. पुढे लोकशाही आणि पुरोगामित्वाचा कंठाळी जागर करणाऱ्या काँग्रेसने पवारांना अक्षरशः धक्के मारून पाडलं आणि सरकार बदललं .

पण यातून एक गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे अडचणीत आल्यावर पवारांनी काँग्रेस सोडली. त्यांनतर पवारांनी १९८७ मध्ये संपूर्ण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. काँग्रेस जोरावर तेंव्हा पवारसाहेब काँग्रेसमध्ये. अनेकांना ही मोठी चूक वाटते. कारण त्यानंतर पुढे जे काही संक्रमण देशात झालं त्यात पवारसाहेब नक्की पंतप्रधान बनू शकले असते. व्ही पी सिंग, चंद्रशेखर, दावेगौडा आणि गुजराल यांच्यापेक्षा हा नेता नक्कीच गुणी होता.

 

sharad-pawar-marathipizza
indiatimes.com

पुढे १९९६ ते ९९ साहेबांनी वाट बघितली. आणि १९९९ साली राज्यात किंवा केंद्रात काँग्रेस येत नाही म्हटल्यावर वेगळी चूल मांडली. १९९९ साली बदलते वारे ओळखत पवारांनी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसशी संधान सांधलं आणि १५ वर्ष सत्ता उपभोगली. 2014 साली मोदी लाट ओळखून काँग्रेसची धूळधाण आधीच लक्षात घेत वेगळा घरोबा केला. एकूणच विश्वासार्हता आणि पवार यांचा घटस्फोट केंव्हाच झाला आहे. म्हणूनच त्याचं वागणंही दिवसेंदिवस वेगळं होत चाललं आहे.

त्यामुळेच नक्षलवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेली धमकी पवारांना अजिबात गंभीर वाटत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?