' अकबराच्या “सहिष्णु” प्रतिमेमागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे. – InMarathi

अकबराच्या “सहिष्णु” प्रतिमेमागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक/संकलक : नितीन बाळपटकी

===

सदर लेखावर प्रतिवाद आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page – वर पाठवावेत. अभिनिवेशरहित अभ्यासपूर्ण प्रतिवादास प्रसिद्धी आवर्जून प्रसिद्धी देण्यात येईल.

अकबराविषयी आजवर इतिहासकारांनी तोंड भरून स्तुतिपर लिहिलेले असल्याने प्रथमदर्शनी हे विश्लेषण कोणास न पटण्याचाही संभव आहे. पण तटस्थ दृष्टीने या इतिहासाचे अध्ययन केल्यास असे दिसते की,

अकबराला खऱ्या अर्थी निधार्मिक राज्य स्थापन करायचे नसून आपले महत्व वाढवायचे होते. त्याची साम्राज्यलालसा जबरदस्त होती.

अकबराच्या कृतीकडे पाहिल्यास असे दिसते की,

त्याने उदार धोरण स्विकारून राजपुतांच्या मुली पत्नी म्हणून स्विकारल्या. अंतःपुरात त्यांना स्वधर्मानुसार वागण्यास मोकळीक दिली.

जिझियासारखे जाचक कर रद्द केले. गोवध बंदी केली. मंदिरांचा विध्वंस थांबविला. हिंदूंना सैन्यात उच्च स्थान दिले. अनेक हिंदू चालीरिती त्याने उचलल्या.

कपाळी टिळा लावणे, सुर्योपासना करणे, विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करणे, धर्मसभा बोलावणे यासारख्या गोष्टींवरून त्याचे सहिष्णुतेन सिद्ध होते व त्यामुळे तो निश्चितच थोर ठरण्यास योग्य झाला असता.

 

tika InMarathi

 

पण कृतींचे मूल्यमापन एकेरी पातळीवरून करणे योग्य नसते. विशेषतः इतिहासकारांनी कृतींचे विश्लेषण हेतूंच्या संदर्भातच करून निर्णय दिले पाहिजेत. तरच इतिहास भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल.

ज्या शुद्ध मनाने कबीर नानक व काही सूफीपंथीयांनी उदारमतवाद स्विकारला, त्याच शुद्ध मनाने अकबराने तो स्विकारला नाही.

तर या कृतीमागे त्याचा हेतू साम्राज्याची लष्करी अस्थिर बैठक नष्ट करून ते स्थिरपद करण्याचा व आपल्या सर्वोच्च पदाला न भूतो न भविष्यति सन्मान प्राप्त करून घेण्याचा होता.

 

akbar-inmarathi
hindi.firstpost.com

 

अकबराच्या वेळी दिल्लीला मोगल व पठाण यांच्यामधे विलक्षण स्पर्धा असून पठाणांना दिल्लीची सत्ता मुळात आपली आहे व ती मोगलांकडून हिसकावून घेतली पाहिजे असे नेहमी वाटे.

याशिवाय तुर्की, पर्शियन, इराणी, मुसलमान हेही एकमेकांशी स्पर्धा करून आपले घोडे जमेल तसे पुढे दामटत. या अंतर्गत भांडणामुळेच दिल्लीच्या बादशहाला सदैव धोका उत्पन्न होई.

ही भांडणे अकबराच्या फार पूर्वीपासून सुरू होती.

महंमद घोरीच्या दिल्ली विजयापासून ते बाबरापर्यंत ( इ.स.११९३ ते १५२६ ) एकूण ३५ सुलतान गादीवर बसले. त्यापैकी १९ सुलतानांची मुसलमानांनीच हत्या करून तख्त आपल्या माणसांकडे घेतले ( संदर्भ: सं.चा.अ.पृष्ठ २७१).

बाबरानंतर हुमायूनला शेरशहाने हाकून लावले व दिल्ली आपल्या ताब्यात घेतली होती. त्याचेकडून हुमायूनने पुन्हा सत्ता काबीज केली. पण हे शल्य पठाणांना डाचत होते. अनुकूल संधीची वाट पाहत ते वरकरणी स्तब्ध होते.

 

humayun-InMarathi

 

या पार्श्वभूमीवर अकबराच्या उदार धोरणाचा विचार केल्यास असे स्पष्ट होईल की, पठाणांच्या संभाव्य उठावास तोंड देण्यासाठी स्वामिनिष्ठ राजपुतांना जवळ करून राज्य स्थिरपद राखण्याचा अकबराचा उद्देश होता.

सुदैवाने वातावरण त्याला बरेच अनुकूल होते.

हिंदू-मुस्लिम भेद मिटवण्यासाठी कबीरादी लोकांनी जे कार्य करून ठेवले त्याचा फायदा अकबराने, जणू काय आपण हेच धोरण पुढे चालू ठेवतो, असा देखावा उत्पन्न करून, पुरेपूर उचलला.

 

akbar Inmarathi

 

उदार धोरणाची घोषणा करून राजपुतांना आत्मसात करून घेतले व त्यायोगे साम्राज्याचा पाया मजबूत केला.

अर्थात अकबराचा हेतू शुद्ध नसला तरी त्याच्या कृती हिंदू-मुस्लिम ऐक्यास उपयुक्त ठरून त्या कार्याला गती मिळू शकली असती व इतिहास बदलला असता. पण अकबरने या ऐक्य प्रक्रियेस भलतेच वळण दिले.

विचारमंथनातून सर्वधर्मतत्वसार काढण्याचा वरकरणी उद्देश ठेऊन त्याने फत्तेपूर सिक्रीला इबादतखान्यात प्रदीर्घ धर्मचर्चा घडवून आणल्या. या कामी त्याने अबुल फझल या उदारमतवादी मुसलमानास हाती धरले.

या चर्चा घडवून आणण्यात त्याचा खरा उद्देश काय होता हे लवकरच लक्षात आले.

बदायुनीने या घटनांचे वर्णन आपल्या चरित्रात दिले आहे. तो स्वतः या धर्मचर्चांच्या वेळी उपस्थित होता. तो म्हणतो की –

या धर्मचर्चेत अकबरासमक्ष सर्व मुस्लिमधर्मतज्ञ उलेमांना अबुल फजलने प्रश्न विचारला की, ‘मुस्लिम धर्मानुसार मुसलमानास किती बायका करता येतील?’ काहींनी कुराणाच्या आधारे ‘चार’ असे उत्तर दिले. पण अकबरास तर चाराहून अधिक बायका होत्या!

त्यामुळे काहींनी अर्थच्छल मांडून “चौसष्ट” असे उत्तर दिले. यावरून उलेमांमध्ये वाद सुरू झाला. हा व असे अनेक अन्य मतभेदाचे प्रश्न उपस्थित करून या वादांचा अंतिम निर्णय कुणी द्यायचा असा मुद्दा स्वाभाविकच पुढे आला.

 

अशावेळी –

अकबराने हिंदुस्थानात इस्लामसंबंधी धार्मिक बाबतीत अखेरचा निर्णय देण्याचा अधिकार बादशहाला आहे असा लेखी कबुलीजबाब अबुल फजलचे मार्फत लिहून घेतला व उलेमांचे सर्वश्रेष्ठ पद आपल्याकडे घेतले.

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi3
sutori.com

 

तिकडे उदार धोरण स्विकारून हिंदूंच्या मनात आपल्याविषयी आदर उत्पन्न करून घेतला व मग “राजा विष्णूचा अंश असतो” या परंपरागत धर्मसमजुतीचा फायदा घेऊन स्वतःला “पुजार्ह” ठरण्याचा यशस्वी प्रयत्न केला. चरणतीर्थ देणे, प्रातःकाळी झरोक्यातून प्रजेस दर्शन देणे हे प्रकार सुरू केले.

अबुल फझल आपल्या ‘आयने अकबरी’ त लिहितो की,

‘अकबर नवसास पावतो अशी लोकांची दृढ श्रद्धा होती. म्हणून वृद्ध, तरूण,बाल,स्त्री-पुरूष आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नवस बोलत.

तरूणीही आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा मूल रोगमुक्त व्हावे यासाठी त्याला नवस करीत. लोकांची श्रद्धा अशी होती की, अकबर जे पाणी फुंकून देतो ते परिणामकारक आहे. ( संदर्भ: आयने अकबरी )

अशाप्रकारे दोन्ही धर्मांचे सर्वश्रेष्ठत्व आपल्याकडे घेतल्यावर आपण स्वतःच “धर्मसंस्थापक” आहोत हे त्याने ‘दिन – इ – इलाही’ हा नवा धर्म स्थापून प्रगट केले.

 

Dīn-al-ilahi-InMarathi

 

या नवीन धर्मानुसार – ईश्वराऐवजी बादशहाला आपले जीवित, स्वत्व, धर्म, मालमत्ता अर्पण करण्याची शपथ घ्यावी लागे – हे नोंद करण्यासारखे आहे. अबुल फझल हा या धर्माचा मुख्य पुरोहित होता.

सारांश, अकबराच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेपायी व स्वार्थी हेतूंमुळे हिंदू मुस्लिम समाजात सामंजस्य घडवून आणण्याच्या कार्यात अडथळा निर्माण झाला.

एवढेच नाही तर, त्यामुळे डिवचले गेलेले कर्मठ मुसलमान सावध झाले व हे सामंजस्य घडून येऊ नये म्हणून अकबराच्या मृत्यूनंतर संधी मिळताच ते दुप्पट जोमाने कार्यरत झाले.

अकबराचा नवा धर्म तर पाला पाचोळ्यासारखा भिरकावला गेलाच. पण उदारमतवादही त्यांनी क्रौर्याने दडपून टाकला.

अकबराच्या शेवटच्या आजारातच “इस्लाम बुडतो आहे” ही घोषणा त्याचे सरदार करू लागले. त्याचवेळी अकबराचा उत्तराधिकारी सलिमच्या समर्थकांनी, तो आग्र्याहून अलाहाबादला जायला निघाला असताना, त्याला अडवून त्याच्याकडून “सिंहासनारुढ होताच तो इस्लाम चे रक्षण करील” अशी शपथ घेतली.

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi5
indiaopines.com

अकबर हा खरोखर सहिष्णू होता का यासाठी आपण काही उदाहरणे पाहुयात.

१. अकबराच्या कारकिर्दीत एका काझीच्या तक्रारीवरून ईश्वराची निंदा करणाऱ्या एका एतद्देशीयास अब्दुन्नबीने ठार केले ( संदर्भ: Rel. Policy of M.Emp पृ. १४ )

२. अकबराचा लाहोर येथील गव्हर्नर हुसैन खान हा तर हिंदूंच्या बाबतीत कुप्रसिद्धच होता. त्याने आज्ञा केली की, हिंदूंनी आपल्या अंगरख्याच्या खांद्यावर वेगवेगळ्या रंगाची ठिगळे जोडावीत ( संदर्भ: उपरोक्त ) जेणेकरून ते काफीर दुरून ओळखू येतील!

त्यांना चूकूनही मुस्लिमांकडून आदराची वागणूक मिळू नये. हिंदूंनी घोड्यावर खोगीर टाकून बसू नये अशीही त्याची आज्ञा होती.

या सरदारांच्या वर्तणुकीवर अकबराने आक्षेप घेतलेला नाही.

३. स्वतः अकबराने इ.स.१५९३ पर्यंत अनेक काफिरांना बाटवून इस्लामची दिक्षा दिलेली होती ( संदर्भ: अकबरनामा, आयने अक, तारिख-ए-बदा.)

४. अकबराचा चरित्रकार बदायुनी हल्दीघाटच्या प्रसिद्ध लढाईत राजा मानसिंगाबरोबर सहभागी होता. त्या युद्धात दोन्ही बाजूने राजपूत लढत होते.

त्यामुळे त्याने असफखान नामक सेनानायकाला विचारले की, आपल्या पक्षाचे व राणाप्रतापच्या पक्षाचे राजपूत वेगळे कसे ओळखायचे? त्यावेळी असफखानाने उत्तर दिले की,

‘राजपूत कुठल्याही पक्षाचा असला तरी त्यास ठार मारल्याने इस्लामचा लाभच होईल!’

या सल्ल्यानुसार बदायुनीने सर्वदूर तीर सोडणे चालू केले. आपण इस्लामची सेवा करून एका ‘गाझी’ चे पुण्य अर्जित करतो आहोत या कल्पनेने तो हर्षित झाला होता. ( संदर्भ: मुगल राज सांस्कृ. इति.पृ.४९२)

५. इ.स.१५६७-६८ मध्ये अकबराने चितोडवर स्वारी केली. तेव्हा चितोडवर विजय प्राप्त होऊनही, केवळ राजपुतांनी कडवा प्रतिकार केला.

 

akbar 1 Inmarathi

 

या कारणावरून चिडून जाऊन त्याने सर्वसाधारण प्रजेच्या कत्ले-आम चा आदेश दिला. त्यानुसार त्याच्या डोळ्यांदेखत तीस हजार निर्दोष प्रजाजन कापले गेले.

चितोडच्या या सर्व हत्याकांडात जे राजपुत मारले गेले त्यांची जानवे अकबराने उत्सुकतेपोटी तोडून आणण्यास सांगून त्याचे वजन केले ते ७४|| मण ( चार शेरी) भरले. यावेळेसपासूनच राजस्थानात ७४|| हा अंक अशुभ समजला जाऊ लागला. ( संदर्भ: मुगल राज सांस्कृतिक इतिहास)

६. अकबराला एकदा अशीच लहर आली की, कुठलाही संस्कार न केला तर लहान अर्भकाची विचारसरणी पुढे कशी होईल हे तपासून पहावे! त्यासाठी त्याने नवजात वीस अर्भके त्यांच्या मातांकडून हिरावून आणली व एका खोलीत प्रयोगार्थ ठेऊन दिली.

तिथे तीनचार वर्ष ती कोंडून ठेवली गेली, दायांकडून त्यांना फक्त दुध पुरवले जाई. परिणामतः त्यातली बरीचशी मृत्यू पावली. जी थोडीफार जगली ती मुकी झाली.

(संदर्भ: तारिख – ए – बदा )

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात.  InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?