' लहानग्यांची भयप्रद स्वप्नं : काळजीचं कारण की वाढीचं लक्षण? पालकांनी काय करावं? – InMarathi

लहानग्यांची भयप्रद स्वप्नं : काळजीचं कारण की वाढीचं लक्षण? पालकांनी काय करावं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वय वर्षें तीन ते दहा मधील मुलांमध्ये मध्यरात्री एखादं वाईट स्वप्न पाहून उठायची सवय असते. अशी दुःस्वप्न ही प्रत्येक मुलाच्या वाढीच्या टप्प्याचा अविभाज्य भाग असतात आणि त्यामुळे बहुतेकदा हे काळजीचं कारण नसतं.

ही स्वप्नं लहान मुलांना घाबरवतात आणि त्यांना दचकून जागे करतात. ही काल्पनिक, भीतीदायक गोष्टींबद्दलची असू शकतात किंवा खऱ्या आयुष्यातील संकटांबद्दल असू शकतात.

जी लहान मुले अशा प्रकारच्या स्वप्नांतून जागी होतात, ती वास्तविक परिस्थिती स्वप्नांपासून वेगळी करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की जे स्वप्नात दिसलं ते प्रत्यक्ष घडलंय.

ती जसजशी मोठी होतात तसतशी त्यांना स्वप्न ही सत्य नसतात हे लक्षात यायला लागतं. बहुतेकदा लहान मुलांना भीतीदायक बाहुल्या किंवा मोठ्या सावल्यांची भीती वाटते. तर मोठ्या मुलांना खऱ्या आयुष्यातली संकटं उदाहरणार्थ मृत्यू, अपघात, हिंस्त्र प्राणी यांची स्वप्नं पडून भीती वाटते.

 

nightmare-inmarathi

तुमच्या मुलांनी दुःस्वप्न पाहिले आहे हे कसे ओळखाल ?

दुःस्वप्न यांची कित्येकदा भयानक स्वप्नांबरोबर गल्लत केली जाते. मुलं भयानक स्वप्नं किंवा night terrors रात्रीच्या सुरुवातीला बघतात जेव्हा ती नुकतीच झोपलेली असतात.

जी मुलं night terrors चा अनुभव घेत असतात ती झोपेतून पूर्णपणे जागी होत नाहीत पण अत्यंत संतापाने, उद्वेगाने किंवा खूप उत्तेजित होऊन रडत असतात. अशा वेळेस त्यांच्या हृदयाचे ठोके भीतीने वाढलेले जाणवतात.

Night terror मध्ये मुलांना रात्री काय स्वप्न पडले, कशाच्या भीतीने ती अस्वस्थ झाली हे आठवत नाही.

दुःस्वप्न ही शक्यतो रात्रीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात पडतात. ही झोपेच्या जलद डोळ्यांच्या हालचालींच्या काळात (Rapid Eye Movement sleep) पडतात. आपल्याला स्वप्नं ही या REM झोपेच्या काळात पडतात. दुःस्वप्न पाहिल्यानंतर मुलं दचकून उठतात आणि त्यांना शांत करावे लागते. पण त्यांना पडलेले वाईट स्वप्नं हे त्यांना झोपेतून जागे झाल्यावर नीट आठवते.

वाईट स्वप्नं केव्हा पडतात ?

मुलांना त्यांच्या आयुष्यातील काही भीती किंवा त्यांनी एखाद्या प्रसंगाचा घेतलेला धसका यांनी वाईट स्वप्नं पडू शकतात. ते एखाद्या काल्पनिक गोष्टीची भीती वाटून होऊ शकते किंवा लहान मुलाने एखादे भीतीदायक गोष्टीचे पुस्तक वाचले, भीतीदायक चित्रपट पाहिला किंवा झोपण्यापूर्वी एखादा भीतीदायक कार्यक्रम टीव्ही वर पाहिला तर त्याला असे दुःस्वप्न दिसू शकते.

 

children-inmarathi
huffingtonpost.com.au

अशा दुःस्वप्नांचा विषय शक्यतोवर त्या मुलाला किंवा मुलीला प्रत्यक्ष आयुष्यात काय अनुभवायला मिळते त्याच्याशी निगडित असतो. उदाहरणार्थ आई-बाबा हरवण्याची भीती. दुःस्वप्न ही कित्येक गोष्टींबद्दलची असू शकतात.

जसे की, प्राणी, काल्पनिक सजीव, मॉनस्टर्स, वाईट मुलं, ओळखीच्या जागा, आठवणीतील प्रसंग अशा कशाबद्दलही असू शकतात.

दुःस्वप्न पडण्याची कारणे :

दुःस्वप्न पडण्याचे निश्चित कारण अजूनतरी माहिती नाही. ती मुलाला अस्वस्थ करणाऱ्या, घाबरवणाऱ्या दिवसभरातील प्रसंगांमधून जन्मास येत असावीत. दुःस्वप्नांचा प्रकार, हा ते मूल, आयुष्यातील प्रगतीच्या कोणत्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून असू शकतो.

उदाहरणार्थ, बालवयातील मुलांना हरवल्याचे आणि आई बाबा सापडत नसल्याचे दुःस्वप्न पडू शकते तर किशोरवयीन मुलांना मृत्यूचे दुःस्वप्न पडू शकते. त्यामुळे दुःस्वप्नांची तीव्रता वयानुसार वेगवेगळी असू शकते.

दुःस्वप्न पाहिलेल्या तुमच्या मुलाला/ मुलीला शांत व्हायला अशी मदत कराल :

धीर द्या आणि आश्वस्त करा :

तुमचं मूल जर दुःस्वप्न पाहून उद्वेगाने उठलं तर त्याला कुशीत घ्या, थोपटा, किंवा त्याचा पापा घ्या. तुम्ही त्याच्या आसपास आहात आणि त्यांच्याबाबतीत तुम्ही काही वाईट घडू देणार नाही याबद्दल त्यांना आश्वस्त करा आणि पुन्हा त्यांना झोपायला लावा.

पुरेशी झोप मिळेल असे बघा :

जर तुमच्या बाळाची झोप अपुरी होत असेल तर ते अधिककरून दुःस्वप्नांना बळी पडते. त्यांना विशिष्ट रुटीन पाळायला लावा. त्यांना सांगा की त्यांनी रोज रात्री १० वाजता झोपलेच पाहिजे. काही दिवसांनी त्यांना तसे झोपायची सवय होईल आणि ती दचकून उठणार नाहीत.

स्वप्नाबद्दल बोला :

दिवसा तुमच्या मुलांशी त्यांना रात्री पडणाऱ्या स्वप्नांबद्दल बोला आणि त्यात सातत्य आहे का किंवा तेच स्वप्न वारंवार पडतंय का हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. यातून तुम्हाला तुमच्या मुलाला नेमक्या कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे समजायला सोपे जाईल. एकदा तुम्हाला करण समजले की तुम्ही त्यावर उपाय प्रभावीपणे शोधू शकाल.

जादूई शक्ती वापरा :

लहान मुलांना तुम्ही तुमच्या जादुई शक्तीमुळे त्यांचा संकटांपासून बचाव करू शकता असा विश्वास द्या. मॅजिक मॉन्स्टर स्प्रे वापरून तुम्ही मॉन्स्टर्स पळवून लावू शकता. दिवाणाखाली आणि खिडक्यांवर तो मारून तुम्ही मुलांना त्या भीतीतून बाहेर काढू शकता.

 

night-mare-inmarathi

 

मुलांना पुन्हा झोपायला मदत करा :

तुमचा आवाज हा मुलांना शांत करायला मदत करतो. त्यांना तुमच्या आश्वासक शब्दांनी धीर देऊन पुन्हा झोपायला लावा. तुमच्या मुलाच्या कपाळाची किंवा तळहाताची पापी घ्या जेणेकरून ते शांत होतील. त्यांना जी स्वप्नं पाहायला आवडतील अशा प्रकारच्या स्वप्नांबद्दल थोडं बोला आणि त्यांना पुन्हा एकदा झोपायला मदत करा.

संरक्षक कवच :

तुमच्या मुलाला झोपताना हातात धरायला एखादी गोष्टं द्या. तुम्ही त्यांना ब्लॅंकेट देऊ शकता किंवा एखादे खेळणे किंवा बाहुली देऊ शकता.

नाईटलॅम्प

बहुतेक मुलं काळोखाला घाबरतात. रात्री सावल्या किंवा रस्त्यावरची हलणारी झाडं त्यांच्या सावल्या, या मुलांना खूप भीतीदायक वाटतात. रात्रीच्या वेळी एखादा दिवा चालू ठेवला तर मुलांचे घाबरण्याचे प्रमाण कमी होते.

चांगली स्वप्नं पडावीत म्हणून काय कराल ?

वाईट स्वप्नं पडून जागी झालेली मुलं साहजिकच पुन्हा लवकर झोपत नाहीत. पण जर हे असे रोज घडत असेल तर मुलांना आवश्यक तेवढी झोप मिळत नाही. पुढील पद्धतीने तुम्ही वाईट स्वप्नं टाळू शकता आणि चांगली स्वप्नं पडायला प्रोत्साहन देऊ शकता.

झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ घालणे : याने तुमच्या मुलाला गाढ झोप लागायला मदत होऊ शकते.

 

dream-inmarathi

वाईट स्वप्नं पकडणारा ड्रीम कॅचर :

असा ड्रीम कॅचर मुलांच्या पलंगाच्या वर लटकवून तुम्ही तो सगळी वाईट स्वप्नं आपल्या मुठीत पकडतो आणि मुलांना चांगली स्वप्नंच पडतात असं मुलांना सांगू शकता.

चांगल्या गोष्टी वाचणं :

झोपेपूर्वी चांगल्या गोष्टी ऐकल्या की मुलांचा मूड सुधारतो आणि ती आनंदीपणे झोपी जातात. त्यामुळे त्यांना सकारात्मक स्वप्नं पडतात.

भीतीदायक कार्यक्रम बघू नका :

टीव्हीवरचे भीतीदायक कार्यक्रम बघणं टाळा. मुलांना मारहाणीचे, खुनाचे कोणतेही कार्यक्रम दाखवू नका. त्यांना भीती वाटेल अशा गोष्टी वाचायला देऊ नका किंवा सांगू नका. अशा गोष्टी किंवा असे कार्यक्रम त्यांना रात्री दचकवून उठायला लावू शकतात.

त्यांना कुशीत घेऊन चांगली स्वप्नं पडावीत यासाठी शुभेच्छा द्या. मुलांना झोपण्यापूर्वी काही काळ कुशीत घ्या. यामुळे ती चांगल्या मूड मध्ये झोपी जातील. तुमच्या स्पर्शामुळे ती आश्वस्त होतील.

डॉक्टरकडे जायची गरज कधी पडते ?

दुःस्वप्नं ही सर्वच मुलांना सामान्यपणे पडताना दिसतात. ती शक्यतोवर वाईट सिनेमा किंवा भीतीदायक टीव्ही शो, पुस्तकं यांच्या प्रभावामुळे पडतात.

पण जर तुमची मुलं यातलं काहीच न करता सुद्धा त्यांना वाईट स्वप्नं पडत असतील तर डॉक्टरांशी सल्लामसलत करणेच योग्य. पुढे काही प्रसंग सांगितले आहेत ज्यात तुम्ही डॉक्टरांना भेटणेच योग्य.

जर तुमचे मूल हे दर रात्री असे भीतीदायक स्वप्न बघत असेल तर, जर आयुष्यात आलेल्या एखाद्या संकटामुळे मुलाला सतत त्या प्रसंगाची आठवण होऊन स्वप्नं पडत असेल तर, जर तुम्ही वारंवार दिलेल्या आश्वासनांनंतरही तुमच्या मुलाला ती स्वप्ने पडतच असतील आणि ती त्याच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम घडवत असतील तर. अशा वेळी वेळ न दवडता डॉक्टर गाठणेच उत्तम!

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?