चायनीज मालावर, भारत सरळ बंदी का घालत नाही? डोळे उघडणारं सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

चीनी सैन्य भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात. नुकताच चीनने NSG (Nuclear Supplier Group) मध्ये भारताला प्रवेश देण्याबाबत आपली भूमिका ठाम असल्याचे सांगत भारताला त्या ४८ देशांच्या यादीत समाविष्ट करणार नसल्याचे सांगितले. या बातम्या पाहिल्यानंतर सामान्य माणसाकडून एक प्रश्न हमखास येतो.. तो म्हणजे,

जर चीन भारताला NSG मध्ये समाविष्ट करून घेण्यास नकार देत असेल तर आपण चीनमधून होणारी अनेक वस्तूंची आयात बंद का करत नाही?

हा प्रश्न खरंतर वरचेवर अतिशय साधा सोपा आहे.

“चीन आपल्याला सहकार्य करत नाही तर त्यांच्याकडून माल आयात करून चीनचा आर्थिक फायदा का करून द्यायचा?”

असा सरळ प्रश्न! पण दोन्ही देश एकमेकाकडून करत असलेली आयात निर्यात, त्यावर अवलंबून असलेली त्यांची आर्थिक गणिते लक्षात घेतली तर हा प्रश्न वरवर सोपा वाटत असला तरी अत्यंत गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात येते.

 

india-china-inmarathi
indianexpress.com

ही गुंतागुंत नेमकी काय आहे ते थोडक्यात काही सोप्या उदाहरणांच्या आधारे समजून घेऊया…

भारताच्या उद्योगविश्वात सगळ्यात मोठे नाव म्हणजे “टाटा”! अगदी कारपासून ते जेवणात वापरण्याच्या मिठापर्यंत प्रत्येक गोष्ट टाटा कंपनी तयार करते. भारताच्या उद्योग क्षेत्राचा तुलनेने बरंच मोठा भाग टाटा कंपनीने व्यापला आहे. तूर्तास “टाटा मोटर्स” ही कंपनी विचारात घेऊ..

वाहन निर्मिती उद्योगाच्या क्षेत्रात टाटा मोटर्स सध्या अग्रेसर आहे. टाटा मोटर्स स्थानिक मार्केट वगळता इतर ठिकाणीही आपली वाहने निर्यात करते. आफ्रिका, चीन, अखाती देश याठिकाणी टाटा आपली वाहने निर्यात करते.

टाटा मोटारची तब्बल ८५ ते ९० टक्के कमाई ही भारताबाहेर निर्यात केल्या जाणाऱ्या वाहनांवर आधारित आहे. आणि या एकूण कमाईपैकी २९ टक्के म्हणजे सर्वात जास्त कमाई ही चीनमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या वाहनांतून मिळते.

त्यामुळे “भारत चीनमधून होणारी आयात बंद का करत नाही” असा भांड प्रश्न विचारण्याच्या आधी चीनने भारतातून होणारी आयात बंद केली तर भारताच्या आर्थिक क्षेत्रावर काय परिणाम होतील हा विचार केल्यास असे प्रश्न पडणार नाहीत.

 

tata-breakup-inmarathi
quora.com

आता हे झाले एक उदाहरण.. आंतरराष्ट्रीय राजकारण, त्यातील आर्थिक आणि लष्करी हितसंबंध लक्षात घेतले तरी चीनी वस्तूवर बंदी घालण्याची मागणी किती आततायी आहे हे लक्षात येते.

१. भारताने पाकच्या विरोधात जो सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा चीन पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे उभा राहिला नाही. न्युक्लीअर ग्रुप सारख्या अनेक मुद्द्यावर भारत चीन यांच्यात मतभेद असू शकतात, पण येत्या काळात भारत आणि चीन युध्द होणे शक्य नाही.

याचे आणखी एक कारण म्हणजे भारत आता “युएस लॉबी” मध्ये जवळजवळ समाविष्ट झाला आहे.

२. भारताने चीनी वस्तूंची आयात बंद केली तर त्याचा फटका चीनच्या तुलनेने भारताला जास्त बसणार आहे. आपल्या एकूण निर्यातीच्या २.३ % निर्यात चीन भारतात करतो, तर भारत आपल्या एकूण आयातीच्या १२.६% आयात चीनमधून करतो.

याउलट चीनची भारताकडून आयात त्यांच्या एकूण आयातीच्या % आहे आणि ही आयात भारताच्या एकूण निर्यातीच्या ४.२ % आहे.

या आकडेवारीवरून भारताने चीनी मालावर बंदी घातली तर त्याचा तोटा कुणाला होईल हे कळायला फार अवेळ लागणार नाही.

३. तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा, की दोन देशांचे आर्थिक हितसंबंध एकमेकात गुंतलेले असताना लष्करी सुरक्षेची खात्री देता येते. म्हणजे असं पहा, भारत आणि चीनमधल्या अंतर्गत व्यापाराची तुलना केली तर पाकिस्तानच्या व्यापारापेक्षा तो सातपट जास्त आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकाची निवड करण्याची वेळ येईल तेव्हा चीनला भारतासोबत असलेले हे आर्थिक हितसंबंध विचारात घ्यावे लागतील. त्याच्यातच चीनचा आर्थिक फायदा आहे हे चीन व्यवस्थित ओळखून आहे.

 

india-china-pak-inmarathi
pakistantoday.com.pk

४. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध जवळजवळ नसल्यात जमा आहे, त्यामुळे या दोन देशांमध्ये कटुता सहजपणे येऊ शकते. व्यापारी संबंध म्हणजे सीमेवरील परिस्थिती शांत ठेवण्यासाठी असलेले सर्वात प्रभावी अस्त्र आहे. अमेरिका आणि चीन, जपान आणि चीन या दोन देशांमध्ये सर्वच मुद्द्यांवर सहमती आहे असे नाही, किंबहुना मतभेद आहेत.

पण या दोन देशांसोबत आर्थिक हितसंबंध जोडलेले असताना त्यांच्याशी कटुता घेताना चीनला त्या मर्यादांचा विचार करावा लागतो..

५. चीनमधून आयात केलेल्या वस्तू स्वस्त आहेत हाही एक मुद्दा व्यापार बंद न करण्यासाठी पुरेसा आहे. मुळात चीनकडून वस्तू आयात करून भारत चीनवर उपकार करतो किंवा दया दाखवतो असे म्हणणे हेच अडाणीपणाचे आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या तगड्या स्पर्धेच्या या युगात, चीन भारतात वस्तू निर्यात करतो हे लक्षात घेतले तर असे म्हणावे लागेल की भारतात निर्यात केल्या जाऊ शकतील अश्या वस्तू बनवण्याची ताकद आणि गुणवत्ता चीनच्या उत्पादन क्षेत्रात आहे. किंबहुना ती त्यांनी विकसित केली आहे.

सीमेच्या पलीकडे आणि तेही शत्रूच्या देशात तयार झालेली वस्तू भारतीय ग्राहक विकत घेतो म्हणजे त्या वस्तूने त्याला भुरळ पडलेली आहे हे कुणीही सांगू शकेल.

भारतात सध्या वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोनिक वस्तूंपैकी किती वस्तू भारताने स्वतः बनवलेल्या किंवा चीन वगळता इतर देशांतून आयात केलेल्या असतात? इतर देशांतून आयात केलेल्या उपलब्ध वस्तूंची किंमत चीनी वस्तूंच्या तुलनेत किती असते?

कम्प्युटरशी निगडीत असलेले साहित्य जसे की मेमरी कार्ड्स, पेन ड्राईव, हार्ड डिस्क इत्यादी अनेक वस्तू विचारात घेतल्या तर चीनकडून होणारी आयात थांबवण्याच्या बाबतीत भारत किती अक्षम आहे ते दिसून येईल.

 

modi-jinping-inmarathi
india.com

भारताच्या पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचा नारा तर दिला, पण त्यांच्या स्वप्नातला डिजिटल भारत साकार होण्यासाठी जे हार्डवेअर लागते, ते अजूनही आपण चीनकडून निर्यात करतो!

आपली डिजिटल गरज भागवण्यासाठी चीनने गेल्या दोन दशकांच्या काळात किती मोठा हातभार लावला आहे ते पहा.. आणि हा हातभार लावूनही चीनने भारतावर, किंवा चीनमध्ये वस्तू निर्यात करून भारताने चीनवर उपकार केले असे म्हणणे ही अपरिपक्वता आहे.

एकमेकांच्या वस्तू आयात आणि निर्यात करणे हा शुध्द आर्थिक स्वार्थ आहे. हातभार लागणे हे त्याचे दुय्यम फळ आहे. भारताच्या आणि चीनच्या, दोघांच्याही बाबतीत.

याचाच अर्थ असा, की चीन भारताला सहकार्य करत नाही म्हणून भारत आणि चीन यांच्यात चालू असलेला व्यापार बंद का होत नाही, असा प्रश्न विचारणे हे आर्थिक हितसंबंध न समजल्याचे द्योतक आहे. आयात बंद करावी, निर्यातही थांबवावी अशा वल्गना भावनिक असतात म्हणून त्या ऐकायला बऱ्या वाटतात, पण त्यामागे इतके गुंतागुंतीचे अर्थशास्त्र दडलेले असते.

त्या अर्थशास्त्राला भावनेशी काही घेणेदेणे नसते, त्याला फक्त स्वार्थ कळतो. आणि हाच अनेक राष्ट्रांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग राहिला आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “चायनीज मालावर, भारत सरळ बंदी का घालत नाही? डोळे उघडणारं सत्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?