' दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त्यांच्या “आश्रमशाळा” : काल, आज आणि उद्या! – InMarathi

दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त्यांच्या “आश्रमशाळा” : काल, आज आणि उद्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : वैभव तुपे

(लेखक स्वतः आश्रमशाळा शिक्षक आहेत)

===

दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुलांनाही शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता यावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. आश्रमशाळा हि त्यातीलच एक योजना! राज्य शासनाकडून सध्या तीन प्रकारच्या आश्रमशाळा चालवल्या जातात.

अनु. जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावरून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा, अनु. जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा, आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा!

त्या त्या भागातील आदिवासी आणि विजाभज लोकसंख्येचा विचार करून स्वयंसेवी संस्थांना या आश्रमशाळा चालवायला दिल्या जातात. त्यासाठी त्यांना शासन स्तरावरून अनुदानही दिले जाते. गेल्या काही वर्षात बदलते शैक्षणिक धोरण आणि शासनाचीच नव्हे तर समाजाची एकूणच आश्रमशाळांप्रती असणारी अनास्था यामुळे बदलत्या शैक्षणिक वातावरणात आश्रम शाळांची अवस्था मात्र बिकट झाली आहे, होत आहे.

याची कारणं अनेक सांगता येतील, पण मुख्य कारण म्हणजे अनास्था! यंत्रणेची आणि समाजाचीही! योजना पुष्कळ चालवल्या जातात, पण प्रत्यक्षात त्याचं आउटपूट काय आणि किती हेही तपासून पाहिलं पाहिजे.

 

adiwasi-ashramshala-inmarathi
yputube.com

 

दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर बिकट झाला आहे, विशेषतः ग्रामीण भागात! त्यामुळे बहुतांश ठिकाणी आश्रम शाळांमध्ये मुलाना पाणी मिळणे दुरापास्त होते. काही ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आणि पाणीच नसेल तर निवासी विद्यार्थी राहणार तरी कसे? सन्माननीय अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी भौतिक सुविधांची वानवा पहायला मिळते.

अक्षरशः पत्र्याच्या शेड मध्ये आश्रमशाळा भरतांना काही ठिकाणी दिसतात, अशा मुलभूत भौतिक सुविधा सुध्दा नसलेल्या आश्रम शाळांना विद्यार्थी मिळणार तरी कसे? आणि मिळाले तरी टिकणार कसे?

अर्थात सरसकट सगळ्याच आश्रमशाळा अशा आहेत असे मुळीच नाही. या सगळ्या प्रश्नांवर मात करून पाण्याच्या समस्येवर पर्जन्य जल संवर्धन, शेततळे यासारख्या सोयी करून वर्षभर पाणी मिळवणाऱ्या, लाखो रुपये खर्च करून विकत पाणी घेणाऱ्या आणि विजेच्या समस्येवर सौर उर्जा साधनांचा तोडगा काढणाऱ्या सुध्दा आश्रमशाळा सन्माननीय अपवाद म्हणून आहेतच! पण अशांची संख्या फारच कमी आहे.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शैक्षणिक अनास्था! आश्रम शाळा म्हटले की “यांचाकडे काय गुणवत्ता असणार? मुलांना खायला घातलं की झालं!” अशी एक मानसिकता केवळ समाजाचीच नाही तर यंत्रणेची सुद्धा होवून बसली आहे. शासनाची धोरणे सुद्धा फक्त भौतिक सुविधांची पडताळणी करणारी आहेत. शैक्षणिक बाबींकडे फारसं कटाक्षाने लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे एकूणच यंत्रणेची सुस्तावल्यासारखी अवस्था झाली आहे.

 

school-inmarathi
deshdoot.com

 

सध्या अगदी खेडोपाडी सुद्धा इंग्रजी शाळांचे लोण पसरले आहे. अर्थात अशा इंग्रजी शाळांची गुणवत्ता किती हा वेगळा विषय असला तरी यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे एवढं मात्र नक्की!

इतकेच काय, गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद शाळांचे स्वरूपही ज्या पद्धतीने बदललं जातंय ते पाहता स्पर्धा तगडी आहे आणि आश्रम शाळांसमोर अनेक तगडी आव्हानं आता उभी राहिली आहेत हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. यामुळे आश्रम शाळांसमोर अनेक मोठी आव्हानं आता उभी ठाकली आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा आता गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. आता तर पोषण आहाराच्या माध्यमातून एकवेळ जेवण सुद्धा दिले जाते. शिवाय वस्तीशाळांच्या संकल्पनेमुळे आता खेडोपाडीच नाही तर अगदी वाड्या वस्त्यांवरही जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या आहेत.

घराशेजारीच नाही तर अगदी शेतात सुद्धा शाळा असेल तर कोणते पालक आपल्या मुलांना आश्रम शाळेत पाठवतील? आणि पालकांनी का म्हणून आपल्या मुलांना आश्रम शाळेत पाठवावे?

या प्रश्नाचं ठोस उत्तर ज्या आश्रमशाळेकडे आहे त्याच आश्रम शाळा आता यापुढे तग धरून राहतील. आणि या प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे, गुणवत्ता! सर्वच बाबतीत!

आश्रम शाळा खाजगी असो वा शासकीय, चांगल्या भौतिक सुविधांसोबतच खेळीमेळीचे सौहार्दपूर्ण वातावरण आणि बाहेरच्या शाळांना तोडीस तोड असं गुणवत्ता पूर्ण शिक्षण इथेही दिलं जातं, हे जोपर्यंत पालकांना पटणार नाही तोपर्यंत कुठलाच पालक आपल्या पाल्याला आश्रम शाळेत पाठवणार नाही.

पूर्वी अपत्यांची संख्या जास्त असे, त्यामुळे साहजिकच मुलांना आश्रमशाळेत पाठवले जात असे. हल्ली दोन-तीनच अपत्य असतात, त्यामुळे मुलांनी निदान प्राथमिक शिक्षण तरी आपल्या सोबत राहूनच घ्यावं अशी पालकांचीही इच्छा असते.

त्यामुळे आता अगदीच नाईलाज आणि शेवटचा पर्याय म्हणून मुलांना आश्रम शाळेत पाठवले जाते. साहजिकच आश्रम शाळाची पटसंख्या झपाट्याने कमी होतांना दिसत आहे.

भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आश्रम शाळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही ठिकाणी आश्रम शाळा ज्या परिसरात आहे त्या परिसरात भटक्या विमुक्त जाती जमातींची लोकसंख्याच नाही! सगळे इतर जाती जमातीचे लोक! मग अशा शाळांना विद्यार्थी मिळणार तरी कसे आणि कुठून? या बाबींचा विचार केला जात नसल्याने आज पटसंख्येअभावी अनेक भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

 

bpl-school-inmarathi
bhaskar.com

 

आणि एकदा का शाळा बंद पडली की मग ती कायमची बंद होते किंवा मग अन्य ठिकाणी स्थलांतरित होते. क्वचित प्रसंगी दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरितही होते.

अशा स्थितीत आश्रम शाळा टिकवायच्या असतील तर आश्रम शाळेशी संबंधित प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक बदल होणं गरजेचं आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर चांगल्या भौतिक सुविधांबरोबरच तितक्याच चांगल्या दर्जाचं, किंबहुना खाजगी शाळांपेक्षा काकणभर सरस असं शिक्षण आश्रम शाळांना देता आलं पाहिजे.

पालकांनी आपल्या मुलांना आनंदाने आश्रमशाळेत पाठवावं असं वातावरण आश्रम शाळांमधून निर्माण झालं पाहिजे, आश्रमशाळांना ते निर्माण करता आलंच पाहिजे! तरच मुलं आश्रमशाळांमध्ये येतील आणि टिकतील सुद्धा!

चांगले सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणणं, चांगलं शैक्षणिक वातावरण आश्रमशाळांमधून निर्माण करणं हि आश्रम शाळेच्या प्रत्येक घटकाची नुसती जबाबदारीच नाही तर गरज सुद्धा आहे. शेवटी मुलं टिकली तर आश्रम शाळा टिकतील आणि आश्रम शाळा टिकल्या तर आणि तरच कर्मचारी टिकतील! नाहीतर “थांबला तो संपला!” हा सृष्टीचा नियम आहेच! आणि आपल्याला “थांबवण्यासाठी” आणि पर्यायाने “संपवण्यासाठी” अनेक घटक टपून बसलेले आहेतच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?