यंदा राष्ट्रपती भवनात रमझानची इफ्तार पार्टी होणार नाही, आणि त्याचं कारण फारच चांगलं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना हा पवित्र महिना असतो, याच महिन्यात रोजा म्हणजे उपवास ठेवला जातो. जेव्हा सकाळी भल्या पहाटे उपवास धरला जातो त्या वेळेला सहेरी असं म्हटंल जातं आण जेव्हा उपवास सोडला जातो. त्या वेळेला इफ्तार किंवा इफ्तारी असं म्हटलं जातं.

तुम्ही म्हणाल की याच्यात नवीन ते काय आम्हालाही या गोष्टी माहिती आहेत.

परंतु तुम्हाला त्यातली इफ्तारी नावाची गोष्ट अगदीच परिचयाची असेल यात शंका नाही कारण दरवर्षी इफ्तारी ही कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतेच.

 

iftar-inmarathi
rediff.com

दरवर्षी राष्ट्रपती भवनात होणारी इफ्तार पार्टी यंदा होणार नाही. याचं कारण म्हणजे जेव्हा रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी जाहीर केलं की राष्ट्रपती भवनात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत. मग त्यामध्ये कुठलाही धर्म असो वा पंथ कोणताही धार्मिक कार्यक्रम राष्ट्रपती भवनात होणार नाही.

म्हणूनच यंदाची इफ्तार पार्टी देखील रद्द करण्यात आली आहे.

सर्वसामान्य जनतेच्या करावर सर्व सरकारी यंत्रणा चालत असतात मग त्यात राष्ट्रपती भवन देखील येतं त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा हा कोणत्याही धार्मिक कारणांसाठी खर्च करणे चुकीचे आहे.

त्यामुळे यावर्षीपासून राष्ट्रपती भवनात होणारी इफ्तार पार्टीसकट सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, परंतु राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची कोणती सक्ती लागू नाही. शिवाय दरवर्षीप्रमाणे राष्ट्रपती सर्व धार्मिक सणांना शुभेच्छा मात्र देतील. असं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

महात्मा गांधी असल्यापासून सरकारच्या वतीनं दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत असे.

महात्मा गांधी उपवास आणि अधात्म यांचं महत्व नेहमीच सांगत आले त्यामुळे रोजा आणि रमजानबद्दल महात्मा गांधींना नेहमीच आपुलकी आणि आदर वाटत आला. आणि त्यामुळेच ते इफ्तार पार्टीचं आयोजन दरवर्षी करत असत.

महात्मा गांधीनंतर नेहरूंनी देखील इफ्तार पार्टींचं आयोजन करणं चालू ठेवलं परंतु ते सरकारच्या नाही तर स्वत:च्या वैयक्तीक पातळीवर करत असत आणि त्यांचे काही मोजकेच मित्र या पार्टीसाठी येत असत.

 

Mass-iftar-inmarathi
deccanchronicle.com

याच्या नंतर मात्र इंदीरा गांधी इफ्तार पार्टी हेतुपुरस्सर आयोजित करू लागल्या इफ्तार पार्ट्यांमध्ये मुस्लिम नेत्यांना बोलावलं जाऊ लागलं आणि राजकीय मुद्दे देखील चर्चिले जाऊ लागले. आपली व्होट बँक इंदिरा गांधींच्या चांगलीच लक्षात आली होती.

आणि हीच व्होट बँक कुणा इतर पक्षाच्या हातात जाऊ नये म्हणून त्यांनी नंतरच्या काळात तर अगदी जंगी इफ्तार पार्ट्यांचं आयोजन केलं. ज्यामध्ये विविध मुस्लिम संघटनांचे नेते, धर्मगुरू, छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांचे नेते हजेरी लावत असत.

आणि हाच पायंडा पुढेही पडला. दरवर्षी जंगी इफ्तार पार्ट्या आयोजित करून केवळ काही मोजक्या लोकांना ज्यांच्याकडे एकगठ्ठा मते आहेत अशाच व्यक्तींना इफ्तार पार्ट्यांमध्ये बोलावलं जायचं.

काँग्रेसनं ज्या काही वाईट प्रथा आणि पायंडे पाडून ठेवलेत त्यातीलच एक म्हणजे सरकारी पैशांवर इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणं होय. या इफ्तार पार्ट्यांच्या आयोजन करण्याच्या सत्रातून भाजप तरी कसा सुटेल.

एनडीएच्या काळात देखील इफ्तार पार्ट्यांचं आयोजन केलं जायचं खरं परंतु ही सवय मोडण्याचं काम तात्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीच केलं इफ्तार पार्टी असो किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रमाला होणाऱ्या खर्चाऐवजी तो पैसा त्यांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत स्वरूपात देण्यास सुरूवात केली.

आणि राष्ट्रपती भवनात होणारे कार्यक्रम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात थांबविले.

एपीजे अब्दुल कलाम यांच्या नंतर मात्र ही प्रथा पुन्हा सुरू झाली आणि यावर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अशा प्रकारच्या प्रथा कायमस्वरूपी बंद केल्या.

 

sonia-iftar-inmarathi
deccanchronicle.com

परवा महाराष्ट्रातील सह्याद्री अतिथि गृहात पार पडलेली इफ्तार पार्टीदेखील वादात सापडली होती परंतु ती संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंच या संघटनेनं आयोजित केली होती म्हणून वादाला जास्त तोंड फुटले नाही. नाहीतर इफ्तार पार्ट्या आणि वाद हे समीकरणच आजमितीला बनलंय.

केवळ आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि मतांच्या बेरजेसाठी इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणारे आयोजक आणि अशा पार्ट्यांमध्ये विजारीच्या नाड्या टाईट होईपर्यंत खाणारे तथाकथित मुस्लिम नेते हे केवळ दिखाव्यासाठी एखाद्या काजव्या प्रमाणे रमजानच्या महिन्यात बाहेर पडतात. आणि इतर दिग्गज नेतेसुध्दा वेळ पडेल तेव्हा टोपी, पगडी आणि फेटे घालून संधी साधतात.

यांच्या इफ्तार पार्ट्यांचं आयोजन कधी होतं आणि त्या कधी पार पडतात हे सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातूनच कळतं.

सामान्यांशी संबंध नसलेले “साहेब” आणि “दादा” उगाच गळ्यात पक्षाचा पंचा घालून आणि डोक्यावर टोपी घालून भूलवण्याचा प्रयत्न करतात.

राष्ट्रपती भवनाकडून घेतलेला निर्णय हा खरोखरंच चांगला निर्णय आहे. लोकांना लागलेल्या सवयींना खतपाणी न घालता त्या मोडल्या पाहिजेत. 

 

kovind-inmarathi
dnaindia.com

शेवटी जाता जाता एक किस्सा सांगतो, मी एकदा सहज घराच्या बाहेर पडलो तर एका बॅनरवर साहेबांचा टोपी घातलेला फोटो होता सोबत इफ्तार पार्टीचं भव्य आयोजन केल्याची जाहीरातही होती. मी विचारात पडलो की मी यांना कुठेतरी पाहिलंय. पण लवकर लक्षात येईना.

लक्षात याच्यामुळे येत नव्हतं की, मी त्यांना कुठल्या मशीदीमध्ये पाहिलंय याचा विचार करत होतो, पण नंतर लक्षात आलं की अरे यांना तर परवा आपण पलीकडच्या बॅनरवर पगडी घातल्याचं पाहिलयं. आणि मी त्यांना ‘सलाम वालेकुम’ घालून बॅनरच्या समोरून काढता पाय घेतला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?