'आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, तर चक्क मराठी माणसामुळे मिळते!

आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, तर चक्क मराठी माणसामुळे मिळते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नर्सरीत जाणाऱ्या छोट्या चिमुकल्यांपासून तर ऑफिसमधील बाबू-साहेबांपर्यंत कुणालाही विचारा, तुमचा आवडता दिवस कोणता? उत्तर ठरलेलं आहे, रविवार. कारण रविवार म्हणजे सुट्टीचा, आरामाचा… एकूणच सहकुटुंब ‘एन्जॉय’ करण्याचा दिवस.

सर्वसाधारणपणे रविवार हा आपल्याकडे सुट्टीचा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, कॉलेजेस, बँका, सरकारी कार्यालये वगैरे बंद असतात. बरीच खाजगी कार्यालयेही बंद असतात.

 

closed-on-sunday-inmarathi

 

सुट्टीचा दिवस “सन डे” म्हणजे रविवारच का असा प्रश्न कधी पडलाय? या सुट्टीचा इतिहास काय? ही सुट्टी कोणामुळे मिळाली ? कधीपासून सुरु झाली? असं कुतूहल कधी वाटतंय?

खरं तर, असे प्रश्न आपल्याला कित्येकदा पडतात. पण आपण त्यांचा पाठपुरावा करत नाही आणि आपल्या रोजच्या कामाच्या धबडग्यात ते मनातच विरुन जातात.

तसं पहायला गेलं तर साप्ताहिक सुट्टीलाही कुठेतरी धार्मिक पार्श्वभूमी आहेच असे दिसते. मोगल काळात भारतात शुक्रवारी सुट्टी असायची. सत्तेत ज्या धर्माचे प्राबल्य त्या धर्माच्या पवित्र दिवशी सुट्टी हा जगभर रुढ झालेला प्रघात असावा.

कारण मध्यपूर्वेतही शुक्रवारची सुट्टी असायची आणि पाकिस्तानात तर ती अजूनही असतेच. कदाचित या पवित्र दिवसाला “होली डे (Holy Day)” असे म्हणता म्हणता त्याचा “हॉलिडे (Holiday) झाला असावा.

 

happy inmarathi

 

सर्वसाधारणपणे ज्या देशांवर कधीकाळी ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. याचे कारणही मजेशीर आहे. सहा दिवसात सृष्टी निर्माण केल्यावर देवाने सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलमध्ये परमेश्वराने सृष्टी कशी निर्माण केली त्याचे वर्णन आहे.

पाश्चिमात्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असाच असतो आणि त्यामुळे सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात.

चर्चमध्ये रविवारी सकाळी सकाळी जाऊन प्रार्थना करतात. पाद्र्यासमोर (चर्चमधल्या फादरसमोर) उभे राहून कन्फेशन देतात म्हणजेच केलेल्या चुकांची माफी मागतात.

त्यामुळे या सुट्टीचा उपयोग चर्चमधील प्रार्थनांसाठी होईल त्यामुळे ख्रिश्चन धर्मानुसार रविवारची सुट्टी असावी असे ब्रिटिश अधिकार्‍यांच्या एका वर्गाचे मत होते. म्हणून ही रविवारची सुट्टी.

१८४४ मध्ये भारताचे तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून अधिकृतपणे जाहिर केला.

मात्र सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुट्टीचे शिल्पकार ठरले ते महाराष्ट्रातील नारायण मेघाजी लोखंडे, भारतीय कामगार चळवळीचे अग्रणी नेते. यंदाचा १० जून हा रविवारच्या सुट्टीचा १३० वा वर्धापन दिन होता.

 

ravi-inmarathi

 

त्याकाळी कारखान्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांना आठवड्यात हक्काची एकही सुट्टी मिळत नसे.

नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्‌स असोसिएशन स्थापन केली. ती भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. याच वर्षी लोखंडे यांनी पाच प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या.

१) कामाचे तास कमी करावेत.

२) कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी

३) जेवणासाठी किमान अर्ध्या तासाची सुट्टी मिळावी.

४) कामगारांचा पगार वेळेवर व्हावा. किमान गेल्या महिन्याचा पगार या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत व्हावा.

५) अपघातात सापडलेल्या कामगाराला नुकसान भरपाई आणि रजेचा पगार मिळावा. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन देण्यात यावी.

२४ एप्रिल १८९० रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर लोखंडे यांची मोठी सभा झाली आणि लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला.

या मोर्चाची दखल मिल मालकांना घ्यावी लागली आणि अखेर १० जून १८९० रोजी, म्हणजेच मागण्या समोर ठेवल्यावर तब्बल सहा वर्षांनी, मिल मालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुट्टीची मागणी मान्य केली.

हा दिवस भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस ठरला.

तर असे हे नारायण मेघाजी लोखंडे.

हे भारतीय कामगार पुढारी होते. स्वतःच्या नोकरीला लाथ मारून आपल्या कुटुंबाची उपासमार होणार हे दिसत असताना देशातील लक्षावधी स्त्री पुरुष कामगारांना सत्यशोधक समाजाच्या झेंड्याखाली आणण्याचे काम लोखंडे यांनी केले.

नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर. फुलमाळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. लोखंडे यांच्या पत्‍नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.

सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.’

 

narayan-inmarathi

 

तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले.

“मुकी बिचारी कुणी हाका” अशी बिचाऱ्या गरीब कामगारांची स्थिती होती. रात्रंदिवस काम केल्यावर सुद्धा अत्यंत किरकोळ पगार मिळायचा. या कामगारांना आठवडयाची सुटीही मिळत नसे आणि कुठल्या आरोग्यविषयक सुविधासुद्धा.

परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले.

त्यांनी बाँबे मिलहँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८९० रोजी स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते.

इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.

लोखंडे हे महात्मा फुलेनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.

 

mahatma-phule-inmarathi

 

इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामगार वर्गाची बाजू हिरिरीने मांडत असे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे.

सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली.

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला. याच दीनबंधूच्या १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अंकात लोखंडे यांनी गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आणि बालकामगार यांची संख्या देऊन त्यांच्याकडून किती काम करून घेतले जाते याची तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली होती.

त्यांनी “गुराखी” या नावाचे एक दैनिकही काढले होते.

 

narayan_meghaji_lokhande-inmarathi

 

मुंबईत १८९३मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.

ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी ‘मराठा इस्पितळ’ काढले.

परंतु दुर्दैवाने लोखंडे यांनाच प्लेगने गाठले आणि त्यातच ९ फेब्रुवारी १८९७ रोजी,वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचा अंत झाला.

अशा या महान सत्यशोधक व्यक्तिमत्त्वाला शतशः प्रणाम !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, तर चक्क मराठी माणसामुळे मिळते!

  • February 8, 2019 at 11:11 pm
    Permalink

    लय भारी

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?