टीव्हीवर दाखवले जाणारे ‘क्राईम शो’ आणि वाढत्या गुन्ह्यांचे अदृश्य कनेक्शन आहे का? समजून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

तुम्ही खून करताना कुणाला पाहिलयं का? किंवा चोरी करताना कुणाला पाहिलंय का? बलात्कार करताना किंवा विनयभंग करताना तरी पाहिलंय का?

तुम्ही म्हणाला काय माणूस आहे हा, सरळ सरळ अशा गोष्टी विचारतोय ज्याचा आमच्या जीवनाशी काही संबंध नाही किंवा आमच्या बापजाद्यांनीसुध्दा कधी असा विचार केला नाही.

पण मी म्हणेल तुम्ही हे सर्व पाहताय आणि आपल्या घरातील अबालवृध्दांना देखील दाखवताय. माझा पुढचा प्रश्न असाय की –

तुमच्या घरातील एखादा सदस्य ही कृत्ये करण्याची घर बसल्या ट्रेनिंग तर नाही ना घेत?

हा तर फारच गंभीर प्रश्न आहे.

परंतु आपण जे रोज टीव्हीवर पाहतोय ते क्राईम शो आपल्या घरात गुन्हेगारीचं वातावरण तयार करायला मदत तर करत नाही ना? याची खातरजमा प्रत्येकानं करायला हवी.

कारण, आजकाल टीव्हीवर दाखवले जाणारे क्राईम शो आणि त्यामधील गुन्ह्याच्या पध्दती आणि प्रत्यक्षात घडणारे गुन्हे यांच्यात बऱ्याच प्रमाणात साम्य दिसून येतंय. 

 

crime-inmarathi
india-forums.com

टीव्हीमध्ये दाखवले जाणारे गुन्हे हे अतिरंजकपणे दाखवले जातात, ज्याचा जास्त प्रभाव हा किशोरवयीन मुलांवर पडतोय.

मध्यंतरी दिल्लीत एका १३ वर्षाच्या मुलानं बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. उत्तर प्रदेशातून दोन किशोरवयीन मुली पालकांचा राग मनात धरून मुंबईत पळून आल्या होत्या.

दररोज कितीतरी लहान मुलं मुंबईला सिनेमात काम करण्यासाठी आणि हिरो बनण्यासाठी पळून येतात परंतु मुंबईला आल्यावर इथलं वास्तव हे वेगळंच असतं.

सिनेमा आणि मालिकांमधले हिरो हिरोईन घरदार सोडून मुंबईला पळून येतात आणि लगेच यशस्वी बनतात अशा प्रकारच्या काल्पनिक गोष्टींना ही मुलं भूलतात.

मुंबईत आल्यानंतर परत घरी जाऊ शकत नाहीत म्हणून इथल्या गुन्हेगारी जगतात सामील होऊन जातात.

कुणी वेश्याव्यवसायात तर कुणी अंमली पदार्थांच्या तस्करीसारखे गुन्हे करू लागतो. बालमनावर किंवा किशोर मनावर टीव्ही शो आणि चित्रपटांचा किती भयंकर परिणाम होतो हे आपल्याला वाढत्या गुन्हेगारीवरून लगेच लक्षात येईल.

टीव्हीमधील क्राईमचा एपिसोड तयार करायला किमान एक आठवडा लागतो, शंभरावर लोक तिथे रात्रंदिवस राबतात तेंव्हा एका एपिसोडची निर्मीती होते. त्यामध्ये कसलेले अभिनेते काम करत असतात.

हे सांगण्याचा उद्देश म्हणजे एखाद्या नकली गुन्ह्याची तयारी करण्यासाठी इतकी तयारी करावी लागते तर एखादा खरा गुन्हा करण्यासाठी किती तयारी करावी लागेल.

मालिकांमध्ये एका एपिसोडमध्ये हजारो रिटेक आणि कट असतात. एखादा खून केल्यानंतर मृतदेहाला सरळ पुरून झाल्यानंतरचा शॉट आपण पाहतो, किंवा केवळ चाकू उगारल्यानंतर पुढचा शॉट असतो मृत पावलेला व्यक्ती.

 

cid-adaalat-inmarathi
indianexpress.com

पण कल्पना करा, खऱ्या आयुष्यात असा एखादा गुन्हा करायचा असेल इथे रिटेक घेता येत नाही, कट मारता येत नाही, विल्हेवाट लावण्यासाठी वेळ घेता येत नाही, फिल्मीस्टाईलने पुरावे नष्ट करता येत नाहीत.

जितकी रंजकता मालिकेत दाखवली जाते तशा प्रकारे काहीच करता येत नाही. साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखाद्या मृतदेहाला गुपचूप पुरायचं असेल तर त्याची जागा?  बरं जागा जरी सापडली तर पाच फुट खोल आणि लांब खड्डा आपण खणू शकू का?

मालिकेत केवळ शेवटचा एकच फावडा मारल्याचं दाखवलं जातं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेंव्हा मालिकेत आरोपी जेरबंद केला जातो तेंव्हाच तो एपिसोड संपतो.

परंतु खऱ्या आयुष्यात मुख्य खेळ इथून सुरू होतो. आपल्या परिवाराला होणारा त्रास, कोर्टाच्या फेऱ्या पोलिसांचा त्रास  वेळ आणि पैशांचा अपव्यय. पर्यायानं अशा प्रकरणात बरेच सुशिक्षित आरोपी आत्महत्येसारखं पाऊलसुध्दा उचलतात.

खरंतर अशा प्रकारचा केवळ उहापोह न करता मालिकांमधील क्राईम पाहून गुन्हेगारी कशा प्रकारे वाढतीय आणि त्याचे दुष्परिणा काय होऊ शकतात अशा प्रकारचा एखादा काही मिनीटांचा एपिसोड त्या क्राईम शो लागूनच प्रसारित व्हायला हवा.

मालिका आणि सिनेमातील बोल्ड सीन पाहून बलात्कार आणि विनयभंगांसारखे प्रकार घडतात, परंतु असं केल्यानं त्याचे काय परिणाम होतीत हे दाखवणं देखील आज काळाची गरज बनलीय.

लैंगिक शिक्षणाबरोबरच लैंगिक छळाचे दुष्परिणाम देखील सांगीतले पाहिजेत. जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त बालगुन्हेगारी ही क्राईम शो, वेगवेगळ्या मालिका आणि सिनेमांमुळे वाढतेय.

 

adaalat-inmarathi
tellychakkar.com

भारत हे एक असं राष्ट्र आहे की तिथे बोलण्याची, ऐकण्याची, आचरणाची, वागण्याची पर्यायानं अभिव्यक्तीची इतकी मुभा आहे की त्याचा कशाप्रकारे गैरफायदा घेता येईल आणि त्याच्यामधून अर्थार्जनाच्या संधी शोधणारे नमूने आपल्याला भारतात मोठ्या प्रमाणात पाहाता येतील.

काही दशकांपूर्वी तर अनिल थत्ते नावाच्या व्यक्तीनं ‘बलात्कार कसा करावा’ नावाचं पुस्तक लिहीलं आणि एकच खळबळ माजली. त्या पुस्तकावर बंदी आली हा भाग वेगळा. परंतु याचा परिणाम काय होईल याची काळजी न करता ते पुस्तक लिहीलं गेलं.

तशाच प्रकारे आजकालचे क्राईम शो प्रसारित केले जातात. कोणतीही सामाजिक बांधीलकी न जपता सरळसोट पैसे कमावण्यासाठी कशीही दृश्ये चित्रित करून ती प्रेक्षकांच्या माथी मारली जातात. त्याच्या परिणामांचा विचार न करता.

मग अशावेळी प्रेक्षकांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे टीव्हीवर दाखवले जाणारे क्राईम शो आणि त्याचा गुन्हेगारी जगताशी काही अदृश्य कनेक्शन आहे की नाही याची चर्चा आपण अजून किती दिवस करणार.

बरं चर्चा करणार आणि निष्कर्ष शेवटी हाच काढणार की क्राईम शो आणि गुन्हेगारी यांचा संबंध आहेच. मग त्यावर काही उपाय आपण करणार आहोत की नाही. म्हणून अनेकवेळा आपण याविषयी चर्चा केल्या आहेत आता गरज आहे ती यावरील उपायांची त्यामुळे.

रोग जर समजला असेल तर त्यावर इलाज काय करता येईल यावर चर्चा करणं माझ्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?